कलाधिपती आदर्श शिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा यंदाचा आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नगरमधील डॉ. अमोल बागुल यांना जाहीर झाला. अनोखे उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या डॉ. अमोल बागुल यांचा परिचय करुन घेऊया...



‘विद्या विनयेन शोभते’ हा सुविचार आपण शाळेच्या भिंतींवर लहानपणापासूनच वाचत आलोय. विद्या ही अलंकाराप्रमाणे वापरल्यास तिची सजावट अधिक खुलते. याच उक्तीचे आचरण करत अध्ययन कार्यासोबतच आपल्याकडे असणार्‍या कलेचा वापर करून हा शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवत आहे. आजच्या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण इतिहासजमा होत चालले आहे की काय, अशी परिस्थिती सर्वत्र दिसते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळावे याकरिताच पालकांचा आग्रह असतो. अशा परिस्थितीत हा अवलिया केवळ ज्ञानार्जनच नव्हे तर त्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या कलागुणांना वाव मिळावा याकरिता अविरत झटत आहे.



अहमदनगरसारख्या एका छोट्या शहरातून आपल्या अध्ययन व शैक्षणिक उपक्रमातून
‘नासा’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत नाव गाजविणार्‍या डॉ. अमोल सुभाष बागुल यांना २०१८चा ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक अनुभव ते सांगतात, तो असा, “स्टेजवर येण्यास निघालो तेव्हा केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री रमेश पोखरीयाल राष्ट्रपती महोदयांना म्हणाले की, “ये सबसे छोटे हैं।” तेव्हा राष्ट्रपती म्हणाले, “wow... too youngest.keep it up” और आगे बढो...” असे म्हणत आदरणीय राष्ट्रपतींनी माझ्या खांद्यावर शाबासकीचा हात ठेवला. राष्ट्रपती म्हणजे देशातील सर्वोच्चपद. तेव्हा भारताचा राजा जणू काही तुमच्या कामाला दाद देतोय. ही भावना अमूल्य आहे माझ्यासाठी.”



डॉ
. अमोल बागुल यांनी शिक्षणातील नव-नवीन उपक्रमांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शाळेत आमुलाग्र बदल घडविले आहेत. ‘नासा किड्स क्लब’या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यात हातभार लावला. ‘ई-कंटेंट’द्वारे विद्यार्थ्यांना ‘योगा’सारख्या अन्य शारीरिक शिक्षणाचा परिचय घडविला आहे. संगीत कलेचा प्रभावीपणे उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांना कला व संस्कृतीचे ज्ञान दिले.



डॉ. बागुल हे श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत सन २००३पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान या विषयाचे अध्यापन ते करतात. केवळ अध्यापनातून विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा त्यांना त्या विषयात रस वाटावा यासाठी कायम वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवितात. त्यांनी एकाच वर्षात २७६ शैक्षणिक उपक्रम राबविले. शिक्षक असण्यासोबतच ते कलाप्रेमी असल्याने विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव देणारे उपक्रम राबविण्यावर ते अधिक भर देतात. यातूनच अभ्यासक्रमाबाहेरील काही उपक्रम ते राबवितात. ते उत्तम गायन आणि बासरीवादन करतात. त्यांच्या बासरीवादनाने श्रोते मंत्रमुग्ध होत असल्याचेही अनुभवायला येते. यंदाच्या जागतिक मराठी भाषादिनी अभ्यासक्रमातील ७७ कवितांचे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गायन केले. तसेच तब्बल ७ हजार, ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी बासरीवर राष्ट्रगीत वाजवायला शिकवले आहे.

 



आत्तापर्यंत डॉ
. अमोल यांनी धावण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंतच्या अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. केवळ सहभागी न होता ते तब्बल ३० हजार, ४८२ बक्षिसांचे ते मानकरी आहेत. राष्ट्रीय जनगणनेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ‘राष्ट्रपतीपदक’ देऊन गौरविण्यात आले होते. अशाच ४ हजार, ५६८ वेगवेगळ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. २०१५ साली अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ ग्रहावर पाठविलेल्या ‘ओरियन’ या अवकाशयानात विज्ञान अभ्यासकांच्या नावाचा समावेश असणारी मायक्रोचिप बसविण्यात आली होती. या नावांमध्ये डॉ. अमोल बागुल यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. ‘जर्नी टू मार्स’ या उपक्रमाअंतर्गत नासाने हे यान अवकाशात पाठविले होते. सादर केले. हा सन्मान मिळाल्यावर डॉ. बागुल म्हणतात, “नासाच्या या सन्मानामुळे मला पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळाले. आपण ज्या समाजातून येतो त्याचे आपण देणे लागतो. त्यांच्यासाठी काहीतरी करायचं यातूनच ही प्रेरणा मिळते.”



यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी निवडणूक आयोगाने खास
‘सखी मतदान केंद्रे’ तयार केली होती. अहमदनगर शहरातील चार ‘सखी मतदान केंद्रे’ डॉ. अमोल बागुल यांनी सजवली होती. डॉ. बागुल यांनी यंदाच्या गणेशोत्सव काळातील ११ दिवसांपर्यंत ३० अनाथ व वंचित मुलांचा सांभाळही केला. त्यांनी या मुलांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या साहाय्याने १०० किलोंचा ‘बीजगणेश’ साकारला. डॉ. बागुल हे उत्तम व्याख्याते आहेत. विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत कमी वयात पुरस्कार प्राप्त करणारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ मिळवणारे डॉ. बागुल महाराष्ट्रातील एकमेव, तर देशातही गुणानुक्रमाने पहिले ठरले आहेत. दरम्यान, या पुरस्कारातील ५० हजारांच्या रकमेपैकी ३५ हजार रुपये त्यांना सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले असून, उर्वरित १५ हजार रुपये नगर प्रेस क्लबच्या सामाजिक व विधायक उपक्रमांसाठी दिले आहेत. ‘सर्वोच्च शिक्षक पुरस्कार’ मिळवूनही सामाजिक भान जपणार्‍या या अवलियाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा..!!!


- गायत्री श्रीगोंदेकर

@@AUTHORINFO_V1@@