भारतीय ध्वजातील सगळ्यात वरचा आणि पहिला रंग भगवा, नारिंगी किंवा केशरी. याला इंग्रजीमध्ये ‘ऑरेंज’ आणि ‘सॅफ्रॉन’ अशी दोन संबोधने आहेत. प्राचीन भारतीय धर्म संस्कृती, भारतीय समाजजीवन, भारतीय राजकारण, भारतीय परिधान आणि रसना या सर्व संदर्भात अत्यंत महत्त्वाचा रंग. पुरुषांचा फेटा-कुर्ता-धोतर-उपरणे आणि स्त्रियांच्या साड्या आणि अन्य परिधाने अशा सर्व ठिकाणी स्वीकृत असा हा रंग. निवडणुकीच्या आजच्या काळात सर्वात जास्त लोकप्रिय आणि त्याचवेळी अप्रिय असा हा केशरी रंग.
लाल आणि पिवळा या दोन प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून तयार होणारा केशरी रंग. याच दोन प्राथमिक रंगांच्या प्रभावामुळे, व्यक्तीचे आत्मभान म्हणजे वृत्ती आणि वासना म्हणजे चित्त या दोन्हीचे योग्य संतुलन राहते. या प्रभावामुळे हा केशरी रंग मानसिक आणि शारीरिक आरोग्य अबाधित ठेवतो. याच गुणवत्तेमुळे, प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत हा रंग स्वीकृत झाला आहे, महत्त्वाचा मानला गेला आहे.
भगवा ध्वज, रांगडा भगवा फेटा
केशरी रंग हा खरं म्हणजे उष्ण प्रकृतीचा रंग आहे. मात्र, लाल रंगाइतका हा आपल्या डोळ्यांवर तणाव निर्माण करत नाही. स्फूर्ती, उत्साह याबरोबरच केशरी रंग आपल्या चित्तवृत्तीला ऊर्जित करून विचारांना प्रेरित करतो. प्राचीन भारतीय संस्कृतीत राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, आत्मसन्मान, श्रद्धा, भक्ती आणि महत्त्वाकांक्षा अशा भावना आणि धारणांचे, केशरी म्हणजे भगवा रंग प्रतीक बनला आहे. याबरोबरच राजकारण, धर्म, लिंग, विज्ञान, कला, मिथके आणि पुराणशास्त्र अशा अनेक गोष्टींशी हा रंग जोडला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या शौर्याशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या त्यागाशी आणि वारकर्यांच्या विठ्ठलावरील श्रद्धा आणि भक्ती याच्याशी केशरी-भगवा, दृश्य स्वरूपांत चिह्नांकित झाला आहे. आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी आणि शत्रूशी लढताना मृत्यूला कवटाळणारा ‘केसरिया’ हे समर्पण राजस्थानातील शतकांपूर्वीच्या स्त्रियांची खास परंपरा होती. या पराकोटीच्या तीव्र भावनांमुळे, सामान्यतः तरुण वयाला या रंगाचे नेहमीच आकर्षण वाटते. लिंबूवर्गीय फळांचा रंग असल्याने हा रंग क्षुधावृद्धी करतो, म्हणजे भूक वाढवतो म्हणूनच आरोग्यदायी अन्नाच्या उत्पादनांच्या वेष्टनावर हा रंग प्रामुख्याने वापरला जातो. विज्ञाननिष्ठ अभ्यासानुसार, भगव्या रंगाच्या काही गुणवत्तांमध्ये थोडासा विरोधाभास आहे. एका बाजूला या रंगाची दृश्यमानता, अन्य रंगांच्या तुलनेत थोडी जास्त आहे. त्यामुळे आपल्या ध्वजावरील अथवा एखाद्या चित्रामध्ये हा रंग आपले लक्ष पटकन वेधून घेतो. एखादा इंटिरिअर डिझायनर, दर्शकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात या रंगाच्या अनुकूल गुणवत्तेचा वापर करतो. एखाद्या ऑफिसच्या मोठ्या हॉलमध्ये, स्वच्छतागृहाचा किंवा पॅन्ट्रीचा एकच दरवाजा गडद भगव्या रंगाने आपले लक्ष पटकन वेधून घेतो, ही या रंगाची अनुकूल गुणवत्ता. मात्र, या रंगाची प्रतिकूल गुणवत्ता किंवा वैगुण्य असे की, या रंगाची आपल्याला पटकन विस्मृती होते. यामुळेच गाड्या, दूरदर्शन संच अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंसाठी हा रंग वापरला जात नाही.
प्रतीकशास्त्र अथवा चिह्नसंकेतानुसार, विषमभूज आयताकृती हे भूमितीय चिह्न, केशरी, भगव्या किंवा ऑरेंज रंगाचे प्रतीक आणि रूपक मानले गेले आहे. लाल रंग नेहमीच ऐहिक, लौकिक, सांसारिक किंवा पार्थिव म्हणजे वास्तवाच्या जवळचा समजाला जातो. मात्र, याचा केशरी हा उपरंग मात्र ऊर्जा, प्रकाश, उत्साह आणि जोश अशा पारलौकिक आणि वैश्विक तत्त्वांचे प्रतीक मानला गेला आहे. उबदार, प्रेमळ, मोहक, वेधक तरीही निश्चित आणि काटेकोर अशा संवेदना, प्रथम दर्शनी हा रंग निर्माण करतो. तीव्र, उत्कट, तामसी, उष्ण या लाल रंगाच्या संवेदना आहेत. प्रसन्न, उल्हास, समाधान, आनंद अशा संवेदना या केशरी रंगामुळे प्रसारित होतात. उगवणाऱ्या सूर्याच्या रंगाच्या स्नेह आणि मैत्रभावना अशा वैयक्तिक आणि सामाजिक संवेदनांची अनुभूती हे या केशरी-भगव्या रंगाचे वैशिष्ट्य आहे. लाल रंगाचा प्रभाव जास्त असलेला केशरी रंग इच्छा, शरीर जाणिवा, अभिलाषा, प्रभुत्व, आक्रमकता आणि राष्ट्रप्रेम अशा संवेदनांचे प्रतीक आहे. पिवळ्या रंगाने प्रभावित असलेला केशरी रंग, हा देव्हाऱ्यातील दिव्यासारखा सौम्य प्रकाशदायी म्हणजे दीप्तिमान आहे. याबरोबरच सोनेरी रंगाच्या जवळ जाणारा केशरी किंवा भगवा नेहेमीच बुद्धीवैभव, धनवैभव आणि उत्तम दर्जा अशा गुणवत्तांचे दृश्य संकेत देतो. खगोलातील बुध ग्रह कुशाग्रबुद्धीचे प्रतीक आहे. हा केशरी रंग याच बुध-मंगळ या दोन ग्रहांचा आणि सूर्याचा प्रतीक रंग आहे. रविवार, मंगळवार आणि बुधवार या आठवड्यातील तीन वारांचा हाच प्रतीक रंग आहे. वस्तुनिष्ठ दृष्टीने केशरी रंग आनंदी-प्रसन्न-ऊर्जित-उत्साही-प्रभावी अशा व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. व्यक्तिनिष्ठ किंवा तात्त्विक दृष्टिकोनातून व्यक्तीचा आनंदी-गंमत्या स्वभाव, ज्ञान प्रचुरता, विपुलता, निरासक्त जीवनशैली, एखाद्या ज्ञानशाखेच्या अभ्यासाची आसक्ती अशा गुणवत्तांचे चिह्नसंकेत स्पष्ट होतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये मानवी शरीराचा आणि जीवनाचा मूलाधार असलेल्या सात कुंडलिनी चक्रांचा सखोल आणि विस्तृत अभ्यास मांडला गेला. सहस्रारचक्र, आज्ञाचक्र, विशुद्धचक्र, अनाहतचक्र, मणिपूरचक्र, स्वाधिष्ठानचक्र, मूलाधारचक्र या सात चक्रांपैकी सहावे स्वाधिष्ठानचक्र याची जागा मानवी जननेंद्रियापाशी मानली गेली आहे. हेच स्वाधिष्ठानचक्र व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेचे आणि मैथुन या चार पैकी एका प्राथमिक गरजेचे नियंत्रण करते. पांढऱ्या कमळाच्या सहा शेंदरी अथवा केशरी पाकळ्यांमध्ये हे चक्र चिह्नांकित केले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये शरीर इच्छातृप्ती आणि प्रजननासाठी मैथुन म्हणजेच युगुलधर्म हे आवश्यक मानले गेले. या निरामय आणि शुद्ध युगुलधर्माचे पावित्र्य आणि शरीरइच्छेचे नियंत्रण याचेही महत्त्व या अभ्यासात मांडले गेले. व्यक्तीचे आत्मभान म्हणजे वृत्ती आणि वासना म्हणजे चित्त या दोन्हीचे योग्य संयमित संतुलन ठेवण्याचे महत्त्वाचे काम, केशरी अथवा भगवे वस्त्र वापरल्यामुळे साध्य होते. अशी सखोल आणि संपूर्ण, शरीरइच्छा नियंत्रण करण्याची, निरामय युगुलधर्माचे पावित्र्य आणि त्याची वैयक्तिक आणि सामाजिक आवश्यकता स्पष्ट करणारी स्वाधिष्ठानचक्राची विज्ञाननिष्ठ संकल्पना, भगव्या रंगाच्या गुणवत्तेशी जोडण्याचे, आपल्या पूर्वजांचे हे काम फार विलक्षण आहे. आजही निरिच्छ, निरपेक्ष वृत्ती धारण करणाऱ्या आणि निरामय जीवनशैली स्वीकारलेल्या व्यक्ती, भगवी वस्त्र-परिधान वापरतात. संयम, श्रद्धा, भक्ती, वात्सल्य, पावित्र्य, राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रेम या भावना व्यक्त करताना केशरी आणि भगव्या रंगाचा प्रभावी वापर केला जातो. जगातील अनेक देश आणि संस्कृतींमध्ये आपला भगवा म्हणजेच केशरी रंग विविध रूपे घेऊन वावरतो. बौद्ध धर्मप्रणाली स्वीकृत असलेल्या समाजातील विनम्र आणि विनयशील वृत्तीचे बौद्ध भिक्खु नेहमी केशरी वस्त्र वापरतात. केशरी अथवा भगवे वस्त्र हा त्यांचा बाहेरच्या जगाशी होणारा निःशब्द संवाद आहे. चिनी आणि जपानी समाजात, केशरी रंग आपुलकी आणि आनंदाचे संकेत देतो. चौदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत युरोपियन समाजात ‘ऑरेंज’ या रंगाला ‘येलो-रेड’ असे संबोधन वापरले जात असे. ख्रिश्चन धर्म संकल्पनेतील प्रोटेस्टंट प्रणाली स्वीकारणाऱ्या युरोपियन समाजाने केशरी रंग पवित्र म्हणून प्रमाण मानला आहे. याच युरोपातील जर्मनी आणि रशियामध्ये केशरी-नारिंगी रंगाचे संत्रे अथवा ऑरेंज फ्रुट आजही ‘चायनीज अॅपल’ या संबोधनाने लोकप्रिय आहे. थायलंड या देशातील समाजात ‘ऑरेंज’ हा रंग ‘गुरुवार’ या दिवसाचा रंग मानला जातो. ऑरेंज रंगाचे परिधान आठवड्यातील गुरुवारी वापरणे ही थायलंडमधील प्राचीन परंपरा आहे. आयर्लंड या ब्रिटिश राजसत्तेचा भाग असलेल्या देशाचा ध्वज थोड्याफार फरकाने भारतीय तिरंग्याशी रंगांचे साधर्म्य दाखवतो. भारतीय तिरंग्याचे रंग आडवे आहेत. आयरिश ध्वजाचे तेच तीन रंग उभे आहेत. या मागे काही ऐतिहासिक घटनाक्रम आहे. आयरिश ध्वजातील हिरवा रंग कॅथलिक, ख्रिश्चन धर्म प्रणालीचा संकेत देतो. यातला केशरी रंग प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म प्रणालीचा संकेत देणारा आहे. काही शतकांपूर्वी एकाच धर्मातील या दोन प्रणालींमध्ये फार मोठा हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी शांतता निर्माण करण्यासाठी या दोन रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पट्टा वाढवून नवा ध्वज निर्माण झाला.
या भगव्या रंगाचे काही शतकांपूर्वीच्या अमेरिकेशी जुळलेले नाते समजून घेणे खूप रंजक आहे. आजच्या हॉलंड देशातील स्थलांतरित डच लोकांनी तत्कालीन अमेरिकेत १६२५ मध्ये ‘न्यू अॅमस्टरडॅम’ या नावाने एक शहर वसवले होते. हेच आजचे जगप्रसिद्ध न्यूयॉर्क शहर. त्यावेळच्या डच युवराजाच्या ध्वजाची प्रतिकृती वापरून न्यूयॉर्क शहराचा ध्वज निर्माण झाला होता. या ध्वजावर, निळा, पांढरा, केशरी अशा तीन रंगाचे उभे तीन पट्टे आहेत. आजही ऑरेंज अथवा केशरी रंग हा डच समाजाचा आवडता रंग आहे. कालांतराने त्या शहराचे ‘न्यूयॉर्क’ असे नामकरण झाले आणि पुढे शहराचे मानचिह्न या ध्वजाच्या पांढऱ्या पट्ट्यावर अंकित झाले. मात्र, मूळ डच ध्वजाचा प्रभाव तसाच राहिला. जगभरातील रसना संस्कृतीशी या केशरी रंगाचे जवळचे नाते आहे. कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेला केसरी भात, खास भारतीय जिलेबी, गाजराचा हलवा या भारतीय रसना कृतींसह, संत्रे आणि कलिंगड ही फळे, चविष्ट सामन मासा आणि चमचमीत खेकडा किंवा झिंगा, स्वीट पोटॅटो अशा केशरी रंगाच्या अनेक शाकाहारी आणि मांसाहारी रसनाकृती जगभरातील खवय्यांची रसना तृप्ती करत आहेत. ऑरेंज-भगवा-केशरी-नारिंगी-शेंदरी या भारतीय नावांनी सुपरिचित रंगाच्या अनेकानेक छटा, विविध संबोधनांनी जगभर ओळखल्या जातात. अशी संबोधने अथवा नावे त्या रंगाच्या उपयोगाच्या-वस्तूच्या-फळांच्या संदर्भाने वापरली जातात. त्यातील प्रत्येक नाव आपल्या परिचयाचे असते. अंबर, अॅप्रिकॉट (ओला जर्दाळू), गोल्ड, रस्ट (लोखंडाचा गंज), टोमॅटो, पम्पकिन (लाल भोपळा), कॅरट (गाजर), बर्न्ट (खमंग भाजलेला पदार्थ), फ्लेम, सनसेट, टी रोझ आणि ब्राईट अशा असंख्य छटा या केशरी रंगाची जगभरातली किमया आहे. या केशरी-भगव्या रंगातील परिधानात न्हाऊन निघालेल्या नागरिकांच्या उपस्थितील देशभरातील प्रचंड सभा, फडफडणारे असंख्य भगवे ध्वज, तत्कालीन प्रस्थापितांना अन्यायाविरुद्ध जाब विचारण्यासाठी लढणाऱ्या, भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या साध्वी आणि भगव्या वस्त्र-परिधानात समाजाचा आत्मसन्मान जागृत ठेवणारे, नागरिकांना ऊर्जा देणारे नवे योगी राजकारणी... या विशाल भगव्याला आपला दंडवत आणि त्याच्या यशासाठी अनेकानेक शुभेच्छा...!!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat