गावपळण : असाही एक दृष्टीकोन

    14-Dec-2019   
Total Views |

aachra_1  H x W



महाराष्ट्रातील काही मोजक्या गावांमध्ये आजही 'गावपळण' ही परंपरा पाळली जाते. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हा भाग वेगळा. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा पाळणारे 'आचरे' हे कोकणातील एक गाव. या गावाची 'गावपळण' दि. १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली. दर चार वर्षांनी तीन दिवसांसाठी संपन्न होणार्‍या अनोख्या 'गावपळण' या परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...



 श्रीरामेश्वर कृपा ज्यावरी शतधारांनी झरे,

कलासक्त हे गुणीजनमंडित पुण्यग्राम आचरे


'आचरे' हे समृद्ध कोकणातील समृद्ध गाव. आचरे या गावाला एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचा इतिहास आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे दर चार वर्षांनी होणारी 'गावपळण.' शेकडो वर्षांपासूनची ही प्रथा. आज या प्रथेची चर्चा होते कारण, ती 'अंधश्रद्धा' आहे. या परंपरेला 'अंधश्रद्धे'चा शिक्का मारण्यासाठी 'काहीजण' पुढे आले आहेत, तर काहीजण ही 'श्रद्धा' आहे यावर अजूनही ठाम आहेत. 'श्रद्धा' आणि 'अंधश्रद्धा' यातील सीमारेषा पुसट आहेत किंवा त्या निश्चितपणे ठरवताही येत नाहीत. त्यांचे निकषही पक्के नसतात. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे, या वादात न जाता आपण वेगळ्या दृष्टिकोनाने या प्रथेकडे पाहू शकतो.



'गावपळणी'मागील आख्यायिका

शेकडो वर्षांपूर्वी आचरे या गावात भूत-पिशाच्यांनी उच्छाद मांडलेला. त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. तेव्हा सर्व आचरेवासीय श्री देव रामेश्वराला शरण गेले आणि यातून तारण्याची विनंती केली. तेव्हा रामेश्वराने तीन दिवस आणि तीन रात्रींकरिता गाव सोडण्यास सांगितले. या काळात साक्षात रामेश्वराने संपूर्ण गाव भूत-पिशाच्यांपासून मुक्त केले. आजही अशी श्रद्धा आहे की, गावपळणीच्या काळात श्री रामेश्वर गावाचे शुद्धीकरण करतो.



aachra_1  H x W

व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तर

'गावपळणी'मध्ये तीन दिवसांसाठी गाव सोडावे लागते. त्यासाठी संपूर्ण घराची आवाराआवर करावी लागते. तीन दिवसांनी परतल्यावर पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करावी लागते. त्यामुळे साहजिकच संपूर्ण घराची स्वच्छता कोणतेही अभियान न राबवता होते. 'गावपळण' ही 'र्धावागुंठीत' सहल आहे. पूर्वीच्या काळी 'वीकेंड पिकनिक', 'आऊटिंग' हे शब्द प्रचलित नव्हते. तेव्हा ही दर तीन वर्षांनी होणारी संपूर्ण गावाची सहल होती. निवास व्यवस्था तात्पुरती का होईना, सर्वांच्या सहकार्याने, इतरांच्या सहयोगाने करायची. सर्वांची मर्जी सांभाळत निवास उभारणे हाही एक आगळा अनुभव असतो. रोजचे कामकाज नसल्याने कुटुंबीयांसाठी पूर्ण वेळ देता येतो. विविध विषयांवरती चर्चाही घडते. या चर्चेलाही एक महत्त्व आहे. घरोघरी पूर्वीच्या काळी वीज नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात काम चाले. दिवसासुद्धा झाडांची सावली. त्यामुळे घरातील लहान मुलांना निरखता येत नसे. गावपळणीच्या निमित्ताने लहान मुलांना उघड्यावर पाहता येई. समस्त गाव एकत्र असल्याने मुलामध्ये विकृती असल्यास ती दृष्टीस पडे. त्यावरचे उपायही शोधले जात. मानवी देह अतिशय सुंदर आहे. आपल्या देशाच्या सौष्ठवाची जाणीव होण्यासाठी 'राजापूरची गंगा' किंवा 'गावपळण' कारण ठरत. आचर्‍यासारख्या निसर्गरम्य गावात निसर्गनिरीक्षणासाठी माळरानावर राहण्याची काहीच गरज नाही. परंतु, 'पिंडी ते ब्रह्मांडी'चा साक्षात्कार होण्यासाठी 'गावपळण' हे नक्कीच निमित्त ठरत असे.



सामाजिक दृष्टिकोन

आचरा हे गाव असले तरी येथे विविध समाज पातळ्यांवरचे लोक राहतात. काही काळापुरते होईना गावातील श्रीमंत आणि गरीब लोक एकत्र येतात, एका निवार्‍यात वास करतात. समपातळीवर येतात. समान अनुभव घेतात. यालाही महत्त्व आहे. समाजातील सर्वात श्रीमंत माणूस आणि सर्वात गरीब माणूस यांच्या संपत्तीचे गुणोत्तर '20:1' असते, असे समाजवादी चळवळ मानते. कोणे एकेकाळी हे गुणोत्तर याच्या जवळपासचे असे. ही आर्थिक तफावत 'गावपळणी'निमित्त काही काळाकरिता पुसली जात असे. कारण, ऊन-वारा-पाऊस याची माणूस म्हणून येणारी अनुभूती समान असते. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर 'गावपळण' ही विधायक आहे.



व्यावहारिक दृष्टिकोन

आचरे गावात 'तुम्ही घाबरू नका, देव काही वाईट करत नाही,' असे सांगणारे 'काही' लोक आले होते. आचरे हे समृद्ध विचारवंतांचे, कलारसिकांचे गाव. जी रूढी घातक नाही ती नाकारण्याचा प्रश्न येत नाही. जिथे बळी देणे, हत्या करणे, पर्यावरणाचा र्‍हास करणे आदी घटना घडतात, तिथे विरोध शक्ती वापरणे ठीक आहे. परंतु, एखादी रूढी जुनी आहे म्हणून ती नाकारणे हे वाईट. काळाच्या ओघात रूढी-परंपरा परिष्कृत होत असतात. विघातक किंवा सामाजिक, राजकीय, आर्थिक हानी होत नसेल, तर ती रूढी का वाईट ठरवावी? 'गावपळणी'मध्येही कालानुरूप बदल होत गेले आहेत. पण, या परंपरेच्या मुख्य उद्देशाला कुठेही धक्का पोहोचवला गेला नाही.



वैज्ञानिक दृष्टिकोन

तीन दिवस तीन रात्री संपूर्ण गाव रिकामे राहिल्याने गावातील प्रदूषण निम्नस्तरावर येते. माळरानावर निसर्गाच्या सान्निध्यात वास केल्याने आपोआप निसर्गाशी जवळीक वाढते. नवीन पिढीला निसर्गाची ओळख होते.



aachra_1  H x W

मानवशास्त्रीय दृष्टिकोन

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या जैविक प्रेरणा आहेत. त्या मानवालाही आहेत. त्यांचा समतोल मानवाचे उन्नयन साधतो. थोडीफार का होईना भीती ही असली पाहिजे. आजकाल कोण कोणाला भीत नाही, ही समस्या झाली आहे. पूर्वी भीतीच्या विधायक छायेखाली देवराई सुरक्षित राही. वने, काही जागा या सुरक्षित ठेवल्या जात. त्यामुळे थोडी भीती हवी. शिवाची नको, पण अशिवाची, पापाची भीती हवी. 'गावपळणी'मध्ये ही प्रेरणा जोपासली जाते. रामेश्वराला काही आचरेवासीय 'म्हातारा' असे संबोधतात. देवाशी नातेसंबंध जुळवण्याचा, त्याला आपल्यातील एक व्यक्ती मानण्याचा हा भाग असेल. या 'म्हातार्‍या'चा दरारा या गावाला एकत्र ठेवतो. त्याची असणारी आदरयुक्त भीती आचरे गावाला या विधायक रुढीस प्रवृत्त करते. ती जोपासण्याची प्रेरणा देते.


'गावपळण' या प्रथेमागे नक्कीच विधायक संकेत व्यवस्था असण्याची शक्यता आहे. त्याचे धागेदोरे आपण शोधले पाहिजे. त्यासाठी आपली दृष्टी निर्मळ असली म्हणजे झालं...


चरा चरामध्ये राहे शंकर

रक्ता रक्ता मधून वाहे शंकर

हे जीवन म्हणजे त्याची आज्ञा

भाव हा उरे...

कलासक्त गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे....



अनोखे तत्त्वज्ञान

ही संपूर्ण सृष्टी नश्वर आहे. जन्माला आलेली व्यक्ती कधीना कधी जाणार असते. पण, जीवन जगतानासुद्धा आपल्यावर घर सोडण्याची कधीतरी वेळ येते. मग, ती मुलीचे सासरी जाणे असो, शिक्षणासाठी मुलांचे परगावी जाणे असो. अगदी इहालोकीतून परलोकी जाणे असो. हे आनंदात जायचे का रडत, हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु, तीन दिवस तीन रात्र आपल्या घराला सोडून पूर्णत: रामेश्वराच्या हवाली करून दूर जाण्याचा 'गावपळण' हा जणू ट्रेलर आहे. 'गावपळणी'चे मंतरलेले दिवस अनोखे साहचर्याचे, सहयोगाचे तत्त्वज्ञान शिकवून जातात.



'गाव भरण्या'चे वेध

'गावपळण' सुरू होते त्याला 'गाव फुटणे' असे म्हणतात. 'गावपळण' संपन्न झाल्यावर गावात परतणे याला 'गाव भरणे' म्हणतात. तीन दिवस तीन रात्री मजेत घालवल्यानंतर बारा-पाच मानकरी एकत्र बसून 'गाव भरवण्या'चा कौल लावतात. कौल झाला नाही तर एक दिवस आणखीन वाढवला जातो, ही तर आचारेवासीयांसाठी परवणी असते. कौल झाल्यावर संपूर्ण गावकर्‍याना ही बातमी दिली जाते. मग पुन्हा गावाला जाग येऊ लागते. श्री इनामदार देव रामेश्वर संस्थान पुन्हा संजीवित होऊन वाट पाहते पुढील 'गावपळणी'ची...



aachra_1  H x W


-  वसुमती करंदीकर
 

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत १२ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.