मुंबई : "जनतेची कामे करणारे आपले सरकार पुन्हा बहुमताने निवडून देण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान करा," असे आवाहन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या भाजप -शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते आणि उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजवर तुम्ही योजना रखडवणारी काँग्रेसची सरकारे पाहिली आहेत आणि गेली पाच वर्षे आमचे काम करणारे सरकार पाहिले आहे. काँग्रेसने सतत केवळ भ्रष्टाचार केला, लोकांची काही कामे केली नाहीत. आम्ही लोकांच्या हिताच्या योजना वेगाने राबविल्या आहेत. खरेतर आम्ही राबवित असलेले सर्व मोठे पायाभूत प्रकल्प हे काँग्रेसच्या काळात प्रस्तावित होते. मुंबईतील मेट्रो प्रकल्प १९९७ साली प्रस्तावित होता, तर नवी मुंबई प्रकल्पसुद्धा १९९७ साली प्रस्तावित होता. मात्र, मधल्या काळात काँग्रेस सरकारने हे प्रकल्प दाबून ठेवले. मुंबईत २०१३ मध्ये केवळ एकच मेट्रो लाईन सुरू झाली. आमचे सरकार येताच आम्ही अत्यंत वेगाने ही कामे पूर्ण करत आहोत. मुंबईतील बहुसंख्य मेट्रो लाईनचे जाळे येणार्या दोन वर्षांत वापरात येणार आहे," असे मोदींनी संगितले.
"सामान्य माणसाचे जीवन सुखी, सहज व्हावे म्हणून आपल्या सरकारच्या प्रत्येक योजना आखलेल्या आहेत," असे सांगून मोदी म्हणाले की, "रियल इस्टेट माफिया विरुद्ध सामान्य माणसाला काही संरक्षण नव्हते. ते आम्ही कायदा करून दिले आहे. विरोधक म्हणतात ते थकले आहेत, पण आम्ही असे आहोत की, ठरलेली कामे केल्याशिवाय थकत नाही, थांबत नाही आणि झुकणे तर आम्हाला पसंतच नाही." "आमचे प्रत्येक काम सामान्य माणसाचे जीवन सोपे करते," असे सांगून मोदी म्हणाले की, "आम्ही सामान्य माणसाला घरे देत आहोत, गॅस देत आहोत, वीज आणि पाणी देत आहोत आणि शौचालयेसुद्धा देत आहोत. त्याचबरोबर पाच लाखांपर्यंतचे उपचार देत आहोत. आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आणि राजकारण हे राष्ट्रसेवेचे साधन आहे," असे त्यांनी सांगितले.
"काँग्रेसने वर्षानुवर्षे ३७० सांभाळले. जेव्हा आम्ही हटवले तेव्हा काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसने नेहमी शत्रूंची साथ दिली आहे," असे ते म्हणाले. "जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा त्याचे कर्तेकरविते देशाबाहेर सहजपणे पळून गेले. ते तसे पळाले, हे आता उघड होत आहे. कारण याच मंडळींचे त्यांच्याशी मिरचीचे व्यापार आहेत. जेव्हा देशात बॉम्बस्फोट झाले, तेव्हा शत्रू देशातील दहशतवाद्यांनी त्याची जबाबदारी घेतली मात्र, काँग्रेसने नेहमी त्यांची पाठराखण करून ते दहशतवादी या घटनांमध्ये नाहीत, असे सांगितले," असा आरोप त्यांनी केला.
एकही बेईमान कायद्याच्या तडाख्यातून सुटणार नाही!
"देशात भ्रष्टाचार करणारा कोणीही सुटणार नाही, गेल्या पाच वर्षांत तुम्ही फक्त झलक पाहिलीत," असं सांगून मोदी म्हणाले की, "यापुढे या विषयात बरंच काही घडलेलं तुम्हाला दिसेल. एकही बेईमान कायद्याच्या तडाख्यातून सुटणार नाही आणि एकही इमानदार व्यक्तीला त्रास होणार नाही," असे मोदी म्हणाले.