नेहरू-गांधी घराण्याचे वारस टिकविण्यासाठी सावरकरांना शिव्या देणे बंधनकारक झालेले आहे. त्यांचे पाय चाटण्याचे राजकारण करणारे राजकारणी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून बोलत राहणार. तो त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे.
काँग्रेसचे नेते सावरकरांच्या मागे एवढे हात धुवून का लागलेले असतात? सर्वसामान्य नागरिकांना पडलेला हा प्रश्न असतो. सावरकर तर हयात नाहीत. ते ज्या हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, त्या हिंदू महासभेची राजकीय शक्ती नगण्य आहे. तरीसुद्धा सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढण्याचे राहुल गांधी आणि त्यांचे साथीदार काही सोडत नाहीत. "माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे," असे राहुल गांधी म्हणतात. असे म्हणणारे राहुल गांधी एक तर महामूर्ख असले पाहिजेत किंवा खूप धोरणी असले पाहिजेत. सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढून मतदानाच्या टक्केवारीत काहीही वाढ होत नाही, हे राहुल गांधी यांना समजत नाही, असे समजण्याचे कारण नाही. "मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे," हे वाक्य दोन भारताचे दर्शन घडवते. एक भारत नेहरू-गांधींचा भारत आहे आणि दुसरा भारत सावरकरांचा भारत आहे. नेहरू-गांधी ही विचारधारा आहे, सावरकर हीदेखील विचारधारा आहे. हा संघर्ष नेहरू-गांधी आणि सावरकर या तीन व्यक्तींतील नसून तो विचारधारेतील संघर्ष आहे. त्याचे नेमके स्वरूप काय आहे, हे समजल्याशिवाय कधी राहुल गांधी, कधी कपिल सिब्बल, कधी मणिशंकर अय्यर तर कधी अन्य काँग्रेसचे नेते सावरकरांचा एवढा द्वेष का करतात, हे समजणार नाही.
नेहरू-गांधी विचारधारेचे मानणे असे आहे की, भारत नावाचा देश १९४७ साली अस्तित्वात आला. हा नवीन देश उदारमतवादी असला पाहिजे. येथे सर्व धर्माच्या लोकांना समान स्थान दिले पाहिजे. हा देश हिंदूंचा नाही, तर या देशात राहणाऱ्या हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आदी सर्वांचा देश आहे. या देशाची संस्कृती हिंदू संस्कृती नसून संमिश्र संस्कृती आहे. या देशाचे आदर्श अकबर, टिपू सुलतान यांच्याबरोबर शिवाजी, महाराणा प्रताप हेदेखील आहेत. मुसलमानी आक्रमक या देशात लुटीसाठी आले, शेवटी ते देशात राहिले, त्यांनी देश आपला मानला म्हणून आपणही त्यांना आपले मानले पाहिजे. सावरकरांचे म्हणणे याच्या उलट आहे. हा देश अतिशय प्राचीन आहे. त्याची निर्मिती १९४७ साली झाली नाही. हिंदू समाज राष्ट्रीय समाज आहे. हा देश हिंदूंचा आहे म्हणून हे हिंदू राष्ट्र आहे. त्याला थोर प्राचीन परंपरा आणि संस्कृती आहे. या मूळ संस्कृतीशी अन्य धर्मीयांनी जुळवून घ्यायला पाहिजे, स्वत:चे वेगळे अस्तित्व जपता कामा नये, या वेगळ्या अस्तित्वाच्या आधारे फुटीरतेच्या मागण्या करता कामा नयेत, यासाठी हिंदू समाजाने संघटित झाले पाहिजे. हिंदू समाजाच्या संघटनेचा आधार आपली मातृभूमी असली पाहिजे. सिंधू नदीपासून ते दक्षिण सागरतीरापर्यंतची ही भूमी आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे आणि ती प्राचीन काळापासून आहे. या दोन्ही विचारधारा एकमेकांना छेद देणाऱ्या आहेत. नेहरू-गांधी विचारधारेचे नेतृत्व महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. या विचारधारेत अंतर्गत असंख्य दोष आहेत, विसंगती आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम देशावर फार घातक झालेले आहेत. आपले राष्ट्रीयत्व कशात आहे, हेच नीट न समजल्यामुळे फुटीरतेची मागणी करणाऱ्या मुस्लीम लीगला कोरा धनादेश देऊन सामावून घेण्याचा प्रयत्न झाला. ऐकायला गोड वाटणाऱ्या भाषेत महात्मा गांधीजी म्हणत असत की,"हिंदू मोठे भाऊ आहेत, मुसलमान लहान भाऊ आहेत. मोठ्या भावाने उदार मनाने त्याच्या काही मागण्या मान्य केल्या पाहिजेत." हा लहान भाऊ गळा कापायला हातात सुरा घेऊन उभा आहे, हे महात्मा गांधीजींनी कधी पाहिलेच नाही. नेहरूंना ते दिसले नाही. १९४७ साली या लहान भावाने भारतमातेचाच गळा कापला. हा गांधी-नेहरू विचारधारेचा सर्वात मोठा पराभव आहे.
देशाचा गळा कापला जाणार, याची भविष्यवाणी सावरकरांनी केली होती. १९३६ साली सिंध प्रांताला मुंबईपासून वेगळे करण्यात आले. त्याचे कारण सिंध प्रांत मुस्लीमबहुल करायचा होता आणि तो पाकिस्तानला नंतर जोडायचा होता. गांधींना ते समजले नाही. नेहरूंना समजण्याचा प्रश्नच नव्हता. १९४० साली लाहोरला पाकिस्तानचा ठराव झाला. नेहरू म्हणाले, "पाकिस्तानची मागणी अतिशय मूर्खपणाची आहे." १९४७ साली इतिहासाने नेहरूंना महामूर्ख ठरविले. गांधी म्हणाले, "अगोदर माझ्या देहाचे दोन तुकडे होतील आणि नंतर देशाची फाळणी होईल." देशाची फाळणी झाली आणि आठ-दहा लाख हिंदूंच्या देहाचे तुकडे झाले. गांधी-नेहरू विचारांचा हा आणखी एक दारुण पराभव. पंडित नेहरू यांनी तिबेटचे उदक चीनच्या हातावर सोडले. चीनशी पंचशीलाचा करार केला. हे पंचशील भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहे. नेहरूंनी तो शब्द घेतला. सावरकर तेव्हा म्हणाले की, "तिबेट गिळंकृत केल्यानंतर भारताची भूमी हडप करण्याची चीनची भूक वाढेल. भविष्यात भारताच्या भूमीवर चीनने आक्रमण केल्यास त्याचे आश्चर्य वाटू नये." सावरकरांची ही भविष्यवाणी १९५४ची आहे. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. नेहरूंच्या उदारमतवादाचे, शांततेच्या तत्त्वज्ञानाचे थडगे बांधले. वाईट गोष्ट एवढीच झाली की, त्यात हजारो भारतीय सैनिक ठार झाले. नेहरूवादाचा हा आणखी एक दारुण पराभव आहे. आसाममध्ये १९३० सालापासूनच बांगला-मुसलमानांची घुसखोरी सुरू झाली. आज आसामच्या लोकसंख्येत जवळजवळ ३० टक्के मुसलमान आहेत. इतिहासाचा सिद्धांत असा आहे की, भारताच्या ज्या प्रदेशात मुसलमान बहुसंख्य होतात, तो प्रदेश भारतात राहात नाही. अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तानचा बहुतेक भाग याचे उदाहरण आहे. सावरकरांनी त्याविरुद्धही इशारा दिलेला होता. ही अशीच घुसखोरी चालू राहिल्यास आसामच्या संस्कृतीला धोका निर्माण होईल आणि उत्तर पूर्व अशांत होईल. आज त्याचा अनुभव आपण घेत आहोत. नेहरू तेव्हा म्हणाले, "निसर्गाला पोकळी मंजूर नसते. जेथे मोकळी जमीन भरपूर आहे, तेथे दुसऱ्या भागातून लोक येणारच." ही होती नेहरूंची देशाकडे बघण्याची दृष्टी. आजचा धगधगता पूर्वांचल हे नेहरू विचारांचे स्मारक आहे. इतिहास प्रत्येक ठिकाणी सावरकरांना ‘द्रष्टा’ म्हणून सिद्ध करीत चाललेला आहे आणि इतिहास प्रत्येक ठिकाणी गांधी-नेहरू यांना अपयशी आणि अपराधी ठरवित चाललेला आहे. काँग्रेस चालवायची असेल तर, हा इतिहास चालवून चालणार नाही. त्यामुळे सावरकरांची बदनामी हे काँग्रेसच्या दृष्टीने अस्तित्व रक्षणाचे टॉनिक झालेले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे वारस टिकविण्यासाठी सावरकरांना शिव्या देणे बंधनकारक झालेले आहे. त्यांचे पाय चाटण्याचे राजकारण करणारे राजकारणी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून बोलत राहणार. तो त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे.
सावरकरांची बदनामी झाली की, अनेकजण भावनिक होतात. त्यांच्या भावनेला धक्का पोहोचतो. हे स्वाभाविक आहे. मग त्यांना सावरकरांचा त्याग, अंदमानातील १३ वर्षे, त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत असे सर्व काही आठवू लागते. प्रश्न भावनिक बनण्याचा नाही. प्रश्न वैचारिक संघर्षाचा आहे. वैचारिक संघर्षात डोकं थंड ठेवावं लागतं. प्रतिपक्षाच्या भात्यातील बाण निष्प्रभ करावे लागतात. त्यांचे अपयश खूप मोठे करून लोकांपुढे मांडावे लागते. ते काम आपण करत राहिले पाहिजे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही नरेंद्र मोदी यांनी दिलेली घोषणा आहे. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस राहिली पाहिजे, पण विचारधारा म्हणून काँग्रेस संपली पाहिजे. नेहरू यांच्या विचारधारेतून काँग्रेसला मुक्ती दिली पाहिजे. काँग्रेस ही राष्ट्रीय झाली पाहिजे. तिला राष्ट्रीय व्हायचे असेल तर, स्वा. सावरकरांचा विचार तिला समजून घ्यावा लागेल आणि पचवून घ्यावा लागेल. तेवढे सामर्थ्य हिंदू जनतेने निर्माण केले पाहिजे. सावरकरांचा विचार मांडताना सावरकर अभ्यासक उदय माहुलकर यांनी फार सुंदर वाक्य लिहिले आहे, ते असे - "सावरकर हे राष्ट्रीय सुरक्षेचे राष्ट्रपिता आहेत." पाकिस्तान निर्माण करून नेहरू काँग्रेसने एक शत्रू आपल्या दाराशी आणून उभा केला. त्याचे वार आपण गेली ७० वर्षं झेलत आहोत. राहुल गांधी आपल्या पणजोबांची परंपरा पुढे नेत आहेत. त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्यात काही अर्थ नाही. त्यांची वैचारिक दिवाळखोरी जबरदस्तपणे सतत मांडत राहिली पाहिजे, हे काम चार-दोन लेखकांनी करून चालणार नाही, तर वाचक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, हे समजून घेतले पाहिजे आणि निर्भय होऊन या वैचारिक लढ्यात उतरले पाहिजे. राहुल गांधी चढ्या आवाजात म्हणतात की, "मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. खरं बोलल्याबद्दल मला माफी मागायला सांगतात, मेलो तरी माफी मागणार नाही." राहुल गांधी यांनी मरू नये, जिवंत राहावे. चांगले शंभर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभावे. कारण, नियतीची इच्छा अशी आहे की, त्यांनीच आपल्या हाताने नेहरू विचाराचे थडगे बांधावे. त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य आवश्यक आहे.