कर्करोगाशी झुंज देणाऱ्या 'यश'चा अखेर मृत्यू
मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीत कर्करोगाशी झुंज देणाऱ्या 'यश' नामक वाघाचा अखेर मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीची त्याला दुर्मीळ असणाऱ्या स्नायूच्या कर्करोगाचे निदान झाले होेते. कर्करोगाशी संबंधित असणाऱ्या समस्या आणि अवयव निकामी होत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या वाघाला युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दत्तक घेतले होते.
गेल्या ११ वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र सफारीत नांदणाऱ्या 'यश' वाघाची कर्करोगाशी सुरू असलेला संघर्ष मंगळवारी सायंकाळी संपला. 'यश'चा जन्म २००८ मध्ये राष्ट्रीय उद्यानातच 'बसंती' वाघिणीच्या पोटी झाला होता. गेल्या वर्षभरापासून ओठावर येणाऱ्या गाठीमुळे तो त्रस्त होता. गेल्यावर्षी जून महिन्यात यशच्या ओठावर 'ग्रन्युलोमा' गाठ आली होती. या गाठीवर शस्त्रक्रिया करुन ती काढण्यात आली. परंतु, मार्च महिन्यात पुन्हा एकदा या वाघाच्या खालच्या ओठावर डाव्या बाजूला गाठ निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी देखील शस्त्रक्रिया करुन ४०० ग्रॅमची गाठ काढण्यात आली. या गाठीची तपासणी करण्याचे काम 'मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालया'तील रोगनिदानतज्ज्ञांना देण्यात आले होेते. या गाठीची तपासणी केल्यानंतर या वाघाला 'रबाॅडोमोसोर्सकोमा' या दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाल्याचे उघड झाले.
'यश'चे जतन
'यश' मृत्य़ूमुखी पडला असली तरी 'टॅक्सीडर्मी'च्या माध्यमातून पर्यटकांसाठी तो सदैव जिवंत राहणार आहे. टॅक्सीडर्मीस्ट डाॅ. संतोष गायकवाड यांच्या मार्फत 'यश'च्या कातडीवर 'टॅक्सीडर्मी'ची प्रक्रिया करुन त्याचे जतन केेले जाणार आहे. यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या 'बाजीराव' नामक वाघावर टॅक्सीडर्मी करण्यात आली नव्हती. कारण त्याचे कातडे टॅक्सीडर्मी करण्यायोग्य राहिले नव्हते.
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat