संस्कृत संवर्धनाची अनोखी आरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019   
Total Views |




संस्कृत या विषयाकडे ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून बघितले जाते. पण, ही भाषा केवळ गुण मिळवण्यापुरती मर्यादित नसून तिला तिचे स्वत:चे सौंदर्य आहे, तिला स्वत:ची ओळख आहे. परंतु, कठीण भाषा, किचकट व्याकरण यांसारख्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे संस्कृतची वाढ कुठेतरी खुंटवण्याचा प्रयत्न होतो. पण, या भाषेला जीवंत ठेवण्यासाठी पुण्याच्या संस्कृतच्या शिक्षिका आणि अभ्यासक आरती पवार गेली २३ वर्षे अहोरात्र झटत आहेत.


आरती यांच्या घरात संस्कृतची कोणतीही पार्श्वभूमी नाही. श्लोकांव्यतिरीक्त संस्कृतशी संबंध नसताना आरती पवार यांनी आठवीत संस्कृत हा विषय घेतला. या विषयाचा अभ्यास करताना त्याची आवड निर्माण झाली. ही आवड ‘संस्कृत भारती’च्या ‘शिक्षक प्रशिक्षण वर्गा’ने पुढे अधिक विकसित झाली. महाविद्यालयीन काळात त्यांनी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना घडवण्याची ही त्यांची झालेली सुरुवात. स्वत:तील गुण जेव्हा स्वत:ला उमगतात तेव्हा त्यांच्या विकासाच्या दिशेने प्रवास करणे अधिक सुलभ होते. हीच गोष्ट आरती यांच्या बाबतीत झाली. संस्कृतवरील प्रभुत्व आणि अध्यापन कौशल्यामुळे त्या महाविद्यालयीन काळातच विद्यार्थीप्रिय झाल्या. दरम्यान, ‘संस्कृत भारती’च्या ’पत्रद्वारा संस्कृतम्’ या उपक्रमाच्या पुस्तक निर्मिती मंडळात त्यांची निवड झाली. त्यांनी ’कारगिल विजय उवाच’ या संस्कृत पुस्तकाचे या काळात भाषांतर केले. पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांनी ’व्याकरण’ हा विषय विशेष अभ्यासासाठी घेतला. समवयस्कांना शिकवताना संस्कृत व्याकरणाची त्यांनी स्वत: काही टिप्पणे तयार केली आणि त्यातूनच सुलभ संस्कृत व्याकरणासाठीचे त्यांचे पहिले पुस्तक निर्माण झाले.

संस्कृत भाषेच्या लेखनासाठी आवश्यक आहे ते सर्वप्रथम व्याकरण नीट समजणे. पण, विद्यार्थ्यांना या व्याकरणाचीच मुख्यत्वे भीती वाटते. तासिका ते परीक्षा या काळात विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात, ते सोडवणे शिक्षकांना वेळेअभावी शक्य होत नाही. हे ओळखून व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ’व्याकरण कार्यशाळे’ची रचना केली. सूत्र माहीत असल्यावर गणित सुटते, याचआधाराने ’संस्कृत गणितीय विचारपद्धती’ त्यांनी रुजवली. या पद्धतीचा वापर त्या या कार्यशाळेत करतात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या तीनशेहून अधिक संस्कृत व्याकरणाच्या कार्यशाळा झालेल्या आहेत. त्यांचे ’प्रभात’ वृत्तपत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर असे २५० लेखही प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण होण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. आरती पवार ‘भाषाबोधन वर्ग’ आणि ’व्याकरण उद्बोधन वर्ग’ घेऊन शिक्षक घडवण्याचे कार्य करीत आहेत. ‘संस्कृत वाड्मयातील एक परिणामकारक घटना : मृत्यू’ या संशोधनासाठी त्यांना ‘राष्ट्रीय संस्कृत संस्थान’ची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. ‘वेदान्त अकादमी’ मळवली येथे त्या परदेशी तसेच अमराठी विद्यार्थ्यांना ‘देवनागरी लिपी’व ’भगवद्गीतेचे व्याकरण’ याविषयी मार्गदर्शन करतात. जेव्हा संस्कृत भाषेतील व्याकरणाचा तुमचा पाया मजबूत असतो व ती भाषा तुम्ही जगता, तेव्हाच तुम्हाला या भाषेच्या सर्वांगीण कौशल्याचा प्रत्यक्षात उपयोग करता येतो आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आरती पवार. अनेक नाट्यसंस्था, आकाशवाणी केंद्रे तसेच शिबिरांमध्ये त्या ’तेळलश र्लीर्श्रीीींश’ या विषयावर मार्गदर्शन करतात. त्यांनी पुणे व कोल्हापूर या आकाशवाणी केंद्रांवर उद्घोषिका म्हणून कार्य केले आहे. धुळ्यातील नांद्रा गावात त्या बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर शुद्ध लेखनाचे संस्कार व्हावेत, यासाठी त्या ’लेखन शुद्धता’ याचे विनामूल्य वर्ग घेतात. त्या स्वत: उत्तम कथा लिहितात. आकाशवाणीवर त्यांच्या स्वरचित कथा सादर झाल्या आहेत.

 

गणित ही तर त्यांची लहानपणापासूनची आवड. संस्कृत ज्ञानामुळे ’वैदिक गणित’ या विषयात त्यांनी प्रावीण्य संपादन केले. तसेच, त्या या विषयात संशोधनदेखील करीत आहेत. संस्कृत व्याकरणाच्या वर्गांप्रमाणे त्या वैदिक गणिताचे वर्ग घेतात. ओडिशा येथील निगमानंद सरस्वती यांच्या निळाचल परिवार संघ, पुणे यांच्यातर्फे ‘ज्ञानीगुरू,’ ‘ब्रह्मचर्य साधना,’ ‘प्रेमिकगुरू’ यांसारख्या तत्त्वज्ञानाधिष्ठित पुस्तकांचे भाषांतर व संपादकीय मंडळ त्या सांभाळत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, या पुस्तकांसाठी मराठी सोडून अन्य सर्व भारतीय भाषांकरिता पुरुष कार्यरत आहेत आणि मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातून आरती पवार व सारंगा साळुंखे या दोन स्त्रिया काम पाहतात. सध्या त्या मुक्त राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तक निर्मिती, अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या निमंत्रित सदस्या आहेत. पाचवी, आठवी व दहावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकाचे व स्वयंअध्ययन पुस्तिकेचे कार्याबद्दल त्यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आरती पवार यांनी आतापर्यंत ६० पेक्षा अधिक पुस्तकांसाठी संस्कृतमध्ये लेखन, अनुवाद व संपादकीय कार्याची जबाबदारी सांभाळली आहे. ’संस्कृत व्याकरण मार्गदर्शिका’ या त्यांच्या पुस्तकाच्या दहापेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ”संस्कृत भाषा ही खजिना आहे. संस्कृत भाषा येत असेल, तर कितीतरी ज्ञानाची दारे तुमच्यासाठी खुली होतात. पण, त्यासाठी संस्कृत शिकणे गरजेचे आहे. या भाषेला एकदा समजून घेतले की, कराल तेवढे संशोधन, अभ्यास कमीच ठरेल,” असे त्या म्हणतात. संस्कृत भाषेसाठी अविरतपणे कार्यरत असणार्या आरती पवार यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 
- वसुमती करंंदीकर
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@