भारत सर्वात जवळचा व महत्त्वाचा मित्र

    05-Jan-2019
Total Views |



अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांचं वक्तव्य


नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमध्ये भारताकडून उभारण्यात येणार्‍या ग्रंथालयाची खिल्ली उडवल्याने अफगाणिस्तानने त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानने ट्रम्प यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त करत भारताला आपला सर्वात जवळचा व महत्त्वाचा मित्र असल्याचे म्हटले. अफगाणिस्तानच्या विकासात भारताचे बहुमोल योगदान आहे, अशा शब्दांत अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीनंतर मत व्यक्त केले. दरम्यान, अफगाणिस्तानने व्यक्त केलेल्या मनोगतामुळे भारताने शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठी तयार केलेली रणनिती यशस्वी झाल्याचे म्हणता येते.

 

हमदुल्लाह मोहीब आणि अजित डोव्हाल यांनी दिल्ली नुकतीच एकमेकांची भेट घेतली. यावेळी मोहीब यांनी डोव्हाल यांच्यासमोर आपली बाजू मांडली. या बैठकीला अनेक अंगाने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण याच बैठकीत मोहीब यांनी, माझ्या देशात शांतता प्रस्थापित करण्यात भारताचे सर्वाधिक योगदान आहे. अफगाणिस्तानच्या आर्थिक विकास आणि पुनर्उभारणीतही भारताचे बहुमोल साहाय्य मिळत आहे, अशा शब्दांत भारतीय मदतीला नावाजले. सोबतच या बैठकीत दोन्ही अधिकार्‍यांनी अफगाणिस्तानची सुरक्षा, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यावरही चर्चा केली.

 

अजित डोवाल यांनी या बैठकीबद्दल सांगितले की, भारत अफगाणिस्तानमध्ये शांतीस्थापना आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर यापुढेही सहकार्य देत राहिले. भारत इथे कितीतरी मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. त्याचबरोबर अफगाणी नागरिकांच्या आवश्यकतेनुसार सामुदायिक विकास कार्यक्रमांनाही लागू करण्यात येत आहे. याप्रकारचे सहकार्य देशाला आर्थिक रुपाने समृद्ध आणि स्थिर ठेवण्यासाठी सुरुच राहिली, असेही ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/