आपल्या देशात ‘उडान योजना’ यशस्वी होत आहे. ‘उडान’ म्हणजे ‘Ude Desh ka Aam Nagarik’ ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल २०१७ मध्ये आणली. ज्यामध्ये सर्व राज्यांतील सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या खर्चात हवाईमार्गाने प्रवास करता येईल. या उडान योजनेखाली १३ महिन्यांत १०० विमानतळे (सरकारी व खाजगी) जोडण्याची किमया साधली आहे. नव्या व जुन्या विमानतळांना जोडणाऱ्या उडान योजनेखाली दोन पर्वात एकूण ३०० विमानसेवा सुरू झाल्या आहेत. उडानचे लवकरच तिसरे पर्व सुरू होणार आहे. शिवाय सागरी विमानसेवा, हेलिकॉप्टर व स्वयंचलित हवाई सेवेच्या योजना पण कार्यान्वित होणार आहेत. या देशातील अशा विमान योजनांमुळे २०१८ सालात सुमारे १४ कोटी लोकांनी (१८.६ टक्क्यांची वाढ) विमानप्रवास केला. डिसेंबर २०१८ महिन्यात १.३ कोटी लोकांनी प्रवास केला. २०१७ मध्ये ११.७ कोटी लोकांनी प्रवास केला होता. ‘एअर इंडिया’ व ‘जेट एअरवेज’ विमान कंपन्या संकटात सापडलेल्या असताना व इतर अनेक समस्यांना तोंड देऊनसुद्धा ही वाढ झाली आहे. एअर आशिया, विस्तारा, इंडिगो, गो-एअर, स्पाईसजेट, घोडावत, अलायेन्स, टर्बो, हेरिटेज, झूम, ट्रुजेट, अॅव्हिएशन, अंदमान, मेघा, झेक्सस या इतर विमान कंपन्या आहेत.
२५ जानेवारी, २०१९ ला ‘उडान पर्व ३’मध्ये आणखी २३५ विमान सेवांची मागणी केली आहे. १६ विमानतळे आतापर्यंत न वापरलेली, १७ अंशत: वापरलेली व सागरी विमानांकरिता सहा जल विमानतळे अशी ३९ नवीन विमानतळे यासाठी वापरली जाणार आहेत. यातून पहिल्या पर्वात १३ लाख, दुसऱ्या पर्वात २९ लाख व तिसऱ्या पर्वात ६९.३ लाख बसण्याच्या जागांची सोय केलेली असेल व तिसऱ्या पर्वाच्या प्रकल्पाचा खर्च सुमारे १,१६७ कोटी रुपये होईल. २३५ विमानमार्गातील ४६ मार्ग पर्यटक प्रवाशांसाठी असतील. उडानचे वैशिष्ट्य म्हणजे ५० टक्के जागा कमी खर्चात (अंतरावर अवलंबून) पुढील दहा वर्षांकरिता ठेवणार आहेत. उर्वरित ५० टक्के नेहमीच्या दरात असतील. अंबाला, फैझाबाद, गाझीपूर, हाशीमारा, कोटा इत्यादी शहरांकरिता प्रथमच विमान सेवा उपलब्ध होणार आहे. ईशान्येकडील राज्यातील गौहत्ती, शिलाँग, लिलाबारी, तेझपूर, पासीघाट इत्यादी स्थाने असतील. ३१ हेलिपॅड वा हेलिपोर्टमधून हेलिकॉप्टर सेवा ही ईशान्येकडील राज्ये, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप अशा विशेष क्षेत्रांकरिता उपलब्ध केलेली असेल. भारतातील ‘रोहिणी’ नावाचे पहिले हेलिपोर्ट दिल्लीला उभे राहणार आहे, ज्याद्वारे ‘हेलिकॉप्टर रुग्णसेवा’ सुरू होईल.
सागरी विमानांकरिता पुढील सहा ते आठ महिन्यांत आसाममधील गौहत्ती नदी व उमरंगसो जलाशय, तेलंगणमधील नागार्जुन सागर धरण आणि गुजरातमधील साबरमती नदी, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि शत्रूंजय धरण, महाराष्ट्रातील चिपी अशी जल विमानतळे असतील. या सागरी विमानांसाठी ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व आसाम अशा पाच राज्यांत सागरी विमान सेवेच्या योजना तयार होत आहेत. जगातील स्थानिक प्रवासीवहनाच्या तुलनेमध्ये अमेरिकेची १४ टक्के, चीनची ९ टक्के व भारताची सध्या १.४ टक्के वाढ होत आहे. परंतु, सर्व देशांच्या तुलनेत स्थानिक प्रवाशांमध्ये दुहेरी अंकांची वाढ फक्त चीन, भारत व रशियामध्येच होत आहे. सध्या प्रवाशांच्या हिशोबात भारत हे जगातील सातवे राष्ट्र गणले जाते व २०२४ पर्यंत ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मंडळाने (IATA) अंदाज वर्तवला आहे. २०३७ सालापर्यंत जगातील नवीन ५७.२ कोटी प्रवाशांपैकी भारताचे ४१.४ कोटी प्रवासी असतील. विमान सेवेच्या प्रगतीचा वेग मोठा आहे व २०४० मध्ये भारताच्या ११२.४ कोटी विमानप्रवाशांपैकी स्थानिक प्रवासी ८२.१ कोटी असतील, असा अंदाज वर्तवलेला आहे.
सिक्कीमच्या पहिल्या पाकयांगविमानतळाचे उद्घाटन
पाकयांग विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, “आमच्या प्रशासनाच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी पहिल्यांदाच विमान व रेल्वे सेवा पोहोचली आहे. कित्येक ठिकाणी प्रथमच वीजपुरवठा केलेला आहे. चारपट मोठे राष्ट्रीय महामार्ग उभारले जात आहेत. गावागावांमध्ये रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहेत. नद्यांवर व रेल्वेवर मोठ-मोठे पूल उभारले जात आहेत. अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू झाली आहेत. याशिवाय ‘अंकीय भारत’ (Digital India) योजनेचा विस्तार होत आहे.”
पाकयांग विमानतळाची वैशिष्ट्ये
सर्व सुखसोईने युक्त असे विमानतळ समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर आहे. डोंगराळ भागातील अभियांत्रिकी कामाकरिता इटलीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या विमानतळ प्रकल्पाकरिता ६०५.६९ कोटी रुपये खर्च झाला आहे. सिक्कीमच्या गंगटोकपासून हे विमानतळ ३० किमी अंतरावर वसले आहे.
इतर उडान सेवा
शिर्डी - वर्षभरापूर्वी मुंबई, दिल्ली, हैदराबादमधून व ६ जानेवारीपासून बेंगळुरू, जयपूर, अहमदाबाद, भोपाळपासून सेवा सुरू झाली आहे. रोज शिर्डीकरिता आता २० उड्डाणे होत आहेत. आतापर्यंत सव्वा लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. रोज दिल्लीतून दोन, मुंबईतून दोन, तर हैदराबादहून सहा विमानांची उड्डाणे होत आहेत. स्पाईसजेट या प्रवासी विमान कंपनीने सर्वाधिक उड्डाणे करून धार्मिक पर्यटन स्थळांचा व्यवसाय कंपनीकडे खेचला आहे. शिर्डीला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लाखांच्या घरात आहे. रात्रीची उड्डाणे सुरू झाल्यावर या संख्येत भर पडेल. देशभरातील सर्व मोठी शहरे शिर्डीला जोडली जातील, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सांगितले आहे.
नाशिक - मुंबई-नाशिक व पुणे-नाशिक मार्ग ‘एअर डेक्कन’ कंपनीच्यावतीने केंद्र सरकारने उडान योजनेतून सुरू केला होता. परंतु, या दोन शहरातील हवाई अंतर १५० किमीहून कमी असल्याने या दोन्ही मार्गांकरिता उडानचा लाभ देता येणार नाही, असे एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया यांनी सांगितले. म्हणून हे दोन्ही मार्ग महाग होणार आहेत. नाशिक ते अहमदाबाद सेवा चालू होणार आहे. नाशिक ते दिल्ली सेवा सुरू झाली आहे. भविष्यात भोपाळ, प्रयाग, वाराणसी येथे नाशिकहून सेवा सुरू होणार आहे. दारूची राजधानी असलेल्या नाशिकमधील ओझर विमानतळ २०२० मध्ये भारतातील गर्दीच्या विमानतळांपैकी एक असेल असे काहींचे म्हणणे आहे.
पुणे - ‘एअर डेक्कन’ची सेवा नाशिक, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी शहरांकरिता आहे. दुसऱ्या विमानतळाच्या जागी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनण्यासाठीचे अडसर दूर होत आहेत.
महाराष्ट्रात जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी शहरे उडान योजनेत आणून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. नागपूर विमानतळावर प्रवाशांची गर्दी तिप्पट झाली आहे. तसेच झारखंडमधील देवघर व अरुणाचल प्रदेशातील पासीघाट, कर्नाटकातील हंपी, उत्तराखंडातील पिठोरगड, हिमाचल प्रदेशातील सिमला विमानतळे सुरू होणार आहेत.
स्वयंचलित हवाई वाहने
देशात आता कायद्याने नवीन वर्षापासून स्वयंचलित विमाने फिरू शकतील. या यंत्रणेचा (Drone) वापर रेल्वे, खाण उद्योग, जंगल खाते, शेती, लष्कर, अग्निशमन, उंच इमारती वा पूल बांधणे, ड्रोनच्या साहाय्याने भौगोलिक सर्वेक्षण, टेहळणी आणि मनोरंजनाकरिता देखाव्यांची चित्रे घेणे यासाठी होऊ शकतो. भारतात या क्षेत्राने भरारी घेतली असून २०२१ सालापर्यंत याची उलाढाल सहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
ड्रोन चालविणे हे कौशल्याचे काम आहे. त्याकरिता प्रशिक्षणाची जरुरी आहे. तरीपण ड्रोनच्या माध्यमातून व्हर्च्युअल रिअॅलिटी चित्रीकरणाची सुविधा निर्माण होऊ शकते.
ड्रोनच्या मशीनचे तीन प्रकार होतात - फिक्स्ड विंग, सिंगल रोटर व मल्टिरोटर. काही ड्रोन्सना रिमोट कंट्रोल असतो. रेंजवरून पडणारे तीन प्रकार - जवळची रेंज तीन मैलापर्यंत, शॉर्ट रेंज ३० मैलापर्यंत व मध्यम रेंज ९० मैलापर्यंत. आकाराप्रमाणे चार प्रकार - १. नॅनो ५० सेमी, २. छोटे दोन सेमीहून लहान, ३. मध्यम यात दोन माणसे बसू शकतात व ४. मोठे. हे विमानाच्या आकाराचे असते.
भारत सरकारने याच्या वापराकरिता नियमावली तयार केली आहे. अशा तर्हेने भारतात विमानसेवेचे युग सुरू झाले आहे. कोणताही देश हवाई क्षेत्रात पुढे आला, तर त्या देशाची भरभराट लवकर व नक्की होते, हे इतर देशांच्या अनुभवावरून समजू शकते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/