स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019   
Total Views |
 



स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग दोघही महान क्रांतिकारक. भगतसिंग निरिश्वरवादी किंवा नास्तिक आणि सावरकरवादी हे हिंदुत्ववादी असले तरी दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता आणि वेळीवेळी दोघांनीही तो व्यक्त केला होता.

 

सावरकरांच्या भगतसिंगविषयीच्या भावना

लालाजी लजपतरायांना दंडुका मारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साँडर्सला लाहोरमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद ह्यांनी गोळ्या घातल्या. ही बातमी रत्नागिरीला पोहोचताच अनेक मित्रांना व तरूणांना सावरकरांनी आपल्या घरी बोलावून भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने या वृत्ताचे महत्त्व समजावून सांगितले व अशा प्रतिशोधाच्या (सूडाच्या) कृति घडतील तसतशी देशात जागृती होऊन स्वातंत्र्य जवळ जवळ येईल. त्यागी वीरवृत्तीची तरूणांनी जोपासना करून परकीय सत्तेच्या अन्यायास वीर भगतसिंगाप्रमाणे प्रतिकार केला पाहिजे. तरच देश पारतंत्र्यापासून मुक्त होईल असे सांगितले. (साळवी, आ. ग., स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात- भाग १, प्रकाशक- आ. ग. साळवी, १९७६, पृष्ठ ३१) सावरकर इथे भगतसिंगांचा उल्लेख वीरअसा करून त्यांच्या कृतीचे महत्त्व पटवून देत आहेत.

 

दि. २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली. ती बातमी ऐकून सावरकरांना अतोनात दु:ख झाले. पण रडत न बसता त्या फाशीचा सूड घ्यावा, असे त्यांनी आपल्या अंतस्थ गोटातील तरुणांना सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून ह्या तरुणांनी दुसऱ्या दिवशी पहाटे गावातून प्रभातफेरी काढून सावरकरांनी भगतसिंगांवर रचलेले गीत म्हटले आणि स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार केला. (सावरकर, शां. शि. तथा बाळाराव. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व), वीर सावरकर प्रकाशन, १९७२, पृष्ठ २४८) रत्नागिरीत सावरकरांच्या घरावर नेहमी भगवा ध्वज फडकत असे. २६ मार्चला सावरकरांनी घरावर काळा ध्वज लावून ह्या क्रांतिकारकत्रयींना दिलेल्या फाशीचा निषेध व्यक्त केला होता.

 

सावरकरांनी हुतात्मा भगतसिंगांवर रचलेले गीत:

हा भगतसिंग, हाय हाय!

जाशि आजी फाशि आम्हांस्तवचि वीरा, हाय हा!

राजगुरू तू हाय हा! राष्ट्रसमरी, वीर कुमरा, पडसि झुंजत हाय हा!

हाय हो, जयजय अहा

हाय हायची आजची, उद्यीकच्या जिंकी जया।।

राजुमुकुटा तो धरी

मृत्युच्या मुकुटाशी आधी बांधी जो जन निजशिरी

शस्त्र धरूंचि अम्हि स्वतः

धरूनि जें तू समरिं शत्रूंसि मरसि मारित मारता,

अधम तरि तो कोणता?

हेतुच्या तव वीरतेची जो न वंदिल शुद्धता।।

जा हुतात्म्यानों अहा

साक्ष ठेवुनि शपथ घेतो आम्ही उरलो ते पहा।।

शस्त्रसंगर चंड हा

झुंजवुनि की जिंकुची स्वातंत्र्यविजयासी पहा

हा भगतसिंग हाय हाः

 

५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यावरही ज्या सावरकरांच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाहीत, त्याच सावरकरांच्या डोळ्यातून हे भगतसिंगावरील काव्य रचताना अश्रू ओघळत होते अशी आठवण रत्नागिरीतील सावरकरांचे सहकारी नारायण सदाशिव बापट उपाख्य कवी उल्हास यांनी लिहून ठेवली आहे. (बापट, ना. स., स्मृतिपुष्पे, चारुचंद्र प्रकाशन, १९८४, पृष्ठ २७-२८) सावरकरांच्या मनात भगतसिंगांविषयी कशाप्रकारच्या भावना होत्या हे ह्यावरून लक्षात येईल तसेच इथे हेही लक्षात घ्यायला हवे की सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते व त्यांना राजकारणावर बोलण्यास, लिहिण्यास व भाग घेण्यास बंदी होती.

 

वासुदेव बळवंत गोगटे सावरकरांना रत्नागिरीत मे १९३० ला प्रत्यक्ष भेटायला गेले होते. गोगटेंनी विचारले, ''आम्ही तरुणांनी काय करावे? कोणत्या मार्गाने देशसेवा करावी?'' त्यावर सावरकर म्हणाले,''आपण कोण व्हायचे, तात्यासाहेब केळकर यांच्याप्रमाणे संपादक व्हायचे की भगतसिंग, राजगुरुप्रमाणे हुतात्मा व्हायचे हे प्रथम मनाशी निश्चित करा. माझे मत विचाराल तर संपादक होण्यापेक्षा भगतसिंगाच्या मार्गाने जाण्याने देशात फार मोठ्या प्रमाणावर जागृती होईल. वधस्तंभावरून केलेल्या 'वंदे मातरम' च्या गर्जनेने होणारी राजकीय जागृती दहा कांग्रेस अधिवेशनापेक्षा जास्त प्रभावी ठरते.’’ पुढे गोगटे स्पष्टपणे हे मान्य करतात की ह्या संभाषणाचा ठसा त्यांच्या अंत:करणावर कायमचा कोरला गेला व आपणही फडके, चाफेकर, कान्हेरे, सावरकर, भगातसिंग, राजगुरू ह्या क्रांतिकारकांचे अनुकरण करून आत्मार्पण करावे असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. (हॉटसन-गोगटे आत्मवृत्त: वासुदेव बळवंत गोगटे, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन, १९७२, पृष्ठ १८- १९) नंतर दि. २२ जुलै १९३१ रोजी पुण्याच्या फर्गयुसन महाविद्यालयात ह्याच वा. ब. गोगटेंनी हॉटसनवर गोळी झाडली होती.

 

१९३७ ला विनाअट मुक्तता झाल्यावर त्यांच्या सत्कारप्रसंगी, मिरवणूक प्रसंगी सावरकरांच्या प्रोत्साहनाने हुतात्मा चाफेकर बंधू, कान्हेरे, भगतसिंग, राजगुरू आदी सशस्त्र क्रांतिकारकांचा जयजयकार करण्यात येत असे. ह्यामधून स्वदेश स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करणाऱ्या ह्या महान क्रांतिकारकांचा ह्या देशाला कधी विसर पडू नये म्हणून सावरकर सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. १९३८ ला पंजाब दौऱ्यात वार्ताहर परिषदेसाठी जाताना त्यांनी वाटेत उतरून भगतसिंग, राजगुरू प्रभृतींनी जेथे साँडर्सचा वध केला त्या पवित्र स्थानाचे आवर्जून दर्शन घेतले होते.

 

भगतसिंगांच्या सावरकरांविषयीच्या भावना

'मतवाला' या नियतकालिकाच्या १५ व २२ नोव्हेंबर १९२४ च्या अंकात भगतसिंगांचा "विश्वप्रेम" शीर्षकाचा लेख दोन वेळा प्रसिद्ध झाला आहे. त्यात सावरकरांविषयी भगतसिंग म्हणतात, "विश्वप्रेमी तो वीर आहे, ज्याला भीषण क्रांतिकारक, कट्टर अराज्यवादी म्हणायला आम्ही लोक जरादेखील लाजत नाही- तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरुन येऊन गवतावर चालता चालता कोवळे गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना, म्हणून ते थांबत." (शहीद भगतसिंग समग्र वाडमय, संपादक- दत्ता देसाई, मनोविकास प्रकाशन, पुणे, २०१७, पृष्ठ ४०१) भगतसिंग इथे सावरकरांना "वीर सावरकर" संबोधत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. वरील विधानावरून असे दिसून येते की भगतसिंगांना सावरकर क्रांतिकारक, विश्वप्रेमी व कोमल ह्रदयी वाटत होते. १९४४ ला कॉनवे येथे भरलेल्या जागतिक बंधुभाव संस्थेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सावरकरांची निवड झाली होती. पण दुर्दैवाने ते ह्या परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. ह्या अधिवेशनाला पाठविलेल्या संदेशात सावरकर म्हणतात, ''पृथ्वी ही आमची खरी मातृभूमी आहे. मानव जात आमचे राष्ट्र आहे आणि समान अधिकार, समान कर्तव्ये यांच्यावर अधिष्ठित असलेले अखिल मानवी सरकार हेच आमचे अंतिम साध्य असले पाहिजे. '' (कीर, धनंजय. अनुवाद: द पां खांबेटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, तिसरी आवृत्ती, २००९, पृष्ठ २८२-२८३) म्हणजे भगतसिंगांना सावरकर जसे वाटत होते तसेच सावरकर विश्वप्रेमी होते. केवळ तात्कालिक उपाय म्हणून सावरकरांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता.

 

मार्च १९२८ मध्ये 'किरती' या नियतकालिकात भगतसिंग मदनलाल धिंग्रा आणि सावरकरांवर लिहितात, "असे म्हणतात की, श्री. सावरकर आणि मदनलाल ढींगरा एके रात्री बराच वेळ सल्लामसलत करत राहिले. देशासाठी आपला प्राणदेखील देण्याची त्यांची हिंमत आजमावण्यासाठी सावरकरांनी त्यांची परीक्षा घेतली. त्यांनी मदनलालना जमिनीवर हात ठेवायला लावून त्यांच्या हातात दाभण खुपसला, पण या पंजाबी वीराने हूं की चूं केले नाही. दाभण काढण्यात आले. दोघांचे डोळे अश्रूंनी भरुन आले. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडले. आहा, तो क्षण किती सुंदर होता! ते अश्रू किती अनमोल आणि अलभ्य होते! ते मीलन किती सुंदर, किती महान होते! सांसारिक रहाटगाडग्यात अडकलेले व मृत्यूच्या विचारालादेखील घाबरणारे भ्याड लोक आपण, आपल्याला काय समजणार की देशासाठी, राष्ट्रासाठी प्राण पणाला लावणारे ते लोक किती महान, किती पवित्र आणि किती पूजनीय असतात". (शहीद भगतसिंग समग्र वाडमय, पृष्ठ ६९) भगतसिंग इथे सावरकर व धिंग्रांच्या देशभक्तीचा मुक्तकंठाने गौरव करून त्यांना पूजनीय म्हणत आहेत.
 

१९३० आणि १९३१ ला भगतसिंग तुरुंगात असताना एकूण १०७ लेखकांची आवडलेली विधाने त्यांनी आपल्या बंदीवासातील दैनंदिनी (जेल डायरी) मध्ये लिहून ठेवली आहेत. त्यात केवळ सात भारतीय लेखक असून त्यातील एकमेव सावरकरच असे आहेत की त्यांची एकापेक्षा अधिक विधाने भगतसिंगांनी आपल्या दैनंदिनीत समाविष्ट केली आहेत. ती सहाच्या सहा विधाने 'हिंदुपदपादशाही' या एकाच ग्रंथातील आहेत. ती पुढीलप्रमाणे:

 

१. "जो त्याग प्रत्यक्ष अथवा दुरान्वयाने का होईना यश मिळवण्यासाठी रास्तपणे अपरिहार्य असेल, तरच तो कौतुकास्पद होतो. परंतु जो त्याग अंतिमत: यशात परिणत होत नाही, तो अत्मघातकी असतो आणि म्हणून त्याला मराठ्यांच्या युद्धतंत्रात अजिबात स्थान नव्हते. [हिंदुपदपातशाही, पृष्ठ २५]

 

२. या मराठ्यांशी लढणे म्हणजे वाऱ्याशी लढणे, पाण्यावर रेघा काढणे. [हिंदुपदपातशाही, पृष्ठ २५८]

 

३. . .इतिहास न घडवता इतिहास लिहिणे हे आपल्या युगाचे दु:ख आहे. शौर्यकृत्ये न घडवता, अंगी धाडस नसताना व ते जीवनात प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळत नसताना शौर्यगाथा गाणे हे आपले दु:ख आहे. [हिंदुपदपातशाही, पृष्ठ २५६-६६]

 

४. . . . राजकीय गुलामगिरीच्या बेड्या काही वेळा सहज झुगारून देता येतात आणि तोडता येतात. परंतु सांस्कृतिक वर्चस्वाच्या बेड्या तोडणे अवघड असते. [हिंदुपदपातशाही, पृष्ठ २७२-७३]

 

५. जा, स्वातंत्र्या, ज्याचे स्मित नित्यनूतन आम्हासाठी जा, सांग त्या आक्रमकांना, मूर्खांना तुझ्या मंदिरापाशी एक युग रक्त वाहणे अधिक मधुर आम्हासाठी एखादा क्षणही शृंखलांमध्ये झोपून राहण्यापेक्षा (थॉमस मूर) [हिंदुपदपातशाही] (शहीद भगतसिंग समग्र वाडमय, पृष्ठ ४४०)

 

६."धर्मांतरित होण्यापेक्षा मारले जाणे बेहत्तर" ही घोषणा त्याकाळी हिंदूंमध्ये प्रचलित होती; पण यावर रामदास उभे ठाकले आणि निग्रहाने म्हणाले,"नाही, हे बरोबर नाही. धर्मांतरित होण्यापेक्षा मारले जाणे चांगले हे बोलणे फारच चांगले आहे; पण मारलेही जाऊ नका अणि धर्मांतरितही होऊ नका, तर उलट स्वत: हिंसाचारी शक्तींना मारून टाका. त्यासाठी प्रयत्न करणे हे त्याहीपेक्षा चांगले आहे. अणि यात जर मरण येणारच असेल तर मारले जा; पण विजयासाठी मारता मारता मारले जा- न्यायाला विजयी करण्यासाठी मरा." [हिंदुपदपातशाही, पृष्ठ १८१-१८२] (शहीद भगतसिंग समग्र वाडमय, पृष्ठ ५०७) ह्यावरून भगतसिंगांचा सावरकर वाडमयाचा, विचाराचा अभ्यास दिसून येते.

 

९ मे १९३० ला बाबाराव सावरकरांच्या घराची व श्रद्धानंदच्या छापखान्याची पोलिसांनी झडती घेतली तेव्हा भगतसिंग यांनी दोन खंडात छापलेल्या सावरकरलिखित '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' ह्या ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराच्या चार प्रती सापडल्या अशी नोंद डी. हीली यांनी आर. एल. मॅकडोनाल्डना ९ मे १९३० ला पाठवलेल्या पत्रात सापडते. १९२८-२९ ह्या काळात प्र्काशित झालेल्या ह्या आवृत्तीची छपाई लाहोरमध्ये झाली होती व कोलकत्याचे भट्टाचार्य ह्यांचे प्रकाशक म्हणून नाव छापले होते. (फडके, य. दि., शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, द्वितीय आवृत्ती, २०००, पृष्ठ ११८) ह्याच्या प्रती भारतभर विकल्या जात होत्या. मुंबईच्या एम्पायर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींचे तर असेही म्हणणे होते की, आपण हे पुस्तक शंभरशंभर रुपयांस विकत असू. श्रीपाद शंकर नवरे यांनी तर सांगितले की, गुप्तपणे आमच्याकडे आलेल्या प्रती आम्ही विकत असू, वाचीत असू, आणि त्यामधून मिळालेला निधी भगतसिंगांकडे पाठवीत असू, त्याच आवृत्तीवरून नंतर मराठी भाषांतर करण्यात आले होते.
 

भगतसिंगांनी सावरकरांच्या हिंदुत्वावर आक्षेप घेतलेला कुठेही दिसून येत नाही. सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्यावरही भगतसिंगांनी आक्षेप घेतला नव्हता, तसेच सावरकर रत्नागिरीत राजकारणात भाग न घेण्याच्या अटी मान्य करून स्थानबद्ध आहेत ह्यावरही भगतसिंगांनी कधी टीका केली नव्हती, कारण भगतसिंग हेही एक क्रांतिकारक असल्याने शत्रूशी खेळल्या जाणाऱ्या खेळी, डावपेच त्यांना ज्ञात होते.

 

फाशी झालेल्या बहुतांश क्रांतिकारकांनी क्षमा मागितली नाही पण सावरकरांनी मात्र क्षमा मागितली असा आरोप केला जातो. फाशी म्हणजे मृत्युदिन ठरलेला असतो, ते हौतात्म्य असते. अशा फाशीतून इतर तरुणांना क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती, जशी चाफेकर बंधूंच्या फाशीतून सावरकरांनी प्रेरणा घेतली होती. पण जन्मठेप म्हणजे वर्षानुवर्षे कारावासात खितपत पडणे. उपयुक्ततावादी सावरकरांच्या दृष्टीकोनातून अशा कारावासात जीवन कंठण्याने ना राष्ट्रहित साधते ना तरुणांना देशभक्तीची विशेष प्रेरणा मिळते. म्हणून सावरकर अंदमानातील सहबंद्यांना स्वकीयांशी द्रोह न करता, काही अटी मान्य करून अंदमानातून बाहेर पडून, पुन्हा राष्ट्रकार्य करण्याचा सल्ला देत होते तर वासुदेव बळवंत गोगटेंना भगतसिंगांच्या हौतात्म्याची परिणामकारकता सांगून क्रांतिकारक घडवत होते.

 

सावरकर आणि भगतसिंग हे दोघेही महान देशभक्त व क्रांतिकारक होते, दोघांचा स्वातंत्रसंपादनाचा मार्ग हाही एकच होता. स्वतंत्र भारताची उभारणी इहवाद, मानवता, समानता ह्या तत्त्वांवर व्हावी ह्याविषयी दोघांचे जवळजवळ एकमत होते. म्हणजे त्यांचे विचार परस्परविरोधी मूळीच नव्हते. उलट बहुतांश विचारात साम्य होते. काही विचारात भिन्नता असेलही, कदाचित परस्परविरोधीही असतील, पण म्हणून त्यामुळे ते एकमेकांचे शत्रू होत नाहीत, त्यांच्या एकमेकांविषयीच्या लिखाणात तर असे शत्रूत्व, एकमेकांच्या विचारांवर प्रखर टीका दिसून येत नाही. उलट एकमेकांविषयी आदर, गौरव आणि प्रशंसाच दिसून येते.
 

@@AUTHORINFO_V1@@