संविधान : संकल्पना आणि विकास

    25-Nov-2019   
Total Views |


 


आज जगातील प्रत्येक देशांत संविधान प्रमाण मानून राज्यकारभार केला जातो. आपल्या भारतीय लोकशाहीचा तर आत्मा म्हणजे हे संविधान. त्यामुळे आज संविधान दिनानिमित्ताने सर्वप्रथम
संविधानही मूळ संकल्पना आणि कालानुरुप त्यामध्ये झालेले बदल समजून घेणे क्रमप्राप्त ठरेल.

जगात ज्या देशांमध्ये प्रजातंत्र आहे, त्या देशांमध्ये संविधान आहे. संविधानाशिवाय प्रजातंत्र चालू शकत नाही. जगातील पहिले लिखित संविधान अमेरिकेने १७८७ साली निर्माण केले. त्यानंतर जगातील प्रजातंत्रीय राजवटींनी या संविधानाला प्रमाण मानून आपापले संविधान तयार केले. अमेरिकेचे संविधान केवळ सात कलमांचे आहे. या सात कलमांची उपकलमे आहेत आणि शब्दसंख्या जवळजवळ सहा हजार शब्दांची आहे. १७८९ पासून या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. या घटनेलादेखील आता जवळजवळ २३० वर्षे झालेली आहेत. अमेरिकेतील माणूस म्हणतो की, “आमचे संविधान हे जगाला मोफत भेट आहे. ते कुणी आयात केल्यास कुठलाही कर लावण्यात येत नाही.दुसरी गोष्ट अमेरिकन माणूस सांगतो की, “आज आम्ही जे काही आहोत, महासत्ता, अर्थसत्ता, ज्ञानसत्ता, हे सर्व संविधानामुळे आहे. ते आमचे अत्यंत पवित्र लिखाण आहे.

फ्रेंच संविधानासंबंधी एक विनोद सांगितला जातो. पुस्तकाच्या दुकानात एक माणूस गेला. त्याने विचारले की, “फ्रान्सचे संविधान तुमच्याकडे आहे का?” पुस्तक विक्रेता म्हणाला,“क्षमा करा. आम्ही नियतकालिकांची विक्री करत नाही.विनोद लगेच समजणार नाही, म्हणून सांगतो. नियतकालिकम्हणजे वर्तमानपत्रे आणि साप्ताहिके, मासिके. त्याची प्रत्येक आवृत्ती स्वतंत्र असते. पहिल्यात जे लिहिले असेल, ते दुसर्‍यात नसते. संविधान अशा प्रकारचे नियतकालिक नसते. ती कायमस्वरुपाची कृती असते. तिच्यात मन मानेल तसे बदल करता येत नाहीत. फ्रान्सचे पहिले संविधान इ. स. १७९१ साली तयार झाले. आज त्यांचे पाचवे संविधान चालू आहे. म्हणून पुस्तक विक्रेता म्हणतो, “आम्ही नियतकालिके विकत नाही.

संविधानाला दीर्घकालीनत्व कशामुळे प्राप्त होते?

प्रजातांत्रिक संविधानाची काही मूलतत्त्वे आहेत.

- सर्व सत्तेचा उगम प्रजा असते.

- संविधान देशातील सर्वोच्च कायदा असतो.

- हा कायदा सर्व सत्तेच्या उगम असलेल्या प्रजेतून उगम पावतो.

- हा कायदा राज्यातील सर्व प्रजेला बांधून ठेवतो.

- हा कायदा शासन करणार्‍यांनादेखील बांधून ठेवतो.

- व्यक्ती हे एक मूल्य असेल आणि व्यक्तीला आपले जीवन, आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याचा आणि सुख शोधण्याचा जन्मसिद्ध अधिकार असेल.

- यातून आणखीन काही गोष्टी पुढे येतात. त्या अशा आहेत.

- कायद्यापुढे सर्व समान असतील.

- देशात कायद्याचे राज्य राहील.

- कायद्याच्या राज्याचे रक्षण राज्याची न्यायपालिका करील.

- राज्याच्या अनियंत्रित सत्तेवर बंधन घालण्यासाठी व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले असतात. हे मूलभूत अधिकार म्हणजे व्यक्तीच्या संरक्षणाची भिंत आहे आणि राज्याच्या अधिक्षेपाची सीमा आहे.

सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रजातंत्राच्या राज्यघटनेची ही वैशिष्ट्ये असतात. यातून काही प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न, राज्यघटनेची ही वैशिष्ट्ये कशी निर्माण झाली? कोणी निर्माण केली? आणि का निर्माण केली? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध म्हणजे संविधानही संकल्पना कशी-कशी विकसित होत गेली आहे, हे समजून घेणे होय.

संविधानाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येते, ती अशी की, जगातील कोणताही तत्त्वज्ञ, मग तो कितीही मोठा असेना, संविधान निर्माण करीत नाही; ते तो निर्माण करू शकत नाही. त्याचे तत्त्वज्ञान संविधान निर्माण होत असताना काही प्रमाणात व्यवहारात आणले जाते. संविधान निर्मितीचे सर्व श्रेय प्रजेला द्यावे लागते. तसे पाहता, जगातील कोणत्याही देशात कोणे एके काळी सर्व लोक एकत्र आले, त्यांनी विचारविनिमय केला आणि संविधान बनविले, असे घडलेले नाही. असे असताना प्रजेने संविधान निर्माण केले,’ या म्हणण्याला कोणता अर्थ होतो?

प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात १२१५ साली इंग्लडचा राजा जेम्स याने मॅग्ना चार्टाया सनदीवर सही केली, तेव्हापासूनहोते. तेथून आधुनिक काळातील प्रजातांत्रिक संविधानाच्या विकासाला प्रारंभ होतो. हा राजा जेम्स क्रूर होता, हिंसक होता, प्रजेवर जुलूम करीत असे, कुणाचीही संपत्ती, केव्हाही हडप करी, कुणी त्याला विरोध केल्यास त्याला पकडून तो तुरुंगात पाठवून देई. कुणालाही तो मनात येईल तेव्हा फासावर लटकवत. सैन्याला रसदीचा पुरवठा करण्यासाठी शेतकर्‍यांना तो बळजबरीने त्यांची जनावरे आणि शेतमाल घेऊन सैनिक तळावर बोलावत असे. त्यांच्याकडून सगळे फुकट घेत. याला जनता खूप वैतागली होती. इंग्लडमधील उमराव, बिशप, सरदार (यांची इंग्रजी नावे वेगवेगळी आहेत.) सैन्य जमवून राजमहालावर चालून गेले.

जो क्रूर असतो, तो भित्रा असतो. राजा अतिशय घाबरला. आपल्या महालातून बाहेर आला. सरदार, बिशप मंडळींनी चर्मपत्रावर सर्व मागण्या लिहून आणल्या होत्या. राजाला त्यावर सही करावी लागली. राजमुद्रा उमटवावी लागली. या घटनेनंतर राजा हादरला आणि काही वर्षांत मेला. ही जी सनद सरदार, बिशप वगैरेंनी प्राप्त केली, तिला मॅग्ना चार्टाम्हणतात. तिचे वैशिष्ट्य कोणते?

- या सनदेने राजाच्या अनियंत्रित अधिकारावर जबरदस्त बंधने आली.

- लोकप्रतिनिधी सभागृह (पार्लमेंट) निर्माण झाली. अर्थात, ती आजच्यासारखी पार्लमेंटनव्हती. प्राथमिक अवस्थेतील पार्लमेंटहोती.

- आज ज्यांना आपण मूलभूत अधिकारम्हणतो, असे काही अधिकार या सनदेने प्राप्त झाले. उदा. कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय कुणाचाही प्राण घेतला जाणार नाही. संपत्तीचा योग्य तो मोबदला घेतल्याशिवाय ती ताब्यात घेतली जाणार नाही इत्यादी. या सनदेत सर्वसामान्य जनतेला कोणतेही अधिकार मिळाले नाहीत. ती जिथे होती, तिथेच राहिली. जनतेतराजकीय जागृती शून्य होती. बहुतेक प्रजा भूदास होती. ती एक प्रकारची गुलामीच होती. मॅग्ना चार्टाने राजाच्या अनियंत्रित सत्तेला एक खिंडार पाडले.

आणि १६८८ साली म्हणजे जवळजवळ चारशे वर्षांनंतर प्रजेने राजाविरुद्ध उठाव केला. त्यामुळे प्रजेला मूलभूत अधिकारांची प्राप्ती झाली. इंग्रजांच्या संविधानाच्या भाषेत त्याला बिल ऑफ राईट्सम्हणतात. १६८८ च्या क्रांतीला तेजस्वी क्रांतीअसे म्हणतात. या क्रांतीची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत.

राजाच्या अनिर्बंध सत्तेची समाप्ती होऊन इंग्लंडची पार्लमेंट सार्वभौम झाली. तिला सर्व प्रकारचे कर लावण्याचा अधिकार मिळाला.

राजाकडून जनतेच्या हक्काच्या सनदीवर सह्या घेण्यात आल्या. त्याला डिक्लरेशन ऑफ राईट्सअसे म्हणतात. या हक्काच्या सनदीत लोकांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यांच्या जीवनाची आणि मालमत्तेच्या रक्षणाची हमी मिळाली. राजाचा कर लावण्याचा अधिकार काढून घेण्यात आल्यामुळे, आता लोकप्रतिनिधी म्हणजे अपरोक्षपणे लोकच, कोणते कर असावेत-नसावेत, हे ठरविणारे झाले.

यानंतर इंग्लडच्या संविधानाच्या विकासक्रमात लोकप्रतिनिधी असलेली संसद अधिक शक्तिशाली बनत गेली आणि कालांतराने संसद सार्वभौम झाली. पूर्वी सार्वभौमत्त्व राजाकडे असे. आता ते लोकप्रतिनिधी सभागृहाकडे म्हणजे संसदेकडे आहे. इंग्लडमध्ये संसदेची दोन सभागृहे झाली. एक हाऊस ऑफ कॉमन्सआणि दुसरे हाऊस ऑफ लॉर्ड्स.’ ‘हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जनप्रतिनिधी असत. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सरदार आणि राजघराण्यातील लोक असत. या पद्धतीमध्येसुद्धा दोन-अडीचशे वर्षात बदल होत गेले. वंशपरंपरेने निवड हे विषय आता संपलेले आहेत आणि सर्व सत्ता जनप्रतिनिधींकडे म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सकडे आली आहे.

इंग्लंडच्या संविधानाच्या विकासक्रमामध्ये राजा आणि राजमंडळ याचा एक गट. त्याला विरोध करणारा सरदार व धर्मगुरुंचा गट. यांच्या संघर्षातून आजच्या संविधानाच्या एकेक संकल्पना विकसित होत गेलेल्या आहेत. त्या कुठल्याही ग्रंथातून आलेल्या नाहीत. मूलभूत अधिकार जन्मसिद्ध आहेत, अपरिवर्तनीय आहेतवगैरे भाषा ब्रिटनमध्ये चालत नाही. ब्रिटनचे लोक म्हणतात की, “हे अधिकार आम्ही राजाशी संघर्ष करून मिळविले आहेत.अठराव्या शतकात थॉमस पेन नावाचा एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याचे राईट्स ऑफ मॅनहे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. तो निसर्गसिद्ध अधिकाराची भाषा करतो. या पुस्तकावर ब्रिटनमध्ये बंदी होती आणि एडमन बर्कने थॉमस पेनचा सर्व युक्तिवाद खोडून काढला आहे. त्याच्या पुस्तकाचे नाव आहे,‘रिफ्लेक्शन ऑन दी रेव्होल्युशन इन फ्रान्स

इंग्लंडच्या संविधानाला अलिखित संविधानम्हणतात. येथे अलिखितयाचा अर्थ होतो की, भारताच्या संविधानाची जशी कलमांची प्रत आहे, तशी इंग्लडच्या संविधानाची लिखित प्रत नाही. या संविधानाची वैशिष्ट्ये अशी आहेत.

- हे १२१५ पासून विकसित झालेले संविधान आहे.

- ते सर्वसामान्य, पारंपरिक कायद्यावर अवलंबून आहे.

- राजा/राणी राज्याची घटनात्मक प्रमुख असते. तो किंवा ती वंशपरंपरेने गादीवर येते. परंतु, त्यांना राज्यशक्तीचे कोणतेही अधिकार नसतात. राज्य त्यांच्या नावाने चालते.

- ब्रिटनची संसद सार्वभौम आहे. राजा सार्वभौम नाही. अलिखित घटना सार्वभौम नाही. ब्रिटनची संसद जो कायदा करते, तो संविधानिक कायदाच असतो. सर्वसाधारण परिस्थितीत न्यायालयाला त्यात बदल करता येत नाही.

- या संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य’, ‘कायद्यापुढे समानता’, ‘कायद्याचे राज्यया संकल्पना दिलेल्या आहेत.अधिक योग्य भाषेत सांगायचे तर ब्रिटिश जनतेने या सर्व गोष्टी संघर्ष करून मिळविलेल्या आहेत.

जे फुकट मिळते, त्याची काही किंमत नसते. हे आपल्या देशाला चांगले लागू पडते. ब्रिटिश माणूस हा घटनेला बांधून राहतो. घटनानिष्ठात्याला शिकवावी लागत नाही. त्याची घटनानिष्ठाम्हणजे कायद्याचे पालन, राज्याला पूर्ण निष्ठा, राजा किंवा राणीला पूर्ण निष्ठा, याबाबतीत तो कसलीही तडजोड करीत नाही. जगात साम्राज्य निर्माण करताना त्याने अनंत भानगडी केल्या, फसवणूक केली, लोकांना लुटले-मारले, खोटे करार केले. परंतु, त्याने ब्रिटिश कायदा आणि राजनिष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड केली नाही. तो कायद्याने बांधलेला राहतो म्हणजे काय?

कायद्याने बांधून राहणेयाचा अर्थ संघटित समाजजीवन जगणे होय. शेकडो माणसे एकत्र आली की, त्यांच्यात वादविवाद, तंटे-बखेडे होणारच. माणूस हा काही देवदूत नव्हे. म्हणून अमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार जेम्स मॅडिसन म्हणतो की, “जर समाज देवदूतांचा बनला असेल, तर त्याला संविधानाची आवश्यकता नाही. समाज हा सामान्य माणसांचा बनलेला असल्यामुळे त्याला संविधानाची म्हणजेच नियमांची म्हणजेच कायद्यांची आवश्यकता आहे.या कायद्याने स्वत:ला बांधून घेणे आणि त्याच्या आधाराने परस्परांशी व्यवहार करणे, हे ब्रिटिश माणूस करत असतो. इंग्लडचे संविधान म्हणजे कायदा, म्हणजे समाज बांधून ठेवणारे नियम, इंग्रज माणसाला वंशपरंपरेने प्राप्त होतात. आईच्या दुधातूनच हे सर्व त्याला प्राप्त होते.

अशी इंग्रज माणसे सोळाव्या शतकापासून अमेरिकेत वसाहती करण्यासाठी जाऊ लागली. संविधानाला बांधील असणारा इंग्रज माणूस राजाच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. अमेरिकेत वसाहती करण्यासाठी वेगवेगळ्या व्यापारी कंपन्या निर्माण करण्यात आल्या. या कंपन्यांना राजाने चार्टर’ (सनद) दिले. त्यामध्ये अमेरिकेतील किती क्षेत्रफळाची भूमी तुमच्या अधिकाराखाली असेल, तेथे जाणार्‍या लोकांचे नियमन कोणत्या कायद्याने केले जाईल, त्यांचा प्रमुख कोण असेल, त्याला बदलायचा असेल तर त्याची पद्धती कोणती, काही अपराध घडल्यास त्याला शासन कोणते दिले जाईल, ख्रिश्चन धर्मातील कोणत्या पंथाचे पालन तेथे करायचे आहे, अशा सर्व गोष्टी लिखित स्वरूपात असत. राजाकडे सर्व अधिकार असत. एका अर्थाने राजाने दिलेल्या या घटनाच होत्या. त्यांना प्रजातांत्रिक घटनाम्हणता येत नाही. कारण, त्या लोकांनी निर्माण केलेल्या नाहीत. या घटनांचे पालन मातृभूमीपासून हजारो मैल दूर गेलेला इंग्रज अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत असे, हे त्याचे संवैधानिक सामर्थ्य आहे. ज्याचा आपल्याकडे पूर्णपणे अभाव आहे आणि असे काही असते हेदेखील आपल्याला समजत नाही.

अमेरिकेचे पहिले लिखित संविधानअसे ज्याला म्हणता येते, ते मेफ्लॉवरनावाच्या प्रवासी जहाजावरील सुधारणावादी ख्रिश्चनांनी १६२० साली तयार केले. त्याचा अमेरिकन शब्दप्रयोग आहे, ‘मेफ्लॉवर कॉम्पक्ट.’ ‘कॉम्पक्टयाचा अर्थ करार.राज्यघटनेच्या संदर्भात हा शब्दप्रयोग अमेरिकन घटनातज्ज्ञ वापरत असतात. ही मेफ्लॉवरची घटना १०२ लोकांच्या समूहाने तयार केली. त्यावर सुमारे ४४ लोकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. स्त्रियांच्या नाहीत. कारण, तेव्हा इंग्लंडसहित कोणत्याही देशात स्त्रियांना विशेष अधिकार नव्हते आणि घटनेची संकल्पना विकसित होत असताना त्यात सहभागी होण्याची त्यांना काही संधीही नव्हती. अमेरिकेत येणार्‍या या लोकांना राजाने सनद दिली नव्हती. यापूर्वी गेलेल्या लोकांकडे सनदा होत्या आणि इंग्रज माणसाला कायद्याने राहण्याची सवय असल्यामुळे, ‘राजाने कायदा दिला नाही तर आपणच कायदा करू,’ म्हणून त्यांनी आपणहून कायदा केला. संविधानाच्या इतिहासातील हा लोकांनी केलेला पहिला दस्तावेज आहे, असे मानले जाते.

यानंतर अमेरिकेत इंग्रजांच्या वसाहती उभ्या राहिल्या. एकूण १३ वसाहती झाल्या. त्या सर्व राजाच्या म्हणजे इंग्लडच्या संसदेच्या अधिपत्याखाली आल्या. इ.स. १७५४ ते इ. स. १७६३ या काळात इंग्लड आणि फ्रान्स यांच्यामध्ये सात वर्षं युद्ध झाले. हे युद्ध त्यावेळच्या ज्ञात जगातील सर्व भागात लढले गेले. युरोपमध्ये युद्ध झाले, अमेरिकेच्या भूमीवर झाले, अमेरिकेतून फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. कॅनडा त्यांना रिकामा करावा लागला आणि अमेरिका ब्रिटिश साम्राज्याचा भाग झाली.

या युद्धात प्रचंड खर्च झाला. तो भरून काढण्यासाठी ब्रिटनच्या संसदेने वसाहतींवर कर लादले. त्या कराच्या विरोधात वसाहतीतील इंग्रजांनी प्रचंड विरोध सुरू केला. आमचे प्रतिनिधी संसदेत नाहीत, मग तुम्हाला कर लावण्याचा अधिकार नाही.स्टॅम्पड्युटीवर प्रचंड आंदोलन झाले. स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन फक्त चहावर इंग्लडने नाममात्र कर ठेवला. बोस्टन बंदरात चहाच्या जहाजावरील सर्व चहा तरुणांनी सुमद्रात फेकून दिला. एक चिमूटभर पण कोणी खिशात आणला नाही. ही अमेरिकेच्या राज्यक्रांतीची सुरुवात झाली. दुसर्‍या भाषेत अमेरिकेच्या राज्यघटनेच्या निर्मितीची वेळ आता येत चालली होती.

ब्रिटिशांचा पराभव करुन अमेरिकेने स्वातंत्र्य मिळविले. १३ राज्ये स्वतंत्र झाली. त्यांनी आपला एक संघ बनविला. राज्य करण्यासाठी संसद (काँग्रेस) निर्माण केली. अमेरिकेचा ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्धचा लढा दोन तत्त्वांसाठी झाला. एक आम्हाला समतापाहिजे आणि दुसरे आम्हाला स्वातंत्र्यपाहिजे. यातून पुढे अमेरिकन जीवनाची तीन मूल्ये पुढे आली. त्याला जीवन, स्वातंत्र्य, संपत्ती आणि सुख शोधण्याचा अधिकार (लाईफ, लिबर्टी अ‍ॅण्ड प्रॉपर्टी, परस्यूट ऑफ हॅप्पीनेस)असे म्हणतात. अमेरिकेच्या संविधानाची ही त्रिसूत्री आहे. त्यामागेदेखील त्यांचा म्हणून एक इतिहास आहे.
  

अमेरिकेत इंग्रज माणूस एवढ्या मोठ्या संख्येने का आला? त्याचे एक कारण होते, त्याला जीवन आणि मालमत्तेची शाश्वती हवी होती. त्याला धर्मस्वातंत्र्य हवे होते. त्याला स्वत:चा विकास, स्वत:च्या कल्पनेने करून घेण्याचे स्वातंत्र्य हवे होते. धर्मसत्तेची बंधने, राज्यसत्तेची बंधने, रुढींची बंधने यातून त्याला मुक्त व्हायचे होते. त्यासाठीचा त्याचा शब्द आहे लिबर्टी.’ ‘लिबर्टीम्हणजे मुक्तता.मुक्त झाल्यानंतर जी अवस्था येते, ती स्वातंत्र्याची असते, हे त्याला पाहिजे होते. ही आकांक्षा सर्वसामान्य माणसांची होती.

जे संघराज्य तयार झाले आणि त्याची जी घटना तयार केली गेली, ती काही चालेना. तिच्यात त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी १७८५ साली ५५ जण फिलाडेल्फिया येथे एकत्र बसले. संघाच्या घटनेमध्ये त्यांना सुधारणा करायच्या होत्या. पाच महिने त्यांनी रोज दिवसभर बसून उलटसुलट चर्चा केल्या आणि त्यातून त्यांनी आपले नवीन संविधान तयार केले. लोकांची संमती त्याला आवश्यक होती. त्यासाठी दोन वर्षे गेली आणि १७८७ साली तेरा पैकी नऊ राज्यांची त्याला मान्यता मिळाली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

या संविधानाने लोकशाही राजवटीचा एक नवा अध्याय सुरू केला. त्यासाठीचे दोन शब्दप्रयोग केले जातात.

१ . रिपब्लिक आणि २. फेडरेशन. रिपब्लिकयाचा अर्थ प्रजासत्ताक. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष लोकांच्या प्रत्यक्ष मतदानाने निवडून येत नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक राज्यात प्रतिनिधी निवडावे लागतात. हे प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. इंग्लंडची लोकशाही म्हणजे लोकांनी प्रत्यक्ष राज्यकर्त्यांना निवडून देणे, जे अमेरिकेने स्वीकारलेले नाही. तेव्हा त्यांचे मत असे होते की, ही लोकशाही म्हणजे झुंडशाही आहे. लोक कसेही मतदान करतात. त्यांच्या भावना भडकावणेफार सोपे असते. ही लोकशाही आपल्या कामाची नाही. म्हणून त्यांनी रिपब्लिकनपद्धती निवडली.

दुसरी पद्धती त्यांनी संघराज्याची स्वीकारली. अमेरिकेत तेव्हा १३ राज्ये होती. आज ५० राज्ये आहेत. प्रत्येक राज्य स्वायत्त आहे. त्याची स्वत:ची राज्यघटना आहे. काही प्रमाणात ती सार्वभौम आहे. अमेरिकेची केंद्रीय राज्यसत्ता हा नावीन्यपूर्ण प्रयोग होता. १७८७ पूर्वी अशा कोणत्याही पद्धतीची सवय अमेरिकेला नव्हती. आज हा प्रयोग राहिलेला नाही, तो एक मंत्र झालेला आहे. हे संघराज्य बनविण्याचे कारण काय? त्याचे कारण असे की, प्रत्येक राज्याची वेगळी अस्मिता निर्माण झाली. भाषेमध्येदेखील फरक पडला. प्रत्येकाला आपली ओळख प्रिय झाली. तिची जपवणूक करायची असेल तर राज्यांना स्वायत्तता द्यायला पाहिजे. अमेरिकन राज्यघटनेनेन राज्याची स्वायत्तता आणि केंद्राची सत्ता यामध्ये फार उत्तम संतुलन साधलेले आहे. १८६० साली संघराज्यातून दक्षिणेची काही राज्ये फुटून निघाली. अमेरिकेचे संविधान कोसळण्याच्या स्थितीत आले. अब्राहम लिंकनने स्वत:चे प्राण पणाला लावून हे होऊ दिले नाही. अब्राहम लिंकन म्हणतो,“आम्ही अमेरिकेचे लोक काँग्रेस (म्हणजे संसद) आणि न्यायालये यांचे कायदेशीररित्या मालक आहोत. आमचे काम संविधानाला गचांडी देण्याचे नसून ज्या लोकांनी संविधानात विक्षेप केला आहे, त्यांना हाकलून लावण्याचे आहे.

अमेरिकन राज्यघटनेने अमेरिका नावाच्या राज्याचे, राष्ट्रात रुपांतर करण्याची अद्भुत किमया साधलेली आहे. समाज अनेक रुपात जगतो. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशी त्याची रुपे असतात. विवेचनासाठी या रुपांची दोन भागात आपण विभागणी करू. पहिला भाग नागरी रुपाचा (सिव्हील बॉडी) आहे आणि दुसरा भाग राजकीय रुपाचा (पॉलिटीकल बॉडी) आहे. या दोन्ही रुपांना नियमांनी म्हणजे कायद्यांनी म्हणजे घटनेच्या नियमांनी बांधून ठेवावे लागते. घटनेच्या नियमांच्या मागे राज्याची दंडशक्ती असते. परंतु, दंडशक्तीमुळे राष्ट्र तयार होत नाही, राज्य तयार होते.

राष्ट्र तयार होण्यासाठी भावनिक ऐक्य अतिशय महत्त्वाचे असते. अमेरिकेची राज्यघटना कायद्याच्या रुपाने अमेरिकेच्या नागरी आणि राजकीय रुपाला एकरुप करते. त्यांच्यामध्ये भावनिक बंध निर्माण करते. या भावनिक बंधाचा मुख्य आधार तेथील राज्यघटना झालेला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन या घटनेविषयी म्हणाले, “संविधान माझे मार्गदर्शक आहे आणि मी तिचा त्याग कधीही करणार नाही.अमेरिकन संविधानाच्या निर्मात्यांपैकी जॉन अ‍ॅडम्स म्हणतात,“आमचे संविधान नैतिक आणि धार्मिक लोकांसाठीच तयार केले आहे. अन्य प्रकारच्या लोकांसाठी त्याचा काहीही उपयोग नाही.असे वाक्य आपल्याकडे बोलण्याची कुणी हिंमत करू शकत नाही. आमचे डावे म्हणतील, कसली नैतिकता आणि कसली धार्मिकता? पण, अमेरिकेचे निर्माते असा विचार करीत नाहीत. यामुळे अमेरिका काय किंवा इंग्लड काय, या देशांतील सर्वसामान्य माणूस परमार्थासाठी बायबल आणि ऐहिकासाठी राज्यघटना, दोन्हीही समानदृष्ट्या पवित्र अशा भावनेने जगत असतो. आपल्याला त्या दिशेने मात्र अजून खूप वाटचाल करायची आहे.

आपल्या राज्यघटनेने इंग्लंड/अमेरिकेकडून आलेली काही मूलतत्त्वे जशीच्या तशी स्वीकारलेली आहेत. कायद्याचे राज्य, कायद्यापुढे सर्व समान, स्वतंत्र न्यायपालिका, मूलभूत अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार, इत्यादी. या गोष्टी स्वीकारीत असताना त्या आपल्याला अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न आपल्या घटनाकारांनी केलेला आहे. सर्व शक्तीचा उगम प्रजा असेल, हे तत्त्व आपण स्वीकारले आहे. इंग्लडची राज्यघटना (अलिखित) आणि अमेरिकेची राज्यघटना या राजकीय राज्यघटना आहेत. त्या राजकीय अधिकाराची हमी देतात.

आपली राज्यघटना राजकीय अधिकारावर थांबत नाही. ती सामाजिक अधिकारांना अधिक महत्त्व देते. अमेरिकादेखील समतेची हमी देते, पण ती राजकीय समता आहे. आपली राज्यघटना सामाजिक समतेला अधिक महत्त्व देते. कायद्यापुढे सर्व समानया तत्त्वावरच ती थांबत नाही तर आणखी पुढे जाऊन कायद्याने सर्वांना समान संरक्षण देण्याची हमी देते. याचा अर्थ काय होतो? जे समान स्थितीत आहेत, त्यांना एक प्रकारचा कायदा असेल आणि जे विषम स्थितीत आहेत, त्यांच्यासाठी वेगळा कायदा करावा लागेल. विषम स्थितीत जगणार्‍या वंचित वर्गासाठी आरक्षणासारखी विशेष तरतूद आपल्या घटनाकारांनी केलेली आहे.

घटनासंकल्पनेचा विकास थोडक्यात असा आहे- प्रत्येक देश, आपला समाज, आपली राजकीय परिस्थिती, आपली धर्मसंकल्पना इत्यादींचा विचार करून आपल्या घटनेची (संविधानाची) निर्मिती करतो. आपल्याकडे असा प्रयत्न आपल्या घटनाकारांनी केलेला आहे. आपली परंपरा सर्व उपासना पद्धतींचा सन्मान करणारी असल्यामुळे आपल्याकडे उपासना स्वातंत्र्य घटनेनेच दिलेले आहे. २६ नोव्हेंबर हा घटना दिनसाजरा करत असताना राज्यघटनाया संकल्पनेचा सर्वांनी गंभीरपणे अभ्यास करावा, असे आवर्जून सांगावेसे वाटते.

रमेश पतंगे

९८६९२०६१०१