आपले नातलग किंवा मित्रमंडळींना आर्थिक चणचण असल्यास बरेचदा त्यांना कर्जस्वरुपी मदत केली जाते. पण, अशा जवळच्या लोकांनी नंतर कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास त्याचा परिणाम थेट नातेसंबंधांवर देखील होऊ शकतो. त्यामुळे ही कर्जे अर्थातच असुरक्षित आहेत. म्हणूनच नातलगांना किंवा मित्रमंडळींना कर्जे द्यावयाची की नाहीत, हा प्रश्न अतिशय नाजूक असतो. त्यामुळे अशी कर्ज तुम्ही दिली असतील किंवा भविष्यात देणार असाल, तर नेमकी काय काळजी घ्यायला हवी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा आजचा लेख...
शक्यतो नातलगांना किंवा मित्रमंडळींना कर्जे देऊ नयेत. यातून भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. पण, कधीकधी दयेपोटी किंवा मानवतावादी दृष्टिकोनातून अशी कर्जे देण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय भावनिक असतो म्हणून हा निर्णय कायद्याच्या कक्षेत सहजासहजी आणता येत नाही. जर अशा प्रकारची कर्जे द्यावीच लागली तर, खाली नमूद केलेले पाच नियम पाळून ती द्यावीत. हे नियम कर्ज देणारा व कर्ज घेणारा अशा दोघांसाठीही तितकेच उपयुक्त आहेत.
१. पैसे घालविण्याची तयारी असल्यास
देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण असल्यामुळे बँकाकडून कर्ज घेण्यापेक्षा नातलगांकडून किंवा मित्रांकडून (पैसे) कर्ज मागण्याचे प्रकार वाढत आहेत. कित्येकांच्या नोकर्या गेलेल्या आहेत, कित्येक बेरोजगार आहेत किंवा पगार वेळेवर मिळत नाही. धंदा-व्यवसायाला उठाव नाही. तेव्हा बँकांकडून किंवा वित्तीय संस्थाकडून सहजासहजी कर्जे मिळत नाहीत.ती मिळविण्यासाठी बरेच सोपस्कार पूर्ण करावे लागतात व ती नियमात बसत असतील, तरच मंजूर होतात. त्यामुळे तुलनेने नातलगांकडून किंवा मित्रांकडून कर्जे घेणे सोपे असते. कर्ज मागणार्यांसाठी ते सोपे असते, पण कर्ज देणार्यासाठी ते फार मानसिक व आर्थिक त्रासाचे असते. अशांना कर्ज नाकारणेही बरेचदा जड जाते. समजा कर्ज मागणारा मित्र किंवा नातलग चांगला शिकलासवरलेला असला व दुर्देवाने आर्थिक संकटात सापडलेला असेल तर अशांना कर्ज नाकारणेही अशक्य होते. मात्र, अशी वैयक्तिक कर्ज देताना हे पैसे परत येतीलच अशी खात्री बाळगू नका. तुमच्याकडे तुमच्या चालू व भविष्यातील गरजा भागवून त्यापेक्षा जर अतिरिक्त निधी असेल, तरच अशी कर्जे द्या. आज अशी कर्जे देऊन, तुम्ही भविष्यात आर्थिक संकटात येता कामा नये. तुम्ही ज्यांना पूर्ण ओळखता, ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, जो नेहमी पैशाच्या भानगडी करीत नाही, अशा मित्राला किंवा नातलगालाच कर्जे द्या. शक्यतो कर्जे मागणारी ही माणसे वैद्यकीय कारणे दाखवून कर्ज मागतात. त्यांनी सांगितलेले कारण खरे आहे का, हे त्याला न कळता त्या कारणांची खातरजमा करून घ्या!
२. तुमच्या गुंतवणुकीतून कर्जे देऊ नका
तुमची गुंतवणूक बँकांच्या मुदत ठेवींत किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवींत किंवा अन्य काही पर्यायाने गुंतवणूक केलेली असते. ही गुंतवणूक तुम्ही पूर्ण विचारांती व निश्चित ध्येयासाठी केलेली असते. त्यामुळे भावनाविवश होऊन केलेल्या गुंतवणुकीतून मुदतीपूर्वी बाहेर पडून कर्जे देण्याचा निर्णय घेऊ नका. नटसम्राट नाटकातला वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेला हा संवाद कायम लक्षात ठेवा की, “कोणालाही पुढ्यातले ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये!” तुम्ही जर गुंतवणुकीतून बाहेर पडून कोणाला कर्ज दिलेत, तर भविष्यात तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकाल. तुम्ही सेवानिवृत्तीनंतरची पुंजी गुंतविलेली असेल व ती जर तुम्ही कोणास कर्ज म्हणून दिलीत तर, वार्धक्यात रस्त्यावर याल व अशी उदाहरणे घडलेली आहेत. एखादा प्राणी मरून पडल्यावर जशी गिधाडे त्यावर झडप घालतात, तसे कोणी सेवानिवृत्त झाल्यावर काही नातलग व मित्रमंडळी गिधाडांसारखी झेप घालायला येतात. या मानवरूपी गिधाडांपासून सावध राहा. शक्यतो, अशांना कर्जे देताना बचत खात्यातील शिल्लक रकमेतूनच द्या. गुंतवणुकीतून कर्ज द्यायचा निर्णय कधीही घेऊ नका.
३. ‘नाही’ म्हणायला शिका!
जर तुम्हाला कर्ज देणे योग्य वाटत नसेल तर कोणतेही आढेवेढे न घेता अगदी स्पष्टपणे ‘नाही’ म्हणा. अजिबात संकोच बाळगू नका. ‘नाही’ म्हणण्याने कदाचित तुमचे संबंध दुरावतील पण, तुमचे पैसे सुरक्षित राहतील, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या पैशाचा स्वत: आढावा घ्या. तुम्हाला कर्जे देणे शक्य होणारेे नाही, असे वाटल्यास सरळ स्पष्टपणे ‘नाही’ म्हणा. भावना आणि आर्थिक व्यवहारांंची गल्लत करू नका. समोरच्याची खरंच प्रामाणिक अडचण असेल तरच अशाला कर्जे द्या. मला फ्रिज घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, मुलीचे लग्न थाटामाटात करावयाचे आहे, अशा कारणांसाठी कर्जे मागणार्यांना बिलकुल कर्ज देऊ नका. हॉस्पिटलचे बिल भरावयाचे आहे, खरोखरच कर्ज मागणार्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी पैसा हवा आहे, अशा प्रामाणिक कारणांसाठी कर्ज द्या. तुम्हाला जर अशांना कर्ज द्यावयाचे नसेल तर त्यांना सांगा की, हल्ली बँक सर्रास वैयक्तिक कर्ज देतात, ते घ्या. पाल्याच्या शिक्षणासाठी कर्ज मिळते ते घ्या. स्वत: आर्थिक व्यवहारात अडकण्यापेक्षा कर्ज मागायला येणार्याला आर्थिक साक्षर करा. एकाच व्यक्तीला परत परत कर्ज देऊ नका. कर्जाचे पहिले पैसे आल्याशिवाय तर त्या व्यक्तीला कधीही दुसरे कर्ज देण्याची घोडचूक करु नका. एखाद्या वेळी मदत करणे ठीक आहे, पण त्याला वरचेवर कर्ज मागण्याची सवय लावू नका. तुम्ही जर स्पष्ट ‘नाही’ म्हणता, असे लोकांना कळले तर तुमच्याकडे कर्ज मागायला कोणीही येणार नाही. त्यामुळे अशी असुरक्षित व बुडण्याची शक्यता असलेली कर्जे देण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणून आपला पैसा वाचवा.
४. पैसे परत मागण्यास लाजू नका
जवळच्या नातलगाला किंवा मित्राला कर्ज दिल्यावर ‘ते मी परत कसे मागू?’ या भावनेने काही लोक लाजतात व पैसे मागत नाहीत. लाज, शिष्टाचार वगैरे बाजूला ठेवा. ठणकावून तुमचे पैसे परत मागा. कित्येक जण इतरांची कर्जे परत करण्यास प्राधान्य देतात, पण नातलगांच्या किंवा मित्रांच्या कर्जांची परतफेड करताना चालढकल करतात. अशांकडून ठणकावून पैसे परत मागा. नातलगांनी किंवा मित्रांनी दिलेली कर्जे बिनव्याजी असतात, म्हणून ज्या कर्जांवर व्याज चढत रहाते, अशी कर्जे पहिली फेडली जातात व नातलगाकडून किंवा मित्रांकडून घेतलेली कर्जे मागे टाकली जातात. बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जे घेतल्यास त्यासाठी कर्जे परत करण्याच्या तारखा (रिपेमेंट चार्ट) निश्चित असतात, त्या तारखांना जर हप्ता भरला नाही तर जास्त दराने व्याज आकारले जाते.
त्यामुळे ही कर्जे भरण्यास प्राधान्य दिले जाते व नातलग व मित्रांकडून दिलेली कर्जे दुर्लक्षित होतात, म्हणून या बाबी नातलगांना किंवा मित्रांना कर्जे देताना लक्षात ठेवाव्यात. अशी कर्जे देताना, ती परत कधी मिळणार हे कर्ज घेणार्याकडून कर्ज घेतानाच निश्चित करावे. तो जी तारीख सांगेल, त्या तारखेदरम्यान त्यांच्याकडे कुठून पैसे येणार, याचे पुरावे तपासावे, नाहीतर कर्ज मिळण्यासाठी कर्ज घेणारा कोणतीही तारीख सांगेल. कर्जदार मागत असलेल्या कालावधीसाठी तुम्ही कर्जे देऊ शकत असाल तरच कर्ज द्या. ठरलेल्या तारखेला कर्ज आले नाही तर नातेसंबंध, मैत्री या सर्व बाबी गुंडाळून ठणकावून पैसे मागा. तुम्ही अशी दिलेल्या कर्जांचा काहीतरी पुरावा निर्माण करा. त्याला व त्यांच्या घरच्यांना ई-मेल पाठवा व त्यात, ‘आज मी तुला अमुक अमुक कारणासाठी इतकी रक्कम कर्ज म्हणून देत असून ही कर्जाची रक्कम तू मला अमुक अमुक तारखेला परत करणार आहे,’ असे नमूद करा. हा ई-मेल पाठविल्याने पुरावा निर्माण होईल तसेच इमेल कर्ज घेणार्याच्या बायकोला/ नवर्याला किंवा मुलांना तसेच जवळच्या नातलगांनाही पाठवा. हा तुमच्याकडे पुरावा म्हणून राहिल व गरज पडल्यास भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल.
५. कोणाला जामीन राहू नका
कोणीही कोणत्या बँकेतून कर्ज घेत असेल किंवा अन्य ठिकाणाहून कर्ज घेत असेल तर तुम्ही शक्यतो गॅरेंटर (जामीन) राहू नका. कर्ज घेणारा जर कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरला तर जामीन राहणार्याला कर्जाची परतफेड करावी लागते, हे लक्षात ठेवा. जर कर्ज घेणारा कर्जाची रक्कम भरू शकला नाही तर जामीन राहणार्याला कर्जाची शिल्लक रक्कम, त्यावरील वेळोवेळचे व्याज तसेच दंडाचे शुल्क भरावे लागते. एका व्यक्तीने एका संस्थेकडून ५० हजार रुपये कर्ज घेऊन ते बुडवले. ही रक्कम जामीन राहिलेल्याकडून चार वषार्र्ंत वसूल करण्यात आली आणि त्या चार वर्षांत एकूण १ लाख रुपये वसूल करण्यात आले. त्यामुळे समोरच्या माणसाची आर्थिक स्थिती, त्याची विश्वासार्हता, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी विचारात घेऊनच जामीन म्हणून कागदपत्रांवर सही करा. नातलग किंवा मित्र आर्थिक अडचणीत असेल तर आपल्याला वाईट वाटणे स्वाभाविक आहे, पण त्याला आर्थिक मदत करताना किंवा कर्ज देताना स्वत:च्या आर्थिक कुवतीचा विचार करावयास हवा. तुमच्याकडे अतिरिक्त पैसा आहे म्हणून तुम्ही अशी कर्जे देण्यापेक्षा तो सामाजिक कार्यासाठी वापरा. काही लोकांना अशांना कर्जे देणे प्रतिष्ठेचे वाटते, पण अशा खोट्या प्रतिष्ठेपायी पैसे घालवून बसू नका.