नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधीच्या चर्चांमध्ये सावरकरांचा धर्माच्या आधारावर हिंदुस्थानाच्या फाळणीला पाठिंबा असल्याचे वारंवार संदर्भ दिले गेले. पण, नेहमीप्रमाणेच सावरकरांच्या एका वाक्यावरूनच सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला अथवा द्विराष्ट्रवादाचे समर्थन केले आणि या सिद्धांताचीच अंमलबजावणी जिनांनी करून फाळणीची मागणी केली, असा अत्यंत हास्यास्पद आरोप केला जातो. तेव्हा सावरकरांच्या या विधानांचा नेमका अन्वयार्थ काय होता, याचा या लेखात केलेला ऊहापोह...
"हिंदुस्थान हे एकात्म आणि एकजिनसी राष्ट्र आहे असे आज गृहित धरता येत नाही. मात्र, उलटपक्षी हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी मुख्यत: दोन राष्ट्रे विद्यमान आहेत."१ सन १९३७ मधील कर्णावती (अहमदाबाद) येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी वरील उद्गार काढले होते. या एका वाक्यावरूनच सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला अथवा द्विराष्ट्रवादाचे समर्थन केले आणि या सिद्धांताचीच अंमलबजावणी जिनांनी करून फाळणीची मागणी केली, असा अत्यंत हास्यास्पद आरोप केला जातो.
या वरील वाक्याच्या पुढे लगेच सावरकर म्हणतात, "...आणि या प्रकारच्या परिस्थितीत जगातील अनेक देशांत जे घडून आले आहे, त्यास अनुसरून प्रस्तुतकाली आपण अधिकात अधिक काय करू शकू म्हणजे ज्यात कोणालाही काही विशेष मताधिक्क्य किंवा विशेष प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि कोणालाही वाजवीहून अधिक मोल देऊन आपली राज्यनिष्ठा विकत घ्यावी लागणार नाही, असे हिंदी राष्ट्र बनविणे हेच होय.... हिंदू हे एक राष्ट्र ह्या नात्याने, समान भूमिकेवरून समान हिंदी राष्ट्राविषयीचे आपले कर्तव्य बजावण्याला सिद्ध आहेत."२ याच भाषणाच्या शेवटी सावरकर म्हणतात, "अल्पसंख्याकांचा धर्म, संस्कृति नि भाषा त्यांच्या संरक्षणाची हमी आम्ही त्यांना केव्हाही देऊ. पण, तद्वतच आपलाही धर्म, संस्कृति नि भाषा रक्षिणाच्या हिंदूंच्या समान स्वातंत्र्यावर त्यांचे होणारे कोणतेही अतिक्रमण आम्ही यापुढे सहन करणार नाही. जर अहिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण व्हावयाला पाहिजे, तर हिंदुस्थानातील कोणत्याही अतिक्रामक अल्पसंख्याकापासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण निश्चितपणे झालेच पाहिजे."३
जर सावरकरांना द्विराष्ट्रवाद मांडायचा असता तर त्यांनी अल्पसंख्य, त्यांचा धर्म, संस्कृति नि भाषा रक्षिणाची हमी देऊ याविषयी उद्गार काढले असते का? द्विराष्ट्रवाद समर्थन करायचे असते तर 'कोणालाही काही विशेष मताधिक्क्य किंवा विशेष प्रतिनिधित्व मिळणार नाही' असे म्हणाले असते का? द्विराष्ट्रवाद मांडायचा असता तर 'हिंदू हे एक राष्ट्र या नात्याने, समान भूमिकेवरून समान हिंदी राष्ट्राविषयीचे आपले कर्तव्य बजावण्याला सिद्ध आहेत,' असे सावरकर का म्हणाले असते?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रस्तुत वाक्याच्या आधी सावरकर म्हणतात, "कित्येक बालिश राजकारणी हिंदुस्थान हे पूर्वीच विसंवादरहित बनून गेलेले राष्ट्र आहे किंवा तशी नुसती इच्छा करताच ते तसे होणारे आहे असे मानण्यात भयंकर चूक करीत असतात. हे आमचे सद्हेतुप्रेरित, पण अविचारी मित्र आपली स्वप्ने सत्यच समजून चालत असतात. परंतु, खरी गोष्ट अशी आहे की 'जातीय' म्हणून म्हटले जाणारे प्रश्न हा हिंदू आणि मुसलमान यांच्या सांस्कृतिक, धार्मिक नि राष्ट्रीय विरोधाचा शतकानुशतके चालत आलेला केवळ वारसा आहे. योग्य काळ येताच तुम्ही ते प्रश्न सोडवू शकाल, पण त्यांचे अस्तित्वच मुळात नाकारून तुम्ही ते दडपून टाकू शकत नाही."४ आपण एक लक्षात घ्यायला हवे की कवीमनाचे सावरकर हे वास्तववादी होते. म्हणून 'हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी मुख्यत: दोन राष्ट्रे विद्यमान आहेत' याचा अर्थ तेव्हा अस्तित्वात असलेले ते वास्तव होते. ते अप्रिय सत्यकथन करीत होते. ते मान्य केले तरच आपण त्यावर उपाय करू शकतो.
कर्करोग झाल्याचे निदान झाले तर तो कर्करोग झालाय हे मान्य करावेच लागते, ते मान्य केले तरच त्यावर आपण उपाय करू शकतो. पण, कर्करोग झाला असून तो मान्य केलाच नाही तर त्यावर उपाय कसे करणार? कर्करोगावर क्षयरोगाचे अथवा हृदयरोगाचे उपचार करून कर्करोग कसा बरा होईल? कर्करोगाचे योग्य निदान करणार्या डॉक्टरला कर्करोगाचे प्रचारक, कर्करोगाचे पुरस्कर्ते किंवा समर्थक म्हणणार का? उपचार किंवा उपाययोजना करण्यासाठी तो रोग झालाय हे मान्य करणे ही प्राथमिक अट असते. म्हणून सावरकर म्हणतात, 'हिंदुस्थान हे पूर्वीच विसंवादरहित बनून गेलेले राष्ट्र आहे किंवा तशी नुसती इच्छा करताच ते तसे होणारे आहे असे मानण्यात भयंकर चूक करीत असतात. हे आमचे सद्हेतुप्रेरित पण अविचारी मित्र आपली स्वप्ने सत्यच समजून चालत असतात.' सावरकर हयात असतानाही त्यांच्या भाषणातील या भागावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे नागपूर येथील साप्ताहिक 'आदेश'च्या कार्यालयात जमलेल्या पत्रकारांना दि. १५ ऑगस्ट, १९४३ ला स्वत: सावरकरांनी आपल्या वाक्याचे स्पष्टीकरण दिले. दि. २३ ऑगस्ट १९४३ ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
दि. २८ ऑगस्ट, १९४३च्या साप्ताहिक 'आदेश'मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीतील महत्त्वाचा भाग असा - "मुसलमान आणि हिंदू अशी दोन राष्ट्रे हिंदुस्थानात आहेत. अशी आहे ती वस्तुस्थिती सांगणे म्हणजे काही मुसलमानांचा देश तोडून सांगण्याचा पाकिस्तानी दुराग्रह मान्य करणे नव्हे... सध्या दोन व दोनशे, स्वत:स हिंदूंपासून परकी मानणारी राष्ट्रे हिंदुस्थानात जरी बळाने घुसली असली तरी आणि हिंदुस्थानची विभागणी करू मागत असली, तरी ती वस्तुस्थिती नुसती नाकारण्याच्या भाबडट नि भेकड धोरणाने नव्हे, तर ती वस्तुस्थिती समजून घेऊन त्या वस्तुस्थितीला तोंड देऊन, तिला उलथून पाडून, आसिंधुसिंधू हिंदुस्थानात स्वतंत्र, अखंड नि अविभाज्य असे हिंदुराष्ट्रच नांदत राहणार, यात शंका नाही. आपण राष्ट्र आणि राज्य यामध्ये गोंधळ करू नये. राज्य गेले तरी राष्ट्र टिकते. जेव्हा मुसलमान आमच्यावर राज्य करत होते, तेव्हा शासन (राज्य) त्यांचे होते. पण, हिंदूंचे अस्तित्व निश्चितपणे अबाधित होते. तरीही हिंदू आणि मुसलमानांच्या संयुक्त राज्यास कुठलीही अडचण नाही. भूतकाळात, आपल्याकडे सौराष्ट्र, महाराष्ट्र, देवराष्ट्र (बेरार जवळ) यासारखी राष्ट्रे होती. आता ही राष्ट्रे कुठेत? एकमेकांत मिसळून गेली आहेत. शक आणि हूण हिंदुस्थानात राष्ट्र म्हणून आले. पण, आता त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे काय आहेत? आम्ही त्यांना आत्मसात करून घेतले. म्हणून जर मुसलमानांना हवे असेल तर ते हिंदूंसोबत एक अल्पसंख्य समुदाय म्हणून आनंदाने राहू शकतात. सर्वाच्या अंती, इच्छा हीच राष्ट्राचा अधिक प्रभावी व महत्त्वाचा घटक ठरतो."५
सावरकर येथे वास्तव मांडत होते म्हणजे वस्तुस्थितीचे कथन करत होते. वास्तव मांडून वस्तुस्थितीचे कथन करणे म्हणजे त्याचा पुरस्कार किंवा समर्थन करणे नव्हे. एखाद्या चोरीच्या गुन्ह्यात न्यायाधीश जेव्हा साक्षी, पुरावे पाहून निकाल देताना म्हणतात की 'तू चोर आहेस' तेव्हा न्यायाधीश चोरीचे समर्थन अथवा पुरस्कार करत आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ इतकाच होतो की, त्या गुन्हेगाराला त्या दुष्कृत्याविषयी शिक्षा देताना 'तू चोर आहेस' ही वस्तुस्थिती मांडणे आवश्यक असते. कारण, वस्तुस्थिती किंवा वास्तव न मांडता त्या गुन्हेगाराला शिक्षा देताच येणार नाही. तसेच येथे सावरकर तेव्हा 'हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी मुख्यत: दोन राष्ट्रे विद्यमान आहेत' हे वास्तव मान्य केल्याशिवाय उपाययोजना करता येणार नाही असे सांगत होते.
संदर्भ:
१. समग्र सावरकर वाङ्मय- खंड ६, संपादक- शं. रा. दाते, समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा प्रकाशन, १९६३-१९६५, पृष्ठ २९६
२. उपरोक्त, पृष्ठ २९६
३. उपरोक्त, पृष्ठ २९८
४. उपरोक्त, पृष्ठ २९६
५. www.savarkar.org