पैठणीचा विश्वसनीय ब्रॅण्ड‘साजिरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019   
Total Views |




पैठणीने अनेकांना ओळख मिळवून दिली आहे. अनेकांना उद्योजक म्हणून घडवलं आहे. त्यातलंच एक अग्रणी नाव म्हणजे दीपा लेले- चेऊलकर यांचे ‘साजिरी सारीज अ‍ॅण्ड बियॉण्ड.’

 

महाराष्ट्राच्या अनेकविध वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आपली वस्त्रसंस्कृती. नखशिखांत पैठणी ल्यालेली, नाकात मोतीजडित नथ अशी स्त्री पाहिली की ‘घरंदाज’ या शब्दाचा अनुभव येतो. मुळात पैठणीची ओळखच अशी राजेशाही आहे. हातमागावर तयार झालेली, विविध रंगसंगतीने नटलेली, त्याच्यावर नक्षीचं केलेलं काम, काहीवेळेस सोन्या-चांदीच्या तारांचं तिला मिळालेलं कोंदण यामुळे साडीप्रकारात पैठणीचं स्थान म्हणजे जणू एखाद्या राणीसारखंच. त्यामुळेच तर ती राजकन्या, राजमाता यांची आवडती असायची. पैठणीच्या प्रेमात न पडलेली स्त्री विरळाच. या पैठणीच्या जीवावर एका वाहिनीवरचा कार्यक्रम अनेक वर्षांपासून चांगला चालतोय. यापेक्षा पैठणीच्या प्रसिद्धीची अजून काय पावती देणार? या पैठणीने अनेकांना ओळख मिळवून दिली आहे. अनेकांना उद्योजक म्हणून घडवलं आहे. त्यातलंच एक अग्रणी नाव म्हणजे दीपा लेले- चेऊलकर यांचे ‘साजिरी सारीज अ‍ॅण्ड बियॉण्ड.’

 

दीपा चेऊलकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या दीपा लेले. दीपाचे बाबा, दीपक लेले बँकेत नोकरीस होते. आई-बाबा, दोन भाऊ आणि दीपा असं लेलेंचं लहानसं कुटुंब होतं. दीपाचं बहुतांश बालपण लोणावळ्याला गेले. लोणावळ्याचं प्रसिद्ध अन्नपूर्णा हॉटेल हे दीपाच्या आजोबांचं. दीपाचं सहावी पर्यंतचं शिक्षण लोणावळ्यामध्येच झालं. पुढे दीपाच्या बाबांची बदली मुंबईला झाल्यावर पुढचं शालेय शिक्षण सांताक्रुझच्या पोद्दार विद्यालयात झालं. ‘होम सायन्स’ या विषयातून एसएनडीटी विद्यापीठातून कला शाखेची पदवी तिने मिळवली. दीपा लहानपणापासूनच स्वावलंबी. त्यामुळेच दहावीच्या परीक्षेनंतर आपल्या शिक्षणाचा बोझा घरच्यांवर पडू नये म्हणून एका प्रसिद्ध कपड्याच्या शोरुममध्ये तिने नोकरी केली. दिवसाला 30 रुपये अशा स्वरूपाची नोकरी होती. तो काळ टायपिंग आणि टेलिफोन ऑपरेटिंगचा होता. पुढे नोकरी मिळण्यासाठी ही दोन्ही कौशल्ये असावीत म्हणून दीपाने त्याचा कोर्स केला. ज्या संस्थेतून तिने अभ्यासक्रम पूर्ण केला, कालांतराने तिथेच तिला नोकरी मिळाली.

 

दरम्यान दीपाचं लग्न दिनेश चेऊलकर या उमद्या तरुणाशी झालं. लग्नानंतर दीपा कांदिवलीत आली. तीन वर्षांतच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला, त्याचं नाव ‘सिद्धार्थ’ ठेवलं. सिद्धार्थ शिशुवर्गात जाईपर्यंत दीपाने त्याची पूर्ण काळजी घेतली. तो शाळेत गेल्यावर रिकामपण खायला उठायचं. तिला रिकामं बसण्याची सवयही नव्हती. दोन तास करायचे काय हा प्रश्न होता. ती तडक एका नर्सरी स्कूलमध्ये गेली आणि थेट विचारलं की, “मला शिक्षिका म्हणून घ्याल का? भले मला पैसे नका देऊ, पण मला काम हवंय, रिकामंपण नको.” दीपाचा निर्धार पाहून तिला त्या नर्सरी प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. काही वर्षे तिथे तिने नोकरी केली. लहान मुलांची तिने अल्पावधीतच मने जिंकली.

 

कल्पनाशक्ती आणि मेहनत हे दोन गुण म्हणजे दीपाचं बलस्थान. दीपाचे शेजारी एक जाहिरात कंपनी चालवायचे. क्लायंट्सना देण्यासाठी त्यांना वेगळं काहीतरी हवं होतं. दीपाने कल्पकतेने एक छानशी भेटवस्तू तयार करून दिली. कंपनीला ती भलतीच आवडली आणि दीपाला त्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. अंदाजे नऊ वर्षे काम केल्यानंतर दीपाला तिचं वेगळं विश्व खूणावू लागलं. स्वत:ची कल्पकता स्वत:साठी वापरण्याची वेळ आली आहे, असं तिला वाटू लागलं. इव्हेंट्सचा अनुभव होताच, तेव्हा इव्हेंट कंपनी सुरू करण्याचा विचार तिने केला. मात्र, बाहेर खूप वेळ थांबावं लागेल, या कारणाने दीपाला तिच्या घरच्यांनी विरोध दर्शविला. त्यानंतर वस्त्रप्रावरणांच्या उद्योगात तिने उतरण्याचे ठरविले आणि तिने निवड केली पैठणीची. बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करून तिने २०१२ साली ‘साजिरी साडी अ‍ॅण्ड बियॉण्ड’ हा पैठणीमधला स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. प्रत्येक स्त्रीला वाटतं की, आपल्याकडे पैठणी असावी, हीच तिची इच्छा समजून घेऊन दीपा चेऊलकर यांनी १०-१० महिलांचे समूह तयार केले. त्यातून ‘साजिरी भिशी योजना’ सुरू झाली. या भिशीतून गेल्या सहा वर्षांत पाचशेहून अधिक पैठणींची विक्री झालेली आहे. पैठणीव्यतिरिक्त ‘साजिरी’ मध्ये कांजिवरम, चंदेरी, आर्ट सिल्क, इरकली, बनारसी, मणिपुरी अशा इतर साड्यांचे प्रकारदेखील साजिरीच्या विलेपार्ल्यातील स्टुडिओमध्ये पाहण्यास मिळतात. मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील काही नामवंत सेलेब्रिटी आज ‘साजिरी’चे ग्राहक आहेत.

 

साडी नेसविणे ही एक कला आहे. ती कला दीपांना अवगत आहे. तब्बल २५ हून अधिक प्रकारे त्या आणि त्यांची टीम साडी नेसविण्याची पद्धत जाणतात. वेगवेगळ्या समारंभांना त्यांना साडी नेसविण्यासाठी विशेष निमंत्रित केले जाते. ‘साजिरी इव्हेंट्स’ हा त्यांच्या व्यवसायातील अजून एक भाग. बारशापासून ते अगदी निवृत्ती समारंभापर्यंत स्त्रीच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण साजरा करण्याचे व्यवस्थापन साजिरी इव्हेंट्सद्वारे होते. ‘नवरी सजली’ सुद्धा असाच एक आगळावेगळा उपक्रम. एका छताखाली लग्नाच्या सर्व काही आवश्यक सुविधा या उपक्रमाद्वारे दिल्या जातात.

 

पुढची पिढी घडविण्यासाठी त्याच्या अगोदरच्या पिढीला प्रचंड श्रम घ्यावे लागतात. या उक्तीवर चेऊलकरांचा गाढा विश्वास आहे. त्यांना पुढची पिढी उद्योजक म्हणून घडवायची आहे. त्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. व्यवसाय करत असताना सामाजिक जबाबदारी हीदेखील महत्त्वाची आहे, असं त्या मानतात. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या महिलांसाठी पैठणी म्हणजे एक दिवास्वप्नच असतं. मात्र, ‘साजिरी’ भिशी योजनेच्या माध्यमातून दीपा या महिलांचं पैठणी घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. “या महिला जेव्हा पैठणीवरील मोराच्या नक्षीवरून कौतुकाने हात फिरवतात, त्यावेळचं समाधान शब्दातीत असतं,” असं दीपा म्हणतात. दीपा चेऊलकरांचा व्यावसायिक प्रवास यशस्वी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे सतत नवनवीन शिकत राहण्याचा ध्यास. यामुळेच त्यांच्या व्यवसायात वैविध्य आहे. त्यांचा ‘साजिरी स्टुडिओ’देखील पाहण्यासारखा आहे. पैठणीने नटलेली महालक्ष्मी लक्ष वेधून घेते. आपल्या घरातील देवीला साडी नेसविता येईल, एवढ्या सूक्ष्म पातळीवर दीपा चेऊलकर काम करतात. खर्‍या अर्थाने साजिरी म्हणजे साडी आणि बरंच काही...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@