धर्म : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि महात्मा गांधींचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019   
Total Views |




सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी व स्वातंत्र्यवीर सावरकरांना परस्परांचे विरोधक म्हणूनच ओळखले जाते, किंवा जनतेच्या मनात तशीच प्रतिमा निर्माण केल्याचे-झाल्याचेही पाहायला मिळते. परंतु, गांधी व सावरकर हे दोन्हीही महापुरुष एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या धर्मविषयक विचारांत साम्यही आढळते. दोघांनाही हिंदू धर्माचा पराकोटीचा अभिमान वाटे आणि दोघेही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, अस्पृश्यता आदींच्या विरोधातच होते.

 

भारतात अनेक महापुरुष जन्माला आले; ज्यांनी कालपटलावर आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवून इतिहास रचला. २० व्या शतकातील पहिल्या तीन-चार दशकांत या देशात एकाचवेळी अनेक महापुरुष कर्तृत्व गाजवत होते. त्यातीलच दोन महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी. दोघेही राजकारण व समाजकारण या क्षेत्राशी निगडित, दोघांचेही स्वातंत्र्यलढ्यातील स्थान महत्त्वपूर्ण, दोघेही समकालीन पण, स्वातंत्र्य मिळवण्याचे दोघांचेही मार्ग भिन्न. त्यासंबंधींचे दोघांचे विचारही भिन्न व कधी-कधी विरुद्धही! गांधींनी त्यांच्या ‘हिंद स्वराज्य’ पुस्तकामध्ये ‘मारो काटो का पंथ’ म्हणून जी टीका केली आहे, ती लंडनमधील सावरकर आणि त्यांच्या प्रभावळीला उद्देशूनच केली आहे असे म्हणतात; तर सावरकरांनी गांधींवर टीका करणारे अनेक लेख लिहिले आहेत की, जे ’गांधीगोंधळ’ यात पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत. पण याच दोन महापुरुषांचे काही मुद्द्यांवर विशेषत: ‘धर्म’ विषयावरील त्यांची मते समान दिसून येतात. या दोन महापुरुषांमधील काही समान बिंदू शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

 

खरा सनातन धर्म कोणता?


महात्मा गांधी : ’सनातन’ हा शब्द मी त्याच्या स्वाभाविक अर्थानुसार वापरतो. मी स्वत:ला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेतो. हिंदू धर्माचे ग्रंथ मी मानतो. म्हणून काही, त्यातला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक श्लोक ईश्वराकडून स्फुरलेला आहे, असे मानण्याची मला आवश्यकता वाटत नाही. यावरील कोणतेही भाष्य, ते कितीही विद्वत्तापूर्ण असले तरी ते जर बुद्धीविरोधी व नैतिक भावनांना रुचणारे नसेल, तर ते मी कदापि मानणार नाही. हिंदू धर्मग्रंथांची योग्य मीमांसा, आजचे शंकराचार्य अथवा शास्त्रीमंडळीच करू शकतात, असा जर त्यांचा दावा असेल, तर तो मला बिलकुल मान्य नाही.

 

मी शब्दप्रामाण्यवादी नाही. म्हणून मी जगातील विविध धर्मग्रंथांच्या भावना व मर्म समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. या धर्मग्रंथांनीच त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी लावलेल्या सत्य-अहिंसेच्या कसोटीवर मी त्यांना कसतो. त्या कसोटीला जे उतरत नाही, ते मी अग्राह्य मानतो आणि जे कसोटीला उतरते त्या सर्वांचा मी स्वीकार करतो.

 

हिंदू धर्म हा केवळ काही गोष्टी खाण्यात किंवा न खाण्यात सीमित नाही. त्याचा मूळ गाभा उचित आचरण, अहिंसा आणि सत्याचे योग्य पालन हा आहे. (यंग इंडिया : ६ ऑक्टोबर १९११, २७ ऑगस्ट १९२५, ८ एप्रिल १९२६) (संकलन-संपादन-कानिटकर, वि. ग., धर्म : महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, अस्मिता प्रकाशन, २०००, पृष्ठ ७-८)

 

स्वातंत्र्यवीर सावरकर : नुसते हा सनातनी आणि तो सुधारक असे ओरडत राहण्यात काही अर्थ नाही. आम्ही स्वत:स सनातन धर्माचे अभिमानी समजतो आणि कित्येक सनातनी आपल्या आचरणाने, पुष्कळ सुधारणांस उचलून धरताना आढळतात. यास्तव आम्ही सनातन धर्म या शब्दास काय अर्थी योजतो, ते थोडक्यात सांगणार आहोत.

 

‘धर्म’ याचा मूळचा व्यापक अर्थ ‘नियम.’ कोणत्याही वस्तूचे-त्याच्या अस्तित्वाचे व व्यवहाराचे जो धारण, नियमन करतो, तो त्या वस्तूचा धर्म. सृष्टीचे धर्म, पाण्याचा धर्म, अग्नीचे धर्म. याच व्यापक अर्थाने पारलौकिक आणि पारमार्थिक गोष्टींच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागले. मग ते नियम प्रत्यक्षात असोत वा नसोत.

 

जे जे सृष्टीनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात आलेली आहेत, त्यास आम्ही सनातन धर्म म्हणतो. प्रकाश, उष्णता, गती, गणित, ध्वनी, विद्युत, चुंबक, रेडियम, शरीरवैद्यक, यंत्र, शिल्प यांचे जे नियम आज ज्ञात आहेत, तो खरा सनातन धर्म होय. हे नियम आर्यांसाठी वा अनार्यांसाठी, मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी व इस्रायलींसाठी समान लागू आहेत.

 

जी माहिती नि नियम मनुष्यजातीच्या हाती आज असलेल्या यच्चयावत् धर्मग्रंथातून दिलेले आढळतात, त्यातील एकासही सनातन धर्म, अपरिवर्तनीय, निश्चित सिद्धांत असे म्हणता येत नाही. निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमाप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितींचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांच्या कसोटीस मुळीच उतरलेले नाही. त्यांची सारी भिस्त बोलूनचालून एकट्या शब्दप्रामाण्यावर, आप्तवाक्यावर, विशिष्ट व्यक्तींच्या आंतर अनुभूतीवर अवलंबून असते. त्यातही फारसे बिघडले नसते. कारण काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण, आप्तवाक्य, हेही एक प्रमाण आहेच आहे. पण केवळ या प्रमाणाच्या कसोटीस देखील या धर्मग्रंथातील पारलौकिक विधान लवलेशही उतरत नाही.

 

प्रश्न उरला मनुष्यामनुष्यामधील शिष्टाचाराचा. परिस्थितीभेद झाला की, हे निर्बंध बदलणेच इष्ट आहे. यामुळे मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रीती, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की, नाहीत याच कसोटीने ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत. परिस्थितीनुसार परिवर्तिले पाहिजेत. असे मानवी व्यवहार सनातन असणेच शक्य नाही. (किर्लोस्कर : १९३४ ते १९३७, सावरकरांचे सामाजिक विचार : पृष्ठ ४१ ते ५२) (कानिटकर, पृष्ठ ८ ते १०)

 

सावरकर आणि गांधी दोघेही स्वत:ला ‘सनातनी’ म्हणवून घ्यायला मुळीच कचरत नाहीत. दोघेही शब्दप्रामाण्यवादी नाहीत. कारण गांधी म्हणतात, ”या धर्मग्रंथांनीच त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी लावलेल्या सत्य-अहिंसेच्या कसोटीवर मी त्यांना कसतो. त्या कसोटीला जे उतरत नाही, ते मी अग्राह्य मानतो आणि जे कसोटीला उतरते, त्या सर्वांचा मी स्वीकार करतो.” तर सावरकर म्हणतात, ”त्यांची सारी भिस्त बोलूनचालून एकट्या शब्दप्रामाण्यावर, आप्तवाक्यावर, विशिष्ट व्यक्तींच्या आंतर अनुभूतीवर अवलंबून असते. त्यातही फारसे बिघडले नसते. कारण काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण, आप्तवाक्य, हेही एक प्रमाण आहेच आहे. पण केवळ या प्रमाणाच्या कसोटीसदेखील या धर्मग्रंथातील पारलौकिक विधान लवलेशही उतरत नाही...

 

जे सृष्टीनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होते... मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रीती, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठा कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत.” सावरकर आणि गांधी दोघेही धर्मग्रंथ जशास तसे स्वीकारत नाहीत, शब्दप्रामाण्य नाकारतात. फरक इतकाच आहे की गांधी सत्य व अहिंसेची कसोटी लावतात तर सावरकर विज्ञाननिष्ठेची कसोटी लावतात. सावरकर हे ‘तर्ककठोर बुद्धीवादी’ म्हणून तर गांधी ’आतला आवाज’साठी परिचित आहेत. पण येथे गांधी धर्मग्रंथांवरील भाष्याच्या बाबतीत काहीसा बुद्धीवादी दृष्टिकोन स्वीकारताना दिसतात; म्हणून गांधी, ’कोणतेही भाष्य, ते कितीही विद्वत्तापूर्ण असले तरी ते जर बुद्धीविरोधी व नैतिक भावनांना रुचणारे नसेल, तर ते मी कदापि मानणार नाही,’ असे म्हणतात. ’माझा धर्म पोटात नाही, हृदयात आहे किंवा धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नव्हे’ हे सावरकरांचे विधान आणिहिंदू धर्म हा केवळ काही गोष्टी खाण्यात किंवा न खाण्यात सीमित नाही’ या गांधींच्या विधानात फारसा फरक नाही.

 

एकच धर्मग्रंथ नकोत

महात्मा गांधी : अभ्यासांती मला असे आढळून आले आहे की, मला माहीत असलेल्या सर्व धर्मांमध्ये हिंदू धर्म हा अत्यंत सहिष्णू धर्म आहे. त्यात विशिष्ट मतप्रणालीचा आग्रह नाही, यामुळे आपल्या अनुयायांच्या आत्माविष्काराला तो अधिकाधिक वाव देतो, या गोष्टीचे मला जबरदस्त आकर्षण आहे. इतर कोणत्याही धर्मात जे सार विहित आहे, ते सर्व हिंदू धर्मात सामावलेले आहे आणि त्यात जे समाविष्ट केलेले नाही, ते सारे गौण व अनावश्यक आहे. (यंग इंडिया, १७ सप्टेंबर १९२५, २० ऑक्टोबर १९२७) (कानिटकर वि. ग., पृष्ठ १०)

 

स्वातंत्र्यवीर सावरकर : एक धर्मपुस्तक नाही, हेच चांगले. कारण, यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्त्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठ्यात सामावू शकणार नाही. या विश्वाच्या दोन पुठ्ठ्यांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे, तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. (१९३७, सावरकर, शां. शि. तथा बाळाराव. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू महासभापर्व भाग १, वीर सावरकर प्रकाशन, १९७५, पृष्ठ ३७)

 

काही झाले तरी बुद्धीवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदू धर्म होय! (१९३५, समग्र सावरकर वाङ्मय-खंड ३, संपादक- शं. रा. दाते, समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदूसभा प्रकाशन, १९६३-१९६५, पृष्ठ ५७२)

 

हिंदू धर्म हा असा धर्म आहे की, ज्याला एकच किंवा एकमेव धर्मग्रंथ नाही. विशिष्ट मतप्रणालीचा किंवा तत्त्वप्रणालीचा आग्रह नाही. हिंदू धर्माच्या या वेगळेपणावर दोघांचेही एकमत आहे. हिंदू धर्माला एकच एक धर्मग्रंथ नाही, याचा दोघांनाही आनंद आहे. आस्तिकही हिंदू असू शकतो व नास्तिकही हिंदू असू शकतो.

 

गांधी म्हणतात, “हिंदू धर्म आपल्या अनुयायांच्या आत्माविष्काराला अधिकाधिक वाव देतो.” तर सावरकर म्हणतात, “एक धर्मपुस्तक नाही, हेच चांगले. कारण, यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही.” म्हणजे हिंदू धर्म हा परिवर्तनीय, विकासाला अनुकूल, कालसुसंगत आहे, यावर जवळजवळ दोघांचे एकमत आहे. सावरकर म्हणतात “काही झाले तरी बुद्धीवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदू धर्म होय!” तर गांधी म्हणतात, “इतर कोणत्याही धर्मात जे सार विहित आहे, ते सर्व हिंदू धर्मात सामावलेले आहे आणि त्यात जे समाविष्ट केलेले नाही, ते सारे गौण व अनावश्यक आहे.” म्हणजे जगात हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, यावर गांधी व सावरकरांचे एकमत आहे.

 

हिंदू धर्म आणि अस्पृश्यता

महात्मा गांधी : मला हिंदू धर्मातील अस्पृश्यतेशी कधीही जुळवून घेता आले नाही, अस्पृश्यता ही मी सदैव बांडगुळासारखीच मानली. अस्पृश्यता ही बुद्धीला मुळीच न पटणारी आणि दया, करुणा आणि प्रेम या उपजत भावनांच्या विरोधी आहे. जर हिंदूंनी आपल्या दिव्य धर्माला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक कायमचा मिटवला नाही, तर ते स्वातंत्र्याला योग्य समजले जाणार नाहीत व त्यांना कधी स्वातंत्र्य मिळणार नाही.

 

अस्पृश्यता ही एक पुरातन संस्था आहे; परंतु ते महापाप आहे. ते केवळ पुरातन आहे म्हणून त्याचे समर्थन होऊ शकत नाही. (यंग इंडिया : ६ ऑक्टोबर १९२१, २९ जुलै १९२६) (कानिटकर वि. ग., पृष्ठ १२) अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नव्हे, ती सैतानी करामत आहे. धर्मशास्त्राच्या ग्रंथांचे स्थान कधीच बुद्धी आणि सत्य यांच्या वरचे असू शकत नाही. (कानिटकर, पृष्ठ १३-१४)

 

स्वातंत्र्यवीर सावरकर : जन्मजात अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही. सामाजिक क्रांतीस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करून जाती-जातीतील विषमता आधी नष्ट केली पाहिजे. (समग्र सावरकर वाङ्मय-खंड ३, पृष्ठ ६४१)

 

आमच्या सात कोटी धर्मबंधूंना निष्कारण पशुहूनही ‘अस्पृश्य’ लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे, तर आपल्या स्वत:च्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय, म्हणून ती निघाली (उच्चाटन झाले) पाहिजे... त्या रूढीपासून हिंदू समाजाचा आंशिक लाभ जरी होत असता, तरीही आम्ही तिच्याविरुद्ध तितक्याच प्रखरपणे खटपट केली असती... तो मनुष्याविरुद्ध एक अत्यंत गर्ह असा अपराध आहे. (समग्र सावरकर वाङ्मय-खंड ३, पृष्ठ ४८३)

 

अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे, त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. जन्मजात अस्पृश्यता गेल्याविना देश स्वतंत्र होऊन उपयोग नाही, असे दोघांचेही स्पष्ट मत होते. कारण सावरकर म्हणतात तसे, “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही.” गांधीही हीच भावना व्यक्त करताना म्हणतात की, “हिंदूंनी आपल्या दिव्य धर्माला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक, कायमचा मिटवला नाही, तर ते स्वातंत्र्याला योग्य समजले जाणार नाहीत व त्यांना कधी स्वातंत्र्य मिळणार नाही.” गांधींना अस्पृश्यता ही बुद्धीला मुळीच न पटणारी आणि दया, करुणा आणि प्रेम या उपजत भावनांच्या विरोधी आहे, असे वाटत होते तर तशीच भावना सावरकरांची होती.

 

सावरकरांना अस्पृश्यता हा मनुष्याविरुद्धचा एक अत्यंत गर्ह असा अपराध वाटत होता. तसेच आपल्या स्वत:च्या आत्म्याचाही घोर अपमान वाटत होता. अस्पृश्यता विषयावर दोघांच्याही भावना इतक्या तीव्र होत्या आणि वेळोवेळी त्यांनी त्या व्यक्तही केल्या होत्या. समाजसुधारणेमागील दोघांचाही दृष्टिकोन मानवतावादी होता. सहभोजन, मंदिरप्रवेश, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या मुलांना शाळेत एकत्र बसवणे, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांसह घरोघरी दसरा व संक्रांतीला सोने व तिळगूळ वाटप (जेणेकरून स्पर्शबंदीची बेडी मोडेल), बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेला पूर्वास्पृश्यांचा बँड (जेणेकरून व्यवसायबंदीची बेडी मोडेल), १९२९ पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवातील भंगीबुवांचे कीर्तन, महिलांची प्रकट भाषणे असे अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी यशस्वी केले.

 

१९३३ ला रत्नागिरीत अखिल हिंदू उपाहारगृह काढले, जेथे पूर्वास्पृश्य पदार्थवाटपाचे काम करत व सावरकर त्यांना भेटायला येणार्या व्यक्तीस आधी उपाहारगृहात जाऊन चहा पिऊन येण्याची अट घालत. (जेणेकरून रोटीबंदीची बेडी मोडेल) १९३१ ला सर्व हिंदूंना खुले व ज्याच्या न्यासावर पूर्वास्पृश्यांसह सर्व जातींचे पुढारी असतील असे ‘पतितपावन मंदिर’ सावरकरांच्या प्रेरणेने व भागोजी कीर यांच्या आर्थिक पाठबळामुळे सुरू झाले. तसेच गांधींनीही हरिजन वस्तीत जाऊन केलेली कामे, आपल्या भाषणातूनही आणि लेखनातूनही त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी खूप मोठे कार्य केले होते.

 

वेद

त्यावेळी गायत्री मंत्र नि वेदमंत्र हे अधिकार ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते. त्यावरून त्यावेळी काही दशके आधी महाराष्ट्रात वेदोक्त प्रकरण गाजले होते. अशावेळी सावरकर आणि गांधी या दोघांनी ही एकाधिकारशाही स्पष्टपणे नाकारली. अखिल हिंदू गणेशोत्सवात एका भंगी हिंदूने गायत्री मंत्र नि वेदमंत्र म्हटले होते, यासाठी सावरकरांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा या प्रकरणाचे निनाद लंडनच्या काही वृत्तपत्रांमधूनही घुमले होते. (धनंजय कीर, अनुवाद : द. पां. खांबेटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, तिसरी आवृत्ती, २००९, पृष्ठ १९६) गांधी म्हणायचे, “शुद्राला वेद शिकण्याबाबत मनाई करणे मला स्वत:ला कधीही मान्य होणार नाही. ज्ञान म्हणजे कोणा एका वर्गाची वा वर्णाची मिरासदारी वा हक्क नव्हे.” (कानिटकर वि. ग., पृष्ठ १३) वेद म्हणावेत की म्हणू नयेत हा मुद्दा नसून ते विशिष्ट वर्गापुरते मर्यादित ठेऊन एकाधिकारशाही जपणे या वृत्तीला सावरकर व गांधींचा विरोध होता.

 

सावरकर व गांधी-समान बिंदू का?

 

एकंदरीत सावरकर व गांधी यांच्या समान बिंदूंचा विचार का करायचा? दोघेही महापुरुष होते. पण, दोघांचे स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग वेगळे होते. काही बाबतीत त्यांचे एकमत होते, तर बर्‍याच बाबतीत एकमेकांचे विचार व मार्ग वेगळे नव्हे, तर परस्परविरोधी होते. मग असे असताना ओढून-ताणून या दोन परस्परविरोधी महापुरुषांचे समान बिंदू का शोधायचे, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे साधे उत्तर असे की ओढून-ताणून नव्हे तर जिथे या दोन महापुरुषांचे विचार सारखे वाटत असतील ते मांडले आहेत. तसेच समान बिंदू शोधण्याचा आग्रह हा केवळ समाजहितासाठी व राष्ट्रहितासाठी आहे.

 

गांधी व सावरकरांचे राजकीय विचार भिन्न असल्यामुळे दोन्ही महापुरुषांचे भक्त, अनुयायी, समर्थक हे आपल्या महापुरुषाची रेष मोठी दाखविण्यासाठी दुसर्‍याची रेष किती लहान आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. सावरकरांना मोठं दाखविण्यासाठी गांधीद्वेषाची किंवा गांधींना लहान दाखविण्याची आवश्यकता नसते, तसेच गांधींना मोठे दाखविण्यासाठी सावरकरद्वेषाची किंवा सावरकरांना लहान दाखविण्याची आवश्यकता नसते. दोघेही आपापल्या जागी मोठे आहेत व दोघांचेही स्वातंत्र्यलढ्यात व समाजसुधारणेतील योगदान फार मोठे आहे.

 

दोन महापुरुष समकालीन असतील व त्यात त्यांचे बहुतांश विचार परस्परविरोधी असतील तर त्यांच्या समर्थकांकडून, अनुयायांकडून किंवा भक्तांकडून एकमेकांवर दोषारोप सुरू होतात. याचे कारण इतिहासाचा अभ्यास करून त्याचे मूलभूत आकलन अंधभक्तीमुळे शक्य होत नाही. तटस्थता, डोळस श्रद्धा, चिकित्सक वृत्ती, संयमी-संयत-संतुलित विवेचन हे सर्व गुण लोप पावत चालले आहेत. त्यामुळे समाजस्वास्थ्यावर विपरित परिणाम होऊन पर्यायाने राष्ट्रावरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. समाजस्वास्थ्यासाठी आवश्यकता असते ती एकतेची आणि या एकतेसाठी अशी एकमेकांवर आगपाखड करून, दोषारोप करून उपयोगाचे नाही. एकता निर्माण करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे महापुरुषांविषयीचा अभिमान. महापुरुषांविषयी आपल्या मनात आदरभाव असतो, आत्मीयता असते. या महापुरुषांवर कोणी टीका केल्यास माणूस साहजिकच उद्विग्न होतो. अर्थात उद्विग्न होणे चूक नाही, पण त्या उद्विग्नतेची परिणती हिंसा, धमक्या, मॉब लिंचिंगमध्ये होणे हे निषेधार्ह असून गुन्हा आहे. अशावेळी ती उद्विग्नता अभ्यास करून विचारांचा प्रतिवाद विचारांनी पण संयत, संयमी भाषेत करण्याकडे वळवणे आवश्यक आहे.

 

लेखक वि. ग. कानिटकरांनी यासंबंधी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कानिटकर म्हणतात, ”म. गांधींचे बहुसंख्य चाहते स्वा. सावरकरांचे विचार अस्पर्श मानतात व स्वा. सावरकरांचे भक्त, मूळ गांधी-विचार बहुधा वाचत नाहीत. परस्परांच्या खंडन-मंडनातून जो काय त्यांच्या विचारांचा बोध होतो, तेवढाच त्यांना माहीत असतो.” (कानिटकर, मनोगत) म्हणून अभ्यासकाने नेहमी मूळ संपूर्ण विचार वाचायला हवेत. मग त्यातून तटस्थ वृत्तीने जे काही मांडायचे आहे, ते मांडावे पण ते ससंदर्भ. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी प्रचलित केलेला शब्द म्हणजे ’विचारकलह’; पण विचारकलहाचे वैयक्तिक कलहात रुपांतर होऊ नये याची काळजी लेखक व वाचक दोघांनी घ्यायला हवी. हे तारतम्य बाळगल्यास एक निरोगी चर्चा झाल्यास सर्वांच्या ज्ञानात भर पडून त्यातून भविष्यात काहीतरी समाजहिताचे, राष्ट्रहिताचे कार्य घडावे हीच सदिच्छा. म्हणून महापुरुषांमधील समान बिंदूंचा शोध घेऊन जनतेसमोर ते आणणे समाजस्वास्थासाठी आवश्यक आहे.


@@AUTHORINFO_V1@@