नुकतेच १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली. त्यानिमित्ताने चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील या उत्साही शिक्षकाच्या कारकिर्दीचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...
'देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे' ही म्हण ऐकताच क्षणी काही उदाहरणे डोळ्यांसमोर उभी राहतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे दिग्गज असतात, जे अखेरच्या श्वासापर्यंत त्या क्षेत्राशी संलग्न राहून त्या क्षेत्रात दाखल होणार्या पुढच्या पिढ्यांचेही मार्गदर्शन करतात. त्यापैकीच एक नाव डॉ. जब्बार पटेल यांचे. तसे हे नाव सर्वपरिचित असल्यामुळे जेवढी नवी ओळख आपण करून घेऊ तेवढी कमीच. तरीही डॉक्टरांची जेवढी ओळख एक दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून आहे, तेवढीच ओळख त्यांची एक उत्तम मार्गदर्शक, चित्रपट-नाट्य क्षेत्रातील उत्तम जाणकार आणि एक चित्रपटशिक्षक म्हणूनही आहे. नुकतीच त्यांची शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेली १०० वर्षे चालत असलेल्या मानाच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड करून डॉ. पटेल यांच्या कारकिर्दीचा हा उचित सन्मानच म्हणावा लागेल. अशा या वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही रंगभूमीशी एकनिष्ठ असलेल्या डॉक्टरांबद्दल या निमित्ताने थोडे जाणून घेऊया...
जब्बार पटेल यांचा जन्म २३ जून, १९४२ विठुरायाच्या पंढरपुरात झाला. त्यांना अगदी वयाच्या दहाव्या वर्षीच नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सोलापुरातील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये झाले. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार यांना साहित्य, संगीत व नाट्य अशा तीन कलाक्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या कलाशैलीचा अगदी जवळून अभ्यास करता आला. शाळेत असताना जब्बार यांनी काम केलेल्या 'चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू' हे मूकनाट्य आणि महाविद्यालयात असताना 'तुझे आहे तुजपाशी'मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली. त्यानंतर पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. तेंडुलकरांची काही नाटके त्यांनी वाचली.
ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. त्यानंतर पटेलांनी अनेक एकांकिका आणि नाटके बसवली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटक आणि एकांकिकांनी नाट्यस्पर्धांमध्ये पारितोषिकेही पटकावली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या या कामगिरीची प्रशंसा सर्व ज्येष्ठ आणि मान्यवरांकडून करण्यात आली. त्यानंतर त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती 'अशी पाखरे येती' या नाटकाने. तेंडुलकरांनी लिहिलेल्या आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही मने जिंकली. त्यानंतर त्यांनी 'घाशिराम कोतवाल' या नाटकाचे दिग्दर्शन केले. तेही नाटक खूप गाजले. हे काम पाहून पुढे त्यांना चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचीदेखील संधी मिळाली. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'सामना' हा चित्रपट आजही एक उत्तम चित्रपट म्हणून गणला जातो. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट दिगदर्शित केले. तसेच, काही चित्रपट आणि नाटकांमध्ये कसदार अभिनयही केला.
मालिका, चित्रपट आणि नाटक या मनोरंजन क्षेत्रातील तिन्ही प्रकारांमध्ये त्यांनी आपला अविट ठसा उमटवला. याचवेळी त्यांनी अनेक नवीन कलाकारांना संधी दिली. तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. माहितीपट, लघुपटांच्या माध्यमातून त्यांनी कित्येक नवोदितांना मार्गदर्शन केले. तरुणांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी 'थिएटर अॅकॅडमी' या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली. आजही जब्बार पटेल लिखित एकांकिका, चित्रपट आणि नाटकांचा वापर चित्रपटनिर्मितीच्या अभ्यासक्रमांमध्ये केला जातो.
तसेच, डॉ. जब्बार पटेल हे गेली १७ वर्षे 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे (पिफ्फ) संचालकदेखील आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली २००२ पासून पुण्यामध्ये या 'पिफ्फ'चे आयोजन करण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा महोत्सव महत्त्वाचा मानला जातो. याचअंतर्गत चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणार्या तरुण मंडळींना मार्गदर्शन करण्याचे कामदेखील केले जाते. तसेच, चित्रपटनिर्मिती करणार्या तरुणांसाठी एक उत्तम व्यासपीठदेखील त्यांनी तयार केले. याशिवाय, वेळ मिळेल तसे अनेक विद्यापीठांमध्ये नाटक, मालिका आणि चित्रपटांवरती तासिका घेण्याचेदेखील काम ते करत असतात. नव्या पिढीला देश-विदेशातील आधुनिक चित्रपटांची ओळख व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक काम केले.
अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे हा त्यांच्या इतक्या वर्षांच्या अतुलनीय कामगिरीचा सन्मानच आहे. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि या क्षेत्राशी निगडित असलेला त्यांचा ज्ञानाचा झरा असाच कायम नवीन पिढी घडवत राहो, यासाठी शुभेच्छा...!