प्रणिताची ‘कांस्य’ भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


mansa_1  H x W:


काठमांडू येथे झालेल्या १३व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचेसायकलिंग माऊंटन बाईक क्रॉसकन्ट्री मासस्टार्ट’ या प्रकारात प्रतिनिधित्व करत ‘कांस्यपदका’ची मानकरी ठरलेल्या प्रणिता सोमणविषयी...



क्रीडाक्षेत्रात सहभागी होण्याची आपली आवड जोपासत
, यशाचे उच्च शिखर गाठणार्‍या मुलींची संख्या अजूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. त्यातूनही एखाद्या खेळाकडे ‘करिअर’ म्हणून पाहणार्‍या मुलींना सर्वप्रथम कुटुंब, समाज व परिस्थिती अशा अनेक आव्हानांचा सामना करत आपले ध्येय गाठावे लागते. अशाच एका सायकलिंगचा छंद जोपासणार्‍या तरुणीने मात्र याच क्षेत्रात करिअर करायचे ठरविले आणि त्यात ती यशस्वीही झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सायकलिंगसारख्या या आव्हानात्मक खेळात आता अहमदनगरची प्रणिता प्रफुल्ल सोमण ही नवी ‘स्टार’ ठरू पाहत आहे. प्रणिता सोमण हिने नुकत्याच काठमांडू येथे झालेल्या १३व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. रोज सायकल चालवणे वेगळे आणि सायकलिंग स्पर्धेत सहभागी होणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे. त्यामुळेच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन जेव्हा सायकलस्वार स्पर्धेमध्ये उतरतो, तेव्हा तो सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आणि प्रणालीनेही संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले.



अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील १९ वर्षीय प्रणिता प्रफुल्ल सोमण. दहावीत असताना प्रणिताने ‘सायकलिंग’ या तिला पूर्णपणे अनभिज्ञ असणार्‍या क्षेत्रात प्रवेश केला. अवघ्या चार वर्षांच्या प्रशिक्षणातून आणि सरावातून सायकलिंगमध्ये तिने राज्य व राष्ट्रीय स्पर्धांतून रौप्यपदके मिळवत आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर आता ऑलिम्पिक सहभागाचे स्वप्नवत ध्येयही तिने समोर ठेवले आहे. प्रणिताचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण संगमनेरमध्येच झाले. दहावीत असताना प्रणिताने एका स्थानिक सायकल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी कधीही आपण या क्षेत्रात इतक्या उंचीवर पोहोचू, असे वाटले नसल्याचे प्रणिता सांगते. प्रणिताचे आईवडील हे पेशाने डॉक्टर. त्यामुळे आपणही डॉक्टरच व्हावे, असे तिचे स्वप्न होते. पण, हे स्वप्न जपत असतानाच आपण एका कोणत्यातरी खेळात प्रावीण्य मिळवावे, अशीही तिची मनस्वी इच्छा होती. म्हणून प्रणिता नेट बॉल, चेस यांसारख्या खेळांमध्ये आवर्जून सहभागी होत असे. या खेळांमध्येही तिने राष्ट्रीय पातळीवर मानांकने मिळवली आहेत. दहावीत असताना प्रणिताला शाळेतील मंडलिक सरांनी शालेय पातळीवरील सायकलिंग स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली. तेव्हा तिला राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची संधी गमवावी लागली. पण, सायकलिंगमधील धोका आणि आव्हान तिला भावले व या खेळात तिने स्वतःला अक्षरश: झोकून दिले.



सायकलिंगचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याकरिता प्रणिताने पुणे गाठले
. दहावीत ९६ टक्के गुण मिळवूनही तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेणे पसंत केले. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात तिने अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला. परंतु, त्याठिकाणी तिला ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याने सायकलिंगच्या सरावाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. पुण्यात तिने एक वर्ष राजू भापकर यांच्याकडे सायकलिंगचे प्रशिक्षण घेतले. २०१६ला तिची ‘एमटीबी’ (माऊंटन सायकलिंग)मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. याच संधीचं सोने करत तिने आपल्या आयुष्यातील पहिले रौप्यपदक कमाविले. १८ वर्षांखालीलच्या वयोगटात प्रणिता या रौप्यपदकाची मानकरी ठरली. पुण्यात हे सर्व करत असताना ती नवीन प्रशिक्षकांच्या शोधात होती.



त्यावेळी तिला नगरमधील सैन्य प्रशिक्षण केंद्राची माहिती मिळाली
. प्रणिताने पुणे सोडून परत नगरला येण्याचा निर्णय घेतला. यावेळी बारावीला तिने पेमराज सारडा महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या ठिकाणी खेळाला व तिच्या सरावाला प्रोत्साहन मिळाल्याचे प्रणिता आवर्जून सांगते. सैन्य प्रशिक्षण केंद्रात तिने सुमेर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला आणि तो आजतागायत सुरू आहे. या वेगळ्या क्षेत्राची करिअर म्हणून निवड करताना कुटुंबीयांची पुरेपूर साथ मिळाल्याचेही ती सांगते. प्रणिताचे आईवडील दोघेही पेशाने डॉक्टर असले तरी त्यांनी कधीही आपल्या मुलीवर तिने डॉक्टरच व्हावे, असा आग्रह लादला नाही. बरेचदा क्रीडाक्षेत्रात करिअर इच्छिणार्‍या मुलींना विविध कारणास्तव पालकांचा विरोध असतो. परंतु, प्रणिताला विरोध नाही, तर उलट यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनाचे पाठबळच मिळाले.



“हे क्षेत्र निवडले, तेव्हा मला त्याबद्दल काहीही माहिती नव्हती आणि आज मी या टप्प्यावर आहे. पण, तरीही ही माझी सुरुवातच आहे, असे मी मानते. अजून खूप काही नवीन शिकायचे आहे,” असे प्रणिती आत्मविश्वासाने सांगते. खेळाकडे करिअर म्हणून पाहणार्‍या परंतु समाज, कुटुंब किंवा इतर कारणास्तव या क्षेत्राकडे पाठ फिरवणार्‍या मुलींसाठी प्रणिता संदेश देते की, “आपल्या आवडीनुसार मुलींनी एखादा तरी क्रीडाप्रकार निवडून, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी घेणं खूप गरजेचे आहे. मुली या क्षेत्रात येण्यासाठी खूप उदासीन आहेत. त्यांनी असं न करता बिनधास्तपणे खेळांमध्ये सहभागी झालं पाहिजे. पुढे काय होईल, त्यापेक्षा आत्ता स्वतःला एक संधी देणं खूप महत्त्वाचे आहे.” राष्ट्रीय स्तरावरील आठ सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदाची मानकरी ठरलेल्या प्रणिता सोमणचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आशियाई स्पर्धेत ‘सायकलिंग माऊंटन बाईक क्रॉसकंट्री मासस्टार्ट’ या प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून देत, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्‍या प्रणिता सोमणचे दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अभिनंदन व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@