सावरकर हे मुसलमान किंवा इस्लामद्वेष्टे होते, असा मोठा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. सावरकरांनी मुसलमानांना वगळण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या केली, त्यांना त्यांच्या हिंदुुराष्ट्रात मुसलमानांसह अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे दुय्यम स्थान द्यायचे होते, त्यांना हिंदूंचा बहुसंख्यावाद अल्पसंख्याकांवर लादायचा होता, अशाप्रकारचे आरोप सावरकरांवर केले जातात.
सावरकर आणि शिया मुसलमान
१९३९ मध्ये लखनौमधील शिया मुसलमानांनी गोवधबंदी व मशिदीवरून वाद्य वाजविण्यास संमती, या हिंदूंच्या मागण्या आपणहून मान्य केल्या होत्या. त्यावर सावरकरांनी पत्र पाठवून या शियांच्या खर्या राष्ट्रीय वृत्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार मानले होते. सावरकर त्या आभारपत्रात म्हणतात की, ”उलटपक्षी हिंदू सभा अत्यंत द्वेषातीतपणे आपल्या शिया सहकारी देशभक्तांच्या धार्मिक भावनांना मान देईल. ही त्यांची उदार वृत्ती महासभेला स्वागतार्ह असून, सार्वजनिक मार्गावरून वाद्ये वाजविणे हा नागरिक स्वातंत्र्यातील अंतर्भूत अधिकार असला तरी केवळ अहिंदूंना खिजविण्यासाठी मशिदीपुढे उभे राहून मुद्दाम वाद्य-घोष हिंदू समाज करणार नाही, अशा प्रकारचा ती प्रयत्न करील. या शियापंथीयांनी अनुसरलेल्या राष्ट्रीय वृत्तीशी सहकार्य देण्यास हिंदू सभा संपूर्णत: तयार आहे; नव्हे, अशा राष्ट्रीय व न्यायप्रिय बंधूंशी सख्यत्व ठेवण्याची तिची तीव्र इच्छा आहे. अशा प्रकारे समान एकीची भूमिका स्वीकारण्यास जेव्हा बाकीचे हिंद्वेतर तयार होतील, त्याचवेळी हिंदुराष्ट्रात हिंदू-अहिंदूंची राष्ट्रीय एकी निर्माण होईल.” (केसरी, दि. १ ऑगस्ट १९३९) सावरकर येथे शिया मुसलमानांचा उल्लेख ‘देशभक्त, राष्ट्रीय वृत्ती, राष्ट्रीय व न्यायप्रिय बंधू’ असा करत आहेत, याची नोंद घेणे आवश्यक आहे. सावरकरांचा न्याय्य एकीला कधीच विरोध नव्हता. अन्याय्य तुष्टीकरणाला आणि एकीसाठी होणार्या व्यवहाराला, सौदेबाजीला सावरकरांचा विरोध होता.
या शियापंथीयांनी हिंदू महासभेचे सभासद होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेबद्दल त्यांचे आभार मानून सावरकर म्हणाले, ‘’शिया मुसलमानांच्या संबंधात हेतुत: प्रक्षोभ करण्यासारखे वर्तन हिंदूंकडून घडणार नाही. एवढेच नव्हे, तर त्यांचे न्याय्य अधिकार नि मानण्या मान्य केल्या जातील. हिंदुस्थानला जे केवळ जन्मभूमी नव्हे, तर धर्मभूमी, पुण्यभू नि पितृभू मानतात, त्या सर्वांना आम्ही ‘हिंदू’ समजतो. आपण जोवर हिंदुस्थानला पुण्यभूमी मानत नाही, स्वत:ला ‘हिंदू’ म्हणवित नाही, तोवर काही व्यावहारिक कारणांसाठी आपणाला हिंदू सभेचे सभासद करून घेणे हे हितावह नाही. परंतु, राष्ट्रीय प्रश्नात आपण सहकार्याने कार्य करू शकू.” (ऐतिहासिक निवेदने, पृष्ठ १९) ”जोवर या हिंदुस्थानात केवळ मुसलमान, ख्रिश्नन वा पारशी यांच्या संस्था आहेत, तोवर तरी केवळ हिंदूंसाठी अशी एक तरी हिंदू संस्था हवी. याच हेतूने हिंदू महासभा स्थापन झाली, वाढविली आणि हिंदू एकात्मता नि शक्ती यांचे केंद्र बनली. केवळ शासनातील काही अधिकारपदांच्या फसव्या मोहाने हे स्मृतिमंदिर भग्न करू नका.” (उपरोक्त, पृष्ठ १५४) असे सावरकरांचे धोरण होते. केवळ हिंदूंच्या न्याय्य आणि नागरी हितासाठी लढणारा एक राजकीय पक्ष असावा, असे सावरकरांचे राजकीय धोरण होते. ‘’मुस्लीम लीग आहे, तोपर्यंत हिंदूंची संघटना राहणारच, काँग्रेस ही राष्ट्रीय सभाच राहावी, अशी माझी इच्छा आहे. तिला हिंदू सभा करावयाचे नाही.” (समग्र सावरकर वाङ्मय ससावा- खंड ४, पृष्ठ ३५७) काँग्रेसच्या धोरणावर, ती ‘राष्ट्रीय’ नाही म्हणून टीका केल्यावर सावरकरांनी काँग्रेसला सांगितले की, “एक तर राष्ट्रीय व्हा, नाहीतर हिंदुत्वनिष्ठ व्हा. (केसरी दि. ११ नोव्हेंबर १९४१) पण, हे धोरण असणारे सावरकर मुसलमानांच्या ’न्याय्य अधिकार नि मागण्या मान्य केल्या जातील’ असे वरील पत्रकात स्पष्टपणे म्हणतात, हे महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्या न्याय्य अधिकारांसाठी इतरांच्या न्याय्य अधिकारांवर गदा आणणे किंवा हिरावून घेणे त्यांना मान्य नव्हते.‘’मुसलमानांना अल्पसंख्याकांचे योग्य ते हक्क द्यावेत, त्याला कोणीच विरोध करणार नाही.‘’(उपरोक्त, पृष्ठ ३५७) असे म्हणणारे सावरकर मुसलमान किंवा अहिंदू अल्पसंख्याकांना त्यांचे न्याय्य अधिकार देत नव्हते, हा आरोप किती खोटा आहे हे दिसून येते.
सावरकर असेही म्हणतात, ”तरी यातून उत्तम मार्ग म्हणजे शियापंथीयांनी व हिंदू महासभेने आपापली स्वतंत्र संघटना, सोईच्यादृष्टीने निर्माण करून त्यांनी शक्य त्या मतैक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन कार्य करावे. एकराष्ट्रीयत्व व वास्तव्याचा एक देश या भूमिकेतून असे करणे हितावहच आहे.” (केसरी, दि. १ ऑगस्ट १९३९) म्हणजे सावरकर मुसलमानांचा एकराष्ट्रीयत्वात समावेश करत होते, हेच यावरून सिद्ध होते.
“दसर्याचे दिवशी राणे वकील, सीतारामपंत पटवर्धन, खातू आणि सावरकर इत्यादी मंडळी हिंदू सभेचे वतीने रत्नागिरी येथील प्रमुख मुसलमान पुढार्यांचे घरी आपला देशबंधुत्वाचा प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी सोने द्यावयास गेली होती. प्रत्येक मुसलमानी पुढार्यांचे घरी त्यांनी हिंदू संघटन हे आपल्या मुसलमान देशबंधूंशीही न्याय्य रीतीने आणि प्रेमानेच कसे वागू इच्छित आहे, हे समजाऊन दिले. रत्नागिरीच्या मुसलमान पुढार्यांनीही त्यांचे चांगले स्वागत केले. नंतर त्यांनी ख्रिश्चन मिशनमध्येही जाऊन मुख्य मि. वायली यांच्याशी त्याच अर्थाचे संभाषण केले. ’सर्व भत हिते रति:’ हे हिंदू धर्माचे ध्येय आहे. परधर्माचा हिंदू धर्म कधीही द्वेष करीत नसून आपले ख्रिश्चन, मुसलमान आणि इतर बंधू जे अधिकार न्याय्य म्हणून उपभोगू इच्छितात, तेच हिंदूंसही उपभोगिता यावे, इतकीच हिंदू संघटनांची इच्छा आहे, असे सांगून मिशनमधील ख्रिस्ती पुढार्यांसही त्यांनी सोने वाटले.” (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत- खंड १, पृष्ठ १४)
सावरकरांना १९२० ला अंदमानात तेलकोठाराचे व्यवस्थापक किंवा नराग्रणी (फोरमन) म्हणून नेमण्यात आले होते. (ही नेमणूकही फार उशिरा झालेली होती, सावरकरांपेक्षा अल्पशिक्षित बंदिवान याआधीच मोठमोठे ’बाबू’ होऊन अधिकार गाजवत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.) बंदिवानांचं तेल मोजून घेणे, तेल कामावर देखरेख ठेवणे, बंदिवानांना मारणे, बंदिवानांमध्ये होणार्या तेलचोरीवर निर्णय घेणे, तेल कमी भरल्यास शिक्षा करण्याचा अधिकार असे महत्त्वाचे अधिकार फोरमनला असत. त्यामुळे पूर्वी राज्यबंद्यांच्या छळात सगळ्यांच्या पुढे होण्यात चढाओढ करणारे मुसलमान पेटी ऑफिसर येऊन अगदी नम्रपणे हात जोडून, सलामच नाही तर हात जोडून, सावरकरांची विनवणी करीत की, ”बडे बाबू, अब जान बचाना ” यावर त्यांना सावरकर म्हणत, ”तुम्ही मुसलमान म्हणून कोणाला माझ्यापासून त्रास होईल, ही भीती सोडून द्या. तुम्ही कोणा हिंदू बंदीस त्रास देऊ नका म्हणजे झाले. कोणाची कवडीही मला नको. केवळ शक्य तितके करून आपले काम नीट करीत जा. मग थोडे तरी मी बघून घेईन. परंतु, जर तुम्ही मी हिंदू म्हणून कोणी कटाने काम कमी कराल किंवा पूर्वीप्रमाणे हिंदू लोकांस पीडा द्याल किंवा पैसे उकळू पाहाल तर मात्र ध्यानात धरा!” (माझी जन्मठेप, पृष्ठ ४२०) काही जुन्या पठाणांनी वरिष्ठ अधिकार्यांपाशी अशी भीती व्यक्त केली की, “अब तो पोर्ट ब्लेअरमें हिंदुराज है. त्यामुळे आमच्यावर खोटे खटले भरतील.” त्यावर सावरकर लिहितात, ”ज्या वेळेस यांचे ’पठाण राज’ होते, तेव्हा हिंदूंना असे खोटे खटले करून निष्कारण छळण्याची ज्यांना खोड होती, त्यांच्यापैकी या अवशिष्ट शिष्टांना आता हिंदूही तेच करतील, अशी भीती वाटणे हे त्यांच्याच दुष्टतेचे प्रतिबिंब होते, हिंदूंच्या नव्हे. कारण, हिंदूंनी निष्कारण कोणास मुसलमान म्हणून छळले नाही; इतकेच नव्हे तर समंजस आणि धर्मवेडापासून अलिप्त असलेल्या मुसलमान बंधूस आम्ही शेवटपर्यंत पाठिंबाच देत असून, शिकवीत असून आणि आमच्या वशिल्याने होईल तितके कल्याणच करवीत असू. त्यांतील कित्येकांचे अर्ज लिहिले असतील; कित्येकांच्या कामात साह्य देवविले असेल.” (उपरोक्त, पृष्ठ ३८१) सावरकरांचे अंदमानातील टीचभर हिंदू राज्य हे असे होते. सावरकरांनी अंदमानात मुसलमानांनाही शिक्षण दिले आहे, त्यांच्यातही साक्षरतेचा प्रचार केला आहे. येरवडा तुरुंगात हिंदू-मुसलमान राजबंदी एकत्र करून ’एकीची’ व्याख्या आणि स्वतंत्र हिंदुस्थानची घटना यावर चर्चा घडवली होती.
हिंदुत्व, हिंदुराष्ट्र
मूळात ‘हिंदुत्व’ ही ’हिंदू कोण?’ची व्याख्या आहे. ‘हिंदुत्व’ ही भारतीय नागरिकत्वाची किंवा देशभक्तीची व्याख्या नाही. हिंदुत्वाच्या कक्षेत न येणारे मुसलमान व इतर अहिंदू हे भारतीय नागरिक व देशभक्त आहेत. ते हिंदू नाहीत, पण भारतीय आहेत. फक्त मुसलमान वगळले गेले नाहीत, ख्रिश्चन, पारशी व ज्यू हेही वगळले गेलेत. मुसलमानांना किंवा अहिंदूंना सावरकरांनी नागरिकत्व नाकारलेले नाही किंवा ते देशभक्त नाहीत, असेही सावरकर कुठे म्हणालेले नाहीत. हिंदुराष्ट्रात हिंदूंना जे अधिकार दिलेले आहेत, तेच इतर सर्व अहिंदूंनाही दिलेले आहेत आणि सावरकरांनी तसे हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून आणि वेळोवेळी स्पष्ट सांगितले आहे. हिंदू महासभेच्या निवडणूक घोषणापत्रातही तसे स्पष्ट नमूद केले आहे.
‘हिंदुराष्ट्र’ म्हणजे काय? त्यात अल्पसंख्याकांचे स्थान काय?
‘’हिंदू संघटनवादी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार सर्व नागरिकांना समान अधिकार नि कर्तव्ये राहतील. मग त्यांची जात, पंथ, वंश वा धर्म कोणतेही असोत, मात्र त्यांनी या हिंदुस्थानच्या राज्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आणि कृतज्ञ राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. भाषण, विचार, धर्म नि संघ इत्यादी संबंधीचे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना सारखेच उपभोगता येतील. हिंदुस्थानची भावी राज्यघटना या व्यापक तत्त्वांवर आधारण्यात येईल. सामान्य हिंदी राष्ट्राच्या वाढीशी हिंदुराष्ट्राची कल्पना कोणत्याही प्रकारे विसंगत नाही. कारण, या हिंदी राष्ट्रात सर्व पंथ, उपपंथ, वंश, जाती, धर्म नि संप्रदाय, हिंदू, मुसलमान, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन इत्यादी सर्वांना एका राजकीय घटनेत, समानतेने नि सलगपणे एकत्रित करता येईल, अशा प्रकारचे संयुक्त हिंदुस्थानी राज्य हे हिंदी राष्ट्र होय.” (ससावा- खंड ६, पृष्ठ ३६५-३६६) म्हणजे सर्व भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार दिलेले असून पंथ, उपपंथ, वंश, जाती, धर्म नि संप्रदाय यावरून कुठेही भेदभाव केलेला नाही.
‘’ते हिंदी राज्य मात्र, निर्भेळ हिंदीच असू द्या. त्या राज्याने मताधिकार, नोकर्या, अधिकाराची स्थाने, कर यांच्या संबंधात धर्माच्या नि जातीच्या तत्त्वांवर कसल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना मुळीच थारा देऊ नये. कोणताही मनुष्य हिंदू आहे की, मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू आहे, इकडे लक्षच दिले जाऊ नये. त्या हिंदी राज्यातील सर्व नागरिक सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणानुसार वागविले जाऊ द्यात. कोणतीही जाती किंवा पंथ, वंश किंवा धर्म विचारांत न घेता एक मनुष्य, एक मत असा सर्वसामान्य नियम होऊ द्या. अशा स्वरूपाचे हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल तर हिंदू संघटनवादी स्वतः हिंदू संघटनाच्याच हितार्थ त्या राज्याला अंतःकरणपूर्वक पहिल्याने आपली निष्ठा अर्पितील. मी स्वतः व मजप्रमाणेच सहस्रो ’हिंदू महासभावाले’ यांनी आपल्या राजकीय चरिताच्या प्रारंभापासून अशा हिंदी राज्याचा आदर्श आमचे राजकीय साध्य म्हणून सतत दृष्टीपुढे ठेविलेला आहे आणि आमच्या जीविताच्या अंतापर्यंत त्याच्या परिपूर्तीकरताच संघर्ष करणे आम्ही चालूच ठेवणार.” (ससावा- खंड ६, पृष्ठ २९०) सावरकरांनी धर्म, वंश, जात, पंथ यावरून भेदभाव केला जाणार नाही, असे सांगून सर्व मानव एकसमान म्हणजे मानवतेचा पुरस्कार केला आहे.
ब्रिटिश गृहखात्याच्या गोपनीय अहवालातील नोंद पाहणेही आवश्यक आहे. २१ ऑक्टोबर, १९३९ ला रात्री ९.२५ वाजता परळ नवरात्र उत्सवात १५०० लोकांसमोर (ज्यात ५०० महिला होत्या) सावरकरांनी ’हिंदूंची सद्यस्थिती व कर्तव्ये’ या विषयावर मराठीत भाषण दिले. त्याची नोंद पुढीलप्रमाणे- ’‘त्यांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी या सर्व भारतीयांना राजकीय, सामाजिक, नागरी आणि धार्मिक क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत, हे त्यांचे राजकीय उद्दिष्ट होते. त्यांचा दोष केवळ हाच होता की, मुस्लीम जातीयवादाची भूक शमवण्यासाठी हिंदूंनी राजकीय, सामाजिक, धार्मिकदृष्ट्या पंगू बनू नये, असे त्यांना वाटत होते. त्यांनी खर्या आदर्श राष्ट्रवादाचे समर्थन केले आणि ‘जगा व इतरांना जगू द्या,’ ही त्याची तत्त्वे होती. इतर समुदाय जे मागत आहे, त्यापेक्षा अधिक ते काही मागत नाहीत म्हणजे थोडक्यात ते काहीच मागत नाहीत. हिंदू महासभेला राष्ट्रविरोधी म्हणून धिक्कारणे साफ चुकीचे आहे.” (Home Department confidential report, File no.60-D (h) - F 169/257- 120148-6- S-259-27-259) यावर विशेष भाष्याची आवश्यकता नाही.
‘’आपण हिंदू आहोत किंवा हिंदी लोकसंख्येमध्ये इतर अहिंदू वर्गातील देशबांधवांपेक्षा केवढी तरी आपली बहुसंख्या आहे, या विशेष कारणांच्या बळावर हिंदी नागरिक या नात्याने प्राप्तव्य असेल त्याहून काहीही अधिक हिंदू मागत नाही.” (हिंदुराष्ट्रदर्शन, पृष्ठ २९०) “आम्ही हिंदू या देशात यद्यपि प्रचंड बहुसंख्येने आहोत; तथापि हिंदुजगतासाठी म्हणून आम्ही कोणतेही विशेषाधिकार मागत नाही.” (उपरोक्त, पृष्ठ २९४) सावरकर बहुसंख्याकांसाठी जे अधिकार मागत होते, तेच अल्पसंख्याकांना देत होते, कोणालाही संख्याबळानुसार विशेषाधिकार देत नव्हते व काढूनही घेत नव्हते.
“अल्पसंख्याकांचा धर्म, संस्कृति नि भाषा, त्यांच्या संरक्षणाची हमी आम्ही त्यांना केव्हाही देऊ, पण तद्वतच आपलाही धर्म, संस्कृति नि भाषा रक्षिण्याच्या हिंदूंच्या समान स्वातंत्र्यावर त्यांचे होणारे कोणतेही अतिक्रमण आम्ही यापुढे सहन करणार नाही. जर अहिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण व्हावयाला पाहिजे, तर हिंदुस्थानातील कोणत्याही अतिक्रामक अल्पसंख्याकांपासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण निश्चितपणे झालेच पाहिजे.” (ससावा- खंड ६, पृष्ठ २९८) सर्व धर्माच्या लोकांना धर्मपालन व धर्मसंरक्षण करायचा अधिकार दिला आहे.
भारतीय राज्यघटना व सावरकरांनी वर्णिलेले ‘हिंदुराष्ट्र’ यात कायदेशीरदृष्ट्या काय फरक आहे? सावरकरांची ‘हिंदुराष्ट्र’ संकल्पना धर्मनिरपेक्ष किंवा इहवादी भारतीय राज्यघटनेच्या/संविधानाच्या विसंगत नाही. म्हणजेच, सावरकरांचे ‘हिंदुराष्ट्र’ हे इहवादी व धर्मनिरपेक्षच आहे. आम्हाला ‘हिंदुराष्ट्र’ निर्माण करायचे आहे, आमच्या स्वप्नातील हिंदुराष्ट्राचे निर्बंध वेगळे असतील, असे सावरकर कधीही म्हणाले नाहीत. कारण, आजचा भारत व भारताचे संविधान हेच सावरकरांचे ‘हिंदुराष्ट्र’ आहे. तसेच सावरकरांचा ’भारत’ शब्दालाही आक्षेप नाही, आपण जसे भारताला ‘हिंदुस्थान’ व ‘खपवळर’ या इतर नावानेही संबोधितो, त्याच अर्थाने सावरकर ’हिंदुराष्ट्र’ नावाचा उल्लेख करतात. हिंदुत्वाच्या व्याख्येत सावरकरांनी ‘हिंदुस्थान’ किंवा ‘हिंदुराष्ट्र’ शब्दाऐवजी ’भारत’ शब्दाचा उल्लेख केला आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
“याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून, विरोधाल तर तुम्हांस विरोधून हिंदू आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा जास्तीत जास्त चालू ठेवतील.” (उपरोक्त, पृष्ठ २९५) हे सावरकरांचे हिंदू- मुस्लीम ऐक्यासंबंधीचे सूत्र होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat