विदर्भातल्या पहिल्या पैठणीच्या कारखानदार - माधुरी गिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019   
Total Views |




अवघ्या सहा महिन्यांत विदर्भातला पहिला पैठणीचा कारखाना अकोला एमआयडीसीमध्ये तिने सुरू केला. प्रवाहाच्या विरोधात जाऊन ‘माऊली पैठणी उद्योग’ उभा केला. एवढंच नव्हे, तर विदर्भातील दीडशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. ही रणरागिणी म्हणजे ‘माऊली पैठणी उद्योगा’ची जननी माधुरी गिरी.


 

मराठी माणसांनी कधी कारखाना काढलाय का? त्यातल्या त्यात तुमच्यासारख्या बाईमाणसाने तर यात पडूच नये. तुम्ही शहरात एखादं चांगलं शोरूम काढा अन् तिथं थंडगार ठिकाणी साड्या विका. नको त्या भानगडीत कशाला पडता.” एका सरकारी अधिकार्‍याचे हे उद्गार ऐकून एखादी स्त्री सोडा, पण कोणताही पुरुषसुद्धा अगदी हतबल झाला असता. मात्र, ‘तिने’ तेच शब्द उराशी बाळगले आणि आपण आता कारखानदार म्हणून उभं राहायचंच, असा मनाशी चंग बांधला. अवघ्या सहा महिन्यांत विदर्भातला पहिला पैठणीचा कारखाना अकोला एमआयडीसीमध्ये तिने सुरू केला. प्रवाहाच्या विरोधात जाऊन ‘माऊली पैठणी उद्योग’ उभा केला. एवढंच नव्हे, तर विदर्भातील दीडशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. ही रणरागिणी म्हणजे ‘माऊली पैठणी उद्योगा’ची जननी माधुरी गिरी.

 

अकोल्यातल्या मोठी उमरी या गावात माधुरीचा जन्म झाला. दिलीप विठ्ठल गिरी हे माधुरीचे वडील एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. आई प्रतिभा दिलीप गिरी आदर्श गृहिणीप्रमाणे दोन मुली आणि एक मुलगा यांचा सांभाळ करीत होत्या. माधुरीचं शालेय शिक्षण टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिरात झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण अकोल्याच्या राधादेवी गोयंका महाविद्यालयात झालं. बीए झाल्यानंतर माधुरीचा विवाह अकोल्यातील मलकापूरमधील फायनान्स कन्सल्टिंग कंपनीत कार्यरत असलेल्या राजेश गिरी या तरुणाशी झाला. सासर आणि माहेरचं आडनाव एकच होतं. पुलंच्या भाषेत सांगायचं तर, माधुरीने नाव राखलं होतं. कालांतराने माधुरी आणि राजेशला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोंडस अपत्ये झाली. जरा प्रपंचात स्थिरावल्यानंतर माधुरीला एके ठिकाणी नोकरीची संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये ‘अंगणवाडी मदतनीस’ म्हणून माधुरी नोकरी करू लागली.

 

नोकरी करत असताना माधुरी जी साडी नेसत असे, आभूषणे घालत असे त्याचं आजूबाजूच्या महिला नेहमीच कौतुक करीत. ‘तुझी चॉईस छान आहे, आम्ही पैसे देतो. आमच्यासाठी पण घेऊन येत जा,’ असे महिला म्हणू लागल्या. मग माधुरीने विचार केला की, जर आपण या वस्तू विकू लागलो तर...? तिने नवर्‍याला सुचलेली कल्पना सांगितली. राजेशने लगेच होकार दिला. कटलेट, ज्वेलरी, ब्लाऊजपीस अशा वस्तू ती विकू लागली. २०१० मध्ये तिने मलकापुरात ‘१० बाय १२’ ची एक जागा घेतली आणि ‘माऊली लेडीज कॉर्नर’ नावाने २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत साड्यांचं दुकान सुरू केलं. सुरुवातीचे सहा महिने खूप अवघड गेले. मालामध्ये नफा किती मिळवायचा, कितीला खरेदी करायचा हे माधुरीला कळत नव्हतं. काहीवेळा फसवणूकही झाली. काहीशा निराश झालेल्या माधुरीला तिचे पती राजेश म्हणाले की, “तू व्यवसाय करुन पस्तावशील तरी चालेल, पण न करून पस्तावू नकोस.” माधुरीसाठी हे वाक्य खूप स्फूर्तीदायी ठरले. तिने लवकरच या व्यवसायात आपला जम बसवला.

 

अमरावती, सुरत, येवला येथून माधुरी गिरी पैठणी आणायच्या. येवल्याला तर प्रत्येक घरात पैठणी तयार केली जाते. मग ‘आपणच पैठणी तयार केली तर...’ हा विचार तिच्या मनात येऊन गेला. याचदरम्यान २०१५ साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राने खास महिलांसाठी १० दिवसांची महिला रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. माधुरीने या कार्यशाळेत भाग घेतला. विपणन, वितरण, व्यवस्थापन, मनुष्यबळ, अर्थव्यवस्थापन यांचे धडे पहिल्यांदा तिने येथेच गिरवले. आपल्या पैठणी तयार करण्याच्या कल्पनेविषयी माधुरीने बँकेच्या विभागीय व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांना सांगितले. मात्र, एवढा मोठा उद्योग उभारण्याइतपत ना भांडवल आहे ना हिंमत हेदेखील स्पष्ट केले. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅण्ड अप इंडिया- स्टार्ट अप इंडिया’चा नारा दिला होता. गायकवाडांनी या योजनेची माहिती माधुरीला दिली. मॅडम, तुम्ही फक्त सगळी माहिती करून घ्या, आम्ही तुम्हांला ५० लाख रुपयांचे कर्ज देऊ, अशी ग्वाही दिली.

 

येवल्याला जाऊन माधुरी १० दिवस राहिली. पैठणी बनविण्याचे कौशल्य, रंगकाम, साचा, विपणन, विक्री, मशीन्स या सगळ्यांची माहिती तिने घेतली. परतल्यानंतर तिने ‘स्टार्ट अप इंडिया’ अंतर्गत अर्ज केला आणि अवघ्या १३ मिनिटांत ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. परत तीन महिन्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी माधुरी गिरी येवल्याला गेल्या. परत आल्यानंतर आपला स्वत:चा कारखाना असावा म्हणून अकोला एमआयडीसीमध्ये गेल्या तर तेथील अधिकार्‍यांनी नाऊमेद केले. या सर्व घडामोडीत कर्जाचा अवधी उलटून गेल्यामुळे कर्ज रद्द करावे लागणार होते. “नव्याने अर्ज करा,” असं अधिकारी म्हणाले. कर्ज रद्द करण्याचा अर्ज भरताना माधुरीचे अंग थरथरत होते. एकप्रकारे हा आयुष्याचा जुगारच होता. मात्र, त्यांनी हिंमत सोडली नाही. परत कर्जासाठी अर्ज केला. यावेळी मंजुरीसाठी तब्बल १० दिवस लागले. हे १० दिवस म्हणजे जीवघेणेच होते. एकदाचे कर्ज मंजूर झाले आणि एमआयडीसीमधील सहा हजार चौरस फूट जागेत माऊली पैठणी उद्योग सुरू झाला. माधुरी गिरी यांच्या म्हणण्यानुसार विदर्भातील हा पहिला पैठणी तयार करणारा कारखाना आहे.

 

आज या उद्योगसमूहात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे १५० महिलांना रोजगार मिळतो. पैठणी, पेशवाई पैठणी, कांजीवरम पैठणी अशा विविध साड्या येथे तयार होतात. अगदी चार हजारपासून ते ४० हजार रुपयांपर्यंतच्या साड्या येथे तयार होतात. अकोल्याच्या बचतगटातील महिलांना पैठणी विक्रीसाठी माधुरीने प्रोत्साहित केले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी दूरवरून महिला हा पैठणीचा कारखाना पाहावयास येतात. लवकरच पैठणी संबंधित उद्योगसमूह सुरु करण्याचा माधुरी गिरींचा मानस आहे. कोणत्याही महिलेला कोणताही उद्योग सुरू करावयाचा असल्यास त्याची संपूर्ण माहिती देण्याची त्यांची तयारी आहे. एकूणच माधुरी गिरींचा हा संघर्ष थक्क करणारा आहे. सासू, नणंद आणि पती यांचा पाठिंबा नसता तर हे शक्य झाले नसते, हे त्या प्रांजळपणे कबूल करतात. माधुरी गिरींच्या संघर्षाला सलाम.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@