नॉत्र दाम चर्चमधील अग्नितांडव आणि पडसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019   
Total Views |



 

फ्रान्समधील पॅरिसच्या नॉत्र दाम चर्चमधील अग्निकांडाने युरोपीय राष्ट्रांसह अमेरिकाही हळहळली. पण, एखाद्या चर्चमधील आगीचे जागतिक पडसाद का उमटले? या चर्चची नेमकी खासियत तरी काय?

यांसारख्या प्रश्नांचा वेध घेणारा आजचा माहितीपूर्ण लेख... १५ एप्रिल रोजी पॅरिस शहरातील नॉत्र दाम हे अवाढव्य चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आग विझविण्याकरिता सुमारे अग्निशमन दलाचे तब्बल ५०० कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत होते. पण, या आगीची तीव्रता इतकी होती की, ही आग विझायला तब्बल १५ तासांचा कालावधी लागला. आजूबाजूच्या अनेक इमारतींचे आगीपासून संरक्षण करण्याकरिता त्या तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. या चर्चच्या मधल्या भागातील छपराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या (spire) मनोऱ्यासह दोन तृतीयांश भाग जळून खाक झाला. उत्तर व दक्षिणेकडील दोन्ही मनोरेदेखील आगीत भस्मसात झाले.

 

नॉत्र दाम’ (our lady) या फ्रान्समधील शब्दाचा अर्थ होतो ‘आमची माय.’ या आगीच्या घटनेने युरोपीय देश, अमेरिकेसह सर्वच देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पण, त्यांनी ठरवून टाकले की, हे चर्च पुढील पाच वर्षांत पुन्हा होते तसे व नवीन तंत्रज्ञान वापरून बांधले जायला हवे. सर्व प्रेमीजगताने मोठ्या प्रमाणात (७०० दशलक्ष युरो) दुरुस्ती आणि बांधकामासाठी देणग्या देऊ केल्या. कलेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इतिहासकार अॅन्ड्र्यू टॅलन यांनी लेसरच्या साहाय्याने चर्चची पुष्कळ माहिती चित्रामध्ये जमवली होती व ती माहिती नकाशामध्ये साकारली आहे.

 

या अवाढव्य चर्चमध्ये आग लागली, तेव्हा अनेक कारागीर त्यांचे कौशल्य पणाला लावत होते. स्पायरच्या भोवती परांची व लाकडी साचे (scaffolding) लावून बसले होते. आगीत कोणीही कारागीर अडकला नाही पण, एक फायरमन मात्र जखमी झाला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या दुर्घटनेसंबंधी उद्गार काढले की, “ही चर्चला लागलेली आगीची घटना म्हणजे आपणा सर्वांवर एक दिव्य संकटच ओढवले आहे. आगीचे कारण अजून खात्रीपूर्वक कळलेले नाही. पण, एका विश्वसनीय सूत्राकडून कळले आहे की, ही आग इलेक्ट्रिकच्या शॉटसर्किटमुळे लागली असावी.”

 

चर्चमधील आग कशी पसरली?

 

साधारणपणे संध्याकाळच्या साडेचारच्या सुमारास (ग्रिनविच वेळेनुसार) आगीला सुरुवात झाल्यानंतर लगेचच आगीच्या ज्वाळा चर्चच्या मधल्या छपरापर्यंत पसरल्या. त्यामुळे खिडकीमधल्या रंगीत काचांना तडे गेले आणि खोलीतल्या शोभिवंत कलाकुसरीच्या कामावर नष्टचर्य ओढवले. फायरमननी घंटेचा एक मनोरा कोसळण्यापासून वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रंगीत काचा बसविलेल्या खिडक्या पण वाचविता आल्या. त्यापुढील चार तासांनंतर फायरमनचे प्रमुख जीन क्लॉड गॅलेट यांनी आनंदी स्वरांनी घोषणा केली, “आपण या चर्चचा मुख्य गाभा वाचवू शकलो.” चर्चमध्ये मोठे नूतनीकरणाचे महागडे काम सुरू होते. त्यातील १६ तांब्याचे पुतळे व इतर महत्त्वाच्या वस्तू मात्र दुसरीकडे हलविल्या गेल्या. कारण त्यात अनेक कारागिरांनी कौशल्य व पैसा ओतला होता.

 

पॅरिसच्या उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगरींचे म्हणणे पडले की, “जरी चर्चची इमारत वाचविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात माणसे असली तरी या कॅथेड्रल इमारतीचे आगीच्या घटनेत फार मोठे नुकसान झाले आहे.” तेथेच उपस्थित असलेल्या इतिहासकार कॅमिले पास्कल म्हणतात, “हे चर्च म्हणजे एक वारसास्थळच. नॉत्र दाममधील या चर्चने गेल्या कित्येक शतकांच्या वर्षात अनेक सुखदु:खाचे प्रसंग पाहिले आहेत. परंतु, या ताज्या आगीच्या घटनेने आम्ही सर्वजण अतिशय दु:खी झालो आहोत.” घटनास्थळी जमलेल्या हजारो जणांच्या डोळ्यांत पाणी येऊन ते सीन नदीत जाऊन अक्षरश: रडायला लागले. काही जणांनी इमारत वाचावी म्हणून प्रार्थना केल्या. परिसरातल्या अनेक चर्चनी कॅथॉलिक रितीरिवाजाप्रमाणे घंटा वाजवून आठवडाभर सांत्वन करायचे ठरविले. पॅरिसच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या संस्थेच्या मुख्यांनी, ५० जणांच्या ताफ्यासह तपासात काही गुन्ह्याचे कारण आढळले नाही, असे घोषित केले आहे.

 

आता फ्रान्सने चर्चच्या पुनर्बांधणीकरिता विविध वास्तू विशारदांकडून स्पायरसह नवीन वास्तूरचनेची स्पर्धा जाहीर केली आहे. कारण, नॉत्र दाम चर्च हे एक फ्रान्स देशाचे पवित्र चिन्ह मानले जाते. नॉत्र दामसारखे महत्त्व देशातील इतर कुठल्याच इमारतीला दिले जात नाही. तिची प्रतिस्पर्धक इमारत आयफेल टॉवर ही एका शतकापेक्षा थोड्या जास्त वर्षांनीच जुनी आहे. पण, नॉत्र दामची लोकप्रियता व परंपरा इसवी सन १२०० सालापासून कायम आहे.

 

या चर्चलानॉत्र दाम’ हे नाव मोठ्या साहित्याच्या आधारावरून पडले आहे. व्हिक्टर ह्युगोची कादंबरी ‘नॉत्र दाम द पॅरिस’ नावाने ओळखली जाते. या चर्चला प्राचीन काळी फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस असाच मोठा फटका बसला होता. पण, दोन्ही जागतिक युद्धात हे चर्च मात्र सुरक्षित राहिले. या चर्चच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरिता तब्बल पाच वर्षांचा काळ लागणार आहे. चर्चमध्ये जाऊन पूजा करणारे आता पोरके झाल्याने चर्चच्या समोरच्या एस्प्लनेड इमारतीत कॅथॉलिक समाजाला प्रार्थना करण्याची फ्रेंच सरकारकडून तात्पुरती व्यवस्थाहीस करण्यात आली आहे.

 

‘नॉत्र दाम’ विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

 

या चर्चला भेटी देणाऱ्यांची संख्या वर्षाला १३ दशलक्ष इतकी आहे. आयफेल टॉवरला भेट देणाऱ्यांची संख्या मात्र फक्त ७ दशलक्षच आहे. या चर्चच्या बांधकामास सन ११६० मध्ये सुरुवात होऊन ते काम सन १३४५ मध्ये संपले. म्हणजे या चर्चच्या कामाला तब्बल १८५ वर्षे लागली. या चर्चला ‘युनेस्को’कडून १९९१ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. त्यामुळे या अग्निकांडानंतर आता ‘युनेस्को’च्या तज्ज्ञांनी सर्वतोपरी साहाय्य देण्याचे कबूल केले आहे. कारण, नॉत्र दाम चर्च ही वास्तू ऐतिहासिक असून वास्तू विशारदांच्या जगतामध्ये व आध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेली आहे. सध्या या कॅथॉलिक कॅथेड्रलमधील धातूंचे अनेक पुतळे त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी दुसरीकडे हलविले गेले आहेत. या मधल्या भागातील छप्पर जळून खाक झाले. कारण, ते सर्व बहुतांशी लाकडाचे बनविलेले होते. दोन्ही मनोऱ्यांची उंची ६९ मी. आहे, जे दोन तृतीयांश उद्ध्वस्त झाले, त्या छपराची उंची ४३ मी. होती व त्या स्पायरची उंची ९६ मी. होती. चर्चची लांबी १२८ मी. आहे. दक्षिणेकडील व उत्तरेकडील खिडक्यांचा व्यास अनुक्रमे १३.१ मी. व ९.७ मी. आहे. चर्चचे एकूण सर्व क्षेत्रफळ ४८०० चौमी. आहे. नॉत्र दाम चर्चच्या मधल्या भागात भिंतीवर लाद्यांचे अनेक शोभेकरिता बटरेस लावलेले आहेत. या चर्चची वास्तुशैली ही ‘गॉथिक’ प्रकारची आहे.

 

या चर्चमध्ये एक काट्यांचा मुकूट आहे. या मुकुटाचा काही भाग येशूला ज्यावेळी क्रुसावर चढविले, त्यावेळचा असल्याचे चर्चचे विश्वस्त सांगतात. आठ हजार पाईप बसविलेले असून त्यातील काही पाईप खराब झाल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तांब्यापासून बनवलेले १६ पुतळे आहेत. त्यातील १२ पुतळे पूर्वीचे १२ अॅपॉझल्स व ४ इव्हॅनजलीस आहेत. परंतु, ते खराब होऊ नयेत म्हणून दुसरीकडे नेण्यात आले आहेत.

 

या चर्चचे आंतरराष्ट्रीय महत्त्व काय?

रोमच्या व्हॅटिकन पोपने शोक व्यक्त करून चर्चकरिता प्रार्थना गायली. जर्मनीच्या चॅन्सेलर एन्जेला मर्केल यांनी फ्रान्सच्या लोकांना धीर दिला आणि त्या म्हणाल्या की, “नॉत्र दाम चर्च ही फ्रेंच देशाची व युरोप खंडाची निशाणी व संस्कृती आहे.” युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ट्विट केले की, “मी सर्व फ्रेंच जनतेच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या नॉत्र दाम चर्च आगीपासून वाचविण्याच्या श्रमामध्ये सहभाग देऊ इच्छिते.” नेपोलियन बोनापार्टचा १८०४ मध्ये सम्राट म्हणून अभिषेक याच चर्चमध्ये झाला होता. पोप पायस दहावा याने याच चर्चमध्ये ‘जॉन ऑफ आर्क’ला १९०९ मध्ये सुशोभित केले होते. तसेच पूर्वीचे अध्यक्ष चार्ल्स द गॉल व फ्रान्कॉईस मितरांड यांचा याच चर्चमध्ये अंत्यविधी झाला होता.

 

नॉत्र दाम चर्चचे जागतिक महत्त्व

खालील बॉलिवूड सिनेमांच्या चित्रीकरणात नॉत्र दाम चर्चमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते.

* (२००९) - ‘लंडन ड्रीम’मध्ये सलमान खान व असीन ही जोडी ’मनको अती भावे’ गाणे गात असताना.

* (२०१२) - ‘लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क’ चित्रपटामध्ये अली जाफर व आदिती राव जोडी नदीमध्ये प्रणय करत होती.

* (२०१३) - ‘ये जवानी है दीवानी’ मध्ये रणबीर कपूर स्कूटरवर होता.

* (२०१६) - ‘बेफिक्र’ मध्ये रणविर सिंग व वाणी कपूर जोडी सर्व पॅरिसभर दिसत आहे.

 

फ्रान्स देशातील मधमाशांचे प्रमाण वाढविण्याकरिता निकोलस गींटने नॉत्र दामच्या छपरावर २०१३ मध्ये मधमाशांची तीन पोळी लावली होती. ती सर्वच्या सर्व म्हणजे १ लाख, ८० हजार मधमाशा आगीतून वाचल्या आहेत. या किटकांना फुफ्फुसे नसतात व आगीतला कार्बन डायऑक्साईड त्यांचा नाश करत नाही, उलट मधमाशांना मध गोळा करायला उद्युक्त करत त्यांनी मधमाशी-राणीचे प्राण वाचविले. अशा नॉत्र दाम चर्चसारख्या इमारती बांधायच्या म्हणजे प्रेम, वास्तू-विशारदाचे ज्ञान, कौशल्य व मोठ्या भांडवल निधीची जरूरी असते व या सगळ्या गोष्टी फ्रान्स देशाकडे आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@