हिंदू पुतळ्यांची भीती!

    30-Apr-2019
Total Views |



एका संकेतस्थळाने भारतातील हिंदू नेत्यांच्या, देवीदेवतांच्या भव्य प्रतिमा मुस्लिमांना बेचैन करत असल्याचे जाहीर केले. म्हणजेच इस्लामी कट्टरवाद्यांनी गेल्या कित्येक वर्षांत शेकडो, हजारो, लाखो लोकांच्या चिंधड्या केल्या तरी मुस्लिमांना भीती वाटते, कोणाची? तर हिंदू मूल्यांच्या विराट अभिव्यक्तीची! यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना?

 

श्रीलंकेत अडीचशेच्यावर माणसांना जिहादी हल्लेखोरांनी अक्षरशः किडा-मुंगीप्रमाणे मारल्यानंतर तिथल्या सरकारने बुरखाबंदीचा निर्णय घेतला. जगभरात सर्वत्रच धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी हैदोस घातलेला असताना ‘दहशतवादाला धर्म नसतो,’ म्हणणार्‍यांच्या दृष्टीने श्रीलंका सरकारची ही कृती अनैतिकही ठरू शकते. भारतातही श्रीलंकेतील हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, पण एका विशिष्ट छद्म धर्मनिरपेक्षतावादी, छद्म पुरोगामी टोळक्याकडून श्रीलंकन सरकारच्या स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांमुळे मुस्लिमांवर कसा अन्याय होत आहे, त्याच्या ‘स्टोरीज’ लिहिण्याची, छापण्याची कसरतही सुरू झाली. नव्या माहितीनुसार तर ईस्टरच्या दिवशी चर्च व हॉटेलांत हल्ले करणार्‍यांच्या मन-मेंदूत स्वधर्माच्या अलौकिकत्वाचा विखार भरण्याचे काम कथित शांतताप्रेमी इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकने केल्याचेही स्पष्ट झाले. हा तोच झाकीर नाईक आहे, ज्याची स्तुती करताना काँग्रेसनेते दिग्विजय सिंगांची जीभ थकत नव्हती. ‘हिंदू दहशतवादा’च्या बागुलबुवा उभारणीत दिग्विजय सिंगांचा सक्रिय सहभाग होता, पण आता श्रीलंका बॉम्बस्फोटात झाकीर नाईकचे लागेबांधे असल्याचे उघड झाले तरी हा इसम तोंडातून शब्दही काढताना दिसला नाही. परंतु, दिग्विजय सिंग किंवा त्यांच्यासारखी मानसिकता असलेल्यांची भारतात मुळीच अनुपस्थिती नाही. ही मंडळी मूठभर असली तरी माध्यमांना हाताशी धरून आपला एक समाजस्वास्थ्य बिघडविणारा उपद्रवी अजेंडा नेहमीच चालवताना दिसतात. बहुसंख्य हिंदूंना दूषणे देणे आणि मुस्लीम कसे मासूम, निरागस, समंजस आहेत, असे सांगण्याची त्यांच्यात अहमहमिका लागते. आताही श्रीलंकेतील हल्ल्यानंतर इस्लामी दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना एका संकेतस्थळाने भारतातील हिंदू नेत्यांच्या, देवीदेवतांच्या भव्य प्रतिमा मुस्लिमांना बेचैन करत असल्याचे जाहीर केले. म्हणजेच इस्लामी कट्टरवाद्यांनी गेल्या कित्येक वर्षांत शेकडो, हजारो, लाखो लोकांच्या चिंधड्या केल्या तरी मुस्लिमांना भीती वाटते, कोणाची? तर हिंदू मूल्यांच्या विराट अभिव्यक्तीची! यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना?

 

इथे हिंदूंच्या मोठ्या मूर्ती मुस्लिमांना फक्त बेचैन करतात की, त्यांना पुतळे फोडायची खुमखुमी खुणावत राहते, हाही एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे. कारण, अगदी शिवकाळात अफझल खानापासून ते २००१ साली तालिबान्यांनी बामियाँन बुद्धमूर्ती फोडण्यापर्यंतचा हा सतत चालत आलेला सिलसिला आहे. तेव्हाही धर्मांधतेपायी आक्रमकांना मूर्त्यांचा त्रास होत होता आणि आताही तसेच होताना दिसते. हे असे का होत असेल? तर मुस्लिमांतील एका धर्मांध गटाला स्वतःला ‘बुतशिकन’ म्हणवून घेण्यात मोठीच धन्यता वाटते, हे एक वास्तव आहे. शिवाय अशा धर्मांध बुतशिकनांना त्यांच्यात ‘गाजी’ म्हणूनही नावाजले जाते. म्हणूनच धर्माशी किंवा हिंदूंच्या मूर्ती-पुतळ्यांशी संबंधित मुद्दा येतो, तेव्हा अशा अंधारयुगात वावरणार्‍या लोकांचे भ्रम दूर कोण करणार, त्यांची काळजी कोण घेणार, हाही प्रश्न निर्माण होतो. कारण, भारतात मुस्लिमांचे लांगूलचालन करणार्‍यांचा एक वर्ग स्वातंत्र्याच्या आधीपासूनच आहे. स्वातंत्र्यानंतरही हा कंपू आपल्या पोकळ कल्पनांच्या आधारे मुस्लिमांना हक्क-अधिकार वगैरे मिळवून देण्याच्या नावाखाली निराळ्याच कारवाया करताना दिसला. सत्तेवर आलेल्या नेहरू-गांधी परिवारानेदेखील एकगठ्ठा मतपेढीसाठी हे लांगूलचालनाचे काम इमानेइतबारे केले. परंतु, मुस्लीम समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी तो आपल्याच धर्मात कसा गुरफटत जाईल, याचीच खबरदारी या सर्वांनी घेतली. हिंदू बहुसंख्य असल्याची भीती दाखवून आम्हीच तुमचे कैवारी असल्याचा प्रचारही या लोकांनी केला. आजही या मंडळींचा भर हिंदूंच्या लोकसंख्येवरून मुस्लिमांना घाबरवून सोडणे, भ्रमित करणे यावरच असतो. ‘द प्रिंट’ नामक संकेतस्थळाने इंदुलता प्रसाद यांचा नुकताच प्रसिद्ध केलेला 'Giant statues of Hindu gods and leaders are making Muslims in India nervous' हा लेख त्याचाच एक नमुना.

 

२०१४ साली नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले आणि देशात हिंदू राष्ट्रवाद्यांना जोर चढला,” असे म्हणत या लेखाची सुरुवात होते. नंतर कोणत्याही छद्म धर्मनिरपेक्षतावाद्याप्रमाणे गोरक्षक, हिंदू दहशतवादी, बाबरी विध्वंस या मुद्द्यांवरून गाडी पुढे सुटते. मध्येच टुकडे-टुकडे गँगच्या म्होरक्यांसह शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्यांसाठी गळा काढलेला वाचायला मिळते. ‘मोदी सरकार सबका साथ-सबका विकास’च्या नावावर स्थानापन्न झाले. परंतु, ते अर्थविषयक, रोजगारविषयक आघाडीवर नापास झाल्याचे ठोकून देतानाच ‘मुस्लीमबहुल’ पाकिस्तानबरोबरील वादाचा मोदींनी निवडणुकीसाठी वापर केल्याचेही लेखिकेने म्हटले. तरीही, लेखाचे शीर्षक ज्या मुद्द्यावरून आले, तो ‘धार्मिक अल्पसंख्याकांच्या मनातील भीती’चा प्रकार लेखिकेचे मानसिक संतुलन ठिकाणावर नसल्याचे दाखवून देणाराच म्हटला पाहिजे.

 

मोदी सरकारने सत्तेवर येताच गुजरातमध्ये सरदार पटेलांचा ५९७ फूट उंचीचा पुतळा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा ६९५ फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा आणि अयोध्येतील प्रस्तावित ७२५ फुटांची श्रीरामाची प्रतिमा, तसेच तामिळनाडूत बिगरसरकारी संस्थेने उभारलेली ११२ फुटी शिवाची प्रतिमा या सर्वच हिंदूंच्या भव्य-अतिभव्य अभिव्यक्तीमुळे मुस्लिमांच्या मनात भीतीची भावना दाटून येत असल्याचे तारे लेखिकेने तोडले. मुळात हिंदूंनी आपल्या नेते-देवीदेवतांचे पुतळे स्वदेशात नाही उभारायचे तर कोठे उभारायचे? हिंदू भारतातच पुतळे उभारणार, मग कोणाला भीती वा बेचैनी वाटत असली तरीही! हिंदू मूल्यांचे सांकेतिक, प्रतिकात्मक उत्थान जर मुस्लीम अथवा इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, हिंदूंचा नव्हे! सोबतच हिंदूंनी सनातन काळापासून कधीही कोणत्याही एका पांथिक, सांप्रदायिक विचारांना एकमेव सत्य-एकमेव मार्ग मानले नाही. विशेष म्हणजे हिंदूंनी आपल्याहून वेगळा विचार मानणार्‍यांचे धर्मांतरही केले नाही वा त्यांचा बळीही घेतला नाही वा त्यांना कधी लैंगिक गुलामही केले नाही. उलट इथल्या हिंदूंनी ‘एकं सद् विप्राः बहुधा वदन्ती’ हाच विचार जगाला दिला. मुस्लिमांची अल्लावर आस्था असली तरी हिंदूंची सगुण-साकार रूपावर हजारो वर्षांपासून श्रद्धा आहे. मुस्लीम आक्रमकांनी मात्र सातव्या शतकापासून हिंदूंची अशी प्रतीकचिन्हे उद्ध्वस्त करण्यासाठीच हयात खर्ची घातली. आताची हिंदूंच्या प्रतिमांमुळे भीती वाटते, ही लेखिकेने दिलेली हाळीदेखील या आक्रमकांसारखीच सर्व काही नष्ट करा, सांगणारीच असल्याचे दिसते.

 

दुसरीकडे लोकशाहीत अल्पसंख्याकांची काळजी बहुसंख्यांनी घेतली पाहिजे, हे तत्त्व अभिप्रेत असते. परंतु, अल्पसंख्याकांची जबाबदारी कोणी घ्यायची? हिंदू नेत्यांच्या, देवी-देवतांच्या प्रतिमांची भीती वाटणार्‍या मुस्लिमांनी आणि धर्मनिरपेक्षतेचा जप करणार्‍यांनी जरा आत्मपरीक्षणही करावे. पहाट झाली नाही तोच लाऊडस्पीकरवरून आवाज करणारे कोण असतात? वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून धार्मिक कारणांसाठी जागा अडवणारे कोण असते? कैराना, मालदापासून भिवंडीपर्यंत हिंदूविरोधी कारस्थाने रचणारे कोण असतात? ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद करणारे कोण असते? तर हीच मूठभर धर्मांध मंडळी ना? अन् हे होते कशामुळे तर आतापर्यंतच्या अल्पसंख्यानुनयामुळेच! ‘आपला तो बाब्या, दुसर्‍याचा तो कार्टा’ म्हणण्याच्या वृत्तीमुळेच! त्याचा बंदोबस्त कोणी करायचा? आणखी एक मुद्दा म्हणजे देशात १५-२० टक्के असलेल्या मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी सार्वजनिक जीवनातून हिंदू मूल्यांची अभिव्यक्ती नष्ट का झाली पाहिजे? केवळ मुस्लिमांना आवडत नाही म्हणून? असेच स्युडो सेक्युलॅरिस्ट गँगचे म्हणणे आहे का? तर तसे नक्कीच होणार नाही. कारण, मुस्लिमांना सुखी-आनंदी वगैरे ठेवण्यासाठी घटनेने कलम २५ ते ३० ची आधीच सोय केलेली आहे. सोबतच विद्यमान केंद्र सरकारनेही अल्पसंख्याकांसाठी शिक्षणविषयक योजना सुरू केल्या, तिहेरी तलाकविरोधी कायदा केला. त्यामुळे मोदी सरकार अल्पसंख्यविरोधी असल्याचे जे म्हटले जाते, तो खोटारडेपणा असल्याचेच लक्षात येते. म्हणूनच कदाचित मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे अल्पसंख्य आणि प्रामुख्याने मुस्लिमांना भुलवता येणार नाही, त्यामुळेही छद्म धर्मनिरपेक्षतावादी, छद्म पुरोगामी गोटातल्यांनी हिंदूंच्या प्रतिमांचे भय दाखवून त्यांना आपल्यामागे खेचण्याचा, समाज कलुषित करण्याचा हा नवा डाव रचला असावा. पण, देशातली जनता विवेकी आहे, ती या लोकांच्या खेळीला बळी पडणार नाहीच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat