मुंबईतील BNHS या पर्यावरण व जैवसंरक्षणात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या संस्थेने जानेवारी २०१९ मध्ये मुंबई महानगरात मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे सर्वेक्षण संपविले. या सर्वेक्षणात या संस्थेला तब्बल १.२१ लाखांहून अधिक फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी मुंबई महानगरात आढळून आले. देशातील पहिल्या क्रमांकाची फ्लेमिंगो पक्ष्यांची वसाहत गुजरातमधील कच्छमध्ये आहे. तेथे त्यांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे. निरीक्षाणांती समजले की, मुंबई महानगरातील फ्लेमिंगोंची संख्या मे २०१८ पासून वाढत आहे. परंतु, फ्लेमिंगोच्या सहा प्रजातीतील ‘ग्रेटर’ जातीच्या फ्लेमिंगोंची संख्या रोडावत चालली आहे व ‘लेसर’ जातीच्या फ्लेमिंगोंमध्ये मात्र वाढ होत आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील फ्लेमिंगोच्या प्रथमच अधिकृतपणे पार पडलेल्या गणतीनंतर बीएनएचएसचे संचालक दीपक आपटे यांनी ठरविले आहे की, देशातील सर्व ठिकाणच्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या फिरत्या वसाहतींची पाहणी महिनाभरात पूर्ण करावी. याकरिता देशातील जंगल खात्याच्या संपर्कात असल्यांचे आपटेंचे म्हणणे आहे. या फ्लेमिंगोंच्या पाहणीतून फ्लेमिंगोंची अनेक वैशिष्ट्ये कळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फ्लेमिंगोंची भटकेपणाची वृत्ती कशी बदलते, किती पक्षीगण कमी होऊ लागले आहेत आणि त्यांच्या आवडीच्या जागा कोणत्या आहेत याचे दरवर्षी निरीक्षण केले, तर या पक्ष्यांविषयी निश्चितच अधिक रंजक माहिती समजू शकेल. सध्याच्या वातावरणात फ्लेमिंगोंच्या वाढीचा कल दिसून आला असून ही वाढ सध्या सरकारकडून पायाभूत सेवांकरिता प्रकल्पांची जी कामे सुरू आहेत, तेथेसुद्धा दिसून आली. या पक्ष्यांची मोजणी सहसा एका दिवसात केली जाते व त्यासाठी गणक बोटींचा वापर केला जातो. ठाणे खाडीतील एक किमी अंतराच्या विभागांची गणती करण्यासाठी तो गणकांमध्ये वाटला जातो. आपटेंच्या म्हणण्याप्रमाणे, फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने मुंबई महानगरात दाखल व्हावेत, असे वाटत असेल तर पाणवठ्यातील प्रदूषण व विषारी द्रव्ये कमी झाली पाहिजेत.
‘ग्रेटर फ्लेमिंगो’ पक्षी अनेक ठिकाणी आढळतात. या जातीचे पक्षी आकाराने बऱ्यापैकी मोठे असतात. ‘ग्रेटर’ जातीचे पक्षी १.२ ते ते १.४ मीटरपर्यंत उंच असतात व ते सर्वात उंच समजले जातात. ‘लेसर फ्लेमिंगो’ पक्ष्यांची संख्या जास्त असते. हे पक्षी जास्त भटके आहेत. ‘चिलीयन फ्लेमिंगो’ प्रकारातील पक्षीही मोठे असतात (११० ते १३० सेंमी). 'जेम्स फ्लेमिंगो’ पक्षी ‘पुना’ नावानेसुद्धा ओळखला जातो. हे जास्त उंचावरून उडू शकतात. ‘अँडिअन’ प्रजातीचे फ्लेमिंगो पक्षी संख्येने विरळ आहेत. अमेरिकन प्रजातीचे पक्षी ग्रेटर व चिलीयन पक्ष्यांसारखेच असतात.
फ्लेमिंगो पक्षांची ऐतिहासक माहिती
पुरातन रोममध्ये या पक्ष्याच्या जिभेला नाजूक म्हणून मान होता. दक्षिण अमेरिकेतील पुरातन पेरूमधील मॉच जातीचे लोक फ्लेमिंगो पक्ष्यांची पूजा करायचे व त्यांची चित्रे काढून ते त्यांना मानांकित करायचे. बहामा जातीचे लोक त्यांना राष्ट्रीय पक्षी मानायचे. खाणकाम करणारे अॅन्डिअन त्यांचा मेद (fat) मटण म्हणून खायचे. त्यांचा समज आहे की, त्यांचा मेद टीबी बरा होण्यास मदत करतो. इतकेच काय तर अमेरिकेत आवड म्हणून फ्लेमिंगोंचे प्लास्टिकमध्ये केलेले गुलाबी रंगांचे पुतळे बागेत लावले जातात.
फ्लेमिंगोंची जीवन पद्धती
हे पक्षी जमिनीवर आले की, एक पाय दुमडून दुसऱ्या पायावरच बहुधा उभे राहतात. तसे उभे राहिल्याने त्याना उब मिळते व ते जास्त वेळ उभे राहू शकतात. ते त्यांचे उचलण्याचे पाय पाळीपाळीने विश्रांतीकरिता बदलत असावे. त्यामुळे त्यांच्या पायांना पुन्हा ताकद येते. एका पायावर उभे राहून त्यांना दुसरा पायाने जवळचे पाणी हलवून त्यातील खाद्य शोधण्यास मदत होते. फ्लेमिंगो पक्षी गगनविहार करण्यात अगदी पटाईत. त्यांना कोणी पकडू नये म्हणून पळून जाण्याच्या तयारीत राहण्याकरिता मध्येच ते आपले पंख फडफडावतात. तरुण पक्ष्यांचा पिसारा करड्या रंगातल्या गुलाबी रंगांच्या छटांमध्ये असतो. पाणवठ्यामधील जल-जीवाणूंमुळे व बिटाकॅरोटिनमुळे खाद्य सुदृढ असलेल्या मोठ्या पक्ष्यांच्या रंगात दाट गुलाबी रंग आढळतो. अशक्त पक्षी पांढरट असतात व त्यांना पुरेसे खाणे मिळत नाही. त्यांचे वजन अडीच किग्रॅ ते साडेतीन किग्रॅ असते व पंख पसरल्यानंतर एक मीटर ते दीड मीटरपर्यंत त्यांची लांबी. मादी पक्षी घरट्यांकरिता मडफ्लॅटमध्ये जागा शोधतात. त्याच्या खाण्यात निळे अल्गा, लार्व्हा वा विविध प्रकारचे किडे, ऑय्स्टरसारखे प्राणी असतात. साधारणपणे हे पक्षी सर्व खाणारे असतात. ते जिभेने साफ करून त्यांचे खाणे खातात. अंडी उबविण्याचे व पिल्लांना खाऊ घालण्याचे काम नर व मादी दोघेही करतात. त्यांच्या शरीरात तयार झालेले क्रॉप दूध ती पिल्लांना पाजते. प्रोटासीन हार्मोनमुळेपिल्लांची वाढ लवकर होते. घरट्यातून पिल्ले सात ते १२ दिवसांत बाहेर येतात. या क्रॉप दुधात मेद, प्रथिने व तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी मिळतात. संगोपनावस्थेतील हजारो पिल्ले एकत्र राहतात. कारण, एकट्या पिल्लाला शत्रूंचा अधिक धोका संभवतो. फ्लेमिंगो हे त्यांच्या कळपात राहणारे संगतिप्रिय पक्षी आहेत. त्यांचा कळप हजारांत असतो. अशा मोठ्या कळपांमुळे त्यांचे खाणे व छोट्या पिल्ल्यांचे संरक्षण होते आणि त्यांना खाद्यही आपापसात वाटून खाता येते. पिल्लांना जन्म देणाऱ्या १५ ते ५० जणांच्या नर-मादी पक्ष्यांचा समुदाय वेगळा ठेवला जातो. ते माना उंच व जवळ करून एकमेकांशी संवाद साधतात.
फ्लेमिंगोच्या दोन प्रकारच्या प्रजातींचे निरीक्षण
ग्रेटर व लेसर प्रजातींची आढळलेली अनुक्रमे संख्या - मे २०१८ (७,४००, १६,७००), ऑक्टोबर (२५,१००, २०,९००), नोव्हेंबर (२०,९००, २९,१००), डिसेंबर (१७,६००, ३६,१००), जानेवारी २०१९ (१४,२००, १०,७७००).
मुंबई महानगरातील फ्लेमिंगोंना बागडण्यासाठी पाणवठ्यांच्या जागा
शिवडीची खाडी, ठाणे खाडी, कळव्याजवळील विटावा, नवी मुंबईतील वाशी, ऐरोली, उरणचे व विविध पाणवठे, विक्रोळी, भांडुप या ठिकाणी फ्लेमिंगोंचे थवे प्रामुख्याने आढळतात. सिडकोच्या व इतर अतिक्रमणातून अनेक खारफुटी व पाणवठे नष्ट झाल्यामुळे पक्ष्यांच्या बागडण्याच्या जागा नष्ट झाल्या आहेत. पाणवठे नष्ट झाल्यामुळे बऱ्याच बिगरसरकारी संस्थांनी सरकारच्या वनखात्याकडे आक्षेप घेऊन विनंती केली की, त्यांनी या पाणवठ्यांचे कुंपण घालून संरक्षण करावे. सरकारच्या वनखात्याने कुंपण घालण्याचे ठरविले व मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरच्या ठाणे खाडीवर फ्लेमिंगोचे आश्रयस्थान बनवू, असे आश्वासनही दिले आहे. सरकारच्या अशा आश्रयस्थानाच्या कृतीने फ्लेमिंगोच्या भटक्या वा वास्तव्याच्या पाणवठ्याचे संरक्षण होऊ शकेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
फ्लेमिंगोंच्या संख्येवर का परिणाम होतो?
हे फ्लेमिंगो भटके पक्षी मोठ्या पाणवठ्यावर बागडायला येतात. पण, खालील काही कारणांमुळे त्यांची संख्या रोडावल्याचे दिसते.
तेव्हा, मुंबई महानगराच्या सृष्टीसौंदर्यात भर करण्याकरिता सुंदर फ्लेमिंगो पक्षी अधिक संख्येने दाखल व्हावेत, असे वाट असेल तर सरकारने व पालिकेने त्याकरिता पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्याकरिता संरक्षित क्षेत्र बनवावीत वा पाणवठ्यांना कुंपण घालावे. कारण, याच पाणवठ्यांवर फ्लेमिंगोंचे वास्तव्य असते, म्हणून ते स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवायला हवेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/