नवी दिल्ली : हवामान विभागाने बुधवारी फनी वादळाचा इशारा जारी केला होता. रौद्र रूप घेतलेले हे वादळ शुक्रवारी ओडिशाच्या तटवर्ती परिसरात ताशी ४५० किमी वेगाने धडकणार आहे. हे वादळ गोपालपूर आणि चांदबली यांच्यातून जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वेने फनी चक्रीवादळाच्या भीतीने १०३ ट्रेन रद्द केल्या आहेत.
हवामान विभागाने ओडिशाला यलो वॉर्निंग दिली आहे. निवडणूक आयोगाने येथील ११ जिल्ह्यांमध्ये मदतकार्य तातडीने पोहोचविण्यासाठी आचारसंहिता हटवली आहे. बौध, कालाहांडी, संबलपूर, देवगड आणि सुंदरगडसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
फनी वादळ ओडिशावर धडकण्यापूर्वीच आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशाच स्वरुपाचे पाऊस गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुद्धा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशातील धोकादायक परिसरांतून ८ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल, हवाई दल आणि कोस्टगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
‘फनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘फनी’ चक्रीवादळासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव, अतिरिक्त प्रधान सचिव, गृह सचिव तसेच भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, राष्ट्रीय आपत्ती मदत पथक तसेच पंतप्रधान कार्यालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांना वादळाच्या संभाव्य वाटचालीबाबत तसेच हाती घेण्यात आलेल्या सावधानता आणि पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली. या तयारीमध्ये पुरेशा साधनसामुग्रीची व्यवस्था, एनडीआरएफ तसेच सैन्य दलाची पथकं तैनात करणे, पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था, वीज आणि टेलिकॉम सेवा पूर्ववत करण्यासाठीची प्रणाली आदींचा समावेश आहे.
उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वादळाचा तडाखा बसणाऱ्या राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याविषयी आणि ज्याप्रमाणे आवश्यकता भासेल त्याप्रमाणे मदत आणि बचाव कार्यासाठी परिणामकारक पावलं उचलण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.
ओडिशाच्या किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा
महाशक्तीशाली ‘फनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील श्रीकाकुलम्, विजयानगरम् आणि विशाखापट्टणम जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी दुपारी हे वादळ ओडिशाच्या गोपालपूर आणि चंदबली दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम आणि मछलीपट्टणम इथल्या रडारद्वारे फनीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat