अजोय मेहता राज्याचे नवे गृहसचिव?

    19-Jan-2019
Total Views |



मुंबई : राज्यातील विविध विभागांचे प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार असून अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध विभागांच्या प्रधान सचिवपदी असलेल्या बहुतांश अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.

 

सद्यपरिस्थितीत कृषी विभाग, गृह विभाग, महिला व बाल कल्याण विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. त्यामुळे ही पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नगरविकास २ च्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्याची शक्यता आहे. विद्यमान आयुक्त अजोय मेहता यांना गृह विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजयकुमार यांचीही बदली होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांना लोकसभा निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असून त्यानंतर वित्त विभागाचे प्रमुख यु. पी. एस. मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/