'एनबीए'सारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धा भारतात रुजावी, यासाठी प्रयत्न करणारे 'सॅक्रेमेंटो किंग्स'चे मालक विवेक रणदिवे यांच्याबद्दल आज जाणून घेऊया...
भारत विविधतेने नटलेला देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती, रूढी, परंपरा आणि खेळ या सर्व गोष्टींचा जगभरामध्ये विशेष अभ्यास केला जातो. जसे भारतामध्ये भाषेमध्ये वैविध्य आहे, त्याचप्रमाणे इथे खेळांमध्येही वैविध्य आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या क्रिकेटपासून ते मराठमोळ्या विटी-दांडूपर्यंत असंख्य प्रकारचे खेळ खेळले जातात. देशामध्ये क्रिकेट, कबड्डी आणि फुटबॉल या खेळांचा विशेष असा चाहता वर्ग आहे. तसेच, भारतीयांनी कुस्तीसारख्या मातीच्या खेळाचीही आवड जपलेली आहे. या सर्व खेळांना व्यावसायिक स्वरूप देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे कामदेखील हे खेळ आतापर्यंत करत आले आहेत. त्याचप्रमाणे, या खेळांमधून अनेक नवीन चेहरे, नवीन संघर्ष आणि नवीन स्फूर्तिस्थानं देशाला तसेच जगाला दिलेले आहेत. क्रिकेटमधील 'आयपीएल,' फुटबॉलमध्ये 'इंडियन सुपर लीग,' कबड्डीमध्ये 'प्रो कबड्डी,' हॉकीमध्ये 'हॉकी इंडिया लीग' आणि बॅडमिंटनमध्ये 'प्रीमिअर बॅटमिंटन' या सर्व लीगमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी मोठा हातभार लागला. त्याचप्रमाणे यामुळे भारतात नवीन रोजगारदेखील तयार होऊ लागले. यामुळे तळागाळातील आणि दुर्लक्षित भागांमधील खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळाला. आता अशाच एका नव्या खेळाला भारतात उभारी येणार असल्याचे संकेत दिसत आहेत. भारतात बास्केटबॉल या खेळावरदेखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बास्केटबॉल खेळाला भारतात लोकप्रिय करण्यासाठी 'नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन' अर्थात 'एनबीए'ने काही सामने आयोजित केले आहेत. मुंबईमध्ये 'इंडियाना पेसर्स' आणि 'सॅक्रेमेंटो किंग्स' या दोन संघाचे सामने खेळवले जाणार आहेत. या संघटनेला भारतात घेऊन येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला ते म्हणजे अमेरिकन-भारतीय उद्योगपती विवेक रणदिवे. हे 'सॅक्रॅमेंटो किंग्स' या संघाचे मालक असून बास्केटबॉल भारतात यावे यासाठी खूप प्रयत्न केले. आज जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल...
अमेरिकेत स्थायिक असलेल्या विवेक यशवंत रणदिवे यांचा जन्म ७ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाला. मुंबईतील जुहूमध्ये त्यांचे बालपण गेले. तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान असले तरी त्यांच्या घरातील चांगल्या वातावरणामुळे त्यांना चांगले संस्कार मिळाले. त्यांचे बालपण हे जुहूच्या किनाऱ्यालगत अधिक गेल्यामुळे लहानपणापासून त्यांना खेळांमध्ये रस होता. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील बाबुलनाथ येथील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. भारतीय कम्युनिस्ट नेते बाळकृष्ण त्र्यंबक रणदिवे आणि अहिल्या रांगणेकर यांचे ते पुतणे आहेत. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना 'मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' म्हणजेच 'एमआयटी' या जगप्रसिद्ध विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. पुढे 'एमआयटी'मध्ये त्यांनी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. १७ वर्षाच्या विवेक रणदिवे यांनी 'एमआयटी'ला पदवीचे शिक्षण घेत असतानाच 'युनिक्स कन्सल्टिंग कंपनी' सुरू केली. लहान वयामध्ये शिक्षण आणि व्यवसाय सांभाळताना त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. 'एमआयटी'नंतर १९८३ मध्ये त्यांनी 'हार्वर्ड' विद्यापीठातून 'एमबीए'ची पदवी घेतली. त्यांनी 'फोर्ड मोटर कंपनी,' 'एम/ए-कॉम लिंकबिट' आणि 'फॉर्च्युन सिस्टिम्स'मध्ये व्यवस्थापक आणि अभियंता पदेदेखील भूषविली आहेत. १९८५ मध्ये 'टेक्नेक्रोन सॉफ्टवेअर सिस्टिम' उभी करण्यासाठी विवेक रणदिवे यांना 'टेक्नेक्रोन कॉर्पोरेशन' या 'टेक्नॉलॉजी इनक्युबेटर'ने २ लाख, ५० हजार अमेरिकन डॉलर इतकी रक्कम त्यांना प्रदान केली. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी 'सिस्को सिस्टिम' आणि 'रॉयटर्स'च्या साहाय्याने 'टिबको सॉफ्टवेअर' कंपनीची स्थापना केली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया रिजेन्ट्स विद्यापीठाच्या भागीदारीमध्ये प्रारंभिक-टप्प्यातील स्टार्टअप गुंतवणूक कंपनी 'बोव कॅपिटल'ची स्थापना केली.
आपल्या कन्येमुळे अनावधानाने बास्केटबॉलशी आलेला संबंध पुढे त्यांची मोठी ओळख बनली. खेळाशी फारसा संबंध आलेला नसतानाही बास्केटबॉलसारख्या खेळात त्यांची रुची वाढू लागली. २०१० मध्ये ते 'गोल्डन स्टेट वॉरियर्स'चे सह-मालक आणि उपाध्यक्ष बनले. 'एनबीए'च्या एखाद्या संघाचे सह-मालकीचा हक्क बजावणारे ते पहिले भारतीय वंशाची व्यक्ती ठरले. २१ मार्च, २०१३ रोजी अशी घोषणा केली गेली की, रणदिवे हे 'सॅक्रॅमेन्टो किंग्ज' हा संघ खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रॉन बुर्कले आणि मार्क मास्त्रोव्हमध्ये सामील झाले आहेत. अखेर त्यानंतर १६ मे, २०१३ रोजी त्यांनी या संघाचे मालकी हक्क हातात घेतले. त्यानंतर २०१९ मध्ये 'एनबीए'ने बास्केटबॉलचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना मुंबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. 'एनबीए'ला भारतात घेऊन येण्यासाठी रणदिवे आणि त्यांचा संघ 'सॅक्रेमेंटो किंग्स' यांचा मोलाचा वाट आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 'इंडियाना पेसर्स' आणि 'सॅक्रेमेंटो किंग्स' यांच्यामध्ये मुंबई प्रीसिझन सामने खेळवण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय आर्थिक चलनवलनही वाढेल आणि भारतीय झेंडा या खेळातही अभिमानाने उंचावेल. यासाठी विवेक रणदिवेंसारख्या व्यक्तींची गरज आपल्या मातीला आहे. आगामी काळात बास्केटबॉल हा खेळ भारतात मोठा करण्यासाठी त्यांना यश मिळो, हीच अपेक्षा आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!