देशभरातील गगनचुंबी इमारतींची व्यापकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019   
Total Views |
 


देशात उंच इमारती तशा पुष्कळ बांधण्यात आल्या आहेत. पण, एकट्या मुंबईत त्यांची संख्या तीन हजारांच्या वर असून ती देशात सर्वाधिकही आहे. तेव्हा, त्याचाच या लेखात घेतलेला हा आढावा...

 

मुंबई महापालिकेने अशा उंच इमारती बांधण्याकरिता काही निकष बदलले आहेत. कारण, अनेक जुन्या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत व त्यांची पुनर्बांधणी लवकर करणे गरजेचे आहे. उंच इमारती बांधण्याकरिता पहिला सुधारित निकष म्हणजे उंच इमारतीची व्याख्या. कोणतीही इमारत उंच इमारतींच्या यादीत जाण्याकरिता तिची उंची ३२ मीटर वा अधिक असायला हवी. पूर्वीच्या नियमात उंच इमारत आहे की नाही, हे ठरविण्याकरिता तिची उंची २४ मीटर वा अधिक अशी समजली जात होती.
 

दुसरा सुधारित निकष - उंच इमारत बांधण्याकरिता पालिका आयुक्तांना १२० मीटर उंचीपर्यंतच्या इमारती (वा ४० मजल्याच्या इमारती) बांधण्याकरिता मंजुरी देण्याचे अधिकार दिले आहेत. जुन्या निकषाप्रमाणे ७० मीटर उंचीपर्यंतचे (वा २१ माळ्यापर्यंतच्या) मंजुरीचे अधिकार पालिका आयुक्तांकडे होते. परंतु, बर्‍याच वास्तुरचनाकारांच्या म्हणण्याप्रमाणे, जुन्या नियमाप्रमाणे मंजुरी मिळविण्याकरिता तीन-तीन महिन्यांनंतर बोलणी करावी लागायची. त्यामुळे त्या मंजुरीला फार विलंब होत असे. उंचीबद्दलचे नियम सुधारित झाल्यामुळे इमारतींच्या विकासाला चालना मिळू शकते. या नियमात बदल केल्यामुळे बांधित क्षेत्र निर्देशांक (FSI) वा विकास अधिकार स्थानांतर (TDR) मिळण्याच्या दृष्टीने सुधारणा उपयोगी पडते वा इमारतींचा वेगाने विकास होऊ शकतो.

 

जुन्या निकषाप्रमाणे, २४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींकरिता भूखंडामध्ये मोकळी सोडलेली जागा रस्त्यापासून कमीत कमी सहा मीटर मोकळी असायला हवी. परंतु, नवीन निकषात उंचीच्या नियमात आता तो बदल ३२ मीटर केल्यामुळे २४ मीटर ते ३२ मीटर उंचीमधल्या व दाट वस्तीत वसलेल्या सर्व इमारतींचा विकास वेगाने होण्यास मदत होईल, असे मत बांधकाम व्यवसायातील अभियंते, वास्तुरचनाकार व नगरनियोजनकार सदस्यांकित संस्थेचे अध्यक्ष शिरीष सुखात्मे यांनी व्यक्त केले.

 

इमारत बांधण्यासंबंधीची राष्ट्रीय संस्था (NBC) उंच इमारती बांधण्यासाठी मार्गदर्शन करते. वास्तू धोकामुक्त राहावी आणि सुरक्षित, सुव्यवस्थित व संकटमुक्त सेवा मिळावी म्हणून या संस्थेने नियमावली बनविली आहे. त्यानुसार देशातील इमारतींचे नऊ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे आणि इमारतीच्या संरचनेचे व अग्निशमनव्यवस्थेचे स्वरूप व व्याप्ती त्या वर्गीकरणानुसार असावी, असे ही संस्था सांगते.

 

नियमावलीत प्रस्तावित इमारतींचे वर्गीकरण आणि श्रेणी खालीलप्रमाणे -

 

- निवासी, ब - शैक्षणिक, क - संकटमोचन संस्था, ड - शुश्रूषा संस्था, इ - धंदाविषयक, फ - व्यावसायिक, ग - औद्योगिक, ह - वखारव्याप्त, य - सभागृह, ज - जोखीमयुक्त, क - वाहन दुरुस्तीविषयक, ल - सेवायुक्त, म - विविध सेवायुक्त

राष्ट्रीय साधन असलेल्या 'एनबीसी' संस्थेकडून इमारतींच्या सुरक्षित आणि सुव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या देशातील बांधकाम नियमांचे वर्णन केलेले आहे. कोणताही विकासक जो इमारत बांधण्याच्या नियमांचे पालन करण्यास अयशस्वी ठरला असेल, त्याला दंड, इमारत परवानगी रद्द करणे किंवा त्याची मालमत्ता पाडणे वगैरे गोष्टींचा समावेश असलेल्या बंधनकारक नियमांचा त्यात समावेश केलेला आहे. 'एनबीसी'च्या नियमावलीत आग प्रतिबंधित करण्यासाठी नियमित मार्गदर्शक तत्त्वे आणि तरतुदींचा समावेशही केलेला आहे.

 

सध्या आपल्या देशात आशिया खंडातील बांधकाम क्षेत्रातील दर्दी म्हणून नावाजलेले असे 'डीएलएफ', 'टाटा', 'गॅमन इंडिया' इ. विकासक आहेत. सध्या इमारत बांधकाम क्षेत्रात वेगाने विकास होत आहे आणि गगनचुंबी इमारतींची संख्या वाढत आहे आणि भारतात उंच इमारती, वास्तूंची वतनविषयक प्रकल्पांची मोठी पेठ तयार होत आहे. सध्या होत असलेल्या वा तयार झालेल्या काही गगनचुंबी इमारती अशा आहेत -

 

उंच इमारत जरी नियमांनुसार ३२ मीटर वा अधिकच्या उंचीची असली तरी गगनचुंबी इमारतींची व्याख्या वेगळी आहे -

 

गगनचुंबी इमारत वास्तूची उंची कमीत कमी १५० मीटर असते. ती वास्तू तिच्या स्वत:च्या जमिनीवर 'सलोह काँक्रिट'संरचित अशा भक्कम पायावर उभी राहिली पाहिजे व तिच्या विविध माळ्यांवर बांधलेल्या क्षेत्रापैकी कमीत कमी ५० टक्के वावरण्यासारखी जागा असली पाहिजे.

 

या गगनचुंबी इमारती मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, गुरुग्राम, चेन्नई इ. अनेक शहरांमध्ये बांधल्या जात आहेत वा बांधल्या गेल्या आहेत.

 

'ओंकार १९७३', मुंबई

ही इमारत वरळीला बांधण्यात येत आहे व तिची उंची ४५० मीटर इतकी असेल. विकासकाचे नाव 'ओंकार रिअ‍ॅलटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स' असून या दिमाखदार व चैनीच्या साधनांनी युक्त असलेल्या इमारतीत ३ बीएचके, ४ बीएचके व ५ बीएचके असलेली ४०० बंगलासदृश घरे असतील. या घरांमध्ये राहण्याचे अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आणि इतर मान्यवर व्यक्तींना आकर्षण आहे.

 

वर्ड वन, मुंबई

ही लोढा समुदाय विकसित करत असलेली लवकरच पूर्ण होणारी निवासी इमारत ४४२ मीटर उंचीची असून तिला ११७ माळे असणार आहेत. इमारतीत एकूण २९० घरे आहेत. इमारतीचे वास्तुरचनाकार 'पे कॉब्स' आणि सहकारी आहेत. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय ठरणार्‍या उच्च दर्जाच्या अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

पलाईस रॉयल, मुंबई

या वास्तूची उंची ३२० मीटर आहे व ती लोअर परळ भागात बांधली जात आहे. या इमारतीत उच्च असे पर्यावरणसंबंधी, टिकणारे व ऊर्जा-तंत्रज्ञान वापरल्यामुळे इमारतीला 'प्लॅटिनम' दर्जाचे मूल्यांकन झाले आहे. इमारतीत आधुनिक अशा सर्व सुविधा उपलब्ध असतील. त्यात चित्रपटगृह, आरोग्य केंद्र, क्रिकेट मैदान आणि तीन तरण तलावांची समावेश आहे. इमारतीतील १२० निवासी घरे ७४० ते १३०० चौ.मीटर क्षेत्राची राहणार आहेत.

 

'दी ४२', कोलकाता

इमारतीसमोर मोठे मैदान व त्यापुढे हुगळी नदी असे विहंगम दृश्य या इमारतीच्या खिडकीतून दिसेल. या गगनचुंबी इमारतीमुळे कोलकाता शहराला मोठा दर्जा मिळाला आहे. इमारतीची उंची २६८ मीटर आहे व इमारतीला ६५ माळे असून अगदी आधुनिक अशा साधनांनी युक्त चैनीची घरे बांधली आहेत. इमारतीत ३६० अंशातून फिरले तरी सर्व बाजूंनी सुंदर असे देखावे दिसतात. या इमारतीत हरित वातावरण मिळावे म्हणून इमारतीची वास्तू हरित संरचनेची बनविली गेली आहे व तेथे मलजल प्रक्रिया केंद्र, सौर पॅनेल आणि विजेवर चालणार्‍या वाहनांकरिता चार्जिंग केंद्र इत्यादींची उपलब्धता दिल्याने इमारतीला राष्ट्रीय हरित इमारत कौन्सिलकडून सुवर्णदर्जा मूल्यांकनाचे प्रशस्तिपत्रक मिळाले आहे.

 

इम्पिरिअल दुहेरी मनोरे, मुंबई

ताडदेव भागात बनलेला २५६ मीटर उंचीचा मनोरा हा निवासी घरांकरिता बांधला आहे व तो सध्या तरी देशातील सर्वात उंच मनोरा आहे. हा मनोरा ६० माळ्यांचा आहे. बांधकामाचा दर्जा उच्च दर्जाचा आहे व घरे चैनीच्या साधनांनी युक्त आहेत. घरांचे क्षेत्रफळ २५५० चौ. फूट ते १० हजार चौ.फूट क्षेत्रफळांचे आहे. प्रत्येक घराला १५० ते २७० अंशांतून बाहेरील देखावे दिसतात. इमारतीची वास्तुरचना 'हाफिज कॉन्ट्रॅक्टर' यांनी बनविली आहे व 'शापुरजी पालनजी' यांनी इमारत बांधणीचे काम केले आहे.

 

'नॉर्थ आय', नोएडा

शहरातील सेक्टर ७४ भागात सहा एकर भूखंडावर वसलेला हा मनोरा २५५ मीटर उंचीचा व ६६ माळ्यांचा आहे. उत्तर भारतातील एक सर्वात निवासी उंच मनोरा म्हणून त्याची ख्याती झाली आहे. मनोर्‍यातील घरे २ बीएचके, ३ बीएचके व ४ बीएचके अशी आहेत. या मनोर्‍याशेजारी उघड्या हवेचे रेस्टॉरंट व गच्चीवर हेलिपॅडची उपलब्धता केली आहे.

 

अहुजा टॉवर, मुंबई

हा मनोरा प्रभादेवी भागात ५४ माळ्यांचा २०१५ सालीच उभा राहिला. या मनोर्याची उंची २५० मीटर आहे आणि इमारतीत ७८ घरे ४ बीएचके व काही घरे ६ बीएचके पेंटहाऊस पद्धतीची आहेत. त्यातील एका घराचे मालक क्रिकेटपटू रोहित शर्मा आहेत. ही २०१५ मध्ये बांधलेली इमारत विश्वातील पहिल्या ५० मध्ये स्थान मिळालेली आहे. न्यूयॉर्कच्या 'विल्सन असोसिएट्स' यांनी इमारतीच्या अंतर्गत वास्तुरचनेचे काम केले आहे.

 
 

'लोढा बेलीसिमो', महालक्ष्मी, मुंबई

ही इमारत २२२ मीटर उंचीची आहे व तिला ४८ माळे असणार आहेत. तेथे २ बीएचके, ३ बीएचके व ४ बीएचकेची घरे शिवाय ५ बीएचकेची डुप्लेक्स पेंटहाऊस आहेत. वास्तुरचना 'गॉफ्रे बावा' यांनी केली आहे. या इमारतीचे बांधकाम 'डीबी रिअ‍ॅल्टी' विकासकांनी केले आहे.

 

'ऑर्किड एनक्लेव्ह', मुंबई

या इमारतीची उंची २१० मीटर असून तिला ५२ माळे असणार आहेत.

 

अ‍ॅन्टीलिया, मुंबई

भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी हा मनोरा ऑल्टमाऊंट रोडला बांधला आहे. ते व त्यांचे कुटुंब २०१२ पासून वास्तव्यास आहे. ही इमारत १७३ मीटर उंच व २७ माळ्यांची आहे. यात ४ लाख चौ. फुटाचे बांधकाम केलेले आहे. यातील सुविधा अशा आहेत - ३ हेलिपॅड, १६८ चारचाकींकरिता पार्किंग व्यवस्था, बॉलरुम, ५० आसनांचे थिएटर, गच्चीवर उद्यान, आरोग्य केंद्र, एक मंदिर, दोन माळ्यांचे करमणूक केंद्र, अनेक तरण तलाव बांधले आहेत. या इमारतीची वास्तुरचना 'पार्किन्स व विल' यांनी केली. याची किंमत दोन अब्ज डॉलर्स असल्यामुळे जगातील हा एक सर्वाधिक महागडा मनोरा ठरला आहे.

 

मुंबई परिसर आर्थिक केंद्र असल्यामुळे ते गगनचुंबी इमारतींचे आगर बनले आहे. येथे तीन हजारांहून अधिक अशा उंच इमारती बांधण्यात आल्या आहेत व बांधकामे सुरू आहेत. त्यात निवासी, व्यावसायिक आणि रिटेल अशा विविध प्रकारांची गगनचुंबी इमारती, संकुले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@