भारत सोडून परदेशात विशेषत: विकसित देशात स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. पण, देश सोडून जाण्यापूर्वी येथील काही आर्थिक/ वित्तीय व्यवहार पूर्ण करणे आवश्यक असते. 'युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स'च्या आकडेवारीनुसार, १९९० सालापर्यंत ७ दशलक्ष भारतीयांनी परदेशात स्थलांतर केले होते, तर २०१७ साली हे प्रमाण १७ दशलक्ष होते. यात ज्या भारतीयांना समाविष्ट होऊन अनिवासी भारतीय (एनआरआय) व्हायचे असेल, तर त्यांना पुढील आर्थिक/वित्तीय व्यवहारांबाबत पाऊल उचलावयास हवे.त्याविषयी आज जाणून घेऊया...
बँक खाते
तुम्ही अनिवासी भारतीय झाल्यानंतर भारतातील तुमच्या निवासी बँक खात्यांतून व्यवहार करता येत नाही. तुम्हाला तुमचे खाते 'एनआरओ' (नॉन-रेसिडेण्ट ऑर्डिनरी) खात्यात बदलून घ्यावे लागते. जर तुमची भारतात बरीच बँक बचत खाती असतील, तर प्रत्येक खाते 'एनआरओ' करण्यापेक्षा सर्व खात्यांचे एकच 'एनआरओ' खाते करा. बरीच 'एनआरओ' खाती उघडलीत तर व्यवहार करण्यासही कठीण जाईल व कर भरण्याच्या दृष्टीनेही ते अवघड होईल. तुम्ही परदेशात गेल्यावर भारतातील राहते घर/ बंगला न विकता जर भाड्याने द्यायच्या विचारात असाल तर त्याचे भाडे, तुम्ही जर कोणत्या कंपनीचे भागधारक असाल तर त्याचा मिळणारा लाभांश अशी 'क्रेडिट' 'एनआरओ' खात्यात जमा होतात. बचत खाते 'एनआरओ' बचत खात्यात बदलायचा निर्णय झाला की, बँकेत खाते बदलाचा फॉर्म भरून, त्यावर सर्व खातेदारांच्या सह्या करून सुपूर्द करा. तसेच नवा खाते उघडण्याचा फॉर्म पूर्ण भरून बँकेला सुपूर्द करा. याशिवाय पासपोर्ट, वैध व्हिसा किंवा ज्या देशात स्थायिक होणार आहात, त्या देशाचे 'वर्क परमिट' या सर्वांच्या फोटो प्रतीही बँकेत सुपूर्द कराव्या लागतात.
जर तुमचे भारतातील खाते 'शून्य शिल्लक' (झिरो बॅलन्स) प्रकारचे असेल, तर बँकेच्या नियमांनुसार ठराविक रक्कम या खात्यात भरावी लागेल. काही बँका या खाते बदलासाठी सेवाशुल्कही आकारतात. 'एनआरओ' खाते कार्यरत झाले व त्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळाले, तर प्राप्तीकर कायद्यानुसार कर कापून उरलेली रक्कम व्याजापोटी खात्यात जमा केली जाणार. तुम्ही परदेशात गेेल्यावर इथे 'लॉकर' वापरणार नाही. त्यामुळे लॉकरही बंद करावा, नाहीतर तुम्हाला लॉकरच्या भाड्यापोटी रक्कम भरावी लागेल. भारतात तुम्हाला भारतातील काही डॉक्युमेंट्स किंवा दागदागिने ठेवायचे असतील, तरच लॉकर चालू ठेवावा.
गुंतवणुकीतून बाहेर पडा
भारतात बऱ्याच ठिकाणी पैसे गुंतविले असतील तर त्यापैकी बऱ्याच गुंतवणूक योजनांतून बाहेर पडून ती खाती बंद करून त्यातून मिळणारी रक्कम हाती घ्यावी. याबाबतचा निर्णय घेताना तुम्ही कोणत्या देशात स्थलांतरित होत आहात व तिकडचे करविषयक नियम काय आहेत, याची आधी सविस्तर माहिती घेऊनच निर्णय घ्यावे. तुम्ही जर अमेरिका किंवा कॅनडामध्ये स्थलांतरित होणार असाल तर 'फॉरेन अकाऊंट टॅक्स कम्प्लायन्स' कायद्यानुसार (एफएटीसीए) तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा आणि रेमिटन्सेस करपात्र आहेत.
त्यामुळे तुम्ही ज्या देशात जाणार आहात, त्या देशांच्या कर कायद्यांची पूर्ण माहिती करून घ्या. काही जण ५० टक्के रक्कम भारतात गुंतवतात, तर ५० टक्के रक्कम जागतिक गुंतवणूक पर्यायांत गुंतवितात. भारत सोडून जाताना तुम्ही सर्व गुंतवणूक पर्यायांत असलेली गुंतवणूक काढून घेतलीत, तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे काहीजण गुंतवणुकीच्या मुदतपूर्तीच्या वेळी गुंतवणुकीतून बाहेर पडतात. हे निर्णय घेताना तुम्हाला परदेशात जाताना पैशाची किती निकड आहे, यावर सर्व गणित अवलंबून असते. घर, बंगला किंवा इमारत तसेच जमीनजुमला परदेशातून विकणे फार कठीण असते. यांची देखभाल खर्चाची बिले, युटिलिटी बिले जर कर्ज अंगावर असेल तर त्यांचे मासिक हप्ते वगैरेंची तरतूद करावी लागते. परदेशी स्थलांतरित होण्याचा निर्णय थोड्या दिवसांत झाला असेल, तर गुंतवणूक बंद करून त्यातून पैसे घेणे सोपे असते, पण प्रॉपर्टी पटकन विकणे तेवढेसे सोपे नसते आणि सध्या तर प्रॉपर्टीला गिर्हाईकही कमी आहेत.
प्रॉपर्टी बंद असेल तर कोणीतरी घुसून ती बळकावेल, ही भीतीही कायमच असते. चांगला प्रामाणिक भाडेकरू मिळाला तर प्रॉपर्टी भाड्याने देताही येऊ शकते. एखादा नातलग प्रॉपर्टीची काळजी घेणारा असेल तर प्रॉपर्टी सुखरूप राहू शकेल किंवा पैसे देऊन सिक्युरिटी ठेवावी लागेल. परदेशात गेल्यावर सुरुवातीला तुमच्या हातात पैसे असणे आवश्यक असते. त्यामुळे भारतात जितके पैसे मिळतील, तितके घेऊन त्यांचे तुम्ही ज्या देशात चालला आहात, त्या देशातील चलनात रूपांतर करून घ्यावे.
जर तुम्हाला भारतीय कंपन्यांत असलेले शेअर विकायचे नसतील, तर तुम्हाला तुमचे 'डिमॅट' खाते 'एनआरओ' किंवा 'एनआरई' (नॉन रेसिडेण्ट एक्स्टर्नल) असे बदलून घ्यावे लागेल. तुम्ही परदेशात गेल्यावर तेथील कंपनीचे शेअर विकत घेतलेत तर ती परदेशी कंपनी तुमचा परतावा भारतातील तुमच्या 'एनआरई' खात्यात क्रेडिट करेल. जर परदेशात राहून भारतातील कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलीत, तर 'एनआरओ' खात्यात लाभांश जमा केला जाईल.
तुम्ही 'पीआयएस' (पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट स्कीम) खातेही उघडू शकता. हे खाते उघडल्यावर तुम्ही अनिवासी भारतीय झाल्यावरदेखील येथे शेअरमध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकता. 'पीआयएस' ही भारतीय रिझर्व्ह बँकेची योजना आहे. या योजनेमुळे अनिवासी भारतीय शेअर तसेच परिवर्तनीय कर्जरोखे मान्यताप्राप्त शेअर बाजारात खरेदी किंवा विक्री करू शकतात. या विक्रीतून आलेली रक्कम किंवा खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम एनआरआय खात्यातून क्रेडिट/डेबिट केली जाते. पण, एनआरआय खाते उघडायची परवानगी असलेल्या बँकेच्या शाखेतच खाते उघडावे लागते.
म्युच्युअल फंड गुंतवणूक
म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनीला नवे केवायसी कागदपत्र द्यावे लागतात. हे केवायसी तुमचा राहण्याचा नवा पत्ता दाखविणारे हवेत. तुमचा फोलिओ 'नॉन रेसिडेण्ट' म्हणून बदलून घ्या. तुमचे 'एनआरओ' खाते म्युच्युअल खात्याशी संलग्न करा. दुसऱ्या देशातून म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ 'मॅनेज' करणे कठीण ठरू शकते. यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकाची मदत घेणे चांगले. काही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी अमेरिका व कॅनडा येथील अनिवासी भारतीयांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देत नाहीत.
भारतातील कायद्यानुसार तुम्ही अनिवासी भारतीय झाल्यानंतर तुम्हाला अल्पबचत संचलनालयाच्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक करता येत नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (पीपीएफ) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) व अन्य गुंतवणूक पर्यायांत गुंतवूणक करता येणार नाही. पण, तुमची असलेली खाती चालू राहू शकतात व त्यात व्याजही जमा होऊ शकते. पैशाची गरज नसल्यास ही खाती तुम्ही चालू ठेवू शकता.
विमा पॉलिसीज्
तुमच्या जीवनविम्याच्या व सर्वसाधारण विम्याच्या पॉलिसींची यादी करा. वाहन विमा हा तत्काळ कालबाह्य होणार. तुम्हाला परदेशातून 'प्रीमियम'वर ट्रॅक ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रीमियम भरण्यासाठी तुमच्या बँकेला 'स्टँडिंग इन्स्ट्रक्शन' द्या. म्हणजे तुमचे प्रीमियम वेळेवर भरले जातील. घराचा फायर किंवा हाऊसहोल विमा असेल व तुम्ही जर घर विकले असेल, तर तोही कालबाह्य होणार. जर तुमच्यावर अवलंबून असलेले भारतात राहत असतील तर जीवन विम्याची टर्म पॉलिसी चालू राहू द्या. आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम पॉलिसीही कालबाह्य होणार. जर तुम्ही परदेशात गेल्या गेल्या तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले, तर 'वेटिंग' कालावधी न संपल्यामुळे तुमचा दावा नवीन देशात संमत होणार नाही. अशा वेळी जर तुम्ही भारतात उपचारासाठी आलात व तुमची मेडिक्लेम पॉलिसी कार्यरत असेल तर तुमचा दावा संमत होऊ शकतो. आरोग्य विमा पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.
एनआरआय कर कायदे
भारत सोडण्यापूर्वी चालू आर्थिक वर्षाचे भारताचे सर्व कर भरूनच परदेशात जा. तुम्हाला येथे व परदेशात असे दोनदा कर भरावे लागू नयेत म्हणून 'डबल टॅक्स अवॉयडन्स अॅग्रीमेंट' (डीटीएए) तपासा. भारत देश व तुम्ही जात असलेला देश या दोघांनी 'डीटीएए' करारावर सह्या केल्या आहेत की नाहीत, याची माहिती करून घ्या. भारताबरोबर 'डीटीएए' करारावर सह्या केलेल्या देशात तुम्ही गेलात, तर तुम्हाला दोनदा कर भरावा लागणार नाही. म्युच्युअल फंड्सवर भराव्या लागणाऱ्या 'कॅपिटल गेन्स' चे नियम भारतीय व अनिवासी भारतीयांसाठी समान आहेत. अनिवासी भारतीयांचा मूलस्त्रोत कर अॅसेट मॅनेजमेंट कंपनी कापते व सरकारदरबारी जमा करते. तुम्हाला एनआरआयसाठीच्या प्राप्तीकर कायद्याच्या कलमांची माहिती नसेल तर एखाद्या कर सल्लागाराची मदत घ्या. वरील सर्व गोष्टी ध्यानात घेऊन अमलात आणून तुमचे परदेशी स्थलांतर सुखकर करा.
९९२०८९५२१०
g.shashank२५@gmail.com