पाटणा : गणितज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. पाटणा येथे पीएमसीएच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून त्यांची सिजोफ्रेनिया या आजाराशी त्यांची सुरु असलेली झुंज अखेर संपली. वशिष्ठ नारायण यांनी आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताला आव्हान दिले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एकेकाळी 'नासा' या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेसाठी काम करणाऱ्या या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला मरणानंतरही यातना भोगाव्या लागल्या. वशिष्ठ नारायण सिंह यांचे पार्थिव रुग्णवाहीका नसल्याने तब्ब्ल दीड तास तात्कळत ठेवावे लागले. रुग्णवाहिका चालकाने पार्थिव भोजपूरला नेण्यासाठी पाच हजारांची मागणी केली होती, त्याची व्यवस्था न झाल्याने विलंब झाल्याची माहिती त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार रवी आणि नेते मंडळींनी नारायण यांच्या पार्थीवाला भोजपूरला नेण्याची व्यवस्था केली.
शालेय जीवनात अत्यंत हुशार असा विद्यार्थी म्हणून वशिष्ठ यांची ओळख होती. शिक्षकांकडून एखादी पद्धत चुकीची शिकवल्यास ते अडवत. त्यामुळे प्राचार्यांनी त्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले होते. मात्र, या परिक्षेतही ते पास झाले. विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कॅलिफोर्नियातील प्राध्यापक जे कॅली यांनी त्यांची कुशाग्रता ओळखली होती. त्यांनी वशिष्ठ यांना अमेरिकेत नेण्याचे ठरले.
यानंतर वशिष्ठ यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. वॉशिंग्टन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले. अमेरिकेत नासा या अंतराळ संशोधन संस्थेत त्यांनी काम पाहिले. भारतात आल्यावर आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई आणि कोलकाता येथे त्यांनी नोकरीही केली.