इमरान कशाला घाबरला?

    02-Mar-2019   
Total Views | 271

 

 
 
 
 
इमरान कुठलीही ऑफर स्वीकारायला राजी नव्हता, तेव्हा मोदी त्याला म्हणाले, “आम्हाला मग आमचे सर्वात भेदक अस्त्र उपसावे लागेल. आम्ही राफेलचे सर्वात नवे आणि आधुनिक लढावू विमान पाकिस्तानवर धाडू. त्यात अशी अस्त्रे, क्षेपणास्त्रे लावलेली आहेत की, तितकी विद्ध्वंसक शस्त्रे जगाच्या कुठल्याही प्रगत देशाची विमाने वा हवाई दलापाशीही नाहीत. युद्धच हवे असेल, तर मग त्यासाठीही सज्ज राहा इमरान!” इमरान वचकला आणि म्हणाला, “कुठले क्षेपणास्त्र? राफेलचे कुठले नवे मॉडेल?” तेव्हा मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत हसून उत्तर दिले, “आम्हाला ‘राहुल राफेल’ पाकिस्तानवर सोडावे लागेल.”
 

पुलवामा येथील जिहादी हल्ल्याला आता दोन आठवडे झालेत आणि त्यांना चोख उत्तर देण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला, त्यालाही काही कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतर भारताने पाकव्याप्त प्रदेशाच्या पलीकडे खुद्द पाकभूमीत जाऊन बालाकोट येथे हवाई हल्ला केला, त्यालासुद्धा पाच-सहा दिवस झाले. तरी पाकिस्तान दर्पोक्तीची भाषा कशाला वापरत नाही? याची अनेक भारतीयांच्या मनात शंका घोळते आहे. प्रामुख्याने ज्यांना सातत्याने अणुयुद्धाच्या भयाने पछाडलेले होते, त्या बुद्धिमान भारतीयांना पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची नरमाईची भाषा पचलेली नाही. इथे मोदी दर्पोक्ती करीत आहेत आणि इमरान हाती लागलेला भारतीय हवाई दलाचा पायलटही कुठली कटकट केल्याशिवाय तात्काळ भारताच्या हवाली करीत आहेत. त्यामुळे भारतातले पाकप्रेमी शांततावादी भलतेच रडकुंडीला आले आहेत. त्यांना पाक व इमरान यांच्या अशा शेपूट घालण्याचा कमालीचा संताप आलेला आहे. कारण, मागल्या सहा-सात महिन्यांत त्यांनी कष्टपूर्वक ज्या राफेल विमान खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आणून लोकसभेची मस्त तयारी केली होती, त्यावर हे पाकिस्तानी मित्र सहकारी पाणी ओतत चालले आहेत. हुलकावणी देण्यासाठी पाकने काही ‘एफ-१६’ विमानेही धाडली व त्यातले एक पाडले गेले. इमरानने ‘५७ इंची छाती फुगवून पुरोगामी भारतीयांची छाती ६० इंच फुगवावीही अपेक्षा अगदीच मातीमोल होऊन गेली. त्यामुळे वैतागलेल्या एका अस्सल पुरोगामी पत्रकाराने आपल्या ‘सूत्रां’कडून इमरानशी संपर्क साधला आणि त्याची पुरती खरडपट्टी काढली. तेव्हा दोन देशांतील समजूतदारपणाचे रहस्य उलगडू शकले आहे. ते रहस्य राफेल विमानाचे आहे. पाक माघार घेणार नसेल, तर राफेल विमानांनी हल्ला करण्याची धमकी मोदींनी दिली, तेव्हा इमरानला घाम फुटला. राफेलच्या एकदम नव्या आधुनिक क्षेपणास्त्राचे नावच इमरानला भयभीत करून गेले.

 

पाकिस्तानने त्यांच्या हवाई दलाला भारताच्या काश्मिरी प्रदेशात हुलकावणी द्यायला पाठवले होते आणि त्यापैकी एक पाडले गेले. त्यांचा पाठलाग करताना भारतीय विमान पाकने पाडले. त्यामुळे आता युद्ध भडकणार याची सर्वांनाच चिंता लागली होती. पण प्रकरण पुढे वाढू नये, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्यामुळे इमरान यांनीही भारताने शांतता प्रस्थापनेची एक संधी द्यावी, अशा गयावया केल्या. हे अनेकांना खटकलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. जरा कुठे खुट्ट वाजले तरी, पाकिस्तान मागल्या दोन दशकात अणुबॉम्बची धमकी देत होता. मग आताच त्यांच्या अणुबॉम्बला काय झाले? ती धमकी कुठे व का गायब झाली? असेही कोडे अनेकांना पडलेले आहे. कारण, पाकचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही पाकने अण्वस्त्रांची भाषा बोलू नये, असा सावधानीचा इशारा दिलेला होता. पण पाकिस्तान इतका गयावया कशाला करतोय? हे कोडे त्यातून उलगडत नाही. अणुबॉम्ब नसेल वापरायचा म्हणून युद्धाला पाकिस्तानने घाबरण्याचे काही कारण नाही. त्यांच्यापाशी तिथेच हजारो प्रशिक्षित फिदायीन, घातपाती कायम सज्ज आहेत आणि ते कमी पडतील म्हणून त्यांनी हजारोंच्या संख्येने भारतातच बुद्धिजीवी फिदायीनही भरती करून ठेवलेले आहेत. एकाच वेळी आपले बुद्धिमंत आणि समोरून पाकिस्तानी फिदायीन अधिक पाक सेना यांच्या माऱ्यांसमोर भारतीय सेनेचा टिकाव लागू शकणारच नाही. हे कोणीही रणनीतीकार ओळखू शकतो. मग पाकिस्तानी नेतृत्वाने व सेनेने असा अवसानघातकीपणा कशाला करावा ना? निदान हवाई हल्ला शक्य नसेल, तर आपली उर्मट-उद्धट प्रतिहल्ला करण्याची आक्रमक भाषा चालूच ठेवायला हवी ना? पण इमरानने तिथेच मार खाल्ला आणि भारतातले पुरोगामी पुरते बिथरून गेलेले आहेत. त्यांना पाकिस्तानच्या अशा नरमाईने व्यथित करून टाकले.

 

पाकिस्तानचा हवाई हल्ला फसला, तर त्यांच्या ताब्यात सापडलेला भारतीय पायलट कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांनी भारताच्या हवाली का करावा? तर जिनिव्हा कराराच्या काही तरतुदीमुळे त्याला परत द्यावा लागला, असे सांगितले जाते. पण इतर खुलासे मोदी सरकार देते त्यावर विश्वास नसलेल्या पुरोगाम्यांनी जिनिव्हा करारातल्या कलमांवर तरी विश्वास कशाला ठेवावा? म्हणूनच त्यापैकी काहीजणांनी थेट पाकिस्तानातील सूत्रांना गाठून खरा तपशील मिळवण्याचा प्रयत्न केला. बहुधा टकले किंवा तत्सम कारवान, एनडीटीव्ही, हिंदू अशा गुप्तचरांना पुरोगाम्यांनी कामाला जुंपले असावे. तेव्हा धक्कादायक तपशील बाहेर आलेला आहे. पाकचे सेनापती व वरिष्ठ अधिकारी यांनी लढायची सज्जता चालवलेली होती आणि खुद्द ५६ इंची छातीचे नरेंद्र मोदीच भयभीत झालेले होते. भारताला युद्ध परवडणारे नाही म्हणून त्यांनीच युद्ध टाळण्यासाठी आटापिटा सुरू केला होता. त्यांनी पाकिस्तानी राजदूतांकरवी इमरानला निरोप पाठवले. परराष्ट्र खात्यामार्फत शांततेचे प्रयास झाले. अगदी काश्मीर परिसरातील चकमकी थांबवून हुर्रियतच्या नेत्यांनाही अटकेतून सोडायला मोदी तयार झाले होते. पण भारतीय पुरोगाम्यांवर विसंबलेले इमरान कुठलीही माघार घ्यायला वा बोलणी करून विषय संपवायला तयार नव्हते. आता थेट युद्धच आणि त्यात उरलासुरला काश्मीर पादाक्रांत करण्याची भाषा इमरान बोलत होते. आपल्याला शांती वा बोलणी नकोत, आता युद्धच! इतक्या टोकाला मामला गेलेला होता. तेव्हा शेवटचे हत्यार म्हणून मोदींनी आपण आजपर्यंत जुनीपानी विमाने वापरली युद्ध पेटले, तर राफेल वापरून हल्ला करावा लागेल, असा इशारा मोदींनी दिला आणि इमरान गडबडला. त्याला गंमत वाटली. अजून फ्रान्सने भारताला नवी खरेदी झालेली विमाने पुरवलेलीच नाहीत, तर मोदी कुठल्या राफेलने पाकवर हल्ला करणार? या प्रश्नाचे उत्तर ऐकून इमरान आणि पाकचे लष्करप्रमुख बाजवाही गर्भगळीत होऊन गेले.

 

इमरान कुठलीही ऑफर स्वीकारायला राजी नव्हता, तेव्हा मोदी त्याला म्हणाले, “आम्हाला मग आमचे सर्वात भेदक अस्त्र उपसावे लागेल. आम्ही राफेलचे सर्वात नवे आणि आधुनिक लढावू विमान पाकिस्तानवर धाडू. त्यात अशी अस्त्रे, क्षेपणास्त्रे लावलेली आहेत की, तितकी विद्ध्वंसक शस्त्रे जगाच्या कुठल्याही प्रगत देशाची विमाने वा हवाई दलापाशीही नाहीत. युद्धच हवे असेल, तर मग त्यासाठीही सज्ज राहा इमरान!” इमरान वचकला आणि म्हणाला, “कुठले क्षेपणास्त्र? राफेलचे कुठले नवे मॉडेल?” तेव्हा मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत हसून उत्तर दिले, “आम्हाला ‘राहुल राफेल’ पाकिस्तानवर सोडावे लागेल.” इमरान म्हणाला, “हे कुठले राफेलचे मॉडेल?” मोदी उत्तरले, “ते विमान नाही, तर माणूस आहे आणि युद्ध टाळायचे तर त्यासाठी आम्ही राहुल गांधींना पाकिस्तानशी बोलणी करायला पाठवून देऊ.” ते ऐकल्यावर जनरल बाजवा यांनी इमरानचा हात दाबला आणि माघार घ्यायला लावले. ते इमरानला म्हणाले, “एकवेळ अणुबॉम्ब परवडला, राफेल लढावू विमानाचा हल्लासुद्धा परवडला. पण आपल्या पाकभूमीत राहुल गांधी नको. हे भारताच्या भात्यातले सर्वात भेदक हत्यार आहे. शहाण्यांची बुद्धी निकामी करून टाकते. जाणकारांचे डोके चालेनासे होते. पत्रकार माध्यमांना वेड लागते. सगळी माहिती गडबडून जाते.” इमरानही चकीत झाला. आपल्या देशाचा सेनापती भारताच्या या अस्त्राला का घाबरलाय, तेच त्याला कळले नाही. तेव्हा बाजवांनी खुलासा केला, मिस्टर प्राइम मिनिस्टर, हे ‘अनगायडेड मिसाईल’ आहे. ते कुठल्या दिशेने जाईल आणि कोणावर कोसळून त्याचा कधी कपाळमोक्ष करील, त्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा सरळ भारताशी युद्ध करावे किंवा थेट शरणागती पत्करावी. पण पाकिस्तान टिकवायचा असेल, तर आपल्या दिशेने ‘राहुल’ नावाचे राफेल येऊ नये, यासाठी वाटेल ती किंमत मोजावी.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121