भयानक... “मी वाचेन ना?” हे तिचे वाक्य ऐकूनच दिल्लीच्या ‘निर्भया’ची आठवण आली. बेशुद्ध अवस्थेतही तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि तीही मृत्यूपुर्वी तिच्या आईला म्हणाली होती, “आई, मला जगायचे आहे.” अन्याय-अत्याचार यांच्या विरोधात जगण्याचा अट्टाहास करणार्या या ‘निर्भया’...
वाचेन ना??? मला जगायचे आहे...” उन्नाव बलात्कार कांडातील ती पीडिता मरणाच्या दारात असतानाही बोलत होती. रात्रभर तिने हाच धोशा लावला होता की, “मी वाचेन ना?” नराधमांनी पेटवून दिल्यानंतरही ही खर्या अर्थाने ‘निर्भया’ असलेली पीडिता न्यायासाठी एक किलोमीटर पळत गेली. तिच्यावर अत्याचार करणार्या, तिच्या भावनांशी खेळणार्या आणि तिची अस्मिता लुटणार्या सगळ्यांच्याच विरोधात ती पेटून उठली होती. पण, तिलाच पेटवून मारण्यात आले. भयानक...“मी वाचेन ना?” हे तिचे वाक्य ऐकूनच दिल्लीच्या ‘निर्भया’ची आठवण आली. बेशुद्ध अवस्थेतही तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि तीही मृत्यूपुर्वी तिच्या आईला म्हणाली होती, “आई, मला जगायचे आहे.” अन्याय-अत्याचार यांच्या विरोधात जगण्याचा अट्टाहास करणार्या या ‘निर्भया’...
या सगळ्या जणींचा दोष काय होता? केवळ पुरुषांपेक्षा वेगळे असलेले शरीर? त्यांच्यावर अत्याचार करणार्यांना त्यांच्या किंकाळ्या, त्यांचा करुण स्वर, त्यांच्या वेदना काही काही ऐकू आल्याच नाहीत? अर्थात, पशूंनाही वेदनांची समज असते. पण, या नराधमांना तीही नाही. या नराधमांच्या मनात सदोदित वासना-विकारांचे थैमान असते. संधी मिळाल्यावर त्यांच्यातला विकृत राक्षस नंगा नाच करतो. कोण असतात हे लोक? शरीरसुखाच्या विकृत लालसेने हे इतके राक्षस कसे होतात? यांना गोळ्या मारा, यांना फासावर द्या, यांचे हालहाल करून मारा... नव्हे, अशा नराधमांना जगण्याचा हक्क नाहीच. पण, तरीही प्रश्न पडतो की, इतके विकृत वर्तन करण्याची त्यांची हिंमत कशी झाली? कायदा-सुव्यवस्था, समाज सोडा, तर कुटुंबाचा जराही धाक यांना का नाही? यांच्या घरी किंवा परिसरात यांचे वागणे-जगणे कसे होते? हे नराधम इतक्या नीच थराचे कृत्य करायला कसे धजावतात? खरे तर अपवाद वगळता बहुसंख्य गुन्हेगारांनी पूर्वीही याच पठडीतले छोटे-मोठे गुन्हे केलेले असतात. पण, वेळीच त्या गुन्ह्यांची दखल घेतली जात नाही. वेळीच त्यांना सजा मिळाली असती तर पुढे गंभीर गुन्हे करताना त्यांनी दहादा विचार केला असता. आता वेळ आली आहे. वेळीच गुन्हेगारांना जरब बसवायची. यापुढे कुणीही ‘निर्भया’ होऊ नये. कुणाही बाबांच्या राजकुमारीला हकनाक अत्याचाराने पीडित मृत्यू येऊ नये, हीच इच्छा...
पीडिता आणि सामाजिक न्याय
गरिबाघरची लेक असो की बंगल्यातल्या शेठजींची कन्या, ती तिच्या बापाची राजकुमारीच असते. तळहाताच्या फोडासारखं आणि दुधावरच्या सायीसारखं तिला जपलं जातं. नकळत्या वयातच तिला तिच्या शरीराबाबत सजग केलं जातं. चेहर्यावर एक पुटकळी येऊ नये म्हणून ती किती आटापिटा करते. मग ती खेड्यातली असो की शहरातली. तिने तिचे शरीर जपलेले असते अगदी काटेकोरपणे. ते जपताना तिने किती स्वप्ने पाहिलेली असतात, हे एक स्त्रीच समजू शकते. पण, बलात्काराने तिचे शरीरच नव्हे, तर मन, भावना आणि स्वप्नही रक्तबंबाळ होतात... मरू घातलेल्या फुलासारखी. अर्थात, खैरलांजी, कोपर्डी, निर्भया दिल्ली, हैदराबाद आणि उन्नाव सगळ्याच घटनांनंतर मनात हेच वादळ सुरू होते.
या सर्व घटना मन सुन्न करणार्या, शब्दातीत क्रूर आणि अक्षम्य संतापजनक. खरे तर स्त्रीवर अत्याचार करणारे हे नीच नराधम माणूस योनीतील नव्हेच, तर हे पशू योनीतीलसुद्धा नाहीत. हे लिंगपिसाट आपली वासना शमवण्यासाठी जीवंत हाडामांसाच्या स्त्रीला नरकयातना देतात. तिच्या आयुष्याची राखरांगोळी करतात. अर्थात, बलात्कार झाला म्हणून जीवन संपले असे पीडित स्त्रीने मानणे चुकीचेच आहे, पण तरीसुद्धा तिच्यावर झालेले अत्याचार विसरायला तिला काय यातना भोगाव्या लागत असतील, हे ‘जावे तिच्या वंशी.’ या नराधमांना तत्काळ कडक शासन व्हावे यासाठी सरकारने ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ला मंजुरी दिली आहे. १०३३ फास्ट ट्रॅक कोर्ट नव्याने तयार होणार आहेत. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत की, पीडितेला दोन महिन्यांच्या आत न्याय मिळावा. बलात्कारविरोधातील कायद्यांना कडक करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष आहे. पण, नेहमी प्रमाणेच सरकार प्रामाणिकपणे कायदे करणार, कडक कारवाई करणार. मात्र, यामध्ये समाजाची भूमिका कोणती? त्या पीडितेच्याबाबत, तिच्या कुटुंबीयांबाबत समाज काय विचार करतो? हासुद्धा प्रश्न आहे, मेणबत्त्या पेटवून त्या पीडितेचे आयुष्य उजळणार नसते की दया, कणव दाखवून तिचे प्रश्न सुटणार नसतात. एक स्त्री आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी समाजाने तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे कुटुंबवत्सल पालक व्हायला हवे, तर कदाचित पीडितेला सामाजिक न्याय मिळेल असे वाटते...