भारतीय स्वातंत्र्यलढा साम्यवादाच्या लाल छायेतून मुक्त ठेवण्यात महात्मा गांधींनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करावेच लागेल. गांधींचे देश स्वतंत्र करण्यात जितके योगदान आहे, तितकीच देश घडविण्यात भूमिका आहे. भारत एक निरंकुश साम्यवादी राजसत्ता म्हणून आकारास येण्याऐवजी, एक मुक्त लोकशाही गणराज्याच्या रूपाने उदयास आला, याचे श्रेय महात्मा गांधींनादेखील आहेच.
स्वातंत्र्योत्तर भारतात संघप्रवाहाला झोडपण्यासाठीच गांधीवादाचा मुखवटा घालून डावे कार्यरत असतात. वैचारिकदृष्ट्या मार्क्सवाद्यांचा आणि गांधीजींचा सलोखा कधी नव्हताच. साम्यवाद कधीही भारतीय जनमानसावर वर्चस्व गाजवू शकला नाही. त्यामागील एक कारण म्हणजे भारतीय समाजात शत्रुत्वाच्या धारणा रुजविणे इतके सोपे काम नाही. दुसरी बाजू, साम्यवाद व साम्यवाद्यांच्या मर्यादा गांधीजींच्या लक्षात आल्या आणि त्यांनी त्या वेळोवेळी दाखवूनही दिल्या. गांधीवाद व साम्यवाद ही परस्परविरोधी दोन टोके आहेत. आधुनिक साम्यवादाचे प्रणेते कार्ल मार्क्सच्या आकलनात आणि महात्मा गांधींच्या चिंतनात मूलभूत फरक आढळतो. गांधी धनिकांना ‘गरिबांचे विश्वस्त’ मानीत तर दुसर्या बाजूला मार्क्स श्रीमंतांना समाजाचा शत्रूच मानतो. जमनालाल बजाज यांसारख्या मंडळींना प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर उदाहरणे प्रस्थापित करण्याविषयी गांधी प्रवृत्त करीत. गांधी हयात असताना त्यांचा मार्क्सच्या वैचारिक वारसदारांमध्ये प्रचंड संघर्ष झालेला दिसून येईल. हा संघर्ष जितका वैचारिक आहे, तितकाच तो प्रत्यक्ष कार्यक्रम व कृतीतही होत असे. ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीयांच्या राष्ट्रभावनेला बहरण्याची, अभिव्यक्त करण्याची संधी मिळत असे. कम्युनिस्टांना या राष्ट्रीय भावनेला कथित आंतरराष्ट्रीयवादात परावर्तित करायचे होते. भारतीय राष्ट्रवादाच्या भावनेला बटिक करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे, त्यांची वैफल्यग्रस्तता वेळोवेळी प्रकट होत असे.
अनेक दक्षिण आशियाई देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. त्या सर्वच देशांत ब्रिटिशांविरुद्ध जनआंदोलने सुरू असत. अशा चळवळींवर साम्यवाद्यांचा डोळा होता. १९१८च्या दरम्यान रशियात राज्यक्रांती झाली. कम्युनिस्ट राजवट अस्तित्वात आली. साम्यवाद्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार लोकशाहीचा आवाज दाबून टाकला. रशियावर साम्यवाद्यांचे एकछत्री साम्राज्य प्रस्थापित झाले होते. संपूर्ण जगातील श्रमिक, सर्वहारा वर्गाचे प्रश्न सारखे आहेत. प्रत्येक देशाचा वेगळा विचार करण्याची गरज नाही, अशी मार्क्सची वैचारिक मांडणी आहे. मार्क्सच्या मते जगातील सर्व प्रश्न सारखे आहेत, त्यांचे शत्रू सारखे आहेत. त्यामुळे मार्क्सवादी विचारपीठिकेत ‘कामगारांचा आंतरराष्ट्रीयवाद’ प्रमुख असतो. प्रत्येक देशाच्या राष्ट्रवादाची स्वतंत्र अभिव्यक्ती साम्यवाद्यांना मान्य नसते. साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करताना सगळ्या जगात ती लागू केली पाहिजे, असे प्रत्येक साम्यवादी वैचारिक स्वप्न रंगवत असतो. वस्तुतः प्रत्यक्ष सत्ताधारी झाल्यावर साम्यवाद्यांनी स्वतःची वैयक्तिक शक्ती वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याची आवश्यकता साम्यवाद्यांना वाटत होती. या प्रयत्नांचे तात्त्विक समर्थनही केले जात असे.
वस्तुतः रशियातील राज्यकर्त्यांना शक्तिशाली व्हायचे होते, हे विसरून चालणार नाही. शोषण, पिळवणूक जिथे असेल, तिथे साम्यवाद खूप लवकर फोफावतो. ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करत असलेल्या भारतात साम्यवादाला पोषक वातावरण होते. रशियात सत्ता हस्तगत केल्यामुळे साम्यवाद्यांकडे संसाधने भरपूर होती. रशियातील कॉम्निटर्नकडून भारतात मासिके, वृत्तपत्रे चालविण्यासाठी भारतातील साम्यवाद्यांना पैसेही पाठवले जात. डाव्यांना विदेशी फंडिंगची सवय तेव्हापासून आहे, असे म्हणायला हरकत नाही. अशा आकर्षक व प्रायोजित वैचारिक लढाईत स्वातंत्र्यसंग्रामाचा मुख्य प्रवाह गांधींमुळेच, डाव्यांपासून सुरक्षित राहू शकला. नेहरूंची वैचारिक बैठक पक्की करण्यात गांधींचे योगदान आहे. एम. आर. मसानी या साम्यवादी नेत्याने नेहरूंचे वर्णन, ‘हाफ ब्रिटिश जेंटलमन व हाफ कम्युनिस्ट’ असे केले होते. यावरून नेहरूंना साम्यवादाचे किती आकर्षण असेल, याचा अंदाज येतो. नेहरूंसोबत असलेल्या मैत्रीद्वारे साम्यवादी पक्षाला काँग्रेसशी संलग्न करण्याचे प्रयत्नही भरभरून करण्यात आले. नेहरूंचे यादरम्यान काही साम्यवादी नेत्यांशी पत्रव्यवहार झाले आहेत. एक साम्यवादी नेते वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी नेहरूंना वृत्तपत्र सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. वीरेंद्रनाथ १९२० साली मॉस्कोला जाऊन आले होते. वृत्तपत्रासाठी आवश्यक निधीची व्यवस्था विदेशातून केली जाऊ शकेल, असे वीरेंद्रनाथांनी नेहरूंना कळवले होते.
कॉम्नीटर्नचे पहिले भारतीय सदस्य, मानवेंद्रनाथ किंवा एम. एन. रॉय यांनी गांधीवादाचे वर्णन ‘समाजाच्या प्रतिक्रियेची एक वैफल्यग्रस्त आणि रोगट अभिव्यक्ती’ असे केले होते. शकुंतला यांनी गांधीजींच्या शिकवणीकडे ‘एक रोग म्हणून पाहिले पाहिजे, असे म्हटले आहे. रजनी पाम दत्त यांनी गांधीजींना ‘बुर्ज्वा वर्गाचे सौभाग्य’ म्हटले आहे. गांधीजींचा उपदेश जनतेच्या (ारीीशी) हिताच्या विरोधात असल्याचे दत्त म्हणत. स्टॅलिन तर गांधींना ‘साम्राज्यवाद्यांचे सहायक’ म्हणत असत. साम्यवाद्यांनी गांधींवर वैचारिक वादामुळे विखारी शब्दांत टीका केलेली नाही. साम्यवाद्यांसाठी महात्मा गांधी त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होते. मुंबई येथे १९३१च्या मार्चमध्ये मजुरांच्या एका सभेत गांधीजींनी भाषण केले. त्यात काही तरुण कम्युनिस्टांनी गोंधळ माजवला. त्यांना उद्देशून गांधीजी म्हणाले, ‘’तुम्ही स्वतःला साम्यवादी म्हणविता, पण तुम्ही साम्यवादी जीवन आचरीत आहात, असे दिसत नाही. ‘साम्यवादी ध्येयाचा उत्तम उदात्त अर्थ आहे; त्यास अनुसरून जीवन जगण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत असतो,’ असे तुम्हाला सांगावयाचे आहे. तुम्हाला जर राष्ट्राला आपल्या बरोबर न्यायचे असेल तर त्याच्याशी युक्तिवाद करून त्याच्यावर प्रभाव पाडण्यास तुम्ही समर्थ असले पाहिजे. हे काम तुम्हाला शक्तीने करता येणार नाही. राष्ट्राला आपल्या बाजूकडे वळविण्यासाठी तुम्ही विध्वंस करू शकाल; पण तुम्ही किती जणांचा विध्वंस कराल?" शेवटी गांधीजी त्यांना म्हणाले की, "तुम्ही शक्य तर काँग्रेसला आपल्या बाजूकडे वळवून घ्या आणि ती आपल्या कब्जात घ्या, असे मी तुम्हाला सांगतो. आपल्या मतांना पूर्ण वाचा फोडण्यास तुम्हाला मोकळीक आहे. जो कोणी सुसंगत रीतीने बोलेल, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची सहिष्णुता भारतात आहे." संबंधित घटनेचा अन्वयार्थ लावण्यास आपण सक्षम आहोत.
एम. आर. मसानी यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना मुंबई येथे केली. साम्यवादी पक्ष काँग्रेसशी संलग्न व्हावा, याकरिता अनेक कम्युनिस्टांनी प्रयत्न चालवले होते. अखेर काँग्रेसमधील समाजवाद्यांनी एकत्र येत, ‘काँग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना केली. नव्या समाजवादी पक्षाचा कार्यक्रम मसानी यांनी गांधीजींच्या विचारार्थ पाठविला होता. त्यावर गांधीजींनी १४ जून, १९३४ रोजी एक पत्र पाठविले. त्यात गांधीजींनी लिहिले आहे, "काँग्रेसमधील समाजवादी पक्षाच्या उदयाचे मी स्वागत करतो. मात्र, छापील पत्रकात जो कार्यक्रम दृष्टीस पडतो, तो मला आवडला, असे म्हणू शकत नाही. त्या कार्यक्रमात हिंदी परिस्थितीकडे कानाडोळा केल्याचे मला दिसते. वरिष्ठ वर्ग व बहुजन समाज यांच्यामध्ये, मजूर व भांडवलदार यांच्यामध्ये, वैरभाव अवश्य असतो आणि त्यामुळे ते परस्परांच्या कल्याणाचे काहीही काम करू शकणार नाहीत, असे एक गृहीत त्या कार्यक्रमातील पुष्कळ योजनांच्या बुडाशी असलेले दिसते. ते मला मान्य नाही.’
माणसाच्या चांगुलपणावर अविश्वास हा साम्यवादी विचारांचा पाया होता. आपला मालक नेहमी वाईट असतो, हे नोकराला पटविणे सोपे असते. स्वातंत्र्यपूर्व भारतात अनेक गिरण्या होत्या. मोठ्या प्रमाणावर मजुरी होती. वेठबिगारीचे प्रमाणही लक्षणीय होते. त्यामुळे स्वाभाविकच भारतात साम्यवादी चळवळ मूळ धरून फोफावण्यास पुरेसा वाव होता. दक्षिण आशियाचे अप्रत्यक्ष नेतृत्व भारत त्याकाळीही करीत असे. तसेच लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही भारत प्रमुख देश ठरतो. रशियासारख्या जागतिक महासत्तेला भारताची चळवळ स्वतःच्या दावणीला बांधलेली पाहणे कधीही शक्य झाले नाही, त्याला कारणीभूत गांधी होते. कम्युनिस्ट अफूच्या नशेत अराजकाचे व्याकरण अनेक देशांनी गिरवले. भारत मात्र त्याला अपवाद ठरला. तत्कालीन अनेक नावाजलेले राष्ट्रपुरुष अधून-मधून साम्यवादी नेत्यांचे व विचारांचे कौतुक करीत असत. गांधींना मात्र याबाबत सुरुवातीपासून स्फटिकाप्रमाणे स्पष्टता होती, असे म्हटले पाहिजे. गांधींच्या चिंतनात साम्यवादासंबंधी वैचारिक गोंधळ उडालेला कुठेच सापडत नाही. अलीकडल्या काळात हो ची मिन्ह या साम्यवादी नेत्याला विचारणा करण्यात आली होती की, भारताचे नेतृत्व कम्युनिस्ट का ताब्यात घेऊ शकले नाहीत, जसे त्यांनी व्हिएतनामसारख्या देशामधील चळवळी स्वतःच्या हातात घेतल्या? हो ची मिन्ह यांनी दिलेले उत्तर आजही विचार करायला लावणारे आहे. हो ची मिन्ह म्हणाले होते की, "तिथे भारतात गांधी होते, इथे मी गांधी होतो."