पत्रकारिता करत असतानाच ‘रुट्स टेल’ या कंपनीच्या माध्यमातून हातमाग आणि हस्तकलेचे उत्तम नमुने सादर करीत जगभरात भारतीय कलाकृतींचा प्रसार करणार्या सीमा सिंग यांच्याविषयी...
“मी मुळची शेतकर्यांच्या घरातली. त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही शिकलो की, स्वप्ने पाहिली जात नाहीत, तर ती पेरली जातात. माझ्या रक्तात मजुरी लिहिली गेली आणि मी सुरुवातीपासूनच त्यासाठी कार्यरत आहे.” सीमा सांगत होत्या. आज सीमा सिंग आपल्या कलाविष्कारामुळे जगभरात ओळखल्या जातात. पत्रकारिता करत असतानाच त्यांनी आपली आवड ओळखून त्याचे व्यवसायात रुपांतर केले. त्यामुळे सीमा सिंह आज अनेक महिला उद्योजिकांचे प्रेरणास्थान ठरल्या आहेत. सीमा सिंग यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सीमा यांचे वडील दिल्ली विद्यापीठात नोकरी करायचे. दिल्लीतच सीमा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी हिंदी विषयातून एम.ए केले. त्यांच्या बालपणीविषयीच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, “माझी संस्कृती जाणून व समजून घेण्यासाठी मी माझ्या मूळगावी समस्तीपूर येथे असे. कदाचित याच कारणामुळे माझ्यात या स्वदेशी कला जाणून घेण्याचे व त्यांच्या निर्मितीबाबतचे कुतूहल निर्माण झाले व ती जाण माझ्यात आपसुकच आली, जी आज ‘रूट्स टेल’च्या माध्यमातून जगासमोर सादर आहे.
आपल्याला कपड्यांची जाण आणि कलेचीही आवड असल्याचे सीमा सांगतात. त्यांची पत्रकारिता मूलत: कला आणि संस्कृती विषयांशी संबंधित होती. कपड्यांविषयीचे उत्तम ज्ञान आणि कलेबद्दलचे प्रेम जगासमोर सादर करण्यासाठी, हातमाग आणि हस्तकलेचा एकत्रित संगम साधत ‘रूट्स ऑफ टेल’ची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीच्या काळात कारागिरांकडून कलाकृती बनवून घेण्यास सुरुवात केली. साडी, दुपट्टा आणि टी-शर्टवर ही कलाकुसर केली. त्यांच्या या कल्पक हस्तकला आणि चित्रांमुळे आपसुक ग्राहकही त्यांच्या उत्पादनाकडे आकर्षित झाले. अशा प्रकारे सीमा यांनी ‘मधुबनी’ आणि ‘मिथिला’ या दोन कलांचा एकत्रित संगम साधत आपल्या व्यवसायाची पायाभरणी केली. केवळ पाच साड्या आणि पाच कारागिरांसह सुरु केलेल्या ‘रुट्स टेल’मध्ये आज ६० कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा सुरुवातीच्या काळातील एकूण नफा पाच लाख रुपये होता, जो आज २८ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या दुकानात साडी, दुपट्टा, हस्तशिल्प, जॅकेट्स, स्टॉल्स, सूट, कुर्ता, ज्वेलरी, गृहसजावटीची अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. तसेच, पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी कपडे आणि इतर हस्तकला व हस्तशिल्पांचीही रेलचेल असते.