पाकिस्तानात राहणार्या प्रत्येकच हजारा परिवाराजवळ दुःख आणि दैन्याची एक कहाणी आहे, जी ते दररोज सहन करतात. मृत्यू आणि उत्पीडनाच्या नेहमीच्या भीतीमुळे हजारांच्या जीवनावर विपरित परिणाम झाला आहे.
इस्लाम धर्माला मानणार्यांसाठी वेगळ्या भूमीच्या मागणीचे फळ म्हणजेच भारताच्या फाळणीनंतर जगाच्या पाठीवर निर्माण झालेले पाकिस्तान नामक नवराष्ट्र होय. इस्लामिक राज्य असल्याने पाकिस्तानमध्ये प्रारंभापासूनच अन्य अल्पसंख्य समुदायाला भेदभावाला नेहमीच बळी पडावे लागले. परंतु, असे असले तरी इस्लाम धर्माला मानणार्याच काही गटांनादेखील धार्मिक भेदभाव सहन करावा लागला. ज्यात ‘अहमदी जिकरी’ आणि ‘हजारा’ समुदायाचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. कारण, हे दोन्ही समुदाय सुरुवातीपासून इस्लाम आणि इस्लामिक राज्यात दुय्यम नागरिक म्हणून आयुष्य कंठण्यास विवश आहेत. १२ एप्रिल रोजी हजारागंजी बाजारात अल्पसंख्य शिया हजारा समुदायातील लोकांना लक्ष्य करत केलेला हल्ला याच भेदभावाच्या, उत्पीडनाच्या मालिकेतील आणखी एक भाग होय. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात किमान २० लोकांना जीवाला मुकावे लागले, तर ४८ पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले. पाकिस्तानात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कट्टरपंथी आणि केवळ स्वतःलाच योग्य आणि इतर मत-पंथ-श्रद्धेला मानणार्यांना जगात राहण्याचाही अधिकार नाही, असे समजणार्या विचारधारेचाच हा दाखला म्हणावा लागेल.
शिया हजारा समुदायावर एप्रिल महिन्यात झालेला हल्ला हा काही पहिलाच हल्ला नाही, तर भूतकाळातही असे कितीतरी हल्ले हजारागंजी परिसरात झालेच होते. हजारागंजी बाजारातील या भागात हजारा समुदायाचे दुकानदार कित्येक वर्षांपासून फळे आणि भाज्यांचा व्यवसाय-व्यापार करत आले. सातत्याने मिळणार्या हल्ल्याच्या धमक्यांमुळे त्यांना सुरक्षाव्यवस्थाही पुरवण्यात आली होती. परंतु, ती पुरेशी नव्हती. आपल्या विशिष्ट शारीरिक ठेवणीमुळे हजारा समुदायातील लोकांना ओळखणे फारसे कठीण काम नसल्याने सांप्रादायिक हिंसाचाराची शिकार हे लोक लवकरत होत असत. अफगाणिस्तानातील हिंसाचारातून जीव वाचवून आलेल्या हजारा समुदायातील दहा लाख लोकांनी गेल्या चार दशकांत पाकिस्तानच्या विविध प्रांतांत आश्रय घेतला. यापैकी सर्वाधिक सहा लाख हजारा लोक केवळ बलुचिस्तानच्या क्वेटा शहरातच राहतात. पाकिस्तानच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनसीएचआर) मागच्या वर्षी जारी केलेल्या एका अहवालातून हजारा समुदायातील लोकांवरील अत्याचाराची धक्कादायक आकेडवारी समोर आली. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१७ दरम्यान क्वेटा परिसरात दहशतवादाच्या विविध घटनांमध्ये हजारा समुदायातील ५०९ लोकं ठार झाले, तर ६२७ लोकं जखमी झाले. एनसीएचआरनुसार लक्ष करुन केलेल्या हत्या, आत्मघाती हल्ले आणि बॉम्बस्फोटांमुळे बलुचिस्तानच्या या सर्वात मोठ्या शहरातील हजारा समुदायाच्या सदस्यांच्या दैनंदिन आयुष्यावर, शिक्षणावर आणि व्यावसायिक गतिविधींना चांगलेच नुकसान पोहोचवले आहे.
हजारा समुदाय
शिया हजारा समुदाय फारसी भाषक, मंगोलियन वंशाशी (एथनिक) समूहाची संबंधित असून मध्य अफगाणिस्तानच्या हजारा क्षेत्रातील बामियान येथून स्थलांतर करून पाकिस्तानात आला. त्याआधी हे लोक ब्रिटिश सत्ताकाळात जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी भारतात मजुरांच्या रूपांत दाखल झाले आणि नंतर अफगाणिस्तानच्या अत्याचारी अमीर अब्दुर रहमान खानने त्यांना तिथून पलायन करण्यासाठी प्रवृत्त केले. यापैकी सर्वाधिक लोक बलुचिस्तानच्या क्वेटा शहरात थांबले. कारण, सैन्यतळ असल्याने इथे सैन्याशी निगडित कामांत रोजगार सुलभपणे उपलब्ध होत असे. परंतु, १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारताला फाळणीच्या मोबदल्यात स्वातंत्र्य दिले आणि नव्या इस्लामिक राज्याच्या आरंभापासूनच हजारा समुदायाच्या दुर्दैवी काळाची सुरुवातही झाली. हजारा समुदायाविरोधातील व्यापक हिंसक लाटेचा विचार करता तीन टप्प्यांत त्याचे वर्गीकरण करता येईल -
पहिली लाट कट्टर सुन्नी प्रचाराबरोबर आली, जी सोव्हिएत आक्रमणाचा सामना करण्यासाठी जनरल झिया उल हक यांच्या काळात सुरू झाली. सौदीच्या पेट्रो डॉलर्सच्या रसदीवर आणि अमेरिकेच्या समर्थनाने चालणार्या या वहाबी कट्टरतेने धर्मांधता आणि दुराग्रहाला प्रोत्साहन दिले. शिया समुदायाला ‘काफिर’ म्हणून संबोधणारा पहिला संदेश १९८१ साली क्वेटाच्या भिंतीवर चिकटवण्यात आला. १९८५ मध्ये ‘सिपाह-ए-सहाबा’सारख्या कट्टरपंथी संघटना आणि १९९६ मध्ये उद्भवलेल्या या गटाच्या ‘लष्कर-ए-झांगवी’सारख्या सशस्त्र शाखेने हजारा समुदायाच्या जगण्यावरच संकट निर्माण केले.
हत्या व हिंसाचाराचा दुसरा टप्पा म्हणजे, हजारा समुदायातील लोकांना पूर्वनिर्धारित पद्धतीने हल्ल्यांसाठी लक्ष्य केले गेले. ऑक्टोबर १९९९ मध्ये बलुचिस्तानचे प्रांतीय शिक्षणमंत्री सरदार निसार अली हजारा यांच्यावर हल्ला करण्यात आला. तथापि, या हल्ल्यातून मंत्री बचावले तरीही या हल्ल्यातून हजारा समुदायाविरोधातील लक्ष्यित हत्यांच्या प्रारंभाला निश्चित केले. विशेषत्वाने कट्टरपंथीयांनी हजारा समुदायातील उच्चशिक्षित सदस्यांना ज्यात डॉक्टर, अभियंते, बँक अधिकारी, व्यापारी आणि राज्य सरकारी अधिकार्यांना एकसारखेपणे निवडले, त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आणि त्यांचा जीव घेण्यात आला.
हजारांविरोधातील हत्यासत्राचा तिसरा टप्पा म्हणजे, समुदायातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर सामूहिकरित्या केलेला नरसंहार होय. जून २००३ साली सुन्नी कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात क्वेटाच्या पोलीस प्रशिक्षण संस्थेतील १२ हजारा पोलीस कॅडेट ठार करण्यात आले आणि नऊ जण जखमी झाले. २००३च्या जुलै महिन्यात शुक्रवारच्या नमाजावेळी एका इमामबारगाहवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ५० हजारा समुदायातील पुरुषांच्या चिंधड्या झाल्या आणि कित्येकजण जखमी झाले.
का होतात हजारांवर हल्ले?
आत्मघाती वा दहशतवादी हल्ल्यांमुळे हजारा समुदाय पाकिस्तानात असुरक्षित आहे. पण कसे? तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे त्यांची विशिष्ट अशी शारीरिक ठेवण. ज्यामुळे त्यांना कोणीही ‘हजारा’ म्हणून ओळखू शकतो, अगदी मोठ्यातल्या मोठ्या सभेतही! दुसरे म्हणजे, क्वेटा शहरात हजारा समुदाय दोन वस्त्यांत राहतो-मरियाबाद आणि हजारा टाऊन. ही दोन्ही ठिकाणी शहराच्या दोन टोकाला आहेत आणि एकमेकांपासून जवळपास १३ किमी अंतरावर आहेत, तसेच एका चिंचोळ्या रस्त्याने एकमेकांशी जोडलेली आहेत. हजारा लोक ज्यावेळी या रस्त्यावरून प्रवास करतात, तेव्हाच त्यांना लक्ष्य केले जाते. तिसरे म्हणजे, शिया झायरीन (हज), जे की क्वेटापासून ६५० किमी अंतरावरील ताफ्तान सीमेच्या माध्यमातून इराण आणि इराकमधील पवित्र शिया धर्मीय स्थळांची तीर्थयात्रा करतात. या प्रवासावेळी हजारा समुदाय गटागटाने पुढे जातात आणि प्रत्येक गटाबरोबर शस्त्रधारी रक्षकही असतात. परंतु, दूरचा पल्ला, शत्रुत्व बाळगणार्यांची बहुसंख्या आणि सापळा रचून बसलेल्या कट्टरपंथी दहशतवाद्यांकडून या मार्गावरच हजारा समुदायातील लोकांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जाते.
‘लष्कर-ए-झांगवी’चा हात
हजारा समुदायाला नेहमीच तालिबान आणि ‘इस्लामिक स्टेट’ म्हणजेच ‘इसिस’च्या दहशतवाद्यांकडून तथा पाकिस्तान व अफगाणिस्तान दोन्ही ठिकाणी सुन्नी मुस्लीम दहशतवादी गटांकडून लक्ष्य करण्यात आले. नुकताच झालेल्या हल्ल्यातील एक तथ्य म्हणजे, ही घटना ‘लष्कर-ए-झांगवी’च्या बलुचिस्तानमधील रमजान मेंगल या म्होरक्याच्या सुटकेनंतर बरोबर तीन दिवसांनीच घडली. ‘लष्कर-ए-झांगवी’ने २० सप्टेंबर, २०११ रोजी २६ शिया यात्रेकरूंच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. याव्यतिरिक्त शिया यात्रेकरूंवर झालेल्या क्रूर हल्ल्यात ‘लष्कर-ए-झांगवी’ने १३ लोकांची हत्यादेखील केली होती. सोबतच ‘लष्कर-ए-झांगवी’ने फेब्रुवारी २०१३ मध्ये क्वेटात झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली होती, ज्यात ८१ लोक मृत्युमुखी पडले; तर १७८ लोक जखमी झाले होते, ज्यात अधिकांश लोक शियाच होते. या पॅटर्नमधून हे स्पष्ट होते की, शिया हजारा समुदायावर ‘लष्कर-ए-झांगवी’ने सातत्याने हल्ले केले आणि संघटनेने त्याची जबाबदारीही घेतली. आता पुन्हा एकदा शुक्रवारी झालेला हल्ला व मेंगलच्या सुटकेत एक दृढसंबंध असल्याचे दिसून येते.
पाकिस्तानात राहणार्या प्रत्येकच हजारा परिवाराजवळ दुःख आणि दैन्याची एक कहाणी आहे, जी ते दररोज सहन करतात. मृत्यू आणि उत्पीडनाच्या नेहमीच्या भीतीमुळे हजारांच्या जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. कित्येक प्रकरणात असेही पाहायला मिळाले की, हजारा समुदायातील लोक त्यांच्यावर लादलेल्या हिंसेचा प्रतिकार करताना स्वतःच आक्रमक झाले. शाळांमध्येही हजारा समुदायातींल मुलांची उपस्थिती काळजी करावी इतकी कमी आहे. अन्य देशांमध्ये हजारा समुदायातील लोक आसर्यासाठी पलायन करत आहेत आणि विदारकतेतून बाहेर पडण्यासाठी क्षुल्लक किंमतीत आपली मौल्यवान संपत्ती विकत आहे. शिवाय मागे राहिलेले लोकदेखील मरियाबाद आणि हजारा टाऊन व दोन्ही ठिकाणांना जोडणार्या चिंचोळ्या रस्त्यात अडकले आहेत, ज्यांच्यासाठी बाहेरच्या जगाचे कोणतेही अस्तित्व नाही, असे असाहय्य आयुष्य जगत आहेत.
(अनुवाद : महेश पुराणिक)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat