इसिसतर्फे प्रसादात विष कालवण्याचे प्रशिक्षण

    06-Feb-2019
Total Views |


औरंगाबाद : मुंब्रा आणि औरंगाबादहून ताब्यात घेतलेल्या नऊ जणांना इसिसतर्फे महाप्रसादात विष कालवण्याचे प्रशिक्षण इंटरनेटद्वारे दिले जात असल्याचा दावा एटीएसने केला आहे. या तरुणांनी महाप्रसादात विष कालवण्याचा कट आखला, यासाठी परदेशातून इंटरनेटद्वारे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. या नऊ संशयितांची पोलिस कोठडी फेब्रुवारी रोजी संपली होती. त्यांना विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्यासमोर हजर केल्यावर न्यायालयाने पुन्हा नऊ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली. हे नऊ संशयित १४ फेब्रुवारीपर्यंत एटीएसच्या ताब्यात राहणार आहेत.

 

एटीएसच्या पथकाने २२ जानेवारी रोजी मुंब्रा येथील उमते महंमदिया ग्रुपच्या आणि औरंगाबाद इसिसच्या मोहसीन सिराजुद्दीन खान ( वय ३२, राहणार, दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (वय २३, राहणार, कैसर कॉलनी), महंमद सरफराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी ( वय २३, राहणार, राहत कॉलनी), महंमद तकी ऊर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (वय २०, राहणार, कैसर कॉलनी) ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड ( वय ३२, राहणार, मुंब्रा ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान ( वय २८, राहणार, मोतीबाग, मुंब्रा ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (राहणार, अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख ( वय २१, राहणार, मुंब्रा ठाणे)तलहा ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरिक (राहणार, मुंब्रा) या नऊ जणांसह एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले होते.

 

सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार

गेल्या १४ दिवसांत विषारी द्रव्य जप्त करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना इसिस समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली आहे. त्यांच्या ताब्यातून हार्डडिस्कही जप्त केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबादेतील मंदिरासमोर वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालवण्याचा कट त्यांनी रचला. या नऊ जणांनी विष टाकून तयार केलेला पदार्थही जप्त करण्यात आला आहे. परदेशात त्यांनी केलेले संभाषण तपासण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला आहे. हार्डडिस्कमधील माहिती तपासायची असल्यामुळे पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली.

 

कारवाई चुकीची बचाव पक्षाचा युक्तीवाद

महाराष्ट्र एटीएसने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदा असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला आहे. १८ ऑगस्टपासून या सर्वांचे फोन टॅप होत होते. मात्र, त्याची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली नाही. याशिवाय आतापर्यंत केलेली अटक, जप्त साहित्याची माहितीही केंद्र सरकारला दिली नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. एटीएसने पोलिस कोठडीसाठी न्यायालयात सादर केलेल्या मुद्द्यातही विरोधाभास आहे, असे मुंबईहून आलेले ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. तैवार पठाण यांनी म्हटले. अॅड. खिजर पटेल यांनीही बाजू मांडली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/