कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे

    19-Oct-2019
Total Views |



आगरी समाजाचे वर्चस्व असलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात दोन भूमिपुत्रांची लढत होणार आहे. २००९ साली डोंबिवलीसोबत कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा उदय झाला. त्यावेळी मनसेचे रमेश पाटील आणि शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र, या भागातील पहिले आमदार म्हणून मनसेचे रमेश पाटील विधानसभेवर निवडून गेले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष भोईर यांनी मनसेचे रमेश पाटील यांना पराभूत करीत या भागातील आमदारकीचा मान मिळवला. यंदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पाटील विरुद्ध म्हात्रे, असा सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून सेनेचे रमेश म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, तर मनसेने रमेश पाटील यांचे धाकटे बंधू व मनसे नेते प्रमोद (उर्फ)राजू पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त या भागातून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत, पण एकंदरीत या भागातील चित्र पाहता ही मनसे विरोधी शिवसेना अशी प्रमुख लढत मानली जाते.

 

भौगोलिकदृष्ट्या या मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागाचे एकत्रीकरण पाहावयास मिळते. मात्र असे असले तरी या भागात विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी प्रत्येकवेळी विविध उमेदवारांना संधी दिलेली आहे. कोणत्याही एकाच पक्षाच्या उमेदवारास मतदारांनी सातत्याने पसंती दर्शविलेली नाही. प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी कायम बदल पाहावयास मिळाला आहे. विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्या विरोधातील नाराजी लक्षात घेत शिवसेनेतर्फे यंदा रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हात्रे हे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेत सलग ४ वेळा नगरसेवकपद भूषविले आहे. याचबरोबर महापालिकेतील महत्त्वाची पदेही त्यांनी भूषवली आहेत. त्यामुळे आमदारकीच्या निवडणुकीसाठी त्यांना संधी देण्यात आली. म्हात्रे यांच्याविरोधात रिंगणात उतरलेले मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा या भागात दबदबा आहे.

 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना व भाजपची युती तुटल्याने या भागात मतांचे विभाजन झाले. त्यानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर येथील २७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर ही गावे वगळण्याचा मुदा कायमच २७ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून उचलण्यात आला. ही २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाली खरी, पण येथील गावामध्ये काही सुधारणा झाली नाही म्हणून येथील नागरिक त्रस्त आहेत.त्यामुळे या प्रश्नावर या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळेल. ग्रामीण भागातील रस्त्यांप्रमाणे शहरी भागातील रस्त्यांची झालेली वाताहत तसेच येथील पाण्याची समस्या ही भीषण आहे. येथील डम्पिंगची समस्या गंभीर विषय आहे. यामुळे विविध समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या या मतदारसंघातून जनता विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

- रोशनी खोत

अग्रलेख