
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ आज दिल्लीच्या विविध भागात आंदोलने व निदर्शने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील अनेक भागात दूरध्वनी व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. भारती एअरटेल, आयडिया-वोडाफोन, रिलायन्स या कंपन्यांनी आपली मोबाईल व इंटरनेटसेवा बंद ठेवली आहे. सरकारी निर्देशानंतर या मोबाईल कंपन्यांनी आपली मोबाईल इंटरनेट व व्हाईस कॉल, एसएमएस सेवा बंद केली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजेपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. अफवा व चुकीचे संदेश पसरू नये याकरिता ही सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते मोबाईलवरून भडकाऊ संदेश पसरवीत असल्याने ही काळजी घेण्यात येत आहे. सेवा पूर्ववत करण्याचे आदेश मिळताच सेवा पुन्हा बहाल केली जाईल अशी माहिती एअरटेलच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडियानेही दिल्लीतील बहुतांश भागात सेवा बंद ठेवली आहे. सकाळी ९ वाजेपासून व्होडाफोनची सेवा अधिकांश भागात बंद आहे. सरकारी आदेशानुसार सेवा बंद ठेवण्यात आली आहे, सरकारकडून पुढील आदेश मिळताच सेवा पूर्ववत केली जाईल असे स्पष्टीकरण व्होडाफोनने ट्विटरद्वारे दिले आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशातील विविध भागांमध्ये विरोध प्रदर्शने सुरू आहेत. विरोध प्रदर्शनांमुळे दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.