मृत्युंजय सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019   
Total Views |




हे मातृभूमी! तुजला मन वाहियेलें

वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेलें।

तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला

लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला॥

 

आपले सारे काही मातृभूमीला अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही राष्ट्राला मार्गदर्शक आहेत. अशा या ‘कालजयी सावरकरां’चे विचार आजही जनसामान्यांसमोर विशेषत: तरुणांसमोर सतत मांडत राहणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ विचार मांडून उपयोग नाही, तर त्या विचारांनुरूप राष्ट्रहिताची कृतीही होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम सावरकरांचा अभ्यास करणे, ही प्राथमिक आवश्यकता आहे.

 

नवीन लेखकांनी सावरकर वाङ्मयाचे तटस्थपणे वाचन, मनन, अध्ययन करावे व त्यातून झालेले आकलन केवळ स्वत:जवळ न ठेवता ते लोकांसमोर योग्य भाषेत मांडावे, जेणेकरून सावरकर-विचार प्रवाहित होऊन त्याचा प्रचार-प्रसार होऊन परिणामी राष्ट्रहित साधले जाईल. अशा या राष्ट्रहितेच्छुक उद्दिष्टपूर्तीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चा हा प्रयत्न.

 

उत्साही, अभ्यासू, नवलेखकांना सावरकर विचारांवर चिंतन करावयास लावून त्यांना लेख लिहिण्यास प्रोत्साहन देणे व त्यांच्या लेखणीतून घडलेले लेख जनतेसमोर मांडण्यासाठी या सावरकर विशेषांकाच्या रूपात व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा प्रमुख हेतू आहे. सावरकरांवर लिहिणारे अनेक लेखक आहेत, पण त्यांना योग्य तेव्हा आणि योग्य ते व्यासपीठ उपलब्ध होत नाही. ती उणीव या सावरकर विशेषांकाच्या रूपात भरून निघेल, अशी आशा आहे.

 

एकदा या तरुण लेखकांच्या मनात सावरकर विचार अध्ययनाची प्रक्रिया सुरू झाली की, निदान ते स्वत:च्या आयुष्यात एक सुजाण नागरिक नक्कीच बनतील, असा विश्वास आहे. सर्वांना सावरकरांचे सगळे विचार पटतीलच असे नाही आणि तसा आग्रहही नाही. परंतु, यानिमित्ताने विचार करण्याची, अध्ययन करण्याची एक प्रक्रिया सुरू होईल. निदान सावरकरांचा एखादा जरी पैलू आपण आत्मसात करू शकलो तरी आयुष्य सार्थकी लागेल.

 

ज्यांनी नेहमी प्रथम राष्ट्राचा विचार केला, ज्यांनी नेहमी अन्यायग्रस्तांची बाजू मांडली, ज्यांनी नेहमी समतेचा, मानवतेचा पुरस्कार केला व मनुजमंगलाचे स्वप्न पाहिले, अशा सावरकरांचे हे व असे अनेक महान विचार आजही कसे, कुठे आणि का आवश्यक आहेत, याची प्रचिती हा विशेषांक वाचून येईल. सावरकरांविषयीचे काही गैरसमज दूर होण्यासही साहाय्य लाभेल. आजपर्यंत सावरकर विचारांकडे दुर्लक्ष करून आणि ‘सावरकरवाद’ आचरणात न आणून आपण किती मोठे नुकसान करून घेतले आहे, याचीही जाणीव होईल. तसेच थोडेफार का होईना, पण अप्रत्यक्षपणे ‘सावरकरवाद’ आत्मसात करून आपले काय हित झाले आहे, हेही कळेल.

 

सावरकर ‘समजणे’ कठीण आहे म्हणून आजच्या तरुणांनी सोप्या भाषेत ते जनतेसमोर मांडले, तर त्याचा प्रचार-प्रसार होण्यास साहाय्य होईल. या अंकातून हे साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षीही असाच सावरकरांचे वेगळे पैलू मांडणारा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘कालजयी सावरकर’ हा विशेषांक प्रकाशित केला होता, ज्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. म्हणून यावर्षीही मागील विशेषांकात समाविष्ट करता आले नाही, असे सावरकरांवरील वेगळे विषय नव्या लेखकांकरवी मांडले आहेत. वाचक या विशेषांकालाही तसाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा करतो.

वंदे मातरम्!

 

(टीप: विशेषांकातील लेखांशी किंवा मजकुराशी संपादक, अतिथी संपादक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@