कष्टाने व्यवसायाला सुगंधित करणाऱ्या उद्योजकाची गोष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019   
Total Views |



 
 

आपल्या आईची स्मृती आपल्यासोबत कायम राहावी म्हणून संजयने अगरबत्तीचा आपला पहिला ब्रॅण्ड तयार केला. त्यास आपल्या आईचं, ‘साऊ’ हे नाव दिलं. बाजारपेठेत असलेली विश्वासार्हता आणि पत यामुळे संजय चव्हाण यांच्या उत्पादनाला पहिल्या दिवसापासूनच मागणी येऊ लागली. अवघ्या अडीच महिन्यात ‘विएना परफ्युमरी वर्क्स’ने २७ लाख रुपयांचा पल्ला गाठला, तर एका वर्षांत दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. सध्या कंपनी २० कामगारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार पुरविते. कंपनीच्या या प्रवासात पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने चव्हाणांना मोलाची साथ दिली. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले. दख्खनचा राजा आणि चिंतामणी या अगरबत्त्या ‘साऊ’ची वैशिष्ट्ये होत.

 

संजय, कोल्हापूरहून मुंबईला नोकरीच्या शोधार्थ आलेला एक तरुण. आपल्या दोन भावांसोबत पत्राचाळीत राहायचा. एक मित्र त्याला नोकरीसाठी माटुंग्याला घेऊन आला. टॅक्सीतून उतरल्यावर मित्राने संजयकडे पाहिलं. ढगळ शर्ट, ढगळ पॅण्ट, पायात चप्पल. मित्र म्हणाला, “हे बघ संज्या, तुझी कापडं मुलाखत देण्याजोगी न्हाईत. तवा मी जातो मुलाखतीला. तुझं आपण नंतरच्याला बघू.” तो प्रसंग संजयच्या मनावर कायमचा कोरून गेला. आपले कपडे नीट नाहीत कारण आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही. हे सगळं आपण बदलायचं. संजयच्या निर्धाराने काही वर्षांतच सगळं काही बदललं. आज संजयची काही कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी आहे, तर त्याचा मित्र अजूनही नोकरीच करतोय. ही जिगरबाज कथा आहे ‘साऊ’ हा अगरबत्तीमधला मराठमोळा ब्रॅण्ड प्रस्थापित करणाऱ्या कोल्हापूरच्या रांगड्या संजय चव्हाण यांची.

 

निवृत्ती दादू चव्हाण आणि साऊबाई निवृत्ती चव्हाण हे दाम्पत्य कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीमधल्या साळफेवाडीचं. शेती हेच उपजीविकेचे साधन. तुकाराम, बाजीराव आणि संजय हे तीन मुलगे. तुकाराम मुंबईच्या सेंच्युरी मिलमध्ये कामाला जाई. सोबत त्याने बाजीरावला पण मुंबईला नेले. तुकाराम २००-५०० रुपये आईवडिलांना पाठवत असे. त्या काळात ती रक्कमसुद्धा चव्हाण कुटुंबीयांसाठी मोठी होती. दरम्यान संजयने कोल्हापूरमधून बीए पूर्ण केलं. बीए करून संजय मुंबईत नोकरी करण्यासाठी आला. शिवाजी बोंगाडे यांनी संजयला नीना सेल्स कॉर्पोरेशनमध्ये सेल्समन म्हणून कामाला लावले. पगार होता ६०० रुपये. अगरबत्ती, चॉकलेट अशा वस्तूंचे विपणन ही कंपनी करत असे. तिथे सुरेश चव्हाण नावाचे दुसऱ्या कंपनीचे एक मॅनेजर यायचे. संजयची मेहनत ते पाहत होते. त्यांनी संजयला वासू अगरबत्ती कंपनीमध्ये कामाला घेतले.

 

 
 

वासू अगरबत्ती कंपनीमध्ये सेल्समन, सुपरवायझर, एरिया सेल्स मॅनेजर अशा बढत्या त्याने मिळवल्या. १३ वर्षे तिथे काम केल्यानंतर शालीमार अगरबत्ती कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून त्याला संधी मिळाली. या ठिकाणी सहा वर्षे काम केल्यामुळे कंपनी कशी चालवावी याचं बाळकडू संजय चव्हाणांना मिळालं. याच दरम्यान संजयच्या एका गुजराती मित्राने भागीदारीमध्ये कंपनी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. संजयने त्यास होकार दिला. व्यवसायासाठी लागणारा पैसा मित्राचा तर व्यवसायाचे गणित, बाजारपेठ, कच्चा माल, उत्पादन याचे ज्ञान संजयचे असे ठरले. संजयने मेहनतीने कंपनीला आकार दिला. दुर्दैवाने याच काळात संजयला आजारपणामुळे इस्पितळात दाखल व्हावे लागले. इकडे मात्र संजयच्या मित्राने कंपनी तोट्यात आहे, असे सांगून कंपनी बंद केली. हा संजयसाठी खूपच मोठा धक्का होता. यावेळी संजयची पत्नी कांचन यांनी संजयला मोलाची साथ दिली.

 

आजारपणात जवळपास सगळे पैसे खर्च झाले. १० हजार रुपये शिल्लक होते. त्यातून परत कंपनी सुरू करण्याचे संजयने ठरविले, मात्र स्वत:ची १०० टक्के मालकी असलेली कंपनी. २५ जानेवारी, २०१४ साली ‘विएना परफ्युमरी वर्क्स’ सुरू झाली. आईवर संजयचा विशेष जीव होता. मात्र, काही वर्षांपूर्वीच आईचं निधन झालं. आपल्या आईची स्मृती आपल्यासोबत कायम राहावी म्हणून संजयने अगरबत्तीचा आपला पहिला ब्रॅण्ड तयार केला. त्यास आपल्या आईचं, ‘साऊ’ हे नाव दिलं. बाजारपेठेत असलेली विश्वासार्हता आणि पत यामुळे संजय चव्हाण यांच्या उत्पादनाला पहिल्या दिवसापासूनच मागणी येऊ लागली. अवघ्या अडीच महिन्यात ‘विएना परफ्युमरी वर्क्स’ने २७ लाख रुपयांचा पल्ला गाठला, तर एका वर्षांत दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. सध्या कंपनी २० कामगारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार पुरविते. कंपनीच्या या प्रवासात पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने चव्हाणांना मोलाची साथ दिली. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले. दख्खनचा राजा आणि चिंतामणी या अगरबत्त्या ‘साऊ’ची वैशिष्ट्ये होत.

 

संजय चव्हाणांना आपल्या गावी, साळफेवाडीमध्ये दुसरं उत्पादन केंद्र सुरू करायचं आहे. या माध्यमातून आपल्या गावात रोजगार न्यायचा आहे. किमान २० गावकऱ्यांना तरी रोजगार द्यायचा आहे. संजय चव्हाण यांनी आपल्या दुसऱ्या पिढीलासुद्धा व्यवसायात आणले आहे. त्यांचा पुतण्या हा विक्रोळीतील उत्पादनकेंद्र पाहतो, तर त्यांचा बारावीमध्ये शिकणारा मुलगा, सुशांत हा कॉलेजमधील लेक्चर्स संपले की थेट कंपनीमध्ये येतो. उत्पादन प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करतो. भविष्यात ‘साऊ’ ब्रॅण्ड देशाबाहेर पोहोचविण्याचा चव्हाणांचा मानस आहे. त्यासाठी सुशांतला आयात-निर्यात विषयात शिक्षण देण्याचा त्यांचा विचार आहे. “मराठी मुलांनी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये यावं, ही क्षेत्रे माणसाचा सर्वांगीण विकास घडवतात. या क्षेत्रात उभा राहिलेला माणूस जगात काहीही विकू शकतो,” असं चव्हाण म्हणतात. २०२० मध्ये कंपनी ६ कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करेल, असा त्यांना विश्वास वाटतो. विक्रोळीमधल्या सूर्यानगरमध्ये चव्हाणांचा अगरबत्तीचा छोटा कारखाना पाहिला तर वाटणारच नाही की, याची काही कोटी रुपयांची उलाढाल आहे. खरंतर असे लघुउद्योगच भारताला महासत्ता बनवतील. ‘यह नया हिंदुस्थान है।’

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@