गोमंतकाचा नवा आवाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019   
Total Views |


 


आयुर्वेदिक डॉक्टर ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे आणि मनोहर पर्रिकरांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविषयी थोडेसे...

 

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या अस्थिर राजकारणात डॉ. प्रमोद सावंत नावाचा एक नवा तळपता तारा क्षितिजावर दिसू लागला. डॉ. प्रमोद सावंत यांचा शपथविधीही गोवेकरांसाठी तसा एक नवीनच अनुभव ठरला. कारण, डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पर्रिकरांच्या निधनामुळे अवघा गोवा आणि देश शोकसागरात बुडाला असताना पर्रिकर यांचा वारस कोण, याचा तिढा अखेरीस सुटला. गेल्या दोन वर्षांपासून गोव्याच्या विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उत्तर गोव्यातील साखळी हा डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदार संघ. या मतदार संघात लोकोपयोगी कामे करून त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटविला. ‘आयुर्वेदिक डॉक्टर ते गोव्याचे मुख्यमंत्री’ हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असा... मनोहर पर्रिकर आणि डॉ. प्रमोद सावंत यांचे गुरुशिष्याचे नातेही तसे सर्वश्रुत होते. पर्रिकरांची प्रकृती खालावली तेव्हा सावंत यांनी ट्विटरवर अतिशय भावनिक ट्विट करत पर्रिकरांशी असलेले भावनिक बंध उलगडले होते.

 

२४ एप्रिल, १९७४ रोजी गोव्यातील पाळी-वेळगेत प्रमोद यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते रा. स्व. संघाशी निगडित होते. त्यांचे वडील पांडुरंग सावंत हे माजी जिल्हा पंचायत सदस्य होते. ते भारतीय जनसंघ, भारतीय श्रम संघाचे सक्रिय सदस्यही होते. भाजपचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. पुढे डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवाजी विद्यापीठामधून बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन आणि सर्जरीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ ही पदवीसुद्धा प्राप्त केली. सावंत हे ‘साई लाईफ केअर’ नावाची संस्था चालवतात. तसेच ‘सेंट्रल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसिनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या डिचोली तालुक्यातील शांतादुर्गा शाळेत शिक्षिका असून भाजप महिला प्रदेशच्या त्या अध्यक्षा आहेत. सावंत यांनी आयुर्वेदिक औषधांवरील पदव्युत्तर पदवीनंतर सामाजिक कामात रस घेतला. त्यांनी मेडिको-लीगल प्रणालीचा अभ्यास केला. त्यांनी २००८ मध्ये भाजपमधून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. साखळीतील जागा रिक्त होती म्हणून त्यांना पक्षातर्फे निवडणुका लढविण्यासंबंधी विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हापसा उत्तर जिल्हा रुग्णालयात आयुर्वेद डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मात्र, भाजपच्या आग्रहाखातर त्यांनी सरकारी नोकरी सोडून आमदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, २०१२ मध्ये ते याच साखळी मतदारसंघातून विजयी झाले. २०१७ मध्ये पुन्हा एकदा ते साखळी मतदार संघातूनच निवडून आले. २०१७ मध्ये मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना विधानसभा अध्यक्षाचा बहुमान मिळाला. गोव्याच्या राजकीय इतिहासातील ते सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले. गोव्याच्या युवा आंदोलनामध्ये त्यांच्या असामान्य कौशल्यामुळे त्यांना ‘राज्य युवा पुरस्कार’ देऊनही गौरविण्यात आले. नंतर त्यांनी भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे.

 

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना ते गुरू मानतात. तसेच, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी पर्रिकरांचीही सावंत यांनाच पहिली पसंती होती. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी सांगितले होते की, “पर्रिकरांनीच मला राजकारणात आणले होते. गोव्यातील भाजपचा प्रवक्ता आणि मुख्यमंत्री म्हणून माझी निवड या सगळ्याचे श्रेय पर्रिकरांचेच आहे.” समाजकारणाची पार्श्वभूमी पक्षनिष्ठा, हीच त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी सुयोग्य बनवते. मनोहर पर्रिकरांनंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी जनमानसात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे त्यांना ‘गोमंतकांचा नवा आवाज’ अशी ओळख गोव्यात प्राप्त झालेली दिसते. विशेष म्हणजे, कुठल्याही मोठ्या मंत्रिपदाचा अनुभव नसताना थेट मुख्यमंत्री होणाऱ्या भाजपनेत्यांच्या यादीमध्ये ते जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते म्हणाले की, “पर्रिकरांच्या जाण्याने गोव्याची सर्वात मोठी हानी झाली आहे. गोव्याच्या राजकारणात मला स्थिरता प्रदान करावी लागेल आणि सर्व सहयोगींसोबत पुढे जाणे आवश्यक आहे. पर्रिकरांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे, ही माझी जबाबदारी असेल. मी त्यांच्याइतका काम करू शकणार नाही परंतु, शक्य तितके कार्य करण्याचा प्रयत्न करेन.” मुख्यमंत्री म्हणून कामकाज चालू केल्यानंतर त्यांनी पर्रिकरांची प्रतिमा बाजूच्या खुर्चीत ठेऊन ते स्वतः दुसऱ्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. यावरुनच प्रमोद सावंत यांचा पर्रिकरांबद्दल असलेला प्रचंड आदर आणि मनस्वी निष्ठा यांचे दर्शन होते. अशा या तरुण, तडफदार मुख्यमंत्र्याला त्यांच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@