डिसेंबरअखेरपर्यंत म्हाडाच्या साडेसहा हजार घरांची सोडत

    22-Nov-2019
Total Views |




मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ६ हजार, ५०० घरांची सोडतीची जाहिरात डिसेंबर अखेर काढण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोकण मंडळाच्या हद्दीतील २० टक्के कोट्यातील १ हजार, २३६ घरे ही ‘पलवा सिटी’, खोनी-अंतर्ली, तर 279 घरे भिवंडी मनकोली असणार आहेत. ४० घरे घणसोली नवी मुंबई, तर १५ घरे वालिव वसई, २ घरे मोगर पाडा ठाणे, आणि कल्याण शिरढोण-खोनि येथील २५०० घरांचा या सोडतीत समावेश असल्याचे पाटील यांनी सांगितले.


याबरोबरच म्हाडा
, कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथे उभारण्यात आलेल्या इमारत क्र. १० मधील १८६ सदनिकांपैकी १०९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवार, दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बोळींज येथे काढण्यात येणार आहे. या सोडतीकरिता पालघर जिल्हा पोलीस दलातील सुमारे १०९ पोलीस कर्मचार्‍यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने म्हाडा विनियम १३(२) अंतर्गत विरार बोळींज येथील ‘टप्पा - ३’ मधील इमारत क्र.१०मधील १८६ सदनिका पालघर जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांसाठी वितरण करण्याबाबत मान्यता दिली आहे. या अर्जदारांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याची निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोडतीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी, माधव कुसेकर, पालघरचे पोलीस अधीक्षक, गौरव सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.