महानगरपालिकेच्या शाळेतील मराठी माध्यमातून शिकलेली श्वेता वर्पे... कुंभारवाडा या मराठी मध्यमवर्गीय चाळीतील ती मुलगी आज जगाच्या एका मोठ्या मंचावर उभी होती. निमित्त होतं, एका सौंदर्यस्पर्धेचं. जमैका देशातील किंग्जस्टन येथे भरली होती ती स्पर्धा. ती स्पर्धाही काही साधीसुधी नाही, तर संयुक्त राष्ट्र संघटनेने आयोजित केलेली ती भव्य स्पर्धा होती.
जगभरातल्या स्पर्धक त्यात सहभागी झाल्या होत्या. १०. ९, ८, ७... असं काऊंटडाऊन सुरू होतं. सगळ्यांच्याच हृदयाची धडधड वाढली आणि घोषणा झाली ‘मिस युनायटेड नेशन्स पेजन्ट’ अंतर्गत ‘मिस गुडविल इंटरनॅशनल-२०१८ टायटल गोज टू श्वेता वर्पे फ्रॉम इंडिया.’ आपलं नाव ऐकताच श्वेताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सातार्याची ही कन्या आज ‘युनायटेड नेशन्स एलएलसी’ने आयोजित केलेल्या सौंदर्यस्पर्धेची विजेती ठरली होती. अशा स्वरूपाची स्पर्धा जिंकणारी ती मराठी स्त्री. तिचं स्वप्नं होतं, या स्पर्धेतून खर्या अर्थाने योगाला एक ग्लॅमर मिळवून द्यायचं. ते स्वप्नं अखेरीस पूर्ण झालं. हे स्वप्न पाहणार्या या योगिनी म्हणजे श्वेतयोगा वेलनेस इन्स्टिट्यूटच्या श्वेता वर्पे.
परशुराम सुर्वे आणि ताराबाई यांनी कुंभारवाड्यात पै न् पै जमवून चाळीत एक छोटीशी खोली विकत घेतली. पदरी तीन मुली आणि एक मुलगा. एक ग्लास, एक ताटवाटी एवढ्याशा भांड्यांनी प्रपंच सुरू केला. ताराबाई तशा खमक्या. नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि बोलण्यात सातारी लहेजा. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याची धमक, तर परशुराम याहून वेगळे. मृदू स्वभाव, जुनी मॅट्रिक शिकलेले, बुद्धिमान, वाचनाची आवड असलेले, सगळ्यांशी स्नेहसंबंध जपणारे. आपल्या आईवडिलांचा गुण भावंडांमध्ये दुसरा नंबर असणार्या श्वेतामध्ये हुबेहूब उतरले. ताराबाई आणि परशुरामांनी खानावळ सुरू केली. त्यामुळे श्वेताच्या घरातली चूल सकाळी ७ ला सुरू व्हायची, ती रात्री १० पर्यंत अखंड सुरूच असायची. आपल्या दीर्घोद्योगी आई-वडिलांमुळे ही मुलंसुद्धा दीर्घोद्योगी झाली. अवघ्या दुसरीत शिकणार्या श्वेताला छान गोलाकार पोळ्या लाटायला यायच्या. यावरून या मुलांच्या कष्टाची जाणीव व्हावी.
महानगरपालिकेच्या मराठी माध्यम शाळेत या चारही भावंडांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. पुढे दहावीपर्यंतचं या बहिणींचं शिक्षण चंदारामजी गर्ल्स हायस्कूलमध्ये नादारी पद्धतीनुसार झालं. नादारी म्हणजे आर्थिक परिस्थिती नसल्याने संस्थेने शैक्षणिक खर्चाचा भार उचलत दिलेलं विनामूल्य शिक्षण. मात्र, त्याकाळी या शिक्षणपद्धतीला ‘फुकट मिळालेलं शिक्षण’ अशाच शब्दांत हेटाळलं जायचं. या शाळेतील मुली जवळपास सधन कुटुंबातील. त्यांच्या तुलनेत कुठेच नसणारी श्वेता या शाळेत पहिली आली. मात्र, दहावीनंतर तिला परशुरामांनी डी.एड.ला शिकायला पाठवलं. उद्देश एकच, लवकर शिकून, कमवायला लागून घराला हातभार लावावा. तशी श्वेता सहावीत असताना चौथीपेक्षा कमी वर्गातील मुलांची शिकवणी घ्यायची. त्यावेळेस ती ७० रुपये कमवायची. ती रक्कम त्या काळात खूपच मोठी होती.
दोन वर्षांचा डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि निकाल यायच्या अगोदर श्वेता एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. पुढचं पदवीचं शिक्षण तिने एसएनडीटी विद्यापीठातून दूरशिक्षण पद्धतीने पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिचं लग्नही झालं. लग्न करताना तिने आपल्या पतीला एकच अट सांगितली, ती म्हणजे लग्नानंतरसुद्धा शिक्षण पूर्ण करू देण्याची. पतीने ती मान्य केली. पुढे श्वेताने पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठातून घेतली. एमएचा तिचा विषय होता, मराठी साहित्य. वाचनाची तिला लहानपणापासूनच प्रचंड आवड. सहावीमध्ये असताना सदाशिव निंबाळकरांचं योग संबंधित पुस्तक तिच्या वाचनात आलं आणि ती योगसाधनेकडे वळली. त्यासाठी थेट कैवल्यधाम येथे जाऊन तिने योगसाधनेचे धडे गिरवले. योगशिक्षिकेचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. आपली कारकीर्द योगसाधनेमध्ये आहे, हे तिने ओळखले आणि शिक्षिकेची नोकरी सोडून एका जिममध्ये योगशिक्षिका म्हणून ती शिकवू लागली.
योग म्हणजे वृद्धांचा, आळशी लोकांचा व्यायामप्रकार, असाच काहीसा तुच्छतेचा भाव लोकांमध्ये असायचा. तिने जवळपास १०० लोकांना योगासनांविषयी सांगितले. प्रात्यक्षिके दाखवली. मात्र, त्यातील एकाच मुलीने योगासनांसाठी प्रवेश घेतला. चिकाटी असलेल्या श्वेतासाठी ती एक मुलगी पण खूप काही होतं. हळूहळू श्वेता योगासनांसाठी प्रसिद्ध होऊ लागली आणि अवघ्या दीड वर्षांत सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन असे सहा वर्ग ती घेऊ लागली. २०१३ मध्ये गोरेगाव येथे भरलेल्या ‘बॉडी पॉवर एक्स्पो’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे प्रदर्शन पाहण्याचा तिला योग आला. तिथे तिने पाहिले तर योगासनांचे एकच दालन होते आणि तिथे जाण्यास कोणीच उत्सुक नव्हते. एकूणच योगासनांबद्दलची उदासीन अवस्था तिने अनुभवली. एक दिवस योगासनांचेदेखील असेच प्रदर्शन आपण भरवायचे, योगाला ‘ग्लॅमर’ मिळवून द्यायचे, असे तिने मनोमन ठरविले.
याचदरम्यान तिची ओळख रितिका रामित्री सोबत झाली. सौंदर्यस्पर्धेतील सौंदर्यवतींना घडविण्यासाठी रितिका प्रसिद्ध आहे. श्वेताने रितिकाला योगाला ग्लॅमर मिळवून देण्याच्या आपल्या स्वप्नाविषयी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ती सौंदर्यस्पर्धेचे धडे गिरवू लागली. फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘मिसेस टियारा इंडिया क्वीन’, जुलै २०१८ मध्ये श्रीलंकेत ‘मिस एलिट एशिया गुडविल २०१८’ आणि ऑगस्ट २०१८ मध्ये ‘मिस युनायटेड नेशन्स पेजन्ट’ अंतर्गत ‘मिस गुडविल इंटरनॅशनल-२०१८’ अशा स्पर्धा तिने जिंकल्या. अशा स्पर्धा जिंकणारी ती एकमेव मराठी महिला आहे.
दोन वर्षांपूर्वी श्वेता वर्पे यांनी ‘श्वेतयोगा वेलनेस इन्स्टिट्यूट’ नावाची योगप्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली. चारहून अधिक शिक्षक या संस्थेत कार्यरत असून श्वेता वर्पेंनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांना योगप्रशिक्षण दिले आहे. योगासने सकाळीच करावीत, शांत जागेत करावीत, या समजाला फाटे देत त्यांनी स्वत:ची शैली विकसित केली आहे. संगीताच्या तालावरदेखील त्या योगासने शिकवतात आणि दिवसाच्या कोणत्याही प्रहरी योगासने करण्याचे धडे त्या देतात. त्यामुळे खर्या अर्थाने त्यांच्याकडे येणारे प्रशिक्षणार्थी योगासनांचा खर्या अर्थाने आनंद घेतात. जिद्द आणि चिकाटी असेल तर एक महिला काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्वेता वर्पे... योगसाधनेतील त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या समर्पित भावनेबद्दल त्यांना ‘योगा क्वीन’ म्हटले जाते. योगाला जागतिक स्तरावर वेगळा आयाम देणार्या श्वेता वर्पेंचा समस्त मराठी जनांना अभिमान आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat