मुंबई (प्रतिनिधी) - फुलपाखरांच्या रंगीबेरंगी विश्वाची ओळख करून देण्यासाठी ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) आणि ’वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) शनिवार व रविवारी ‘फुलपाखरू महोत्सवा’चे आयोजन केले होते. या महोत्सवाला निसर्गप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दि. १९ आणि २० ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ’बीएनएचएस’च्या गोरेगाव चित्रनगरीतील 'संवर्धन आणि शिक्षण केंद्रा'त हा महोत्सव पार पडले. यावेळी फुलपाखरू भम्रंतीबरोबरच लघुपट प्रदर्शन, चित्रकला आणि हस्तकला स्पर्धा घेण्यात येतील.
गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्य ३३ एकर जागेवर ’बीएनएचएस’ संस्थेचे 'निसर्ग आणि संवर्धन केंद्र' वसले आहे. या केंद्राचा परिसर चारही बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे विविध प्रजातींच्या पशुुपक्ष्यांसाठी ही जागा नंदनवन ठरली आहे. विशेष म्हणजे फुलपाखरांना बागडण्यासाठी या ठिकाणी फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे १५० प्रजातींच्या विविधरंगी फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे. फुलपाखरांची ही रंगीत जत्रा पाहण्यासाठी ’बीएनएचएस’ आणि ’डब्ल्यूडब्ल्यूएफ’ या संस्थेकडून शनिवार आणि रविवारी फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धन क्षेत्रात नावलौकिक असलेली ’डब्ल्यूडब्ल्यूएफ’ ही संस्था महाराष्ट्रात निसर्ग शिक्षणाकरिता नानाविध उपक्रमांचे आयोजन करते. याच उपक्रमाअंतर्गत मुंबईत फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.