कमल हसन यांच्यावर हल्ला

    17-May-2019
Total Views |




चेन्नई : कमल हसनने नथुराम गोडसेंवर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा सर्वत्र विरोध केला जात आहे. गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण असा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे.

 

कमल हसन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवण्यात आल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, कोईमतूरमधील सुलूर येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कमल हसन यांना परवानगी देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले की, “आता राजकारणाची पातळी खालवत चालली आहे असे मला वाटते. मात्र, अशा प्रकारांमुळे मी अजिबात घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे त्यांचे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत, असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात अतिरेकी होते हे इतिहास सांगतो.” तसेच नथुराम गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटल्याने निर्माण झालेल्या वादाबाबतही कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली. “मी अटकेला घाबरत नाही. मला अटक करून दाखवा. पण मला अटक केल्यास ते त्यांनाच अधिक अडचणीचे ठरणार आहे. हा इशारा नाही सल्ला आहे,” असा टोलाही कमल हसन यांनी लगावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat