ग्रहणाचे भय जगभरातील अनेक समुदायांना वाटत असे. त्याविषयीच्या वेगवेगळ्या काल्पनिक कथा मोठ्या गमतीशीर आहेत. त्यापैकी बहुतांश कथा सूर्याला गिळंकृत केल्यासंबंधीचे आहेत, तर काही ठिकाणी देव-दानव युद्धाच्या संदर्भाने हा प्रकार घडतो, असे समजले जाते.
गुरुवारी सार्या देशाने कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले. एकेकाळी अत्यंत अपशकुनी समजले जाणारे ग्रहण पाहण्याचा आनंद कित्येकांनी सहपरिवार सगळ्यांनी लुटला. आबालवृद्ध त्यात सहभागी झाले होते. एकेकाळी गर्भवती महिला, लहान मुले यांना ग्रहणाच्या सावलीतून जपणारा समाज आज तेच ग्रहण पाहण्यासाठी चौपाटीवर गर्दी करतो, हे हिंदू समाजाच्या आधुनिकताप्रवणतेचे लक्षण समजले पाहिजे. पण ग्रहणाविषयीचे गैरसमज केवळ भारतीय जनमानसातच होते असे नाही. ग्रहणाचे भय जगभरातील अनेक समुदायांना वाटत असे. त्याविषयीच्या वेगवेगळ्या काल्पनिक कथा मोठ्या गमतीशीर आहेत. त्यापैकी बहुतांश कथा सूर्याला गिळंकृत केल्यासंबंधीचे आहेत, तर काही ठिकाणी देव-दानव युद्धाच्या संदर्भाने हा प्रकार घडतो, असे समजले जाते.
देव आणि दानवात सुरू असलेल्या समुद्रमंथनातून निघालेले अमृत पिण्यासाठी एक राक्षस लपून देवांच्या रांगेत बसला. त्याने अमृताचा घोट घेतल्याचे लक्षात आल्याबरोबर विष्णूने त्याचे मुंडके धडावेगळे केले. पण अर्धवट अमृताचे प्राशन केलेल्या राक्षसाचे ‘धड’ व ‘डोके’ असे दोन्ही भाग स्वतंत्रपणे जिवंत राहिले. त्यापैकी डोक्याचा भाग म्हणजेच ‘राहू’ सूर्याला गिळण्यासाठी गेला. सूर्याला राहू गिळतो, त्यामुळे सूर्याला ग्रहण लागते. अशा प्रकारची आख्यायिका भारतात सर्वाधिक प्रचलित आहे. व्हिएतनाममध्ये विशालकाय बेडूक सूर्याला गिळतो, असा समज आहे. कोरियन लोककथा सूर्यग्रहणाचे वेगळेच विश्लेषण करतात. त्यानुसार काही गूढ श्वान सूर्याला पळविण्याचा प्रयत्न करतात. कुत्र्यांना सूर्य चोरून न्यायचा असतो, अशा स्वरूपाची कथा कोरियन संस्कृतीत आढळते. नॉर्स संस्कृतीने सूर्याला गिळण्याचा आरोप लांडग्यांवर केला आहे. नॉर्स संस्कृती उत्तरेकडील थंड प्रदेशातील असल्यामुळे त्यात स्वाभाविक भयाच्या भूमिकेत लांडग्यासारखा प्राणीच असतो. नॉर्स संस्कृतीतील दंतकथांमध्ये लोकी नावाचे एक देवलोकातील खलपात्र आहे. ‘लोकी’ला देव साखळदंडांनी बांधून ठेवतात. लोकी काही मायावी लांडगे तयार करते.
सूर्याला गिळणारे हे लांडगे त्या ‘लोकी’चे असतात, असे मानले जाते. अमेरिकेतील ‘पोमो’नावाच्या वनवासी समुदायात सूर्याशी अस्वल भांडतो आणि त्याला गिळतो, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर अस्वलाचे चंद्राशीही भांडण होते आणि चंद्राला गिळतो तेव्हा चंद्रग्रहण; या दिशेने ही आख्यायिका पुढे जाते. पोमो जमातीत सूर्यग्रहणासाठी असलेल्या शब्दाचा अर्थही तसाच आहे. आकाशातील ड्रॅगन सूर्याला भोजन म्हणून खायला जातो आणि त्यामुळे ग्रहण लागतं, असा समाज चीनमध्ये आहे. चीनमध्ये सूर्यग्रहणाला चिः किंवा शि: म्हणतात. ज्याचा अर्थ ‘खाणे’ असा होतो. ग्रीक संस्कृतीत सूर्यग्रहण म्हणजे देव रागावल्याचा संकेत समजला जात असे. देव रागावले की, मोठे संकट, नैसर्गिक आपत्ती येणार, असाही ग्रीकांचा समज होता. अलास्का व कॅनडा भागात राहणार्या वनवासी समाजात मालिना आणि हिग्लूक अशा दोन भावा-बहिणीची कथा आहे. त्या संस्कृतीला ‘इन्युट’ म्हणून ओळखतात. मालिना सुंदर असते आणि रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडत असते. हिग्लूक तिच्याकडे आकर्षित होतो आणि तिच्यासोबत प्रणयक्रीडा करत असतो. आपल्यासोबत शरीरसंबंधांत गुंतलेला पुरुष म्हणजे आपला लहान भाऊ आहे, हे मालिनाच्या एके रात्री लक्षात येते. मालिना रागाने तप्त आणि लालबुंद होते व तिथून पळून जाते. हिग्लूक तिचा पाठलाग करू लागतो. दोघेही वेगाने आकशात जातात आणि चंद्र व सूर्य होतात. मालिना म्हणजे सूर्य तर हिग्लूक म्हणजे चंद्र. हिग्लूक आणि मालिनाची आकाशात भेट होते, तेव्हा ग्रहण लागतं, अशी आख्यायिका इन्युट भागात होती.
बातमालिब्बा या संस्कृतीत ग्रहणाच्या वेळेचा उपयोग आपापसातील भांडणे मिटवण्यासाठी करत असत. सूर्य व चंद्राच्या भांडणामुळे ग्रहण लागतं आणि चंद्र-सूर्यातील भांडण सोडवण्याचा उपाय म्हणजेच आपण आपापसातील भांडणे कायमस्वरूपी बंद करणे, अशी त्या समाजाची धारणा होती. कोलंबियात लोक ग्रहण लागल्यावर सूर्यावर ओरडत असत. ‘आम्ही मेहनत करू, चांगले आयुष्य जगू’, अशी वचने देण्याची तिथे परंपरा होती. भारतातही सूर्य-चंद्राला राक्षसाशी सामना करण्याची शक्ती मिळावी म्हणून नदीत बसून राहण्याची परंपरा होती. काळाच्या ओघात विज्ञान-तंत्रज्ञानाने दिलेल्या उत्तरांतून या सर्वच दंतकथा आख्यायिकेपुरत्या मर्यादित ठेवल्या आहेत.