मातृभाषेचे महत्त्व पटवून देताना इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मूळ प्रवाहातून बाहेर पडणार्या मुलांना व गृहिणींना इंग्रजीचे धडे देत स्पर्धात्मक युगात आत्मविश्वास वाढविणार्या मीरा कोर्डे यांच्याविषयी...
मुंबईच्या पश्चिम उपनगरात आणि विशेषतः दहिसर, बोरिवलीत मीरा कोर्डे हे तसे परिचित नाव. अर्थात, त्या राजकारणी नाहीत, अभिनेत्री नाहीत, पण त्यांचे कार्य मात्र ‘लाईमलाईट‘च्या दुनियेत एका दिशादर्शक दीपस्तंभासारखे आहे. इंग्रजी भाषेचा असलेला ’न्यूनगंड’ ही खरंतर एक गंभीर समस्या. बर्याचदा असलेले ज्ञान केवळ इंग्रजीत मांडता येत नाही म्हणून अनेकांची प्रतिभा कच खाते आणि कोणीतरी दुसराच बाजी मारून जातो. म्हणूनच ‘ॲबीज’ संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी शिकवण्याचे कार्य करणार्या मीरा या आपल्या संस्थेला ‘क्लास’ नव्हे, तर एक ‘चळवळ’ असे संबोधतात.
१९९६ साली त्यांचे पती अबिनाश यांच्या अकाली मृत्यूनंतर मीरा कोर्डे यांनी त्याचे भांडवल न करता आपला छंद आणि शिक्षण यांची सांगड घालून इंग्रजी शिकवण्याचा आपला ध्यास पुढे सुरूच ठेवला. त्याला २२ वर्षे पूर्ण होतील. विशेष म्हणजे पारंपरिक शैक्षणिक साधनांचा वापर त्या टाळतात आणि इंग्रजी सुधारण्यासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावर जास्त भर देतात. अर्थात, विद्यार्थी हेच मीरा यांच्या कौशल्याचे प्रमाणपत्र आहे. वय वर्षे १६ ते ६० अशा वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांचा ‘ॲबीज’च्या संपूर्ण कुटुंबात समावेश होतो. विशेष म्हणजे, मीरा त्यांच्याशी व्यावसायिक संबंध न ठेवता त्यापलीकडे आपल्या कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे हे नातं जोपासतात.
‘ॲबीज’च्या एकंदर वाटचालीकडे पाहिलं तर केवळ पुस्तके, नोट्स, प्रेझेन्टेशन आणि गृहपाठ या चौकटीत न अडकता विविध उपक्रमांमधून इंग्रजी शिकविणे हाच मीरा यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्याशी बातचीत केल्यावर आणि त्यांनी सांगितलेल्या एकंदर अनुभवातून एक गोष्ट पुढे आली. ती म्हणजे, मराठी माध्यमातील मुले आजकाल शाळांमधून अगदी पहिलीपासूनच इंग्रजी शिकल्यामुळे व्याकरणाच्या आघाडीवर कुठेही मागे नसतात. कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास आणि याचीच तयारी ‘ॲबीज’च्या माध्यमातून मीरा करून घेतात. हे करत असतानाच अर्थार्जनासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अनेक गरजूंना केलेले मोफत मार्गदर्शन असो किंवा विविध परीक्षांकरिता केलेले समुपदेशन. या सर्वच ठिकाणी त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
मीरा या एका फोनवरसुद्धा आपल्या परिवारातील सदस्यांशी म्हणजेच विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. अगदी कोणत्याही वेळी, हे विशेष. इंग्रजी शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी वयाचे काहीच बंधन नसते. पण आजच्या काळात इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच ‘ॲबीज’च्या माध्यमातून अगदी नोकरी करणारे तरुण असोत किंवा गृहिणी असोत, सर्वांना रोजच्या व्यवहारापुरती इंग्रजी अवगत होईल, यासाठी त्या झटत असतात. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही त्या करतात. विविध स्पर्धा भरवतात आणि वयाचे ओझे न वाटता चिकाटी असेल तर सर्व सहज शक्य आहे, हा आत्मविश्वास जागृत करतात. यासोबतच त्यांनी स्वतःला ‘सोशल’ जगात कुठेही मागे पडू दिलेले नाही. वयाची साठी उलटली असली तरी आजही तथाकथित तरुणाईच्या विविध कार्यक्रमांमध्ये मीरा आवर्जून जातात. त्यांचे विद्यार्थीही उत्साहाने त्यांना आमंत्रित करतात. आपल्या विद्यार्थ्यांविषयी सांगताना त्या म्हणतात की, “बर्याच कार्यक्रमांना माझ्या नातेवाईकांपेक्षा विद्यार्थीच पुढाकार घेऊन सर्व आयोजन करतात आणि माझ्यासाठी या घडीला यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता नाही.”
बहुभाषिकत्वाच्या काळात आपले अज्ञान मातृभाषेच्या बेगडी प्रेमामागे दडवून आयुष्य जगणे त्यांच्या संस्थेला मान्यच नाही. म्हणून जमेल त्या परीने मराठीत आणि गुजरातीतसुद्धा मीरा यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेसंदर्भातले मूलभूत धडे दिले. इंग्रजी शिकणे म्हणजे मराठीला किंवा इतर प्रादेशिक भाषांना कमी लेखणे नव्हे, असा प्रचारदेखील त्या समाजमाध्यमातून करत असतात. आता वयोपरत्वे शरीर साथ देत नसल्यामुळे मीरा यांनी हळहळू सामाजिक जीवनात वावरणे कमी केले आहे, पण शिकवण्याची जिद्द कायम असल्यामुळे त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य मात्र सुरू ठेवले आहे.
एका स्त्रीने घरच्या जबाबदार्या बंधन म्हणून नव्हे, तर आवड म्हणून निभावयाच्या असतात, असे सांगतानाच आज नातवंडांसोबत वावरत त्या तितक्याच ऊर्जेने इंग्रजी अध्यापनाचे कार्यसुद्धा करत आहेत. म्हणूनच त्यांच्या परिचयातले त्यांना ’मॅम’ नव्हे, तर ’मॉम’ असे संबोधतात. शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था आणि शिक्षकांची अनास्था यांच्या बातम्या पुढे येत असतानाच ‘मीरा मॅम’ची बनलेली ‘मीरा मॉम’ आणि त्यांच्यासारखे इतर अनेक प्रयोगशील शिक्षक आपले वेगळेपण कायमच जपत असतात. मीरा कोर्डे आणि त्यांच्यासारख्या शिक्षकांच्या प्रयत्नांना आणि जिद्दीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम.