अधिकचा प्राप्तीकर आणि ‘रिफंड’चे नियम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019   
Total Views |



आत्तापर्यंत तुम्ही जर प्राप्तीकर जास्त भरला असेल, तर तो परत (रिफंड) मिळायला हवा होता. तुमच्या खात्यात थेट जमा व्हावयास हवा होता. हा ‘रिफंड’ अजूनपर्यंत न मिळवण्याची देखील अनेक कारणे असू शकतात. त्याविषयी आजच्या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्थिक वर्ष २०१८-२०१९ आणि असेसमेंट वर्ष २०१९-२०चा ‘प्राप्तीकर रिटर्न’ तुम्ही मुदतीपूर्वी म्हणजे ३१ जुलैपूर्वी फाईल केला असेल, आत्तापर्यंत तुम्ही जर प्राप्तीकर जास्त भरला असेल, तर तो परत (रिफंड) मिळायला हवा होता. तुमच्या खात्यात थेट जमा व्हावयास हवा होता. हा ‘रिफंड’ अजूनपर्यंत न मिळवण्याची देखील अनेक कारणे असू शकतात. पण, त्यातले बहुतेकांच्या बाबतीत प्रमुख कारण असते ते म्हणजे, आयकर रिटर्न फाईल करण्यासाठीच्या ‘आयटीआर’ अर्जामध्ये नमूद केलेला चुकीचा खाते क्रमांक.

अगोदर करदात्याला ‘रिफंड’च्या रकमेचा धनादेश दिला जात असे किंवा त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात असे. पण, प्राप्तीकर खात्याने आता धनादेश देणे बंद केले असून, करदात्याच्या बँक खात्यातच ‘रिफंड’ची रक्कम जमा केली जाते. या असेसमेंट वर्षापासून हे बचत खाते करदात्याच्या ‘पॅन क्रमांका’शी संलग्न हवे. जर तुमच्या उत्पन्नाप्रमाणे नियमानुसार तुम्ही जितका प्राप्तीकर भरावयास हवा, त्यापेक्षा जर जास्त प्राप्तीकर भरला गेला असेल किंवा ‘मूलस्रोत कर’ कपातीत (टीडीएस) कापला गेला असेल तर असा करदाता ‘रिफंड’ मिळण्यास पात्र असतो.

ज्या करदात्याचे उत्पन्नाचे मार्ग अनेक असतील, तसेच ‘मूलस्रोत कर’ अनेक ठिकाणी कापला जात असेल व नंतर त्यांची ‘८० सी’, ‘८० डी’ व अन्य प्राप्तीकर कलमांन्वये गुंतवणूक हिशोबात घेतली, तर अशा करदात्यांचा अतिरिक्त प्राप्तीकर कापला जाण्याची शक्यता असते. असा जास्त भरला गेलेला प्राप्तीकर, प्राप्तीकर खाते तुम्हाला परत करते, पण त्यासाठी तो ‘आयटीआर’ अर्जामध्ये नमूद करूनच परत मिळवावा लागतो.

तुमचा ‘रिफंड’ तुम्हाला ठरलेल्या वेळेत परत का मिळाला नाही? याचे कारण तुम्ही ‘ऑनलाईन’ तपासू शकता. काही वर्षांपूर्वी ‘रिफंड’ वेळेत का मिळाला नाही, याचे कारण प्राप्तीकर खात्याच्या असेसिंग अधिकार्‍याकडून जाणून घ्यावे लागत असे. पण, आता ते काही वेळेत ऑनलाईन पाहू शकता. सध्या प्राप्तीकर खात्याचा कारभार ‘हायटेक’ तंत्रज्ञानाने चालू असल्यामुळे बहुतेकांना प्राप्तीकर रिटर्न वेळेत मिळतो. www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com या संकेतस्थळावर प्राप्तीकर ‘रिफंड’चा तपशील मिळतो. हे संकेतस्थळ उघडल्यानंतर करदात्याला त्याचा ‘पॅन’ व ‘असेसमेंट वर्ष’ हा तपशील द्यावा लागतो. जर ‘रिफंड’ची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर स्क्रीनवर तुम्हाला संदर्भ क्रमांक, परिस्थिती, रिफंड केलेली तारीख व रिफंड कुठे केला याचा तपशील दिसू शकतो.

रिफंड केला नसेल तर का केला नाही, हे करदात्यास समजावयास हवे. रिफंड केला नसेल तर ‘रिफंड अनपेड’ असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसणार. ‘रिफंड अनपेड’असा मेसेज आल्यास करदात्याने सर्व प्रथम ‘आयटीआर फॉर्म’मध्ये बँक खाते क्रमांक बरोबर टाकता आहे की नाही, हे तपासावे.

प्राप्तीकर खात्याच्या नियमांनुसार, ज्या आर्थिक वर्षाचा प्राप्तीकर ‘रिटर्न’ तुम्ही फाईल करीत आहात, त्या आर्थिक वर्षी भारतात तुमची जितकी खाती असतील, त्यात बचत आणि चालू अशी दोन्ही खाती व त्याचा पूर्ण तपशील तुम्ही द्यावयास हवा. जे खाते ‘डॉरमन्ट’ झाले आहे, ज्यात तुम्ही तीनहून अधिक वर्षे व्यवहार केलेले नाहीत, अशा खात्याचा तपशील देणे गरजेचे नाही. सर्व बँकांकडून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा जर बरोबर समाविष्ट केला असेल व तुम्ही बँकांचा पूर्ण तपशील दिला नाही तरी चालेल. यासाठी तुम्हाला कोणताही दंड आकारला जाणार नाही.


करदात्याची जर एकाहून अधिक खाती असतील तर त्याने यापैकी कोणत्या खात्यात
‘रिफंड’ जमा व्हावयास हवा, हे नमूद करावयास हवे. एखाद्या करदात्याला ‘रिफंड’ मिळवायचा नसला तरीही त्याला ही माहिती देणे आवश्यक केलेले आहे. बँकेचा तपशील नमूद करताना बँकेचे नाव, खाते क्रमांक, ११ आकडी आयएफएससी कोड, जर करदात्याचे परदेशात खाते असेल तर आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक (आयबीए एन) हे समाविष्ट हवे.

असेसमेंट वर्ष २०१९-२०साठी त्यांनी प्राप्तीकर रिटर्न फाईल केला आहे, अशांनी ‘रिफंड’ मिळण्यासाठी जे खाते निवडले आहे, ते ‘ई-फायलिंग’ खात्याशी ‘प्री-व्हॅलिडेट’ करावयास हवे व ‘पॅन’शी संलग्न करावयास हवे. वरील बाबी जर पूर्ण नसतील तर ‘रिफंड’ प्रक्रिया पूर्ण होणार नाही. जर तुम्ही चुकीचा खाते क्रमांक किंवा चुकीचा बँक तपशील दिला आहे, तर तुम्ही तो ऑनलाईन अपडेट करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अडकलेल्या ‘रिफंड’साठी मागणी करू शकता. जर बँकेचा तपशील चुकीचा असल्यामुळे तुमचा ‘रिफंड’ अडकलेला असेल, तरच तुम्ही बँकेच्या तपशीलात फेरफार करू शकता. अन्य कारणांनी किंवा तुमच्या मनाची मर्जी म्हणून करू शकत नाही. ‘रिफंड’ मिळण्यासाठी बँकेचा तपशील www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर फेरफार करू शकता. हे करण्यासाठी करदात्याला त्याचा युजर आयडी व पासवर्ड माहीत हवा. युजर आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर ‘माय अकाऊंट’मध्ये जा. मग ‘रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट’वर क्लिक करा. त्यानंतर सर्व प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने पूर्ण करा. मग, नवा बँक खातेक्रमांक द्या किंवा अन्य काही तपशीलामध्ये फेरफार करावयाचे असतील तर ते करा व शेवटी ‘रिक्टेस्ट’ वर क्लिक करा. अशी बँक खात्यात फेरफार करण्याची प्रक्रिया आहे.

बँक तपशीलात फेरफार करण्यापूर्वी हे खाते तुमच्या ‘पॅन’ला संलग्न आहे ना, तसेच ‘प्री व्हॅलिडेटेड’ आहे ना, याची खात्री करून घ्या. तुमचे बँक खाते ‘पॅन’ला संलग्न करण्यासाठी तुम्हाला तुमचे पॅनकार्ड घेऊन तुमच्या बँकेच्या शाखेत जायला हवे. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. फार थोड्या वेळेतच पूर्ण होते. बचत खाते ‘पॅन’शी संलग्न झाल्यानंतर प्राप्तीकर ‘ई-फायलिंग’ खात्यामार्फत बँक खाते, ‘प्री-व्हॅलिडेट’ करा. ‘ई-फायलिंग’ अकाऊंट्सवर लॉग ऑन करा. नंतर ‘प्रोफाईल सेटिंग’मध्ये जा. नंतर तुम्हाला कोणती बँक ‘प्री-व्हॅलिडेट’ करायची आहे ती निवडा. हे करताना तुम्हाला बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएससी कोड, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हा तपशील द्यावा लागेलतुम्ही बँकखात्याचा तपशील अपडेट केला व प्राप्तीकर खात्याकडे अडकलेला ‘रिफंड’ परत मागितलात तर काही दिवसांमध्ये तुमचा ‘रिफंड’ तुमच्या खात्यात जमा होतो.


g.shashank25@gmail.com

@@AUTHORINFO_V1@@