नुकतेच पाकिस्तानी महिलांनी आपल्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून सरकारला, समाजाला आवाहन करण्यासाठी महिलांचा एक भव्य मोर्चाही काढला. यावेळी महिलांनी विविध मागण्यांसह पाकिस्तानी सरकारला धारेवर धरले.
पाकिस्तानातल्या महिलांची दुर्दशा हे एक सार्वजनिक ज्ञात सत्य. पाकिस्तानच्या निर्मितीची ऐतिहासिक, राजनैतिक आणि सामाजिक पृष्ठभूमीदेखील या अवस्थेला पुरेपूर स्पष्ट करते. जनरल झिया-उल-हक यांच्या सत्ताकाळानंतर तर इथल्या महिलांची परिस्थिती अधिकच हलाखीची झाली. दरम्यानच्याच काळात ‘हुदूद’ सारखे कायदे करून महिलांची स्थिती चक्क दुय्यम दर्जाची करण्यात आली अन् पुढे हीच परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली, मग ते लष्करशहांचे सरकार असो वा लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार! आता एकविसाव्या शतकातही पाकिस्तानातील महिलांच्या अवस्थेत फार फरक पडलेला नाही. नुकतेच पाकिस्तानी महिलांनी आपल्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून सरकारला, समाजाला आवाहन करण्यासाठी, समाजाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांचा एक भव्य मोर्चाही काढला. पण, पाकमधल्या कट्टर मूलतत्त्ववाद्यांना तेही सहन झाले नाही व त्यांनी विरोध सुरू केला. जागतिक महिलादिनी आयोजित केलेल्या या मोर्चानंतर प्रमुख पुरुष राजनेते,माजी नोकरशहा आणि दूरचित्रवाणीवरील प्रतिष्ठितांनी समाजमाध्यमे, दूरचित्रवाणी, इतकेच नव्हे तर सिंधच्या विधानसभेतही या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांवर खोटारडे आरोप करण्याचा उद्योग केला. कहर म्हणजे, मोर्चाच्या आयोजकांना, सहभागी महिलांना जीवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्यांनाही सामोरे जावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी ८ मार्चच्या महिला दिनी पाकिस्तानच्या कराची, लाहोर, क्वेट्टा, इस्लामाबाद, मुलतान, हैदराबाद, लरकानासारख्या इतर शहरांत हजारो महिलांनी ‘आम्ही स्त्रिया’ बॅनरखाली एकत्र येत रुढी, प्रथा, परंपरांच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाविरोधात आवाज बुलंद केला. सोबतच देशात महिलांना झेलाव्या लागणाऱ्या यातना आणि सामाजिक, आर्थिक विकासविषयक क्षेत्रातील त्यांच्या योगदानालाही अधोरेखित केले. शिवाय महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचीही चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या मोर्चात अनेक तृतीयपंथाही सामील झाले होते, जे स्वतः समाजाच्या विकृत दृष्टीला बळी पडत आलेले आहेत.
पाकिस्तानातील महिलांना एकाचवेळी एकाच मंचावर आणून त्यांच्यातली एकता दाखवून देणे, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक स्थळांसह कुटुंबातील सदस्यांपासून सुरक्षा बलांकडून होणाऱ्या हिंसा व शोषणाविरोधातील उत्तरदायित्व निश्चित करून न्यायासाठी दबाव आणणे, ही या महिला मोर्चाची प्रामुख्याने उद्दिष्टे होती. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी श्रम अधिकार लागू करण्यासाठी जसा आवाज उठवला, तशीच स्वतःसाठी आर्थिक न्यायाचीही मागणी केली. याचबरोबरच स्वच्छ पेयजल, उत्तम स्वच्छता व्यवस्था, स्वच्छ हवा, वन्यजीवांची सुरक्षा, खाद्यान्न आणि नगदी पिकांच्या उत्पादनातील महिलांच्या भागीदारीला मान्यता देणे, निष्पक्ष न्याय प्रणालीपर्यंत सहजसोपी पोहोच, प्रसुतीविषयक समस्यांचे निराकरण आणि आरोग्य सुविधांची त्वरित परिपूर्ती, न्याय, सार्वजनिक ठिकाणांवर पोहोच, शैक्षणिक संस्थांतील प्रवेशाचा समान अधिकार, धार्मिक अल्पसंख्याकांचे अधिकार,युद्धविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देणे आणि पोलीस व बेकायदेशीररित्या व्यक्तीला गायब करण्यासारख्या कितीतरी घटनांच्या शेवटाचीही यावेळी मोर्चातील महिलांनी मागणी केली. परंतु, पाकिस्तानातील कट्टरपंथी समाजाला हा प्रकार सहन झाला नाही व त्यांनी याविरोधात तिखट प्रतिक्रिया दिली. “मोर्चातील महिला ज्या अधिकारांची मागणी करत आहेत, ते आमच्या संस्कृतीविरोधात आहे,” असे म्हटले गेले. उल्लेखनीय म्हणजे, या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या पोस्टरवर लिहिलेल्या घोषणांनी तीव्रतेने दुखावल्याने आणि सार्वजनिकरित्या प्रदर्शित केलेल्या या गोष्टींविरुद्ध या कट्टरपंथी मंडळींनी आपला रोषही व्यक्त केला.
‘तलाकशुदा और खुश’ ‘मैं ही रोटी क्यों बेलूं, आप भी बेलो’, ‘आप भी चूल्हा जलाओ।’ ‘क्या पराठा बेलने में लिंगभेद नहीं है?’ ‘मुझे खुद के औरत होने पर गर्व है’, यांसारख्या घोषणांवरून इथे कोणती परंपरा पाहायला मिळते, हे तर पाकिस्तानच्या गोंधळलेल्या विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे त्यांचे शासकच चांगल्याप्रकारे सांगू शकतात. पण, आता याचे नुकसान मोर्चातील निर्दोष महिलांना भोगावे लागेल. पाकिस्तानच्या महिला वकील आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या तथा लाहोरमध्ये या आंदोलनाच्या प्रमुख आयोजक निघत दाद आणि त्यांच्यासारख्या कितीतरी नेत्या आता कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. या महिलांना आता दुष्कर्मासह ठार करण्याच्याही धमक्या देण्यात येत आहोत. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या मते, पाकिस्तानात दरवर्षी एक हजारांपेक्षा अधिक मुली व महिलांना इज्जतीच्या, प्रतिष्ठेच्या नावाखाली मारून टाकले जाते आणि त्यांना कधीही न्याय मिळत नाही. पाकिस्तानमध्ये प्रत्येक वर्षी ७५ पेक्षा अधिक महिलांविरोधात अॅसिड हल्ल्यासारखी नृशंस कृत्ये केली जातात. पाकिस्तानात दररोज चार महिला बलात्कार वा सामूहिक बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यांना बळी पडतात. सोबतच सामूहिक बलात्कार, अपहरण, अॅसिड हल्ल्यासारख्या घटनांनी पीडित ८०० महिला एकतर आत्महत्या वा आत्महत्येचा प्रयत्नतरी करतात. कारण, पाकिस्तानची पोलीस ना न्यायिक व्यवस्था महिलांप्रति संवेदनशील नाही. इथली परिस्थिती तर इतकी भयावह आहे की, महिला घरांतही सुरक्षित नाहीत, पाकिस्तानमधील ९०टक्के तर महिला घरगुती हिंसाचाराला, शोषणाला बळी पडतात.
२०११ मध्ये थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार, पाकिस्तान महिलांसाठीचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात धोकादायक देश होता आणि २०१८ पर्यंत पाकिस्तानने या क्षेत्रात उन्नती करत एका सर्वेक्षणानुसार महिलांसाठीचा सहावा धोकादायक देश ठरला. ‘ह्यूमन राईट्स वॉच’च्या नव्या अहवालातही अशाच प्रकारची आकडेवारी पाहायला मिळते. यातील माहितीनुसार, गेल्या वर्षभरात पाकिस्तानात एक हजार महिलांची हत्या पत-प्रतिष्ठेच्या खोट्या अवडंबराच्या नावाखाली झाली. परंतु, वास्तवात इथली परिस्थिती या सर्वेक्षणाच्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक भयंकर आहे.कारण, हे सर्वेक्षण केवळ नोंदलेल्या गुन्ह्यांवर आधारित आहे, पण पाकिस्तानातच आजही अशी अवस्था आणि अराजकतेचे तुकडे अस्तित्वात आहेत,जिथे एक महिला आपल्याविरोधातील अत्याचारांसाठी पोलीस वा न्यायालयाकडे जाण्याचा विचारही करू शकत नाही. परंपराप्रिय टोळ्यांनी बनलेला समाज आणि धार्मिक मूलतत्त्ववादी समूहांनी आपली समांतर न्यायव्यवस्था तयार केलेली आहे. पण विडंबना अशी की, इथे त्यांच्या मूळ स्वभावानुसार महिलांच्या विरोधात झालेल्या गुन्ह्यांतही महिलेलाच दोषी समजले जाते. अशा परिस्थितीत देशात महिलांच्या हक्क व अधिकारांच्या मागण्यांसाठी अशाप्रकारे मोर्चा काढणे आगीशी खेळण्यासारखेच ठरते. म्हणूनच पाकिस्तानच्या जमिनीवर मुख्तारन माई, रिंकल कुमारीपासून कंदील बलोचसारख्या कितीतरी महिलांवरील अत्याचारांच्या खुणा सर्वत्र उघडपणे बोकाळलेल्या दिसतात.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat