सावरकरांनी योजनाबद्धरित्या स्वातंत्र्याचा लढा दिला : पार्थ बावस्कर

    28-May-2019
Total Views |



दै. मुंबई तरूण भारत प्रकाशित कालजयी सावरकर या विशेषांकांचे अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते अभिनव भारत मंदिर, नाशिक येथे अर्पण करण्यात आले. यावेळी दै. मुंबई तरूण भारतचे वर्गणीदार योजनेचे प्रमुख शिरीष सोनवणे आणि सावरकरप्रेमी उपस्थित होते.


नाशिक :स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी स्थापलेल्या 'अभिनव भारत' या संघटनेच्या माध्यमातून योजनाबद्धरित्या भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिला,” असे प्रतिपादन सावरकर साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी केले. ते काल दि. २८ रोजी भगूर येथे भगूरपुत्र स्वा. सावरकर समूह आणि स्वा. सावरकर समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सावरकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी 'सावरकर : तरुणांचे स्फूर्तीस्थान' या विषयावर बोलत होते. यावेळी भगूर येथील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना बावस्कर म्हणाले की, “अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून स्वा. सावरकर यांनी समाजातील गुणी, हुशार आणि देशभक्त तरुणांचे संघटन उभे केले होते. स्थापनेवेळी अभिनव भारत संघटना म्हणजे लोकांचे खून करणे, मारामारी करणे अशा स्वरूपाचे कार्य करणारी संघटना आहे, असे चित्र लोकांच्या मनात निर्माण करण्यात आले होते. तसेच, अशाच स्वरूपाचे कार्य करून ही संघटना वाढत गेली, असे चुकीचे मत आपल्या काही इतिहासकरांनी मांडले आहे.” मात्र, वास्तव आणि सत्य वेगळे असल्याचे सांगताना बावस्कर म्हणाले की, “स्वातंत्र्यप्राप्तीच्या हेतूने त्या काळात जेव्हा भगूर, नाशिक आणि पुणे या तीन शहरांमध्ये ज्या क्रांतिकारक संघटनेची बीजे रोवली गेली, त्या संघटना पुढे जागतिक पातळीवर उत्तम आणि वेगळे कार्य करू शकल्या,” असे मत यावेळी बावस्कर यांनी मांडले.

 

यावेळी पुढे बोलताना बावस्कर म्हणाले की, “अभिनव भारत या संघटनेचा पाया हा समाजातील तरुणवर्ग होता. तसेच, अभिनव भारत संघटनेपूर्वी भारतात सशक्त अशी संघटना नव्हती.” अशा स्वरूपाचे लिखाण स्वा. सावरकर यांनी केले असल्याचे सांगताना बावस्कर यांनी अभिनव भारत संघटनेची गरज का वाटली, याची मांडणी स्वा. सावरकरांच्याच शब्दात यावेळी केली. तसेच, अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून स्वा. सावरकर यांनी तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना दिली असल्याचे प्रतिपादनही बावस्कर यांनी केले. या संघटनेच्या माध्यमातून स्वा. सावरकर यांनी व्यक्तीचा चहू अंगांनी विकास कसा केला, याची सोदाहरण मांडणी बावस्कर यांनी केली.


बावस्करांनी अभिनव भारत संघटनेच्या स्थापनेचा मागोवा घेताना सांगितले की, “या संघटनेचे बीज भगूरमध्ये पेरले गेले, नाशिकमध्ये ही कल्पना वाढू लागली, त्यानंतर पुण्यामध्ये स्वा. सावरकरांच्या संकल्पनेला योग्य ती दिशा मिळाली आणि लंडनमध्ये त्याची फलश्रुती झाली.” गेल्या ७० वर्षांत स्वा. सावरकर यांच्याबाबत चुकीचा इतिहास थोपविण्याचा प्रकार झाल्याचे सांगताना स्वा. सावरकर यांच्याइतक्या योजनाबद्ध स्वातंत्र्यासाठी लढणारे या देशात कोणीही नव्हते, असे सांगून त्यांचा इतिहास ७० वर्षांनंतर माहीत होत आहे, हे दुर्दैव असल्याची खंतदेखील बावस्कर यांनी यावेळी व्यक्त केली. स्वा. सावरकर हे अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास कसे साधत, हे स्पष्ट केले.



 

भगूर : स्वा. सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर (नाशिक) येथे दै.‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कालजयी सावरकर’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना पार्थ बावस्कर (पुणे), विहिंपचे एकनाथ शेटे, रामदास आंबेकर आणि योगेश कापसे, विलास वहाने, उपसंपादक प्रवर देशपांडे, नाशिक जिल्हा प्रचारप्रमुख उपस्थित होते.


 

भगूर नगर परिषदेत झाले 'कालजयी सावरकर विशेषांका'चे प्रकाशन

दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वतीने स्वा. वि. दा. सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी व सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख समाजमनास व्हावी, या हेतूने काल दि. २८ मे रोजी 'कालजयी सावरकर' हा विशेषांक मुद्रित करण्यात आला होता. स्वा. सावरकर यांची जन्मभूमी असणार्‍या भगूर येथे या अंकाचे प्रकाशन भगूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'च्या विशेषांकाचे कौतुक केले. तसेच, आजच्या काळात स्वा. सावरकर यांचे विचार माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी स्वा. सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी भगूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 



दै. 'मुंबई तरूण भारत'च्यावतीने स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर जयंतीनिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या 'कालजयी सावरकर' या विशेषांकाचे प्रकाशन करताना भगूर नगरपरिषद येथे भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, नगरपरिषदेचे नगरसेवक, दै. 'मुंबई तरूण भारत'चे उपंसपादक प्रवर देशपांडे, रा. स्व. संघाचे नाशिक शहर प्रचार प्रमुख डॉ. मृत्यूंजय कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat