वार फडणवीसांवर की स्वत:वरच?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2019   
Total Views |

trio_1  H x W:




त्यांना लक्ष्य करणे म्हणजे, थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपले राजकीय जीवन आपल्या हाताने संकटात आणणे आहे. पक्ष काही कारवाई करील की नाही, हा पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत आपण कोणताही सल्ला देऊ शकत नाही. परंतु, जनता कारवाई करील. जनतेला सल्ला देण्याची गरज नाही. जनमानस हे फार प्रगल्भ असते. ते कोणते ‘मुंडे’ निवडून आणायचे आणि कोणते ‘मुंडे’ पाडायचे, हे ठरवीत असते. लोकांना अक्कल शिकवायची काही गरज नसते.



देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी लक्ष्य केले आहे
. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते तर त्यांना लक्ष्य करण्याचे धाडस या दोघांचे झाले नसते. मुख्यमंत्री असण्या-नसण्याचा हा फरक असतो. विजयाचे वारसदार सर्वजण असतात, अपयशाला कुणी वाली नसतो, असे म्हणतात. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस अपयशी झाले, असा याचा अर्थ नाही. २८८ जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ १४५ जागा आल्या. येथे पहिली चूक झाली. सरकार बनविण्यासाठी १४४ जागा लागतात. तेवढ्या निवडून येणे अशक्य होत्या. शिवसेनेला ते माहीत होते. त्यामुळे भाजपपेक्षा अर्ध्या जागा मिळूनही शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली. भाजपने ते दिले नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांचे अपयश जर कोणते असेल तर ते हे आहे. आता याला अपयश म्हणायचे की आणखी काही म्हणायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे.



 परंतु ते सत्तास्थानी नाहीत
, हे वास्तव आहे. त्यात पंकजा मुंडे परळीतून पडल्या. त्या आपल्या कर्तृत्वामुळे पडल्या. त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी मोदी-शाहाही आले होते. त्या मंत्री होत्या. पक्ष त्यांच्या मागे उभा होता. एवढे मोठे भांडवल असूनही त्या पडल्या आणि आपण पडल्याचे खापर त्यांनी पक्षावर फोडायला सुरुवात केली. एकनाथराव खडसे यांच्या तोंडून त्यांनी ‘पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केल्यामुळे मी पडले,’ अशा प्रकारचे वक्तव्य पसरविले. माध्यमांना तेच हवे होते. पंकजा का पडल्या, याचा शोध परळीत जाऊन करायला पाहिजे. मतदार आणि कार्यकर्ते यांच्या मनात, त्यांच्या विषयीची कोणती प्रतिमा तयार झाली, हे समजून घ्यायला पाहिजे. माध्यमे हे काम करीत नाहीत, ते आगी लावण्याची वक्तव्ये जाणूनबुजून प्रसारीत करीत राहतात.



या वक्तव्यांचा पंकजा मुंडे यांना फायदा नाही की एकनाथ खडसे यांनाही फायदा नाही
, हे त्यांच्या लक्षात येते की नाही माहीत नाही. वर्तमानपत्रे पहिल्या पानावरील बातम्या करून अनेकांना ‘पेपर टायगर’ बनवित असतात. या बातम्या वाचणारे हे नेते जर स्वत:ला खरोखरच ‘टायगर’ समजू लागले, तर मोठी फसगत होते. उद्या राज ठाकरेंची सभा झाली, तर वर्तमानपत्रे तिची बातमी पहिल्या पानावर देतील. पण, राज ठाकरे काही वाघ नव्हेत, हे त्यांच्या लक्षात जरी आले नाही तरी लोकांना ते माहीत असते.



एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यादेखील पराभूत झाल्या
. त्यांच्या पराभवाला तेथील शिवसेना जबाबदार आहे. शिवसेनेने भाजपचे अनेक उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, त्यात दुर्दैवाने रोहिणी यांचा क्रमांक लागला. वाडा येथून डॉ. सवरा यांचादेखील पराभव झाला. ते विष्णू सवरा यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा पराभवदेखील शिवसेनेमुळे झाला. परंतु, सवरा पिता-पुत्र शांत आहेत. ‘मी आदिवासी आहे, म्हणून मला मुद्दाम पाडण्यात आले. भाजपत आम्हाला काही स्थान नाही,’ अशा प्रकारची वटवट त्यांनी केली नाही. पंकजा आणि एकनाथराव मागासवर्गीय असल्याचे कार्ड सतत दाखवित असतात. त्यांचा संकेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतो. न बोलता ते सांगण्याचा प्रयत्न करतात की, ‘फडणवीस ब्राह्मण आहेत. म्हणून आम्हाला डावलतात,’ असे वाक्य ते न बोलताही समजून घेता येते.



गेली १५
-२० दिवस या-ना-त्या प्रकारे फडणवीस यांच्यावर हल्लाबोल होत आहे. फडणवीस मात्र शांत आहेत. ते यापैकी कोणत्याही आरोपांना उत्तर देत नाहीत, याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन! त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही वादात पडू नये. ज्यांना जातीच्या चिखलात खेळायचे आहे, त्यांना खेळू द्यावे. तो चिखल आपल्या अंगावर उडू देऊ नये. आपले काम जातीमुक्त समाज निर्माण करण्याचे आहे. एकरस आणि समरस समाज उभे करण्याचे आहे. कुणालाही न वगळण्याचे आणि कुणालाही डोक्यावर न चढवून घेण्याचे आपले काम आहे.



देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने गेली पाच वर्षे महाराष्ट्राने एक चारित्र्यसंपन्न
, कर्तृत्ववान, विधायक दृष्टी असलेला आणि जातीपातींच्या पलीकडे जाऊन, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करणारा, एक मोठा नेता पाहिलेला आहे. त्यांची क्षमता आणि त्यांचे कर्तृत्व कौतुक करण्यासारखे आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आजवर कुणी केलेला नाही. लोकसंपर्कात ते मागे राहिले नाहीत. राज्य करीत असताना अनेक धाडसी निर्णय त्यांनी केले आणि जनहिताच्या योजनादेखील राबविल्या. दिलेला शब्द त्यांनी नेहमी पाळलेला आहे. त्यांना लक्ष्य करणे म्हणजे, थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपले राजकीय जीवन आपल्या हाताने संकटात आणणे आहे. पक्ष काही कारवाई करील की नाही, हा पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत आपण कोणताही सल्ला देऊ शकत नाही. परंतु, जनता कारवाई करील. जनतेला सल्ला देण्याची गरज नाही. जनमानस हे फार प्रगल्भ असते. ते कोणते ‘मुंडे’ निवडून आणायचे आणि कोणते ‘मुंडे’ पाडायचे, हे ठरवीत असते. लोकांना अक्कल शिकवायची काही गरज नसते.



लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालाव्यात
, असे एकही काम त्यांनी केलेले नाही. त्यांनी मुख्यमंत्री असताना ‘ब्राह्मणशाही’ आणण्याचा प्रयत्न केला असता, तर लोकांनी त्यांना झुरळ झटकावा, तसे झटकले असते. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय त्यांनीच निकाली काढला. शेतकर्‍यांची स्थिती सुधारावी म्हणून जेवढे काही करता येण्यासारखे होते, तेवढे त्यांनी प्रामाणिकपणे केले. पूज्य बाबासाहेब आबंडेकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल, हे त्यांनी बघितले. निवृत्त पत्रकारांना पेन्शन देण्याचाही निर्णय त्यांचाच! म्हणून फडणवीसांना लक्ष्य करणे, म्हणजे आपणहून स्वत:लाच लक्ष्य करण्यासारखे आहे. उद्या भाजपमध्ये राहून जर कुणी मोदी आणि शाह यांना लक्ष्य करू लागला, तर त्याचे काय होईल? अटल बिहारींच्या काळात अशी काही उदाहरणे घडली आहेत. ज्यांनी अटलजींना लक्ष्य केले, ते आज कुठे आहेत? जनता त्यांना विचारतही नाही.



भाजपच्या आधाराचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे
, ती म्हणजे भाजपचा मतदार हिंदू भावनेने भाजपला मतदान करतो. माळी, वंजारी, मराठा, कुणबी, दलित इ. भावनेने तो मतदान करीत नाही. या जातीच्या सीमा त्याने केव्हाच पार केल्या आहेत. निवडून आलेला कोणत्या जातीचा आहे, मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, याचा विचार तो फारसा करीत नाही. तो ‘भाजपचा नेता’ आहे, एवढाच विचार तो करतो. म्हणून जातींचे समीकरणे बांधून भाजपअंतर्गत राजकारण करण्याचे किंवा दबाव गट निर्माण करण्याचे मनसुबे जे रचत आहेत, त्यांचे मनसुबे पत्त्यांचे बंगले ठरतील. एका क्षणात कोसळून पडतील. येथून पुढे जो कुणी भाजपच्या मूळ वैचारिक आशयाशी एकनिष्ठ राहील, जातीपाती विरहित विचार करील, तोच पक्षात पुढे जाईल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे समजले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@