कथा एका ध्येयसाधनेची : अविरत आरोग्यसेवेचा वसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019   
Total Views |


 


वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून स्वस्तात उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न बाळगून ४ जानेवारी, १९६६ रोजी ‘विवेकानंद रुग्णालय’हे रोपटं लावलं आणि सुरू झाला एक अखंड सेवायज्ञ!


जेव्हा एखाद्या देशाची जडणघडण होत असते तेव्हा उत्तम शिक्षण, आर्थिक आणि तांत्रिक उन्नती याप्रमाणेच ‘उत्तम आरोग्यसेवा’ हेदेखील राज्यकर्त्यांचे उद्दिष्ट असायला हवे. परंतु, आरोग्यक्षेत्रात मूलभूत सोयी नाहीत अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. अतिशय महाग आरोग्यसेवांमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडून जाते. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं होऊन गेली तरी, कितीतरी खेडोपाडी मूलभूत आरोग्यसेवा मिळण्यास अडचण येते. अशा कठीण परिस्थितीतही सरकारी कृपेची वाट न बघता स्वतः मैदानात उतरून काम करणाऱ्या आमटे, बंग, कोल्हे कुटुंबीयांनी आरोग्यक्षेत्रात उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे. याच माळेत शोभावं असं काम मराठवाड्यासारख्या आरोग्य सुविधांचा अभाव असणाऱ्या भागात जाऊन उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यांची ध्येयनिष्ठा डॉ. अशोक कुकडे यांनी प्रस्तुत पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहे.

 

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे ध्येय

 

अशोक कुकडे हे पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचे मोठे झाले.अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या कुकडे यांनी एमबीबीएसची पदवी विद्यापीठात प्रथम येत मिळवली. इंटर्नशिपसाठी मिरजसारख्या निमशहरी पण, आरोग्य सेवेसाठी अतिशय नावाजल्या शहरातील मिशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्यांची भेट भूलतज्ज्ञ डॉ. रामभाऊ अलुरकर यांच्याशी झाली. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मनावर असल्यामुळे आपोआपच सामाजिक भावना जोपासली गेलेली. त्यात अलुरकर यांच्याशी शहरापासून दूरच्या ठिकाणी आरोग्य सेवेच्या आवश्यकतेबद्दल विचार विनिमय होत असे.मिशन हॉस्पिटलमध्ये ज्या उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवेकडे लक्ष दिलं जात होतं, त्या प्रकारच काम ग्रामीण भागात करण्याच्या दृष्टीने मनात विचार पक्के होत गेले. रा. स्व. संघाचे विभाग प्रचारक असणाऱ्या सुरेशराव केतकर यांच्याकडून मराठवाड्यातल्या आरोग्य सेवेच्या निकडीबद्दल त्यांना कळलं. मूळचे लातूरचे असणारे संघ स्वयंसेवक डॉ. गोपीकिशन भराडिया यांच्याकडून लातूरच्या आरोग्यसोयींच्या अडचणींबद्दल माहिती मिळाल्यावर त्याच ठिकाणी वैद्यकीय सेवेची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय पक्का झाला. वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून स्वस्तात उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न बाळगून ४ जानेवारी, १९६६ रोजी ‘विवेकानंद रुग्णालय’हे रोपटं लावलं आणि सुरू झाला एक अखंड सेवायज्ञ! या ठिकाणी फक्त वैद्यकीय सेवा देणे एवढेच काम नसून हॉस्पिटलच्या जागेची सोय, उपकरणांची जमवाजमव, आर्थिक जुळवाजुळव अशा अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या.

 

आरोग्यसेवा आणि संघकार्य यांचे अद्वैत

 

नुकतेच लग्न झालेले असूनही कुकडे पती-पत्नी आणि डॉ. अलुरकर व त्यांच्या पत्नी यांनी १२ खोल्यांच्या एका घरात संसार आणि दवाखाना एकत्र सुरू चालू ठेवला. सुरुवातीच्याच काळात आलेल्या काही अवघड केसेस आपल्या कौशल्याच्या बळावर पार पडल्या आणि आपल्या सहृदय वागणुकीमुळे परिसरामध्ये या रुग्णालयाविषयी विश्वास निर्माण केला. हे रोपटं बाळसं धरू लागलं. रुग्णालयाशी संबंधित सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते.‘संघानुकूल जीवनपद्धती’ हे संघ कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य असतं. आपलं काम हे संघकाम सुरळीत चालू राहील या दृष्टीने नियोजित करणे म्हणजेसंघानुकूल जीवनपद्धती’. विवेकानंद रुग्णालयाचा एवढा मोठा पसारा असूनही डॉ. कुकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते काम सांभाळून संघकार्यदेखील तितक्याच निष्ठेने चालू ठेवले हे पुस्तक वाचताना लक्षात येते. संघाकडे बघण्याच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे इतर अनेक ठिकाणप्रमाणेच लातूरलाही या डॉक्टर मंडळींना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, रुग्णसेवा हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे याचे कधीही न सुटणारे भान आणि ‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है’ ही संघाची शिकवण यामुळे काँग्रेससारख्या वैचारिक विरोधकांचा विश्वास मिळवण्यातही हे रुग्णालय यशस्वी ठरले. शिवराज पाटलांसारखा काँग्रेसचा मोठा नेते प्रथमपासूनच रुग्णालयाशी जोडला गेला होता. वाढत गेलेल्या संघकार्याच्या जाळ्याचा उपयोग पुढे किल्लारी भूकंपाच्या वेळी झाला.

 

अन्य कामांमध्येही पुढाकार

 

हे सर्व करत असताना पसारा वाढत असताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होतील याची प्रथम व्यवस्था करून स्वतः कमी पगार घेण्याचा पायंडाही संचालक मंडळाने पाडला. यामुळे रुग्णालयातील कर्मचारी सदैव सहकार्य करत राहिले. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे कामही पूर्णत्वास नेऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल याची सोय केली. भविष्यात कामगार युनियन निर्माण झाल्यानंतर जेव्हा काही कसोटीचे प्रसंग आले तेव्हाही डॉ. कुकडेंनी कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने घेतलेल्या काळजीची जाणीव करून दिल्यावर कर्मचाऱ्यांना आपली चूक कळली आणि कटुता टळली. रुग्णालयातर्फे लातूरपासून दूर असणाऱ्या गावांमध्ये नियमितपणे आरोग्य शिबिरे सुरू केली.रक्तपेढी, ब्लड ट्रान्स्फ्युजन अशा अतिशय महत्त्वाच्या पण, लातूरला तेव्हा उपलब्ध नसणाऱ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. अशा कामांमधून रुग्णालयाच्या कामाचा परीघ विस्तारत राहिला.

 

उत्तम नियोजन व व्यवस्थापन

 

विवेकानंद रुग्णालयाच्या कारकिर्दीतल्या दोन सर्वात महत्त्वाच्या कामगिऱ्या या आपल्या रुग्णालयाची नियमित पठडी सोडून केलेल्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे, १९७२च्या भीषण दुष्काळात रुग्णांवर अतिशय नगण्य किंमतीत उपचार केले. लातूरला आयटीआय मध्ये शिकणाऱ्या १०० मुलांच्या रोजच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करून त्यांचे शिक्षण अडथळ्याशिवाय पूर्ण होईल याची काळजी घेतली. रुग्णालयातर्फे अतिशय महत्त्वाचं आणि देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून वाखाणलं गेलेलं कार्य म्हणजे, १९९२च्या किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी केलेलं सेवाकार्य. लातूर शहरात झालेल्या भूकंपावरून किल्लारीला अधिक मोठ्या प्रमाणात भूकंप झाला असणार असा कयास बांधून, प्रशासन अथवा अन्य कुणाहीकडून कुठलीही सूचना आलेली नसताना स्वयंप्रेरणेने आणि संघाच्या शिस्तीने प्रत्यक्ष भूकंपस्थानी प्रशासनाच्या अगोदरच विवेकानंद रुग्णालयाची मदत पोहोचली. युद्धपातळीवर शस्त्रक्रिया आणि अन्य उपचार केले गेले. विवेकानंद रुग्णालयाने स्वतःला उपचारांपुरते मर्यादित न ठेवता उद्ध्वस्त झालेल्या रेबेचिंचोली गावाचे पुनर्वसन, अनाथ झालेल्या मुलांसाठी आधी शेड आणि त्यानंतर कायमस्वरूपी खोल्यांमधून शिक्षणाची व्यवस्था करणे, मानसिक आघात झालेल्या रुग्णांचा मनस्थितीचा अभ्यास व त्यांना उभारी देणे अशा अनेक प्रकारचं कार्य केलं. पुस्तक वाचताना जाणवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास ५० वर्षं एवढं व्यापक काम करत असताना कुकडे, अलूरकर, भराडिया या संस्थापकांनी दाखवलेला कमालीचा समजूतदारपणा. एकत्र काम करताना भांड्याला भांडं लागणारच. परंतु, मतभेदांचं रूपांतर मनभेदांमध्ये न होऊ देता आपल्यासमोरचं उद्दिष्ट काय आहे, याची सतत जाणीव जागी ठेवल्यास कार्यसिद्धी किती प्रभावीपणे होऊ शकते हेच यातून दिसून येतं. एक डॉक्टर, संघाचा कार्यकर्ता म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून काय काय योगदान देऊ शकतो, याचा विचार रुग्णालयाशी संबंधित सर्वजण सतत करत असल्याचं जाणवत राहतं.

 

सेवाकार्याचे दस्तावेजीकरण

 

संघविचारातून देशभरामध्ये एक लाखांहून अधिक सेवाकार्ये चालत असताना त्यात काम करणाऱ्या निरलस कार्यकर्त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता न केल्यामुळे उर्वरित खूप मोठ्या समाजाला अशा सेवाकार्यांची माहिती झालेली नाही. खरंतर असं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक असतं. प्रस्तुत पुस्तकामधून अशाच एका प्रेरणादायी सेवाप्रकल्पाची तपशिलाने नोंद केल्याबद्दल डॉ. अशोक कुकडे यांचे आभार मानायला हवेत. रुग्णालयाकडून घडलेल्या पुनर्वसन व बचावकार्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थिनीला प्रोत्साहन दिलं गेलं आणि तिच्याकडून त्यासंदर्भात प्रबंध सादर केला गेला. यामुळे या कामाचं उत्तम दस्तावेजीकरण झालं. विवेकानंद रुग्णालयाचा एक रोल मॉडेल म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल इतकी क्षमता या पुस्तकामध्ये आहे. डॉ. अभय बंग यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून आरोग्य सेवेच्या स्थितीबद्दल मांडलेले विचार मननीय आहेत. पुस्तकात रुग्णालयाच्या जडणघडणीबद्दल जे तपशील मांडले गेले आहेत त्याहून अधिक कार्य डॉ. अशोक कुकडे यांनी त्यानंतरच्या काळात केले आहे. २०१६ सालच्या दुष्काळात जनकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी लातूर भागामध्ये केलेलं जलसंधारणाचं काम खूप मोठं आहे. त्यामुळे वर्षानुवर्षं लातूरला भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर तोडगा निघायला मदत झाली. याकार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये समाविष्ट व्हायला हवी अथवा त्यावर एक वेगळं पुस्तक यायला हवं अशी सूचना यानिमित्ताने करावीशी वाटते. कुठल्याही वृथा अभिनिवेश नसलेले, सर्वसहकाऱ्यांचे योगदान अतिशय खुल्या मनाने मांडणारे हाडाच्या कार्यकर्त्याचे हे आत्मकथन समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, यावरचा विश्वास दृढ करणारे आहे.

 

लेखक : डॉक्टर अशोक कुकडे

प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

पृष्ठसंख्या : २३१

आवृत्ती : चौथी (२८ फेब्रुवारी, २०१६)

किंमत : ३०० रुपये.

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@